पत्र क्र १०१

तुमच्या पत्रिकेत जसा भ्रमंती योग असावा लागतो तसाच परदेश गमन योगही असावा लागतो म्हणतात. मग हा योग श्रीलंका, पाकिस्तान अशा शेजारी देशांना जाऊन वाया नाही घालवू म्हणे, आणि ते नेपाळ तर धारचुलाहुन पुढे, तो...

कीर्ती वडाळकर
||4 min read

तुमच्या पत्रिकेत जसा भ्रमंती योग असावा लागतो तसाच परदेश गमन योगही असावा लागतो म्हणतात. मग हा योग श्रीलंका, पाकिस्तान अशा शेजारी देशांना जाऊन वाया नाही घालवू म्हणे, आणि ते नेपाळ तर धारचुलाहुन पुढे, तो पूल ओलांडून, चालत जाऊन पण येते. अरे देवा , एक योग फुकट गेला की काय मग? जाऊन जायचं तर जरा लांबच्या देशांना जा असं एकदा माझी मैत्रीण म्हणाली. पण खरं सांगू का असं काहीच नसावं, कुठेही भ्रमण करा, लहान मुलांच्याठायी असलेल्या कुतुहलासारखे कुतूहल आपल्यात जागृत ठेवावे हे मात्र खरे.

अगदी शेजारी देश श्रीलंका. कितीतरी जण जाऊन आले असतील. तामिळनाडूत फिरतोय कि काय असा क्षणभर भास व्हावा. अलीकडे खूप मोठ्या संकटाचा सामना करतोय. हा देश म्हणजे "भारताचा अश्रू " किंवा धान्यकोठार म्हणून ओळखला जातो. अनेक वर्षांची देखणी परंपरा ह्या देशाला आहे. आपण तर रावणाची लंका म्हणून ओळखतो. रावणाबद्दल मनात असलेली भीती जपतच आपण ह्या देशाकडे बघतो. पण जायला अगदी सोपा. भारतीयांना व्हिसा तिथे पोचल्यावर मिळतो त्यामुळे आधीपासून धडपड करावी लागत नाही. पण "भारताचा अश्रू" का बाँ ? तर भारतापासून वेगळा झालेला प्रदेश, भौगोलिक आकार बघितला तर पाण्याच्या थेंबासारखा आहे, वेगळा झाला म्हणून तो अश्रू! पूर्वापार श्रीलंकेचा समुद्रकिनारा सगळ्या व्यापाराला सोयीचा होता. सिल्क रूट च्या काळापासून व्यापाऱ्यांनी ह्या बंदराला पसंती दिली. म्हणून तिथे सतत कुठले न कुठले धान्य भरलेले जहाज आलेले असे. थोडी विश्रांती घेऊन मार्गस्थ होई. दुसरं असं की , चांगला पाऊस, सुपीक जमीन ह्यामुळे त्यांची धान्य कोठारेही भरलेली असत. म्हणून धान्यकोठार !

मोक्याचे बंदर म्हणून जरी श्रीलंकेची ख्याती होती तरी तेच कारण होते ज्यामुळे श्रीलंकेला सगळ्यात जास्त संघर्ष सहन करावा लागला. अतिप्राचीन काळापासून हा देश अस्तित्वात होता असे पुरातत्व शास्त्रज्ञांचे मत आहे. खूप जुना म्हणजे किती? , तर अगदी पाच लाख वर्षांच्या पूर्वी सुद्धा हा देश असावा असे काहींचे मत आहे. वेदा नावाची एक आदिवासी जमात आजही आहे, त्यांचेच पूर्वज अनंत काळापूर्वी होते असे मानतात. नंतरच्या काळात, म्हणजे जवळ जवळ ख्रिस्त पूर्व हजार बाराशे वर्षांपूर्वी सिलोन हा भारताचा भाग होता असेही पुरावे आहेत. दक्षिण भारताशी संलग्न असलेला हा भूभाग कालांतराने पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने भारताच्या मुख्य भूमीपासून दूर झाला असे मानतात. अनेक भांडी, गाडगी मडकी, नाणी, वगैरे सापडली ज्यावरून सिलोन भारताचा भाग असावा ह्या मानण्याला दुजोरा मिळतो. प्रामुख्याने द्रविड संस्कृती चे पालक लोक इथे होते आणि आजही आहेत.

फार पूर्वी बंगाल मधून हद्दपार झालेला एक विजय नावाचा राजपुत्र, आपल्या सातशे लोकांना घेऊन , सिलोनच्या भूमीवर पोचला. आणि अनेक वर्षे राज्य केले. त्यानंतर श्रीलंकेने १८९ राजे बघितले. सुरवातीच्या काळात प्रामुख्याने हिंदू असलेला हा देश ख्रिस्तपूर्व २५० वर्षांपूर्वी सम्राट अशोकाच्या भेटीने बुद्ध धर्माकडे आकर्षित झाला. मग अनेक शाळा निर्माण झाल्या. त्यात प्रामुख्याने धर्माची शिकवण दिली जाई . ख्रिस्तपूर्व काळात प्रथम महिला राणी असलेला हा पहिला आशियाई देश आहे. राणी अनुला ह्या अनुराधापुरम च्या राणी होत्या. त्यांच्या काळात बरेच बांधकाम झाले. आणि ते आजही सापडते.

मध्ययुगात श्रीलंकेचे बरेच नुकसान झाले. धान्य, वस्तू ने आण करण्यासाठी तिथल्या बंदरावर हक्क मिळवण्यासाठी अनेक युद्धे झाली. ह्या सगळ्यात बुद्ध धर्म हि लोप पावायला लागला. तेव्हा राजा विजयबाहू सत्तेवर आला. पडझड झालेल्या देशाला त्याने खूप सावरले. ब्रम्हदेश हुन बुद्ध साधू बोलावून देशात परत बुद्ध धर्म बहाल केला. त्याच्या प्रयत्नाला त्याच्या नंतर आलेल्या पराक्रमबाहू राजाने चांगलं वर नेलं. सिचनाच्या नवीन पद्धतीने शेती साकारायला मदत केली. खूप धरणं , कालवे, छोटे मोठे जलाशय बांधले. देशाला सुवर्णकाळ बहाल केला पण त्याच्या नंतर मात्र देशाची वेगाने पीछेहाट झाली. अनेक आक्रमणं झाली. त्यातही खूप नुकसान झाले. १५०५ मध्ये पोर्तुगीज आले. त्यांनी हळूहळू हातपाय पसरायला सुरवात केली. त्यांनी सर्वप्रथम कोलंबो मध्ये , समुद्राजवळ एक किल्ला बांधला आणि हळूहळू आजूबाजूचा किनारा आणि बंदर काबीज केले . मग तिथल्या राजांशी सततची खटपट सुरु झाली. ते राजे बिचारे आधीच बाहेरच्या आक्रमणांनी रंजीस आले होते त्यात हे तर घरातच घुसले होते. १६३८ मध्ये डच आले. तेव्हा राजाने डच इस्ट इंडिया कम्पनीशी करार केला की त्यांनी पोर्तुगीजांना हकलवुन लावायला मदत करावी. त्याप्रमाणे युद्ध झाले, डचांनी पोर्तुगीजांना हाकलवले, पण स्वतःच टेकले तिथे. सगळी पोर्तुगीजांची भूमी आणि बंदरे त्यांनी काबीज केली आणि स्वतःचे बस्तान बसवले. राजाशी केलेल्या कराराचा हा भंग होता. म्हणजे आगीतून सुटून फुफाट्यात! आता डचांशी मारामाऱ्या सुरु झाल्या. तेव्हाचा जो राजा होता तो निपुत्रिक गेला. मग पुन्हा गोंधळ. त्यांच्या भावाच्या छोट्या मुलाला गादीवर बसवले. तेवढ्यात ब्रिटिशांनी आक्रमण केले कारण त्यांना वाटले नेपोलियन जग जिंकायला निघालाय,आपल्याला शक्य तितका जास्ती भूभाग काबीज केला पाहिजे. पण लवकरच तिकडे फ्रेंच आणि ब्रिटिशांमध्ये करार झाला आणि त्यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कम्पनी ला श्रीलंकेचा किनारा देऊन टाकला. आता कोणाचा किनारा आणि कोण देतंय बघा, गोंधळ नुसता.

ब्रिटिशांनी मग सगळा देश काबीज केला. तिथे प्रस्थापित पिकांपेक्षा वेगळी पिके आणली. जास्ती पैसे मिळवून देणारे कॉफीचे झाड आणले. ते तिथे चांगले रुजले. पण जागतिक मंदीच्या काळात पुन्हा नुकसान सुरु झाले. मग ब्रिटिशांनी अनेक प्रकारचे कर जनतेवर लादले. त्यात जनता भडकली. मग एक प्रकारचा रोग कॉफी च्या पिकावर पडला. पुन्हा प्रचंड नुकसान. ब्रिटिशांनी लगेच पीक बदलून चहाचे मळे लावले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला रबराचे मळे लावले. ह्याच कालावधीत श्रीमंत आणि गरीब असे दोन वर्ग निर्माण झाले. आणि अगदी भारतासारखेच जातपात, वंशभेद सुरु करून दिले गेले. खरतर तोवर तामिळ आणि सिंहली लोकांमध्ये अत्यन्त सलोखा होता. पण तो मोडला आणि नागरी युद्ध सुरु झाले आणि ते अनेक वर्षे चालले. ४ फेब्रुवारी १९४८ ला स्वतंत्र झालेल्या श्रीलंकेत अराजक नेहेमीचेच झाले.

नागरी युद्ध कमी होत कि काय तर सुनामी पण बेट धुवून गेली. अस्तित्वाची प्रचंड लढाई सतत लढणारा हा देश अनेक गोष्टींमुळे सुंदर आहे.

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments