पत्र क्र १०५

बालमनाला वाटून जायचे. मोठं झाल्यावर कळले असं काही नसते, सगळे देश आपआपल्या परीने सुंदर असतात, आणि प्रत्येकाचे स्वतःचे वेगवेगळे प्रश्न असतात. गुण दोष सगळीकडेच असतात. पूर्वीचा सियाम, म्हणजे आजचा...

कीर्ती वडाळकर
||4 min read

लहानपणी आमच्या इथे एक सरदार कुटुंब राहायचे. त्यांच्या कडे त्यांची एक काकू यायची, तिचे नाव काहीही असले तरी तिला सगळे , "थायलंडवाली " ऑंटी म्हणत. तेव्हापासून थायलंड ह्या देशाबद्दल कुतूहल होते. कारण ती काकू तिच्या मायदेशाबद्दल खूप छान छान गोष्टी सांगायची. मोठा निळा समुद्र आहे, त्यात पाण्याखाली रंगीत प्रवाळ आहे, पांढराशुभ्र किनारा आहे, डोंगर आहेत, काय न काय. म्हणजे परदेश असा चकचकीत असतो का? असं कुठेतरी बालमनाला वाटून जायचे. मोठं झाल्यावर कळले असं काही नसते, सगळे देश आपआपल्या परीने सुंदर असतात, आणि प्रत्येकाचे स्वतःचे वेगवेगळे प्रश्न असतात. गुण दोष सगळीकडेच असतात.

पूर्वीचा सियाम, म्हणजे आजचा थायलंड. एक वैशिष्ट्य ह्या देशाचे कि कोणतीच परकीय सत्ता ह्या देशावर राज्य करायला आली नाही. पण अनेक वेळा काही अंतर्गत कलह , मिलिटरी चे बंड वगैरेंनी पोळून निघाला आहे. इथे घटनात्मक राजेशाही आहे. म्हणजे राजे आहेत पण ते एकटे मोठे निर्णय घेत नाहीत, लोकसभा मोठे निर्णय घेते, राजे त्यावर शिक्कामोर्तब करतात. पण ह्याच पद्धतीमुळे अनेक बंड मोडीत काढणे सोपे झाले त्यांना. जरी कुठल्याही परदेशी सत्तेने सियाम वर राज्य केले नाही तरी अनेकवेळा, सियाम ला स्वतःची जागा आणि व्यापार वगैरे चे नुकसान सोसावे लागले ते चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे.

तिथले राजे स्वतःला रामाचे वंशज मानतात. ती गाईड मला म्हणाली, "रामायण तर आमचेच आहे. आमचा राजा राम आहे, त्याची राजधानी पण अयुथ्या आहे." आता आली का पंचाईत? इंडोनेशियात गेलो ते म्हणतात राम आमचा आहे, थायलंड मध्ये गेलो, ते म्हणतात राम आमचा आहे, कम्बोडिया वाले पण तेच सांगतात, लाओस वाले पण तेच म्हणतात, आपण तर हक्क सांगतोच. मग तिला विचारलं, "सांग बरं , तुमच्या कडून लंकेला कसा गेला राम? लंका तर आम्हाला जवळ आहे. " तिचे उत्तर छान होते, " अगं , राम किती शक्तिशाली होता आमचा, जवळ काय अन लांब काय, लंकेला जाणे काही कठीण नव्हते त्याला. गेला की सहजच हनुमानाच्या खांद्यावर बसून" "असेल बाई, तुझा राम असेल, मात्र आमचा पण आहे हं " त्यावर ती म्हणाली ," मग आता कितवी पिढी आहे त्याची, तुमच्या कडे? आमचा राजा म्हणजे रामाचा वंशज आहे. आमच्या कडे हे बघ अयुथ्या आहे, तिथे जन्म झाला रामाचा. " कुठे कुठे म्हणून राम आहे रे देवा!

पण आता ह्याचा छडा लावलाच पाहिजे न? अनेक शतकांपूर्वी, काही बुद्ध साधू प्रवास करत सियाम ला पोचले. त्यांच्या जवळ जातक कथा होत्या. त्यांनी त्यात रामायण पण आणले. काही जण मानतात कि अनेक शतकांपूर्वी, शेजारचा देश कम्बोडिया भारताचा भाग होता. तिथले हिंदू राजे रामायण मानीत, ते आपल्याला अंगकोर च्या मंदिरातून दिसतेच . त्यांनी इथे पण ते रुजवले. काही जण मानतात कि भारतातून अनेक शतके पूर्वी, जे व्यापारी इथे आले, त्यांनी रामायण आणले. काहीही असो, आज ते त्यांच्या जीवनाचा एक भाग झाले आहे. तिथे "रामकिन " असे नाव आहे. गोष्टी थोड्याफार फरकाने त्याच आहेत मात्र सगळ्याला थाई रूप चढवलेले आहे. फार पूर्वी, जेव्हा हे "रामकिन" लिहिले गेले, तेव्हा राजधानीचे नाव पण अयुथ्या करण्यात आले आणि ज्या राजाने ते लिहून घेतले त्याचे नाव राम. नंतर चे सर्व राजे रामच! त्यांच्या राजवटीचे नाव, अयुथ्या किंगडम! पहिल्या राम राजाने ते लिहून घेतले, स्वतःही त्यातला काही भाग लिहिला. नंतरच्या राजांनी त्याच्या आवृत्त्या काढल्या. पहिल्या राम राजाने बांधलेल्या राजवाड्यात, मंदिरांमधून, रामायण (रामकिन) कथांची अनेक चित्रे आणि मूर्ती आहेत. खोन नावाच्या लोकनृत्याचा आधार रामकिन आहे. मुखवटे घालून हे नृत्य करतात. गावोगावी, आजही, शाळांमधून रामकिन शिकवले जाते. त्यातल्या पात्रांची नावे ऐकायला मजेदार वाटतात, सगळं थाई व्हर्शन! अनेक मंदिरांमधून रामकिन आपल्याला भेटते. सतराव्या शतकात ब्रम्हदेशाकडून झालेल्या हल्ल्यात , पूर्वीपासून जपलेल्या रामकिन च्या प्रति नष्ट झाल्या. पण त्या राजांनी लगेच पुन्हा तयार करून घेतल्या. त्यांची राजधानी पण अयुथ्या आणि राजा पण राम . मग राजाचे जन्म नाव काहीही असो, त्यात राम जोडले जाणार. अनेक वर्षे त्या देशाची राजधानी अयुथ्या होती, अलीकडे ती बँकॉक ला आली.

लोककला आणि लोकनृत्याचा गाभा रामकिन आहे. अतिशय सुंदर कपडे, दागिने घालून केलेले खोन नृत्य नेत्रदीपक असते. त्यांच्याकडे दोन मुख्य लोकनृत्य आहेत. खोन आणि लाखोन . फार पूर्वी दरबारात सादर करायची हि कला होती. आता आपल्याला सगळीकडे बघता येते. ह्या भागातील सर्वच देशांमध्ये जी लोकनृत्य आहेत, त्यांचे कपडे मला जरा सारखेच वाटले. खूप रंगीत, त्यात सोनेरी भराव. रंग पण जरा गडद, त्यावरच्या सोनेरी रंगाची कलाकुसर त्या रंगाला अधिक उठावदार बनवते. खाली एक सारोंग खूप सुंदर निऱ्या करून नेसलेले, स्त्री पात्र पायघोळ नेसणार पुरुष पात्र थोडे लांडे नेसणार . वर एक कमरेपर्यंत लांब ब्लाऊज, त्यावर स्त्रिया कधी ओढणीसारखे उपवस्त्र घेतात, कधी खूपसे दागिने घालतात. पुरुष खांद्यावर कवचासारखे कोरीव , जरा खांद्या बाहेर येणारे, धातूचे दागिने घालतात. मात्र दोन्ही पात्रांना डोक्यावर लांब टोकदार टोपी असणे आवश्यक. हातात सुंदर रंगीत पंखे, हे पंखे ह्या भागात असतातच. खूप दागिने असतात. एका प्रकारच्या नाचासाठी त्या नर्तकांनी फुलपाखरासारखे पंख पण लावलेले होते. हे सगळं इतकं रंगीत आणि चकचकीत असतं नं , अगदी नेत्रदीपक. काही वेळा त्या लोकनृत्याचा कालावधी जास्त असतो आणि त्याचा सगळा तामझाम खूप भव्य असतो. मोठ्या मैदानात, एका बाजूला नृत्याचा कार्यक्रम चालू असतो, बाकी ठिकाणी प्रेक्षक असतात. त्या नृत्यात हत्ती, घोडे पण आणतात, तेही खूप सुंदर सजवून. अनेक लोक गटाने नृत्य करतात. कथा रामायणाची असते. पण जे काही कार्यक्रम तिथे बघितले त्यातून असं जाणवलं कि युद्ध, किंवा गटाने केलेला गोंधळ दाखवायला त्यांना जास्त आवडते. शांत नृत्य पण होते, ते हि अर्थातच गटाने केलेले.

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments