पत्र क्र १०६
अनेक जंगलं आणि सुंदरसा समुद्रकिनारा ह्या मुळे पर्यटक आकर्षित न झाले तरच नवल असा देश, थायलंड. तसा भूभागाच्या आकाराने म्हणाल तर फार काही मोठा देश नाही. पण निसर्ग खूप खुशीत ह्यांना आपले सौंदर्य बहाल...
अनेक जंगलं आणि सुंदरसा समुद्रकिनारा ह्या मुळे पर्यटक आकर्षित न झाले तरच नवल असा देश, थायलंड. तसा भूभागाच्या आकाराने म्हणाल तर फार काही मोठा देश नाही. पण निसर्ग खूप खुशीत ह्यांना आपले सौंदर्य बहाल करतो. समुद्राच्या मध्यभागी असलेली अनेक छोटी छोटी सुंदर बेटं आपल्याला निसर्गाच्या अनेक रंगांचे दर्शन घडवतो.
निसर्गाने भरभरून दिले तरी मानवाने त्याचा गैरवापर केला हे सगळीकडंच दृश्य इथे सुद्धा आहेच. घनदाट जंगलं तोडून मानवी वस्ती केली. मोठ्या मोठ्या इमारती बांधत गगनाला गवसणी घातली. लांब रस्ते करताना मधले जंगल साफ केले. आणि सगळ्यात महत्वाचे, मानवी लोभापायी प्राण्यांचा नाश केला. थाई हत्ती खूप प्रसिद्ध होते. एकोणिसाव्या शतकात लाखोंच्या संख्येने असलेले हत्ती आज काही हजारात उरलेत. हस्तीदन्तासाठी, मांसा साठी, पर्यटकांच्या मनोरंजनासाठी त्यांचा बेदरकारपणे वापर केला गेला. अगदी नामशेष होण्याच्या मार्गावर पोचलाय तो. तीच गत वाघांची आणि बिबट्यांची. अस्वल वगैरे बाकी प्राणी पण त्याच मार्गावर. त्यांचे मांस खाल्ले कि अमुक रोग बरा होतो अन नख गळ्यात बांधलं तर तमुक रोगापासून मुक्ती मिळते. काय रे देवा? काय करावे ह्या मुक्या जनावरांनी?
बँकॉक जवळ सफारी वल्ड आहे. लहान मुलांनाच काय मोठ्यांना पण छान मजा येते. दिवसभराची सफर करायला उत्तम. चांगले पाचशे एकरांवर पसरलेले, ऐसपैस प्राणिसंग्रहालय. त्यात जमिनीवरील प्राणी आणि जलचर प्राणी असे दोन भाग आहेत. सगळाच भाग बघण्यासारखा आहे. खूप प्रकारचे प्राणी, पक्षी तिथे ठेवलेले आहेत. भरपूर हिरवाई तर आहेच, पाणी पण छान फिरवलेले आहे, अधून मधून त्यामुळे पार्क ची शोभा अधिकच वाढते. सगळे प्राणी एकदम खाऊन पिऊन धष्टपुष्ट झालेले आहेत.
दिवसा, काही ठराविक वेळी तिथे वेगवेगळे शो होतात. अनेक प्राण्यांचा वापर करून पर्यटकांचे मनोरंजन केले जाते. अगदी जलचर प्राणीसुद्धा त्यात मागे नाहीत. एका उंच भागात जाऊन
जिराफांना खायला घालता येते. पक्षांना पण दाणे देता येतात. हे अर्थातच तिकीटा व्यतिरिक्त चे खर्च हं . अगदी सर्कस आठवली, तिथे फक्त आपण पूर्णपणे प्रेक्षकात असतो इथे काही ठिकाणी आपणही सहभागी होऊ शकतो.
गाडीत बसून त्या प्राण्यांच्या जवळ जाता येते. अर्थात जाळीची गाडी असते ती. संपूर्ण पार्क फिरायला पण गाडी असतेच नाहीतर इतका मोठा परिसर एक दिवसात बघून होणे शक्य नाही.
वाघांच्या भागातही आपल्याला गाडीने आत नेतात. भाग मोठा आहे. वाघही अनेक आहेत. पण मला तर ते कापूस भरून मुलांना खेळायला देतात न तसेच वाटले. एकदम लोधे! आत एका जाळीच्या गाडीत एक मुलगी खूपसे मांसाचे तुकडे घेऊन बसलेली असते. त्या गाडीभोवती ते सगळे वाघ जमलेले असतात. काही पोट भरून पावलेले वाघ झाडाखाली आराम करत असतात. गाडीतून पर्यटक येत आहेत हे कळल्या बरोबर ते वाघ त्या जाळीच्या गाडी भोवती जमतात. मग आतली मुलगी बरोबर आणलेले मांस त्यांना अगदी तोंडाशी नेऊन देते, भरवायचे तेवढे बाकी ठेवते. ते वाघ मिटक्या मारत खातात . आकाराने प्रचंड मोठे पण नुसते आळशी. तो मांसाचा तुकडा जरा जरी लांब पडला तरी अजिबात धावून उचलणार नाहीत, त्यांना माहित आहे दिवसभर असेच आयते खायचेय. मला कीव आली त्यांची. इतका राजेशाही प्राणी, काय अवस्था त्याची हि? हीच गत सिंहांची. त्यांना ठेवलेय ती जागा मोठी आहे, पण करावा लागणारा मूळ संघर्षच नष्ट झालाय, ते पूर्णपणे माणसाळलेले आहेत.
एक असेच वाघाचे पिल्लू घेऊन, बाहेर एका ठिकाणी एक मुलगी बसली असते. विशिष्ट रक्कम देऊन त्या पिल्लाला आपण, तिने दिलेल्या बाटलीतून दूध पाजू शकतो. बरेच वाघ तिकडे एका ठिकाणी पडून असतात. त्यांच्यातही जाऊन फोटो काढू शकतो. काही करणार नाहीत आपल्याला ते. काही मजाच नाही त्यात, हे कसले जंगली श्वापदं ? पुढे एका ठिकाणी अशाच मगरी पण पसरलेल्या, लोकांनी फोटो काढावा म्हणून त्या मुली पैसे घेणार. हत्ती तर इतके केविलवाणे दिसतात न. प्राणी खूप प्रकारचे आहेत, सगळ्यांची परिस्थिती तीच.
ओरँग उटान च्या शो मध्ये ती माकडे बिचारी , चित्र विचित्र कपडे घालून लोकांचे मनोरंजन करतात, त्यात नाच करतात, मारामाऱ्या करतात, त्यांच्यातल्या सुंदर मुलींसाठी लढाई करतात, दोऱ्यांवरून घसरून येतात.
मध्यन्तरी प्राण्यांसाठी काम करणाऱ्या, मूळ भारतातील असलेल्या, एका संस्थेने ह्या सगळ्यावर आक्षेप घेतला होता. आंतरराष्ट्रीय कायद्या प्रमाणे ह्या सर्व जनावरांची सोय असावी ह्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला. पर्यटकांना सावध करायचा प्रयत्न केला. प्राणिसंग्रहालये असावीत पण त्यासाठी प्राण्यांना , शो करण्याच्या नावाखाली वाईट वागणूक देत माणसाळू नये, असा त्यांचा मुद्दा होता.
सगळीकडे जसे प्राणी मारून त्यांच्या अवयवांचा काळा बाजार करतात, तसाच इथे ही तो प्रकार आहे, मात्र खूप जास्ती प्रमाणात. कदाचित कायदे फारसे कडक नसावेत, म्हणून कि काय खुले आम दुर्मिळ प्राण्यांचे अवयव मिळतात.
दर शनिवार रविवारी बँकॉकमध्ये एक मार्केट भरते, चातुचाक किंवा जे जे मार्केट . थायलंड चे सगळ्यात मोठे मार्केट. पंधरा हजार स्टॉल्स असतात त्यात. कितीतरी विक्रेते तेवढ्यासाठी येतात इथे. अनेक लोक ह्या मार्केटला भेट देतात. अनेक प्रकारच्या वस्तू तिथे मिळतात. कपडे, दागिने, हस्त कौशल्याच्या वस्तू, प्राचीन मौल्यवान वस्तू, पेंटिंग्ज, खाण्याचे विविध पदार्थ, पेय, पुस्तके, पादत्राणे, घरातील उपयोगी वस्तू, बागकामाची अवजारे, झाडे, काय न काय. त्यातच एक भाग असतो, पाळीव प्राण्यांच्या उपयोगी वस्तू विकण्याचा. पाळीव प्राण्यांना लागणारे खाद्य, औषधं , खेळ, माशांच्या टॅंक ला सुशोभित करणाऱ्या वस्तू, अनेक प्रकारचे पाळीव प्राणी म्हणजे कुत्री, मांजरं , ससे, मासे, पोपट , अगदी सगळं मिळत तिथे. अनेक प्राणीही तिथे सर्रास विकले जातात. हे प्राणी चक्क जंगलातून पकडून आणलेले असतात. अनेक प्रकारचे साप , पक्षी त्यात असतातच पण वाघाची नखे, हत्तीचे दात, गेंड्याचे शिंग, मगरींची कातडी, सापांची कातडी, असं सगळं मिळतं ,ते ही खुले आम.
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.