पत्र क्र १००

दुसऱ्याच स्टेशन मध्ये बाहेर येणार. स्टेशन वरून आठवले , काही स्टेशन्स म्हणजे सुंदर इमारतींचा अप्रतिम नमुना आहेत. बघत राहावे अशी कारागिरी. सर इसामबाड किंगडम ब्रुनेल ह्या अतिशय गुणी आणि विद्वान...

कीर्ती वडाळकर
||4 min read

बघता बघता शंभरावे पत्र की हो आले! पण हा प्रवास आहे, तो चालू राहायला हवा, जो थांबला तो संपला. बघू या कुठवर जातोय आपण ते.

तर आपण लंडन मध्ये फिरत होतो. राणीच्या कारकिर्दीला सत्तर वर्ष पूर्ण झाली म्हणून गेले चार दिवस लंडन सजले आहे. सगळ्या ब्रिटनभर विविध कार्यक्रम आणि स्ट्रीट पार्टीज चालू आहेत. एखाद्या जबाबदारीच्या पदावर सत्तर वर्षे राहणे म्हणजे खरंच कमाल आहे. राणींच्या ह्या कर्तृत्वाला त्यांचे नागरिक अनोखी सलामी देत आहेत.

ती ट्यूब म्हणजे एक मोठं कोडं आहे हा लंडनचं , पण प्रवास मात्र एकदम जलद. ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जमिनीच्या पोटातून! एका स्टेशनमधून आत गेलो कि कुठेतरी दुसऱ्याच स्टेशन मध्ये बाहेर येणार.

स्टेशन वरून आठवले , काही स्टेशन्स म्हणजे सुंदर इमारतींचा अप्रतिम नमुना आहेत. बघत राहावे अशी कारागिरी.

सर इसामबाड किंगडम ब्रुनेल ह्या अतिशय गुणी आणि विद्वान अभियंत्याने, ग्रेट वेस्टर्न रेल्वे साठी , १८५४ साली बांधलेले लंडन पॅडिंग्टन स्टेशन. सुरवातीला फक्त मुख्य लाईनचे असलेले हे स्टेशन आज लंडनचे अतिशय गजबजलेले स्टेशन आहे. एक मुख्य लाईन, पाच ट्यूब लाईन्स, हीथ्रो एक्सप्रेस, tfl रेल, बाहेर गावी जाणाऱ्या ट्रेन अशा अनेक दिशांनी जाणारे येणारे प्रवासी ह्या स्टेशन वर येतात. एकशे साठ पेक्षा जास्ती वर्षे राहिलेली मुख्य इमारत उत्तमरित्या जतन केली आहे. जसजशा रेल्वे लाईन वाढत गेल्या तसतशा प्लॅटफॉर्म, लाईन्स जास्तीचे टाकावे लागले तरी मुख्य इमारत तशीच राखली आहे. आजूबाजूला अतिशय महत्वाच्या इमारतींपैकी एक म्हणजे सेंट मेरी हॉस्पिटल. पण ह्या स्टेशनचा जराही त्रास बाहेर जाणवत नाही. सकाळच्या वेळी अनेक उपनगरवासी इथे येतात आणि आपल्या ऑफिस च्या दिशेने जाणाऱ्या ट्यूब मध्ये शिरतात. काहीजण तर घडीची सायकल घेऊन येतात, इथून पुढे सायकल ने जातात. सकाळचे दृश्य बघण्यासारखे असते. तसेच संध्याकाळचे पण. बाकी वेळ फारशी काही गर्दी नाही. छान वाटते त्या इमारती मध्ये. वरचे गोलाकार लांबवर असलेले छप्पर नजरेत भरते. हे शेवटचे स्टेशन आहे. अनेक छोटे मोठे अपघात पचवून आजही दिमाखात उभे आहे. छोटे छोटे अपघात म्हणजे कधी यार्डात नेताना गाडी रुळावरून घसरली , कधी यार्डातून येताना. पण १९९९ साली स्टेशन मध्ये जाणाऱ्या गाडीच्या ड्रायव्हरने सिग्नल तोडला आणि समोरून येणाऱ्या गादीवर जाऊन आदळला. बरीच माणसे त्यात मृत्युमुखी पडली. आणि त्याआधी म्हणजे १९९१ साली आयरिश रिपब्लिक आर्मीने बॉम्ब टाकल्यामुळे त्या सुंदर गोलाकार छताला थोडे नुकसान सोसावे लागले पण अर्थातच ते छत सगळे पुन्हा होते तसे केले गेले. काही छान छान गोष्टी इथे बघण्यासारख्या आहेत. सर इसामबाड किंगडम ब्रुनेल ह्यांचा पुतळा आहे. स्टेशनला शंभर वर्षे झाली तेव्हा एक छान पितळी पाटी पण लावली आहे. ग्रेट वेस्टर्न रेल्वे चे पण एक मेमोरियल आहे. त्यांचे अडीच हजार कर्मचारी पहिल्या महायुद्धात कामी आले. ग्रेट वेस्टर्न रेल्वे ने त्या कर्मचाऱ्यांना पगारी नोकर ठेवत शेवटपर्यंत मान दिला. त्या सगळ्यांचे स्मारक तिथे आहे. पॅडिंग्टन बेअर , मायकेल बॉण्ड च्या पुस्तकातील पेरू देशातून आलेले अस्वल . त्याच्या कोटावर एक चिठ्ठी असते, "ह्या अस्वलाला सांभाळा". त्याचे नाव ह्या स्टेशनवरूनच पडले. परवा च राणींच्या ज्युबिली महोत्सवात एक क्लिप ह्या पॅडिंग्टन बेअर बरोबर होती. सगळ्यांचा आवडता हा पॅडिंग्टन बेअर तिथे घड्याळाखाली पुतळा बनून बसलाय. ह्या शिवाय शेरलॉक होम्स, अगाथा ख्रिस्ती, वगैरे नामवंत लेखकांच्या कितीतरी कलाकृतींमधून पॅडिंग्टन स्टेशन आपल्याला भेटते. पॅडिंग्टन स्टेशनच्या बाहेरच असलेले हिल्टन हॉटेल , दगडातून बांधलेली सुंदर इमारत. तिथे चांगले सहा दिवस राह्यल्यामुळे हा सगळा परिसर अगदी पिंजून काढला.

आधुनिक आर्किटेक्चर चा उत्तम नमुना म्हणजे सेंट पॅनक्रास अँड किंग्स क्रॉस स्टेशन. १८६२ साली बांधलेले सेंट पॅनक्रास स्टेशन. त्याच्या सुंदर छताकडे बघत राहावे असे आहे. स्टेशनच्या समोरच्या बाजूची इमारत म्हणजे मिडलँड ग्रँड हॉटेल आहे, अगदी पॅडिंग्टन स्टेशन सारखेच. त्याचे बांधकाम १८६८ साली झाले. आजही ते तसेच जपले आहे. पण आत कळतसुद्धा नाही कि आपण ज्या इमारतीमध्ये आलो आहोत ती रेल्वे स्टेशनची आहे. जेव्हा युरोस्टार ही वेगवान रेल्वे लंडन आणि युरोपच्या मुख्य शहरांमधून धावेल असे ठरले, तेव्हा त्या दर्जाचे स्टेशन बांधणे जरूरी भासू लागले. मग ही जुनी इमारत जमीनदोस्त करून त्याजागी मोठी इमारत बांधण्याचा प्रस्ताव आला आणि त्या प्रस्तावाला जनक्षोभाला बळी पडावे लागले. खूप टीका झाली आणि जुनी इमारत अबाधित तर राहिलीच पण बऱ्याच मोठ्या प्रमाणात खर्च करून तिला अत्याधुनिक करण्यात आले. आता ह्या स्टेशन मधून युरोस्टार तर धावतेच पण स्कॉटलंडकडे, नॉटिंगहॅम कडे वगैरे अनेक दिशांनी गाड्या जातात. ह्या इमारतीवरचे मोठे घड्याळ असलेले टॉवर आपले लक्ष वेधून घेते. अगदी बाजूलाच लंडन्स किंग्ज क्रॉस स्टेशन आहे. १८५२ साली बांधलेले हे स्टेशन , इतक्या दिशांनी जाणाऱ्या रेल्वेला सेवा देते न, तिथल्या बोर्डवर त्यांची लिस्ट पाहून आश्चर्य च वाटते. केवढा मोठा पसारा तो! बाजूचे सेंट पॅनक्रास आणि हे लंडन्स किंग्ज क्रॉस स्टेशन मिळून हजारो प्रवासी रोज ये जा करतात.

अलीकडेच झालेल्या नूतनीकरणामध्ये , झाडातून निघालेल्या असंख्य फांद्या वाटाव्यात, अशा प्रकारे लोखण्डी ट्यूब्ज मधून सुंदर छत तयार केले आहे. मधला भाग जमिनीतून निघतो तो वरवर सगळ्या दिशांनी पसरत जातो. नेत्रदीपक कलाकृती. आम्ही गेलो तेव्हा ऑकटोबर चा महिना होता. जिकडे तिकडे पॉपी ची फुले दिसत होती. कुठे रिंग करून टांगलेली, कुठे मोठे फुल, कुठे छोटे. लोक ड्रेसवर त्याचे बिल्ले, पिन, लावतात. जगभरात जे लोक आतंकवादाला बळी पडले, युद्धात मारले गेले, निर्दोष मारले गेले, अशा सगळ्यांच्या आठवणीसाठी. असेच एक भले मोठे लाल काळे फुल त्या जमिनीतून उगवणाऱ्या पाईप च्या झाडावर लावले होते. सगळा परिसर त्याच फुलांनी सजवला होता.

लंडनमध्ये फिरताना ह्या सगळ्या इमारती तर आपल्याला भेटतातच पण जगातील सगळ्यात पॉवरफुल समजली जाणारी इमारत, बकिंगहॅम पॅलेस. सुंदर तर आहेच, मला प्रकर्षाने गंमत वाटली ती तिच्या परिसरातील काही पाट्यांची , तुमच्या किंमती वस्तू सांभाळा, परिसरातील चोरांपासून सावध रहा, खिसा पाकीट सांभाळा!! जगातल्या महत्वाच्या इमारतीच्या परिसरात चोरी? अरे देवा!

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments