पत्र क्र १०८

सण साजरे करणे म्हणजे मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग, मग तुम्ही कुठेही जा. त्याचे स्वरूप थोडे बदलेल, पण त्या मागे एक कथा असेल आणि साजरा करायची पद्धत असेल. जिथे तिथे अनंताची अनामिक भीती लोकांना...

कीर्ती वडाळकर
||4 min read

सण साजरे करणे म्हणजे मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग, मग तुम्ही कुठेही जा. त्याचे स्वरूप थोडे बदलेल, पण त्या मागे एक कथा असेल आणि साजरा करायची पद्धत असेल. जिथे तिथे अनंताची अनामिक भीती लोकांना ग्रासलेली असते. त्या अनंताची मनोभावे आराधना म्हणजे अनेक प्रकारचे सण , असे मला वाटते. किंवा रोजच्या सेट पॅटर्न जीवनात बदल म्हणून काहीतरी मनोरंजन जीवनात आणण्यासाठी अनेक वेळा सण साजरे करतात. काहीही कारण असो, तिथल्या समाज जीवनाची उत्तम छबी त्यातून प्रतीत होते.

थायलंड मधला सॉन्गक्रॉन म्हणजे पाण्याचा सण. तसाच "फी था खोन" म्हणजे भुतांचा सण. जून महिन्यात तीन दिवस चालणारा हा सण, तिथल्या रंगीत हस्तकौशल्याचा सण आहे असेही म्हणायला हरकत नाही. पहिल्या दिवशी घरी आणि नदीवर पूजा करतात. मंदिरात जाऊन तिथल्या बुद्ध साधूंचे आशीर्वाद घेतात. मग रंगीबेरंगी , ढगळ ढगळ कपडे घालतात. त्यावर अतिशय सुंदर पद्धतीने बनवलेला एक मुखवटा चढवतात. त्यावर एक सुपा सारखे , बांबूतून बनलेले, शिरस्त्राण चढवतात. तो मुखवटा बनवणे म्हणजे एक कला. नारळाच्या झावळीचा मधला दांडा घेऊन, साफ करून एकमेकात चिकटवतात. मग त्याला अतिशय आकर्षक रंगांनी , विविध आकृत्यांनी रंगवतात. त्यावर त्याच दांड्याचे लांब नाक करून जोडतात. ते हि अर्थातच छान रंगवलेले असते. असे रंगीत कपडे घालून, भुतं बनून, सगळे रस्त्यातून, मोठ्या मिरवणुकीतून फिरतात. दुसऱ्या दिवशी संगीत, नृत्य असे कार्यक्रम असतात. तिसऱ्या दिवशी पुन्हा मंदिरात जाऊन साधूंचे प्रवचन ऐकणे गरजेचे असते.

ह्या सणामागची एक रोचक कथा आमच्या गाईड नी सांगितली. राजपुत्र सिद्धार्थ जेव्हा भगवान बुद्ध बनून त्याच्या वडिलांच्या दरबारात आला, तेव्हा कोणीच त्याला नमन करेनात . दरबारातील ज्येष्ठ व्यक्ती ह्या वयाने लहान व्यक्तीपुढे नतमस्तक व्हायला तयार नव्हत्या कारण त्यांचा मान आड येत होता. राजा तर वडील आणि राजा दोन्ही असल्यामुळे तो कसा नमन करणार न? तेवढ्यात एक अकल्पित घडले, आणि ह्या सगळ्यांच्या वर, जमिनीपासून खूप उंच, भगवान पोचले. आणि खूप तेजस्वी प्रकाश आला. राजा सकट सगळे उठून नतमस्तक झाले. तेवढ्यात बाहेर लाल रंगाचा पाऊस पडायला लागला. भगवान बुद्धांना त्यांच्या शिष्याने विचारले, "हे काय?" त्यावर त्यांनी सांगितले, की त्यांच्या गेल्या जन्मात जेव्हा ते राजपुत्र होते, तेव्हा काही वर्षे वनात तपस्येसाठी गेले होते. तिथून परत येताना काही घात झाला. पण मोठ्या प्रयासाने ते सगळे कुटुंब एकत्र आले. तेव्हा इंद्राने असा लाल पाऊस पाडून त्यांना आशीर्वाद दिला होता. तसाच ह्या जन्मात सुद्धा जेव्हा ते तपस्या करून परत आले तेव्हा इंद्राने पाऊस पाडला आहे. असे म्हणतात कि तेव्हाच इंद्राने हिऱ्या माणकांचा पाऊस पण पाडला आणि म्हणूनच थायलंड मध्ये आजही बऱ्याच ठिकाणी हिऱ्या

माणकां च्या खाणी आहेत.

लगेच आमची गाईड एका जेम्स फॅक्टरीत घेऊन गेली. तिथे ते सगळे लखलखणारे खडे कसे काढतात जमिनीतून ते दाखवले. तिथून पुढेच ती खाण होती. तिथे मात्र प्रवेश नव्हता. फक्त आत काय असते त्याची चित्रफीत बघायला मिळते. बाजूलाच एक भव्य दालन आहे. तिथे हे सगळे खडे ठेवलेले आहेत. त्यापासून बनवलेले विविध दागिने आहेत. ते सगळे हिरे , माणकं , पाचू, मोती, त्यापासून बनवलेले दागिने बघून खरोखर डोळे दिपले.

चीनचा प्रभाव आपल्याला अनेक देशांमध्ये दिसतो. चायना टाऊन खूप ठिकाणी आहेत. अगदी सॅन फ्रान्सिको पासून सिंगापूर पर्यंत सगळीकडेच. त्यामुळे ह्या भागांमधून चिनी वस्तू विकणे, त्यांचे सण साजरे करणे हे ओघाने आलेच. अशाच बँकॉक च्या चायना टाऊन कडून नवीन वर्ष साजरे करायला थायलंड वासी शिकले. मग घरांवर ते लाल सोनेरी गोल गोल आकाशदिवे लावतात, घर सजवतात. ते चायना टाऊन तर अगदी उजळून निघते. ड्रॅगन आणि सिंहाच्या प्रतिमा जिथे तिथे दिसतात. लाल आणि सोनेरी रंगांची उधळण असते नुसती. जोडीला खाबुगिरी आलीच. विविध चिनी पाककृतीची अगदी रेलचेल असते ह्या काळात तिथे.

बँकॉक पासून साधारण दीडशे किलोमीटर वर लोपबुरी गाव आहे. थायलंड च्या पुरातन गावांमधील एक. ख्मेर राजांनी ह्या भागात बरीच बांधकामं केली. काही पुरातन मंदिरं तिथे आहेत. राजाचा जुना महाल आहे. सगळं जतन करायचा प्रयत्न चालू आहे. पण ह्या भागाचे वैशिष्ट्य म्हणजे इथली माकडं . हनुमानाची भक्ती करणारे लोक ह्या माकडांना हनुमानाचे वंशज मानतात. जसे हनुमानाने सीतेला दुष्ट रावणाच्या कचाट्यातून सोडवले तसेच ह्या माकडांची भक्ती केली तर आपली सर्व संकटातून सुटका होईल अशी भावना आहे. मग त्यांना रोज फळं आणि खाद्यपदार्थांचा नैवेद्य दाखवतात. मंदिराच्या पुरातन वास्तू मधून सुखेनैव नांदणारी ही माकडे येणाऱ्या लोकांच्या अंगाखांद्यावर चढून जातात. हातातील पिशव्या ओढून घेतात. गावामध्ये घुसून वायरी तोड, वस्तू

पळव असे उपद्रवी उद्योग पण करतात. मात्र लोक त्यांना कधीच मारत नाहीत. उलट एक मोठा उत्सव , नोव्हेंबर महिन्यात , त्यांच्यासाठी करतात. त्या उत्सवाच्या दरम्यान लोक माकडांचा वेष करतात. मोठी मिरवणूक काढतात. खूप प्रकारची नृत्ये , खेळ होतात. सगळ्यात महत्वाचे ह्या "मंकी गॉड" साठी खूप सुंदर सजवून, शिजवलेला भात, कच्या फळभाज्या आणि अनेक प्रकारच्या फळे वापरून मोठा नैवेद्य करतात. ती सजावट बघण्यासारखी असते. पण अर्थातच त्या माकडांना त्याची फारशी फिकीर नसते. दिसली फळे तर धाव आणि पळव. असे म्हणतात की त्या भागात तीन हजार पेक्षा जास्ती माकडे आहेत आणि चार हजार किलो पेक्षा जास्ती वस्तू त्या नैवेद्य सजावटीत वापरतात.

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments