पत्र क्र १०४

तर त्या सोन्याच्या विटा काही दिसल्या नाही बरं का श्रीलंकेत कुठे. पण एक दिवस मजा झाली. गाईड ला गमतीत सांगितले कि आम्हाला इथले सोने आणि इतर मौल्यवान खजिना बघायचंय. तो खुश च झाला. लगेच खूपशा कहाण्या...

कीर्ती वडाळकर
||4 min read

तर त्या सोन्याच्या विटा काही दिसल्या नाही बरं का श्रीलंकेत कुठे. पण एक दिवस मजा झाली. गाईड ला गमतीत सांगितले कि आम्हाला इथले सोने आणि इतर मौल्यवान खजिना बघायचंय. तो खुश च झाला. लगेच खूपशा कहाण्या सांगू लागला. रावणाचा खूप खजिना होता. त्याने अनेक देवांना भक्ती करून प्रसन्न करून घेतले होते. म्हणून त्याच्या जवळ अनेक हिरे, माणकं , मोती, वगैरे होते. रामाशी झालेल्या युद्धात त्याचे पतन झाले आणि बरीचशी जनता पण मारली गेली. रामाने त्या खजिन्यातील काहीच नेले नाही. विभीषणाने राज्य करताना पहिले जनकल्याण बघितले आणि ह्या गडबडीत तो खजिना हरवला. त्यामुळेच म्हणे श्रीलंकेत अनेक मौल्यवान रत्ने सापडतात.

कारण काहीही असो, रत्नपुरा भागात अनेक प्रकारचे मौल्यवान खडे मिळतात. मुख्य म्हणजे तिथले नीलम हे रत्न जास्त प्रसिद्ध आहे. तिथे एक छोटे संग्रहालय आहे. त्यात ह्या खड्यांची माहिती देतात. ते कसे सापडवतात ते सांगतात. त्या लोकांना बरीच माहिती असते ह्या सगळ्या खड्यांची. इतके सुंदर , मौल्यवान लखलखते खडे बघून क्षणभर आपण नक्कीच हरखून जातो. आपल्या समोर येणारा प्रत्येक खडा किती मोठ्या प्रक्रियेतून गेला आहे ते बघून ही आश्चर्य वाटते. खूप मोठे अग्निदिव्य पार करत, तावून सुलाखून आपल्या पर्यंत पोचतात ते. आणि ज्या दगडात ते सापडलेत तो बघितला तर कळणारच नाही आपल्याला ह्यात मौल्यवान भाग असेल असे. ते खऱ्या रत्नपारख्याचेच काम बरं. असा दगड शोधून, आणून, तो साफ करून, प्रक्रिया करून ते विविध खडे तयार होतात. मग त्याला तास पाडून , दागिने घडवतात. कसलं कठीण काम ते, बापरे! अर्थातच तिथे विक्री पण आहेच. मग तुमची जन्म तारीख सांगा, तुम्हाला अमुक हा खडा घातला पाहिजे. लगेच त्या खड्याची अनेक रूपे आपल्या समोर हजर. तुम्ही घ्या कि नका घेऊ त्या खड्याची विविध रूपे मनमोहक असतातच. तिथे एक अजून मजा असते, गाईड म्हणाला, तुम्ही ह्या भागातील जंगलात फिरायला जा, तुम्ही पण एखादा खड्डा करा, तुम्हाला नक्की मौल्यवान खडे सापडतील. जे सापडले ते तुमचे. पण आख्यायिका अशी आहे कि ह्या खड्यांच्या लालसेने जे लोक जंगलात गेलेत ते परतच नाही आलेत. अरेच्चा, मग हे सगळे खडे कुठून आलेत रे? तर म्हणे ह्या लोकांनी देवाची आराधना करून त्या त्या भागातील खडे मिळवण्याची परवानगी घेतली आहे. असो. आपल्याला नकोत बाबा ते तुझे खडे.

आजूबाजूला खूप छान जंगल आहे. त्यात अनेक धबधबे आहेत. बघण्यासारख्या खूप छान जागा आहेत. निसर्गप्रेमी लोक खरंच हरवून जातात, त्या हिरवाईत.

श्रीलंका म्हटलं की रामायण आणि अनेक देवळं हि आलीच. अनेक सुंदर मंदिरं आपण बघू शकतो, त्यामागच्या रोचक कथा ऐकत. बुद्ध मंदिरं पण भरपूर आहेत.

नुवारा ईलिया असाच एक भाग. अतिशय सुंदर जंगल. किती प्रकारच्या झाडांची गर्दी आहे तिथे. अनेक प्रकारचे पक्षी आहेत. निळ्या रंगाचा बुलबुल खूपदा दिसला. त्याशिवाय अनेक रंगीबेरंगी पक्षी. तर हे गाव नुवारा इलिया , कोलंबो पासून जरा दूर, समुद्र सपाटी पासून उंच. त्यामुळे छान थंड. वर्षभर थंड, आल्हाद दायक हवा त्यामुळे पर्यटकांचे आवडते ठिकाण. अनेक गोष्टी ह्या गावाशी निगडित आहेत. समुद्रसपाटीपासून उंच आणि थंड म्हणून ब्रिटिशांचे अर्थातच आवडते ठिकाण. इथे अनेक ब्रिटिश कालीन घरे आहेत. मोठा गोल्फ कोर्स आहे. घोड्यांचा रेसकोर्स आहे. तलाव, नद्या, बगीचे, जंगल सगळंच आहे. जंगलात अनेक श्वापदं आहेत. त्या जंगलात अनेक हत्ती होते. गोल्फ कोर्स बांधायच्या काळात, तिथे ब्रिटिश मेजर थॉमस विल्यम रॉजर्स होता. गोल्फ कोर्स ला अडथळा करत म्हणून तिथे येणारे हत्ती तो मारून टाके. जंगलात जाऊनही अनेक हत्ती त्याने मारले. त्याने १४००, १५०० हत्ती मारले असा अंदाज आहे . त्या गोल्फ कोर्स च्या एका बाजूला त्याचे थडगे आहे. असे सांगतात की दर वर्षी ह्या थडग्यावर वीज कोसळते, जणू त्या गत हत्तींचा आक्रोश. कोणालाही तिकडे जाऊ देत नाहीत.

ह्या भागाला इथल्या हवामानामुळे लिटिल इंग्लंड म्हणतात. खूप दूरवर पसरलेले चहाचे मळे अतिशय लक्षवेधी आहेत. जगातील उत्तम प्रतीचा चहा इथून बनतो, असे ते आपल्याला सांगतात. रंगीबेरंगी साड्या नेसलेल्या स्त्रिया, पटापट, चहाच्या झाडाची ती वरची कोवळ्या कोंबालगतची दोन पाने खुडून पाठीवरच्या टोपलीत टाकत असतात. केरळ किंवा आसामचे चित्र! तिथेच चहाचा कारखाना पण आहे. त्यात सगळी प्रक्रिया सांगतात चहा करण्याची.

जवळच एक डोंगर भाग आहे. जरा टोकावर आपण जाऊ शकतो. त्याचे नाव त्यांनी चक्क "वल्डस एन्ड" असे ठेवले आहे. टोकावर जाऊन आजूबाजूचे दृश्य अतिशय विहंगम दिसते. अतिशय छान हवा , मुबलक पाणी, पुरेसा सूर्यप्रकाश, त्यामुळे ह्या भागात अनेक पिके होतात. चहाचे मळे तर आहेतच, पण अनेक फळांचे मळे पण आहेत. त्या फळांचे गर काढून , प्रक्रिया करून अनेक पदार्थ बनवण्याचे कारखाने इथे आहेत. आपण सहज त्यांना भेट देऊ शकतो. अनेक प्रकारच्या भाज्याही इथे पिकतात. सुंदर हवेत सुंदर फुले फुलणे आलेच ओघाने.

दर वर्षी एप्रिल मध्ये, तामिळ आणि सिंहीली नवीन वर्षाच्या सुमारास ह्या भागात मोठा उत्सव असतो. अनेक प्रकारच्या स्पर्धा, कार रेस, घोड्यांच्या रेस, गोल्फ च्या स्पर्धा, अशा अनेक स्पर्धा होतात. शेवटी फुलांचा शो होतो. खूप लोक ह्या सगळ्याना हजेरी लावतात.

जवळच एक मोठे बोटॅनिकल गार्डन आहे. त्यापलीकडे एक छोटेसे जंगल आहे. खरं म्हणजे सगळा भागच जंगल वाटते. ते जंगल इतके छान आहे न. त्यात अशोक वाटिका आहे, आणि रावणाने सीतेला इथेच ठेवले होते असे सांगतात. सीतेचे एक छानसे मंदिर पण तिथे आहे. एक सुंदर ओढा बाजूने वाहतो. लोक सीतेची खूप भक्ती करताना दिसले. ह्याच ओढ्यात सीता रोज अंघोळ करत असे, हे जरूर सांगतात. एका मोठ्या खडकावर मोठे खड्डे आहेत, विशिष्ट आकाराचे. हे हनुमानाचे पायाचे ठसे. समोरच सीता हनुमान भेटीचे दृश्य साकारणारी मूर्ती आहे. इथेच हनुमान प्रथम सीतेला भेटला असे मानतात. सगळा परिसर छान आहे. मंदिर पण दक्षिण भारतातील मंदिरांची आठवण करून देणारे आहे.

नुवारा इलिया पासून थोडे पुढे गेल्यावर एका भागात हनुमान मंदिर पण आहे. हनुमानाने सीतेच्या शोधात लंका गाठली ते पहिले पाऊल इथेच ठेवले सांगतात. दोन मोठे डोंगर तिथे समोरासमोर आहेत. एका वर रावणाची सेना होती तर एका वर रामाची वानरसेना. मधल्या भागात युद्ध झाले. सगळा परिसर भक्तिमय आहे. श्रीलंकेत गेलो आणि रामायणाचा माग नाही काढला तर ट्रिप फुकटच नाही का?

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments