पत्र क्र १०९
तर अनेक सण साजरे करत सुखात आयुष्य जगू पाहणारी थायलंड ची जनता. पाण्याचा सण, भुतांचा सण, माकडांचा सण असे तर साजरे करतातच पण अजूनही काही मजेदार सण, उत्सव साजरे करतात. हिंदू आणि बुद्ध धर्माचे एकत्रित...
तर अनेक सण साजरे करत सुखात आयुष्य जगू पाहणारी थायलंड ची जनता. पाण्याचा सण, भुतांचा सण, माकडांचा सण असे तर साजरे करतातच पण अजूनही काही मजेदार सण, उत्सव साजरे करतात.
हिंदू आणि बुद्ध धर्माचे एकत्रित पालन करतात. गणपती, हनुमान, राम हे तर त्यांचे देव आहेतच पण बुद्ध हा मुख्य देव आहे. आता ह्यातला कोण अधिक महत्वाचा ? असा मात्र कधी त्यांना प्रश्न पडत नाही. एकाच मंदिरात हे सगळे एकत्र नांदताना दिसतील.
अनेक सुंदर आणि भव्य बुद्ध मंदिरं आपल्याला इथे बघायला मिळतात. पापभिरू थाई जनता त्या मंदिरांमधून आपली भक्ती अर्पण करत असते. पर्यटक पण बऱ्याच मंदिरांना भेटी देतात.
ह्या मंदिरांबरोबर इतर अनेक कृतींमधून निसर्गाची , देवाची आराधना थाई लोक करतात.
देवाने पाऊस पाडावा म्हणून दर वर्षी एक रॉकेट फेस्टिव्हल करतात. पहिल्या दिवशी , नेहेमी प्रमाणे मंदिरात जाऊन बुद्धाची आराधना करतात आणि बुद्ध साधूंचे आशीर्वाद घेतात. दुसऱ्या दिवशी गावामधून मोठी मिरवणूक काढतात. खूप रंगांची आणि कलाकृतींची उधळण ह्यात असते. लोक रंगीबेरंगी कपडे घालून, वेगवेगळ्या पद्धतीने सजवलेले रॉकेट्स घेऊन मिरवणुकीत सामील होतात. ती रॉकेट्स खूप सजवलेली असतात. कधी हातात धरतात, कधी चाकाच्या ढकल गाड्यांवर नेतात. नाच गाणे चालू असते. संपूर्ण गाव ह्यात सहभाग घेते. तिसऱ्या दिवशी ते सगळे रॉकेट्स आकाशाच्या दिशेने उडवतात. असे मानतात कि खूप रॉकेट्स आली म्हणजे देव वर जागा होईल आणि पृथ्वीवर पाऊस पाणी उत्तम राहील. साधारण पणे पेरण्या सुरु करण्याआधी हा उत्सव असतो. असेही मानतात कि पुढे शेतीत करावी लागणारी खूप मेहेनत सुरु होण्या आधी थोडी मजा करावी मग कष्टाला सुरुवात करावी. बुद्ध धर्माचा प्रसार होण्या आधी पासून चालत आलेला हा सण आहे असे मानतात. आमच्या गाईड ने मला बोलावले आहे , तिच्या गावात हा सण साजरा करण्यासाठी. अलीकडच्या काळात काही इतिहासाचे अभ्यासक ह्या रॉकेट लॉंचिंग चा अभ्यास करायला येतात.
तिने अजून एक मजेदार उत्सव सांगितला. म्हशींच्या स्पर्धा. अरे देवा ! आता हे काय ? म्हणाली, आमच्या कडे शेतकरी म्हशी आणि रेड्यांना खूप जपतो. ते त्याला शेतीत मदत करतात. मग साधारण ऑक्टोबर च्या महिन्यात ह्या म्हशींच्या स्पर्धा, एका गावात होतात. भरपूर गर्दी जमते. देशोदेशीचे लोक हा उत्सव बघायला येतात. ह्या स्पर्धांसाठी म्हशींना विशेष करून तयार केले जाते. त्यांचा स्पेशल खुराक देऊन, त्यांना छान तगडे बनवले जाते. ह्या स्पर्धेत उतरण्यासाठी वर्षभर तरी अगोदर पासून लोक तयारी करतात. जो म्हशीवर बसणार त्याला पण विशेष प्रशिक्षण दिले जाते. स्पर्धेच्या दिवशी म्हशींना खूप सजवतात. एका साधारण शंभर मीटर च्या पट्ट्यात खूप चिखल केला जातो. पाणी पण साचवले जाते. आणि तिथे ही स्पर्धा होते. मालक किंवा जो वर बसणार असेल तो म्हशीच्या पाठीवर मागे बसतो. वेसण घातलेली असते, ती दोरी हातात धरतो. आणि म्हशीला पळवतो. चालक आणि म्हशी मधला सुसंवाद, गती, सजावट आणि चालकाचे कौशल्य ह्या सगळ्यावर विजेता ठरतो. चालक म्हशीच्या पाठीवरून खाली पडायला नको. भरघोस बक्षिसे पण असतात. काही ठिकाणी छान सजवलेल्या म्हशींच्या स्पर्धा असतात. म्हैस किती तगडी आहे त्यावरून बक्षिसे ठरतात. शेतकऱ्यांच्या मुलीची सौंदर्य स्पर्धा पण घेतली जाते. एकूण काय खूप मजा नक्कीच असते.
सुरीन नावाच्या भागात पुरातन काळात अनेक हत्ती होते. सगळा भाग म्हणजे घनदाट जंगल होते. अनेक हत्ती असल्यामुळे तिथल्या काही वनवासी नागरिकांना त्यांची शिकार करावी लागत असे. पण सगळे गणपतीचे उपासक, मग हत्ती ची शिकार कशी करणार ? त्यासाठी आधी खूप मोठी पूजा करत, गणपतीची. शिकार करताना सतत गणपतीचा धावा करत आणि शिकार केल्यानंतर परत गणपतीची माफी मागत. कालांतराने ह्या हत्तींचा उपयोग त्यांना माणसाळवून अनेक ठिकाणी मनोरंजनासाठी केला जाऊ लागला. राजांचे खास पाहुणे येऊन शिकार करू लागले. देशोदेशीच्या नामांकित व्यक्तींना बोलावून राजे त्यांना शिकारीत सामील करून घेऊ लागले. पण झाले असे कि ह्या सगळ्यात हत्तींची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली. मग ती शिकार बंद च केली गेली.
पण तिथल्या लोकांनी मग एक उत्सवाचे रूप देऊन ही प्रथा चालू ठेवली. अलीकडच्या नवीन उत्सवात भाग घेण्यासाठी पाळीव हत्ती त्यांच्या माहुताच्या कुटुंबासकट येतात. खूप छान सजवलेले हत्ती एका मिरवणुकीने गावातून फिरवतात. माहूत आणि बघे पारंपरिक रंगीबेरंगी कपडे घालतात. बराच मोठा पल्ला ही मिरवणूक चालते आणि मग मुख्य चौकात येते. तिथे पारंपरिक थाई सिल्क च्या कापडाने सजवलेल्या टेबलांवर फळं आणि भाज्यांची सुंदर सजावट केलेली असते. कमीतकमी पन्नास टन फळं आणि भाज्या वापरल्या जातात. ह्या सगळ्याचा हत्तींना नैवेद्य दाखवतात. त्यांनी खाऊन उरलेली फळे आणि भाजीपाला घरी घेऊन जातात प्रसाद म्हणून.
दुसऱ्या दिवशी हत्तींच्या खेळासाठी असलेल्या स्टेडियम मध्ये सगळे जमतात. तिथे हत्तींच्या बाळांची परेड होते. त्यांच्या मागून त्यांच्या कळपातील त्यांचे पिता हत्ती चालतात. ही परेड खूप रंगारंग असते. हत्तींना तर खूप छान सजवलेले असतेच पण त्यांच्या माहुतांचें कुटुंब पण पारंपरिक वेशात सजून सोबत असते. ही परेड झाल्यावर लुटुपुटु ची लढाई होते. हत्तींची प्रात्यक्षिके होतात. मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. ज्या वनवासी जमातीचा हत्तीची शिकार करणे हा पिढीजात उदयॊग होता, त्यांच्या साठी मुख्यत्वे हा उत्सव करतात. त्यांची रोजीरोटी चालू राहावी म्हणून एक प्रयत्न असतो हा. अर्थात हल्लीच्या काळात ती जमात काही फक्त हत्तींवर अवलंबून राहिलेली नाही. पण एक परम्परा म्हणून त्यांनी चालू ठेवली आहे. दुसरे महत्वाचे म्हणजे ह्या उत्सवाच्या निमित्ताने देशोदेशीचे अनेक पर्यटक ह्या भागाला भेट देतात. ते अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचे साधन होते. हस्तकलेच्या वस्तू करणारे , खाद्यपदार्थ बनवणारे, हॉटेल वाले , गाड्या भाड्याने देणारे, गाईड लोक अशा अनेकांना रोजगार मिळतो. आणि जनतेचे मनोरंजन ही होते.
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.