पत्र क्र १०३

अनेक वर्षांपूर्वी भारताचा भाग असलेला देश श्री लंका रावणा मुळे आपल्याला जास्ती माहित . जशी आपल्याला रावणाची काहीशी भीती वाटते तशीच अलीकडच्या काळात घडलेल्या काही अप्रिय घटनांमुळे त्या देशाची पण वाटते....

कीर्ती वडाळकर
||4 min read

अनेक वर्षांपूर्वी भारताचा भाग असलेला देश श्री लंका रावणा मुळे आपल्याला जास्ती माहित . जशी आपल्याला रावणाची काहीशी भीती वाटते तशीच अलीकडच्या काळात घडलेल्या काही अप्रिय घटनांमुळे त्या देशाची पण वाटते. तामिळ आणि सिंहीलि संघर्ष खूप विकोपाला गेला आणि ते छोटेसे बेट अक्षरश: पेटले. आम्ही पहिल्यांदा गेलो तेव्हा हा संघर्ष नुकताच आटोक्यात आला होता. जागोजागी चेकपोस्ट होते. आम्हाला थांबवून, "आर यु टायगर्स?" करत दमात विचारत, उगाचच धडकी भरे. कसले टायगर्स बाबा, साधी त्या वाघाची मावशी सुद्धा घाबरत नाही आम्हाला, असे सांगावे वाटे. पण गपचूप आपले कागद दाखवा आणि पुढे चला. किती ठिकाणी थांबवले असेल आम्हाला ह्याची गिनतीच नाही.

बराचसा दक्षिण भारताचा प्रभाव असलेली संस्कृती ह्या देशाची आहे. प्रामुख्याने बुद्ध धर्माचा पगडा जनतेवर आहे. रामायणातील संदर्भांमुळे अनेक ठिकाणी हिंदू धर्माचा पगडा पण जाणवतो. काही श्रीमंत भागातून कॅथॉलिक लोक पण आहेत. त्या सगळ्या भागावर त्यांच्या संस्कृतीचा वरचष्मा जाणवतो. अलीकडच्या काळात जरा जास्तच पाश्चिमात्य झालेत लोक कारण पर्यटन हा व्यवसाय खूप फळफळला. त्यात पैसा जास्त आहे म्हणून लोकांनी स्वतःला बदलून घेतले. नितळ स्वच्छ, आरस्पानी समुद्रकिनारा दूर दूरच्या पर्यटकांना आकर्षित करतो. त्याचप्रमाणे अनेक मंदिरं आणि रामायणातील लंका बघायला अनेक लोक येतात. देश छोटा आहे, थोड्या कालावधीत बघून होतो, आणि मुख्य म्हणजे अत्यन्त पडेल चलन आहे. त्यामुळे स्वस्तात फिरून होते. अशा अनेक कारणांनी पर्यटक येऊ लागले. मग त्यांना लागतील आणि आवडतील अशा सुखसोयी निर्माण करण्यात आल्या. कष्टाळू जनता झटून सेवा देऊ लागली.

लहान मुलींचा डेस खूप छान दिसतो. साधे परकर पोलके आपले , पण त्याला गळ्याला खूप छान झालर त्या पोलक्याला खाली पण झालर असते, म्हणजे पोटावर. परकर सरळ असतो . लग्नात लहान मुलींना, करवलींना हा ड्रेस छान रंगीत घालायला मिळतो . पण धार्मिक कार्यक्रमात मात्र पांढरा घालायला लागतो. ह्या ड्रेस चे नाव लामा सारिया . वयाने मोठ्या स्त्रिया लामा सारिया नेसतात, पण झालर नसते त्याऐवजी, वरचे लांब पोलके परकरात खोचतात, क्वचित काही जणी ओढणी घेतात.

पारंपरिक श्रीलंकन साडी नेसणारी स्त्री शहरापासून दूर गेल्यावर सगळीकडे सापडते. ती साडी नेसायची पद्धत फारच वेगळी आहे. छान दिसतात त्या स्त्रिया.

भरतनाट्यम च्या ड्रेस सारख्या समोर, पोटावर, साडीच्या काठाचा फुलोरा केलेला खूप छान दिसतो. तिला कांड्यान किंवा ओसरीआ म्हणतात.

एका प्रकारच्या साडीत मागे निऱ्या खोचलेल्या असतात. दोन्ही प्रकारे नेसलेली साडी छान दिसते. काही ठिकाणी भारतीय पद्धतीने पण नेसतात.

भारताचा प्रभाव खूप ठिकाणी जाणवतो. पुरुषांचा वेष म्हणजे तर अगदी दक्षिण भारतीय पद्धत, खाली सरोंग म्हणजे लुंगी, वर शर्ट. लग्नात ह्याच्याही वर एक कोट. परदेशी पाहुणे येतात म्हणून जरी बरेच जण पॅन्ट शर्ट घालत असले तरी बऱ्याचशा दुकानांमधून, हॉटेलमधून , कचेऱ्यांतून, हे पारंपरिक वेष दिसतात. आपली संस्कृती बाहेर दिसावी हा त्यात मूळ उद्देश. श्रीलंकन एअर वेज च्या हवाई सुंदऱ्यानी , मोरपीसाचे चित्र असलेल्या आकर्षक साड्या , त्यांच्या पद्धतीने नेसलेल्या बघितल्या तेव्हा लगेच हि सगळी माहिती मिळवली.

दक्षिण भारत, इंडोनेशिया आणि डच संस्कृतीचा तिथल्या पदार्थांवर फार पगडा आहे. जेवणात भात , मासे, भाज्या आणि नारळ, जोडीला अनेक मसाले. आपल्या सारखेच प्रत्येक घरची चव वेगळी, प्रत्येकाचा मसाल्याचा वापर वेगळा, मात्र एक गोष्ट सगळीकडे आहे ती म्हणजे पदार्थ नुसतेच मसालेदार न करता भयंकर तिखट करतात. तिथे सांगावे लागते, " तिखट कमी करा". अनेक प्रकारच्या तिखट मिरच्या, लवंगा , मिरी, सढळ हस्ते पदार्थांमध्ये घालतात. जेवणात मुख्य पदार्थ भात , त्या बरोबर एखादी मांसाहारी मुख्य डिश, एखादा भाजीचा प्रकार, डाळीचा पदार्थ, वेगवेगळी तिखट लोणची आणि चटण्या. सणासुदीला "कीरीबाथ" , म्हणजे नारळाच्या दुधात शिजवलेल्या भाताच्या , केळीच्या पानावर केलेल्या, ढोकळ्यासारख्या वड्या . सोबत छानसा पातळ पदार्थ करतात. सांबोल नावाचा पदार्थ म्हणजे आपल्या खोबऱ्याच्या चटणीची श्रीलंकन बहीण. ती कशातही मसाला, वाटण म्हणून वापरतात आणि चटणी म्हणून पण खातात. तांदूळ, भाज्या, अंडी वगैरे वापरून कोट्टु रोटी करतात. काही ठिकाणी हि कोट्टु रोटी, भाजी वगैरे बरोबर आपण पोळी भाजी खातो, तशी खातात, तर काही ठिकाणी शिजवलेल्या भाजी आणि चिकन वगैरेंच्या कालवणात तुकडे करून टाकतात आणि सगळे एकत्र करून खातात.

ह्या शिवाय दक्षिण भारतातील अनेक पदार्थ मिळतात. त्यामुळे माझ्यासारखे शाकाहारी लोकसुद्धा अजिबात उपाशी राहणार नाहीत. सगळ्या प्रकारच्या भाज्या इथे पिकवतात. भाजी बाजारात एक चक्कर मारली तर आपल्या इथल्या सर्व भाज्या आणि फळे दिसली. डोंगर भागात फळभाज्या आणि विविध फळे होतात. त्यातही फणस, नीर फणस , तुती, केळी , अननस, पपई, आंबे खूप. समुद्राजवळच्या भागात जरा वेगळ्या भाज्या लावतात. मला बहुतेक घरांच्या मागे भाजीची बाग दिसली. मिरच्या, टमाटे आणि पालेभाज्या ते घरीच उगवतात असे जास्ती ठिकाणी आढळले. नारळ सर्वदूर होतो. त्यामुळे तो सगळ्या पदार्थात वापरला जातो. कॉफीचे खूप मळे डोंगर भागात आहेत, तसेच चहाचे पण. अगदी केरळ ची आठवण यावी. रबराचे मळे पण आहेत. अर्थात ह्या तीन पिकांसाठी श्रीलंका प्रसिद्ध आहे हे आपल्याला माहीतच असते. अति प्राचीन काळापासून इथली शेती प्रगत होती. नदी किनारी पीक सिंचनाची काळजी नव्हती, पण दूर वरच्या भागात सिंचनासाठी कालवे आणि टाक्या बांधल्याचे अनेक पुरावे आहेत. एक वेळ धान आणि बाकी वेळ इतर पिके ते घेत असत. साधारण १७२२ मध्ये डच आले आणि त्यांनी सोबत कॉफी आणली. साधारण शतकभर हे पीक खूप उत्पन्न देऊन गेले पण नंतर त्यावर पडलेल्या किडीने ते नष्ट होऊ लागले. मग चहा आणि रबर आले. त्याचेही पीक चांगले येऊ लागले. नारळ सुरवातीला फक्त घरात वापरण्यासाठी लोक स्वतःच्या अंगणात लावत. त्यातून पण पैसा कमावता येऊ शकतो असे ध्यानात आल्यावर नारळाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली गेली. मसाले तर आधीपासूनच होते. त्यातही दालचिनी जास्त प्रसिद्ध, कारण डच आणि ब्रिटीश ती वापरायला लागले. बाकी तिखट मसाले त्यांना जमेनात. जसे पदार्थात नारळ वापरतात तसेच शेंगदाणे ही खूप वापरतात. त्यापासून चिक्की सारखा पदार्थ, अनेक गोड पदार्थ वगैरे करतात. ह्या शिवाय नारळाच्या आणि रबराच्या मळ्यात झाडाखाली कोकोची झाडे पण लावलीत आणि त्याचेही उत्पन्न चांगले येते. ते मोठे कोकोचे फळ प्रथमच बघितले तिथल्या बागेत. आत पांढऱ्या आवरणात बिया असतात. त्या काढून, वाळवून, भाजून पावडर करतात. आणि त्यापासून अनेक पदार्थ, मुख्यत्वे चॉकलेट्स बनवतात. पांढऱ्या रंगाच्या बी पासून तपकिरी रंगाचे चॉकलेट बनेपर्यंत ची सगळी प्रक्रिया बघायला इतकी मजा आली.

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments