पत्र क्र १०७

निसर्गसुंदर देश थायलंड. पण अनेक प्रथा परंपरा कसोशीने पाळणारा. ह्या प्रथांमधूनच तर खरे समाज जीवन प्रतीत होते. सगळीकडे स्त्रिया अनेक कामं करताना दिसत होत्या. मला वाटतं त्या तशा बहुतेक सर्वच देशांमधून...

कीर्ती वडाळकर
||4 min read

निसर्गसुंदर देश थायलंड. पण अनेक प्रथा परंपरा कसोशीने पाळणारा. ह्या प्रथांमधूनच तर खरे समाज जीवन प्रतीत होते. सगळीकडे स्त्रिया अनेक कामं करताना दिसत होत्या. मला वाटतं त्या तशा बहुतेक सर्वच देशांमधून दिसतात. आम्हाला फिरवणारी सारथी मुलगी आणि माहिती देणारी पण मुलगीच होती. त्यामुळे छान वाटले मला. बरीचशी माहिती त्या दोघींकडून मिळत होती.

सगळे थाई लोक कुटुंबाला प्रथम प्राधान्य देतात. मजा म्हणजे, आम्ही जिथे जाऊ तिथे आमच्या गाईड मुलीचा कोणी भाऊ किंवा बहीण भेटायचीच. आणि सारथी पण मागे नसे. ह्या दोघींना नक्की किती भाऊ बहिणी आहेत बरं? तर म्हणाली ,"आमचे कुटुंब खूप मोठे असते. आम्ही सगळे एकत्रच राहतो. बहुतेकदा रात्री जेवायला सुद्धा एकत्रच असतो. आमच्या भाषेत आम्ही भावंडं सगळे सख्खेच असतो. आणि काही झाले तरी कुटुंबाला प्रथम प्राधान्य असते. त्यामुळे जिथे कुठे जाऊ तिथे आमचे बहीण भाऊ असतातच." घरचे ज्येष्ठ लोक लहान मुलांची देखभाल करतात. आई वडील दूर दूर जाऊन नोकरी धंदा करतात. हा तुझा, हा माझा असा मुलांमध्ये भेदभाव नसतो. घरापासून कितीही दूर गेले तरी शनिवार रविवार घरी येणार. त्यांचे जे मूळ गाव असते तिथे त्यांचे पारंपरिक घर असते. त्यात बहुतेकदा सगळे जमतात. सण समारंभ तिथेच होतात. ती म्हणाली," आमच्या कडे कोणी खूप मोठ्याने बोलत किंवा भांडत नाहीत. तसे करायला परवानगीच नाही." मोठ्याने रडणे , ओरडणे जसे शिष्टाचारात बसत नाही तसेच सगळ्यांसमोर खूप आनंद व्यक्त करणे पण नाही. ह्या दोन्ही भावना हृदयाच्या आहेत, हृदयातच जपल्या पाहिजेत.

देशाचा मुख्य धर्म बुद्ध. पण अनेक वेळा मला तो धर्म म्हणजे हिंदू आणि बुद्ध धर्माचे हायब्रीड वाटले. सुंदर सुंदर मंदिरांमधून फिरताना गणपती, राम, विष्णू , हनुमान दिसतात. आत मोठा बुद्ध असतो. त्यांच्या अनेक गोष्टी त्यांनी हिंदू धर्माकडून घेतल्यात असे ते सांगतातच म्हणा. जितका देवावर विश्वास तितकाच भुताखेतांच्या अस्तित्वावर सुद्धा. बऱ्याच अंधश्रद्धांचा पगडा समाजमनावर आहे. आजारपणात डॉक्टर कडे धावताना मधेच मांत्रिकाकडे पण वळतात.

अनेक प्रकारचे सण साजरे करतात. सगळ्यात प्रसिद्ध सॉन्गक्रॉन फेस्टिव्हल. नववर्ष दिन. आपल्या हिंदू नवं वर्षाच्या दिवशीच असतो हा सण, म्हणजे साधारण एप्रिल मध्ये. आधी तीनच दिवस सुट्टी असायची पण अलीकडे चांगली पाच दिवस असते.

फार पूर्वी कपिल ब्रम्ह नावाचा राजा होता. त्याला सात मुली होत्या. त्याच गावात एके ठिकाणी दोन कुटुंबे शेजारी शेजारी राहत. त्यातील एक अतिशय श्रीमंत होते आणि दुसऱ्यातील कर्ता नुसता दारू पित असे पण त्याला दोन मुलगे होते आणि श्रीमंत माणसाला काहीच अपत्य नव्हते. त्यामुळे तो सतत त्या श्रीमंत शेजाऱ्या ला हिणवत असे. दुःखी होऊन त्याने देवांची आराधना सुरु केली. सूर्य, चंद्र, पृथ्वी, समुद्र आणि शेवटी त्याने वडाच्या झाडाची पण आराधना केली. वडा ने मग इंद्राला सांगितले कि ह्याला जे हवे ते द्या. इतक्या देवांना प्रसन्न करून घेतल्यामुळे अतिशय हुशार मुलगा त्या माणसाला प्राप्त झाला. तो वेद विद्या पारंगत तर झालाच पण त्याला पक्षांची, प्राण्यांची भाषा पण अवगत झाली होती. त्या मुलाची ख्याती ऐकून राजा कपिल ब्रम्हाने त्याला बोलावून घेतले आणि काही गहन प्रश्न विचारले. त्याला उत्तर देण्यास आठ दिवस वेळ दिला. आणि जर उत्तर नाही आले तर तुझा शिरच्छेद करेन, मात्र जर उत्तर आले तर माझेच शीर धडावेगळे होईल, असे सांगितले. राजाला माहित होते कि कोणी त्याचे शीर धडावेगळे करणार नाही कारण जर ते पाण्यात पडले तर पृथ्वीवरील सगळं पाणी आटेल, हवेत उडले तर दुष्काळ पडेल आणि पृथ्वीवर पडले तर मोठे वादळ सगळ्या पृथ्वीचा नाश करेल. आणि जो पुरुष हा वध करेल तो स्वतः पण जळून जाईल . शिवाय प्रश्न इतका गहन होता कि त्याचे उत्तर त्या मुलाला येणारच नाही अशी राजाला खात्री होती. सात दिवस विचार करून थकलेला तो मुलगा एका झाडाखाली बसला असतो. वरती गिधाडांची जोडी बोलत असते. ते दोघे ह्या मुलाच्या अंतानंतर आपण त्याचे धड कसे सम्पवायचे ह्याबद्दल बोलत असतात. तेवढ्यात त्या जोडीतील "ती" त्या गिधाडाला विचारते, त्या प्रश्नाचे उत्तर काय आहे पण. आणि तो तिला उत्तर सांगतो. हा मुलगा लगेच राजवाड्यात येतो आणि राजाला उत्तर सांगतो. आता मोठी पंचाईत झाली. हरल्यामुळे राजाचा वध व्हायलाच हवा. पण त्याचे परिणाम? मग राजा स्वतःच त्यातून मार्ग सांगतो. त्याच्या सात मुलींना बोलवतो. तुमच्यापैकी एकीने माझा शिरच्छेद करा, माझे शीर धातूच्या पात्रात ठेऊन, कोणालाही न दाखवता कैलास पर्वतावरच्या गुहेत घेऊन जा. तिथे ते ठेवा आणि गुहा बंद करा. तसेच केले गेले. पण दर वर्षी त्याच दिवशी, राजाचे वंशज असलेल्या कुटुंबातील मुख्य स्त्री तिथल्या पर्वतावरील गुहेत जाऊन परंपरेप्रमाणे पूजा अर्चा करते. पहाटे पासून ते मध्यरात्री पर्यंत ती वेगवेगळ्या पद्धतीने पूजा करते.

गावोगावी मोठ्या उत्साहात हा सण साजरा होतो. सगळे घरी जमतात. आदल्या दिवशी सगळे घर साफ करून सजवतात . सकाळीच छान पारंपरिक , रंगीबेरंगी कपडे घालून, देवळात जातात, तिथे साधूंना अन्नदान करतात. बुद्ध मूर्तीवर पाण्याचा अभिषेक करतात. काही ठिकाणी देवळाच्या डागडुजीसाठी रेती वगैरे वस्तू देतात. काही ठिकाणी मासे पाण्यात सोडतात किंवा पक्षी आकाशात उडवतात. मग घरातील ज्येष्ठ आणि कनिष्ठ व्यक्तींचे पाय पाण्याने धुतात. ह्यात वर्षभर काही चुका झाल्यास माफी मागितली जाते. लहानांवर काही संकट येऊ नये म्हणून प्रार्थना केली जाते.

गावातून मोठी यात्रा काढून त्यावर पाणी उडवले जाते. सगळीकडे पाण्याचे फवारे मारतात. पाण्याचा सण असेही ह्या दिवसाला म्हणतात. दुसऱ्या दिवशी संगीत स्पर्धा, हस्तकलेच्या वस्तूंचे प्रदर्शन, पारंपरिक वेशभूषेतील मुलामुलींच्या स्पर्धा, पाण्याचे युद्ध , असे भरगच्च कार्यक्रम असतात. दूर दुरून लोक ही सगळी मजा बघायला येतात. अलीकडे पाणी टाकण्याचा मोठा कार्यक्रमच असतो. गावोगावी रस्त्यांवरून वाहतूक बंद करून लोकांना पाणी एकमेकांवर उडवायला जागा करून दिली जाते. मात्र ह्या सणाचा मुख्य उद्देश म्हणजे झाले गेले विसरून, नवी सुरुवात करू या , हाच असतो.

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments