पत्र क्र १०२
"लंकेत सोन्याच्या विटा" ह्या म्हणीचे मला लहानपणी खूप आकर्षण होते. खरंच तिथे सोन्याच्या विटा आहेत का? त्यांनी ते लोक घर बांधतात का? म्हणजे सगळीकडे किती चकचक असेल न? पण खऱ्या लंकेत अनेक गहन प्रश्न...
"लंकेत सोन्याच्या विटा" ह्या म्हणीचे मला लहानपणी खूप आकर्षण होते. खरंच तिथे सोन्याच्या विटा आहेत का? त्यांनी ते लोक घर बांधतात का? म्हणजे सगळीकडे किती चकचक असेल न? पण खऱ्या लंकेत अनेक गहन प्रश्न आहेत. कसल्या सोन्याच्या विटा, गरिबांना मातीच्या विटा पण मिळेनाशा झाल्यात.
ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा ही त्यांची नीती सगळीकडेच राबवली. त्याप्रमाणे लंकेत पण अनेक गट तट निर्माण झाले. शिक्षणापासून वंचित जनता अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ लागली. नैसर्गिक संकटे पण खूप आली. दक्षिण भारतातील राज्यांसारखे सुंदर भाग इथे आहेत. डोंगर दऱ्या आहेत, जंगलं आहेत , सुंदरसा समुद्रकिनारा आहे. पाऊसपाणी चांगले आहे, त्यामुळे पिके उत्तम आहेत.
सत्तर टक्के जनता बुद्ध आहे, उरलेल्या ३० टक्के मध्ये हिंदू, ख्रिश्चन, मुसलमान आहेत. एकदा आम्ही तिथे गेलो तेव्हा ख्रिसमस होता. कितीतरी घरांच्या बाहेर गोठा सजवलेला बघितला.
ब्रिटिशांनी आणलेली काही नवीन पिके म्हणजे कॉफी, चहा, रबर इथल्या वातावरणात रमली. आणि देशाला चांगले उत्पन्न मिळवून देऊ लागली. डोंगर भागात इतके रम्य मळे बघायला मिळतात. मसाल्याचे पदार्थ तर उत्तम होतातच. श्रीलंकन मसाले प्रसिद्ध आहेतच. खूप प्रकारचे आणि चवीचे तयार मसाले बघायला मिळाले. खरं तर श्रीलंकेत जाण्या अगोदर इंडोनेशियात गेलो होतो आणि तिथे आम विक्रीला फारसे मसाले दिसले नव्हते. आपण आपल्या केरळातच घ्यावेत मसाले अशा मताची तोपर्यंत मी बनले होते. आणि अचानक पहिल्या दिवशीच तिथला गाईड म्हणाला ," तुम्हाला मसाल्याच्या बागा बघायला आवडतील का?" अरे नेकी और पूछ पूछ ? चल न लगेच.
सुंदरशा समुद्रकिनाऱ्याच्या सोबतीने लांबवर गेलो आणि किती सुंदर मसाल्याच्या बागा बघितल्यात म्हणून सांगू! भरपूर खरेदी पण झाली. सुंदर बागेतून, एकेका मसाल्याच्या पदार्थाच्या झाडाची माहिती घेत गेलो. त्या लोकांना माहिती पण चांगली होती. बऱ्याच वस्तूंपासून मसाले, तेलं वगैरे पदार्थ करून ते विकत होते. कुठे आयुर्वेदिक उपचार करून देत होते. स्वयंपाकात वापरायचे मसाले पण कसे बनवायचे ते सांगत होते, काय वापरा, कसे वापरा वगैरे छान माहिती देत होते.
ती मसाल्याची बाग पण खूप रम्य होती. श्रीलंकन दालचिनी प्रसिद्ध आहे, ती पण कधी कापतात झाडापासून ते बघितले.
तिथे सर्वप्रथम मी नारळाच्या सर्वच भागांचा वापर केलेला बघितला. झावळी चा हिर काढून झाडू करतात हे माहित होते पण तोच हिर रंगवून , त्याच काढलेल्या झावळी च्या पानाची फुले लावून इतकी सुंदर रचना केली होती. नारळाच्या काढलेल्या शेंड्या वापरून बागेला काठ केले होते. ते तर मला खूपच आवडले. आपण विटा वापरतो, किंवा भिंती बांधतो त्यापेक्षा ह्या लाल गेरू आणि पांढऱ्या चुन्याच्या रंगसंगतीत नीटपणे रचलेल्या शहाळ्याच्या शेंड्या ! काय कल्पना होती ती. त्यातल्या बागेला एक वेगळाच नूर होता. झावळीचा मधला दांडा काढून , तासून, रंगवून काय सुंदर वस्तू केल्या होत्या! नारळ ज्या फुलोऱ्यात लागतात, त्यातून ते सुटून खाली पडले कि उरलेल्या फुलोऱ्याचा केलेला उपयोग अफलातून होता. आतले पाणी पिऊन आणि खोबरे खाऊन झाल्यावर उरलेल्या शहाळ्यातून अनेक कलाकृती कोरलेल्या होत्या. बटणाचे डोळे लावून माकडे केली होती, कोरून कमळ केले होते, फुलदाण्या केल्या होत्या.
आणि नारळाच्या करवंट्या !!! त्यांनी तर किती आकार परिधान केले होते. गळ्यातल्या कानातल्याच्या सेट पासून तर कपापर्यंत, शर्टच्या सुंदर रंगीत बटणांपासून तर छोट्या छोट्या कुंड्यांपर्यंत, सगळेच आकार होते. कसे अडाणी म्हणणार ह्या लोकांना? केवळ पुस्तकी डिग्र्यांची भेंडोळी जमवली तरच शिक्षित होतो का आपण?
एकूण तो दिवस खूपच सत्कारणी लागला. एकूणच नैसर्गिक वस्तूंचा जास्तीत जास्त वापर करण्याकडे त्यांचा मला कल दिसला.
सुंदरसा समुद्रकिनारा लाभलेला हा छोटासा देश. कोणी म्हणे भारताचा अश्रू, कोणी म्हणे हिंद महासागरातला मोती, काही म्हणा रम्य देश आहे नक्की. तो समुद्र तर इतका नितळ सुंदर. आमचे हॉटेल समुद्रकिनारी होते. उसळत्या लाटांच्या सोबत तिथल्या सुंदर बगिच्यात गरम कॉफी पित , सूर्यास्त बघणे म्हणजे स्वर्गसुख! निळा हिरवा समुद्र, केशरी सूर्य, हिरवी झाडे, अनेक रंगांची फुले, निसर्ग रोजच तिथे होळी खेळत असतो. समुद्रकिनाऱ्याचा तो भाग खूप सुंदर होता. रात्रीचे जेवण पण हॉटेल तिथेच मांडत असे. पण जसा हा समुद्र वरदान आहे तसाच तो अनेक वेळा शापही ठरला आहे श्रीलंकेसाठी.
व्यापाराला योग्य आणि सोयीचा किनारा म्हणून कितीतरी वेळा त्या देशावर परकीय आक्रमणे झाली. फार पूर्वी अनेक परदेशी खलाशी ह्या बंदराचा आराम करण्यासाठी वापर करत. मग कोणाच्या तरी डोक्यात येऊन, आपली सत्ता जमवण्यासाठी ते पाहुणे म्हणून आलेले खलाशी सरळ युद्धच करत. जनता जेरीस आली होती नुसती. अगदी अलीकडच्या काळात, त्यांच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचा फायदा उठवत त्यांना कर्ज देऊ करून किनारा वापरायला देण्याच्या अटी घातल्या काही बड्या राष्ट्रांनी . हि आक्रमणे कमी होती म्हणून कि काय समुद्रही आपले रौद्र रूप अधून मधून दाखवतो. एकदा आम्ही तिथे राहून गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोठी सुनामी आली. सगळे हॉटेल धुवून निघाले. ती बातमी वाचूनसुद्धा अंगावर काटा आला. किती प्रेमळ लोक होते ते! त्यांचे काय झाले असेल? किती विचारपूर्वक सजवलेले होते ते हॉटेल, त्या सगळ्या सजावटीचे काय झाले असेल? पुन्हा एवढे सगळे उभे करणे म्हणजे किती कठीण काम. पण अचानक काहीच दिवसात पुन्हा श्रीलंकेला जाण्याचा योग्य आला. आणि आश्चर्य म्हणजे तेच हॉटेल राहायला मिळाले. वाटले, तेव्हाच्या अद्ययावत खोल्या तर आता नसणार, जाऊ दे जे असेल ते. पण आम्ही तिथले दृश्य बघून अचंबित झालो. सगळे बऱ्यापैकी जागेवर पोचले होते. छोट्या बंगलीवजा खोल्यांचे खूप नुकसान झाले होते तिथे आम्ही आधी राहिलो होतो. पण बाजूलाच असलेल्या इमारतींमधून पुन्हा अद्ययावत हॉटेल सेवा द्यायला तयार झाले होते. त्यांना विचारले कि सुनामीचे काय झाले? म्हणाले सगळं हॉटेल पाण्याखाली होते. खूप नुकसान झाले, पण कर्मचाऱ्यांनी अति परिश्रमाने , थोड्याच काळात ते पुन्हा उभे केले. काही लोक गेलेही समुद्राच्या पोटात वाहून, त्यांच्या कुटुंबियांनाही मागे राहिलेल्या कर्मचाऱ्यांनी आधार दिला होता. म्हणाले, समुद्रकिनारी आहोत न , जसा फायदा मिळतो तसा तोटाही होणारच, तो सहन केलाच पाहिजे. आणि बाहेर बघितले तर त्या रत्नाकराला ह्या कशाचाही गंध नव्हता, तो तसाच निळा हिरवा पसरला होता , पांढऱ्या फेसाळणाऱ्या लाटांमधून किनाऱ्याला धडकत होता.
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.