पत्र क्र ९९
लंडन मध्ये फिरताना तिथल्या अनेक इमारती जशा खुणावतात तशीच तिथली सगळी ट्रान्सपोर्ट सिस्टिम आपले लक्ष वेधून घेते. ती प्रसिद्ध ट्यूब , तिचे ते ज्युबिली लाईन, पिकॅडली लाईन, व्हिक्टोरिया लाईन, बेकरलू लाईन,...
जगाच्या पाठीवर ... कधीतरी कुठेतरी पत्र क्र ९९लंडन मध्ये फिरताना तिथल्या अनेक इमारती जशा खुणावतात तशीच तिथली सगळी ट्रान्सपोर्ट सिस्टिम आपले लक्ष वेधून घेते. ती प्रसिद्ध ट्यूब , तिचे ते ज्युबिली लाईन, पिकॅडली लाईन, व्हिक्टोरिया लाईन, बेकरलू लाईन, एलिझाबेथ लाईन, अशा अनेक नावांनी पसरलेले जमिनीखालचे रेल्वेचे जाळे. त्यामुळे कुठूनही कुठेही जाताना वेळ वाचतो. रस्त्यांवर ताण येत नाही. वेगवान गाड्या इकडून तिकडे काही मिनिटात नेऊन घालतात. तरी मला मात्र लंडनच्या बसेस मधून फिरायला जास्ती आवडले कारण सगळा परिसर बघत बघत जाता येते. लंडनची ट्यूब स्टेशन्स सगळ्या महत्वाच्या स्टेशन्सना जोडली आहेत. मात्र हा सगळा प्रवास महागही आहे. अर्थात आपण प्रत्येक वेळी पौंडाची तुलना रुपयाशी केल्यास ती महागाई नक्कीच जास्त जाणवते. लंडनच्या त्या दुमजली बस मध्ये वरच्या मजल्यावर चढून गम्मत बघायला आपल्याला थोडे बालपणाकडे जावे लागते. आपले वय विसरून, बालपणीच्या निरागसतेने बाहेरच्या प्रत्येक गोष्टीचे अप्रूप वाटून घ्यावे, की झाले तुमचे तिकीट वसूल. लंडन मध्ये फिरायला एक छानसे ऑईस्टर कार्ड घ्यायचे, बस मध्ये चढताना, ट्रेन स्टेशन मध्ये शिरताना आणि बाहेर पडताना कार्ड रीडर वर ठेवायचे आणि मजेत प्रवास करायचा, असे कळले. पण पहिल्यांदाच पॅडीग्ट्न स्टेशनबाहेर ट्रॅफल्गार साठी बस मध्ये चढलो, आम्ही कार्ड रीडर वर ऐटीत कार्ड ठेऊन पुढे आलो पण मागे असलेल्या एका स्त्रीचे कार्ड काही चालेना. ते होत नाही तोवर बस हलणार नव्हती. ती पण रडवेली झाली, तिने कार्ड टॉप अप केल्याची रिसीट पण दाखवली. मग काय झाले असावे? मला उगाचच चिंता, तुमचे कार्ड जर नाही चालले तर दंड म्हणून बसच्या पूर्ण प्रवासाचे भाडे द्यावे लागते. आता ती काय करेल? तेवढ्यात स्टॉप जवळचा एक बस इन्स्पेक्टर मदतीला आला, कदाचित तिने कुठल्या तरी मॅग्नेट जवळ कार्ड ठेवले असावे ज्यामुळे ते खराब झाले, असे म्हणाला. मग तिला उतरवून ऑफिस कडे घेऊन गेला नवीन कार्ड द्यायला. मग आमची बस हलली . आता आपणही सतर्क राहायला हवे बाबा. त्या ट्यूब्ज चे जाळे समजून घेताना ते आखणाऱ्या बुद्धिवंतांची खरोखर कमाल वाटते. जमिनीखाली एका स्तरावर एक, त्याखाली दुसरी , त्याखाली तिसरी, बापरे, किती खोल जाणार? आणि सगळ्यात नवी एलिझाबेथ लाईन, राणींच्या राज्याभिषेकाला सत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांनीच ते ऑईस्टर कार्ड घेऊन अलीकडेच उदघाटन केलेली , सगळ्यात खाली. ती लाईन बांधायला अर्थातच जास्त काळ लागला. १८६३ साली, जगातील पहिली जमिनीखालची रेल्वे लंडन च्या पॅडिंग्टन स्टेशन पासून सहा स्टेशन पार करत फॅरिंगडन ला पोचली. आणि तेव्हापासून लोकांची हि लाडकी " ट्यूब " , घुशीच्या बिळा सारखी, सतत सर्व दिशेंनी जमिनीखाली पसरत आहे, आज ११ लाईन्स आणि २७० स्टेशन्स च्या जाळ्यातून त्या ट्यूब्ज पळत असतात. सुरुवातीला दूरच्या भागातील लोकांची सोय व्हावी म्हणून ती धावली. आणि ट्यूब आहे म्हणून तिथे रहिवासी आले, ऑफिसेस आली, सगळ्या परिसराचा विकास झाला. काही लाईन्स लोकांसाठी आल्या तर काही ठिकाणी लाईन्ससाठी लोक आले. पहिल्या पन्नास वर्षातच जमिनीखालच्या बरेचसे बोगदे , त्यावर वायुविजनासाठी खिडक्या वगैरे बांधून झाले होते. तेव्हा वाफेवर चालणारी इंजिनं होती, त्यामुळे खूप खोल जाणे कठीण होते, त्या इंजिनाचा धूर बाहेर पडण्यासाठी खूप खिडक्या कराव्या लागत. पण एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला इलेक्ट्रिकची इंजिनं आली आणि जमिनीत खोल खणत जाणे शक्य झाले. तसे अजून अजून पृथ्वीच्या पोटात शिरत नवनवीन लाईन्स काढल्या गेल्या. प्रत्येक लाईन काढताना काही मजेदार गोष्टी तिच्याभोवती येत. जसे, बेकरलू लाईन काढली तर म्हणे काही धनदांडग्यांना लॉर्ड्स वर क्रिकेटची मॅच बघायला जायला सोय म्हणून ती काढली गेली. आणि खूप टीका सुरु झाली. पण ह्या टीकेला खोटे ठरवत ती लाईन खूप लोकांना उपयोगी पडू लागली. १० मार्च १९०६ ला उदघाटन झाल्यावर जवळजवळ ३६००० लोकांनी ती अगदी थोड्या कालावधीत वापरली, क्रिकेटचा हंगाम अजून सुरु व्हायचा होता तरी पण. सेंट्रल लाईन सगळ्यांची कामाची, लंडन च्या मध्यभागी महत्वाचे दोन स्टेशन जोडणारी, १९०० साली बांधून झाली. तेव्हा तिचे तिकीट दोन पेनी होते, तर प्रेसमध्ये लगेच तिचे नामकरण, " टुपेनी ट्यूब " करण्यात आले. ह्या ट्यूब चालवणे काही एका कम्पनीचे काम नव्हते. मेट्रोपोलिटन रेल्वे आणि डिस्ट्रिक्ट रेल्वे अशा दोन कंपन्या सर्कल लाईन भागात होत्या. आधी हि सर्कल लाईन गोल गोल फिरत असे. पण ह्या दोन कम्पन्यां मध्ये वाद झाले. मग एक जण घड्याळाच्या दिशेने तर दुसरी कम्पनी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने हि लाईन चालवू लागली. मजा म्हणजे अगदी २००९ पर्यंत हे असेच चालू होते. नंतर मात्र ती एक लाईन झाली. सुरुवातीच्या काळात, "उन्हाळ्यातील थंड हवेचे ठिकाण" अशी ह्या ट्यूब ची ख्याती होती. कारण जे बोगदे बांधले होते त्याला उष्णता शोषून घेणाऱ्या चिखलाचे आवरण केलेले होते. आत प्रामुख्याने इंजिनच उष्णता तयार करीत, इतर गोष्टी म्हणजे स्टेशनच्या इमारती आणि प्रवासी फार कमी उष्णता वातावरणात सोडत. जी काही उष्णता तयार होई, त्यातली ८० टक्के उष्णता त्या चिखलाच्या भिंती शोषून घेत. उर्वरित उष्णतेपैकी बरीचशी वायुविजनासाठी सोडलेल्या खिडक्यांतून बाहेर जाई . पण कालांतराने , त्या भिंतींची उष्णतारोधक क्षमता कमी झाली. आणि त्या फारशी उष्णता शोषून घेईनात. बाहेरचे तापमान पण वाढू लागले. आणि ट्यूब ने प्रवास करणे जरा जिकिरीचे झाले. हल्ली आत किती माणसे आहेत आणि किती तापमान वाढले आहे ह्याचा सततचा लेखाजोखा ठेवतात. जराही कुठे तापमान सहन करण्यापलीकडे गेले असे जाणवले कि ते स्टेशन सरळ बंद करतात. सगळीकडे सूचना लिहिलेल्या आहेत, बरोबर पाणी ठेवा आणि ते सतत पित राहा. खूप खोल असल्याने उष्णता बाहेर काढणे कठीण झाले, गाड्या काही वातानुकूलित नव्हत्या . कारण ते वातानुकूलन यंत्र बसवायला एक तर जागा नव्हती आणि त्या यंत्राने निर्माण होणारी जास्तीची उष्णता पुन्हा प्रश्न निर्माण करू लागली. अलीकडे ज्या लाईन्स उथळ आहेत त्यांच्या बोगद्यांना जास्तीच्या खिडक्या काढून उष्णता बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. पण हा मोठाच प्रश्न भेडसावू लागला. २००३ च्या भयंकर उन्हाळ्यात तर खूप कठीण परिस्थिती निर्माण झाली, मग लंडनच्या मेयरनी ह्या प्रश्नाचे उत्तर शिधून देणाऱ्यास १ लाख पौंडा चे बक्षीस जाहीर केले, दोन वर्षे झाली तरी कोणी ते मिळवू शकले नाही. काही स्टेशनमध्ये , लाईनच्या खाली पाणी साठवून बघितले, काही वेळा गाड्यांमधून मोठमोठ्या बर्फाच्या शिळा ठेवून बघितल्या, पण हा प्रश्न अजूनही तसाच आहे. आता काही नवीन वातानुकूलित गाड्या आणून प्रयत्न करून बघत आहेत. पण तोवर आत गरम झाले म्हणून लाईन बंद. पिकॅडली स्टेशनच्या जवळ संध्याकाळी, बघितले प्रचंड गर्दी जमली होती. काय झाले असावे? उगाच जाऊन विचारले तर कळले आत तापमान वाढलेय म्हणून प्रवेश बंद. शेरलॉक होम्सच्या घराला भेट देऊन धावतच बेकर स्ट्रीट स्टेशन गाठले. कारण पुढच्या ठिकाणी वेळेत पोचायचे होते. थोडे आत गेलो आणि सायरन वाजायला लागला. कळेना काय करावे, एक पोलीस आला अतिशय नम्रतेने आम्हाला स्टेशन बाहेर जाण्यास सांगितले कारण आतले तापमान वाढले होते.
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.