पत्र क्र ११०

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी लागणाऱ्या खूपशा गोष्टी थायलंड मध्ये निसर्गाने भरभरून दिल्या आहेत. नितळ सुंदर समुद्रकिनारा आहे, घनदाट जंगलं आहेत, बँकॉक सारखी मोठी मायानगरी आहे, विविध प्रकारचे उत्सव...

कीर्ती वडाळकर
||4 min read

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी लागणाऱ्या खूपशा गोष्टी थायलंड मध्ये निसर्गाने भरभरून दिल्या आहेत. नितळ सुंदर समुद्रकिनारा आहे, घनदाट जंगलं आहेत, बँकॉक सारखी मोठी मायानगरी आहे, विविध प्रकारचे उत्सव आहेत, भव्य मंदिरे आहेत, रंगारंग कलाकारी आहे, संगीत, नृत्य , सगळं काही आहे.

बँकॉक ला जायचा प्रसंग ३ वेळा आला. त्या काळात इतका बदल झालेला बघितला ह्या शहरात. मोठमोठ्या इमारती क्षितिजाला व्यापू लागल्या. शहरातून धावणारी मेट्रो अनेक स्टेशन्स मधून, शहराचा जास्तीत जास्त भाग जोडू लागली. त्यामुळे प्रवास सुकर आणि जलद झाला. डॉन मुएन्ग आंतरराष्ट्रीय विमानतळाला येणाऱ्या पर्यटकांचा वाढलेला भार सोसेना म्हणून अद्ययावत असा सुवर्णभूमी आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधला गेला. दोन विमानतळांमधले अंतर बरेच आहे. मग इथून तिथे जाण्यासाठी मोफत शटल सेवा सुरु झाली. मेट्रो तर आहेच. टॅक्सी पण आहे. एकूण काय पर्यटन वाढले तसे पर्यटकांना सेवा देण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये भरपूर बदल झाले.

अनेक मोठमोठे मॉल्स आले. पायाचे तुकडे पडेपर्यंत फिरा आणि जमेल ते खरेदी करा. भाव करण्याचे तुमचे कसब पणाला लावा. सोन्यापासून कपड्यांपर्यंत वाट्टेल ते मिळेल.

मुंबई सारख्या मायानगरीची आठवण यावी असे शहर बँकॉक. सतत वाढता पसारा. चाओ फ्राया नदीच्या काठावर वसलेले बँकॉक, खेड्या पाड्यांमधून, गरिबीतून जगणाऱ्या जनतेचे आशास्थान आहे. नशीब आजमायला अनेक तरुण ह्या शहराकडे धाव घेतात. देशातील सत्तर टक्के जनता शेतीवर निर्भर आहे. जगातील सगळ्यात जास्ती तांदूळ निर्यात करणारा देश म्हणजे थायलंड होता अनेक वर्ष पर्यंत. त्याशिवाय नारळ, मका, रबर, ऊस, वगैरे आहेतच जोडीला. मासे पण उत्पन्नाचा मोठा स्रोत आहेत. उत्तम प्रतीचे मासे इथून निर्यात होतात. खूप लोकांना रोजगार देणारे मासे त्यांच्या पण जेवणात अर्थातच असतात. चांगल्या दर्जाचे लाकूड पण जंगलातून कापून त्याचे ओंडके आणून , फळ्या वगैरे बनवून निर्यात करतात. पण ह्या लाकूड निर्मितीच्या व्यवसायामुळे वारेमाप जंगल तोड झाली. मग सरकारने काही जंगलं राखीव जाहीर करून तेवढ्याच भागवरची झाडे लाकूड व्यवसायासाठी तोडायला परवानगी दिली. अनेक खनिजे तिथे सापडतात. त्यातही जिप्सम ची निर्यात मोठ्या प्रमाणावर होते. इलेक्ट्रिकल वस्तू, कॉम्पुटर चे पार्टस अशा अनेक गोष्टी उत्तम दर्जाच्या बनतात आणि निर्यातही होतात. वाहतुकीची अत्याधुनिक साधने बनतात. सोनं , मोती, विविध रत्ने आणि त्यापासून बनलेले सुंदर दागिने निर्यातीचा एक मोठा भाग आहेत. ह्या सगळ्या प्रकारच्या कारखान्यांमधून अनेक जणांना रोजगार मिळतो. बँका , विद्युत निर्मिती आणि पुरवठा, विमा कम्पन्या, पर्यटन ह्यासारख्या सेवा पुरवणाऱ्या अनेक उद्योगांमधून बरीच रोजगार निर्मिती होते.

पर्यटनाचा व्यवसाय कितीतरी अब्ज बाथ थायलंड ला मिळवून देतो. दिवसेंदिवस हा आकडा वाढतच जात आहे. पर्यटनात वाढ व्हावी म्हणून टुरिझम ऑथॉरिटी आहे. अगदी सुरवातीच्या काळात, म्हणजे साधारण १९६० च्या सुमारास थायलंड प्रथम पर्यटकांच्या नकाशावर लोकप्रिय झाले कारण तिथली शांतता. कुठल्याही प्रकारची राजकीय, सामाजिक अस्वस्थता नसल्यामुळे पर्यटक येऊ लागले. पर्यटनात मुख्य वाढ झाली ती अमेरिकेच्या व्हिएतनाम मध्ये आलेल्या सैनिकांमुळे. देश बाजूलाच , त्यातून स्वस्त आणि निसर्गसुंदर, मग अमेरिकन सैनिक थायलंड मध्ये मोठ्या संख्येने यायला लागले. आणि तिथूनच पर्यटन हा मोठा उद्योग होऊ शकतो हे त्यांच्या लक्षात आले. अनेक जागा पर्यटकांच्या दृष्टीने सोयीस्कर विकसित करून घेतल्या. अनेक पायाभूत सुविधा केवळ पर्यटन वाढले म्हणून आल्या. थायलंडला पर्यटनातील जागतिक मान्यता मिळाली. एकेकदा तर युरोप पेक्षा लोकप्रिय ठरले आहे हे टुरिस्ट डेस्टिनेशन!

असं सगळं असून, "थायलंडला जातोय" सांगितले की लोकांच्या भुवया उंचावतात. पहिल्यांदा गेलो तर इतके जाणवले नाही. पण पटाया किंवा फुकेत सारख्या सुंदर ठिकाणांना भेट दिली आणि खूप वाईट वाटले. कारण खुले आम चालणारा वेश्या व्यवसाय. लहान मुलांना नेण्याची सोय नाही. संध्याकाळ नंतर बाहेर सगळीकडे खुले आम वेश्या व्यवसाय चालतो. खूपसे पुरुष एकेकटे येऊन त्या मुलींबरोबर राहतात. अगदी अलीकडच्या भेटीत तर खूप भारतीय लोक पण दिसले.

कित्येक मोठ्या शहरातील एक भाग असा शापित असतो, पण इथे तर खुले आम सगळीकडेच. असे का असेल? मी शेवटी न राहवून आमच्या गाईड ला विचारले. तिथेच एक जरा ज्येष्ठ स्त्री पण होती. त्या अर्थशास्त्राच्या अभ्यासक होत्या. त्यांनी सांगितलेले ऐकून खरंच दुःख झाले.

जेव्हा अमेरिकन सैनिक थायलंड मध्ये येऊ लागले, तेव्हा मजा म्हणून ते काही व्हिएतनामी मुलींना बरोबर आणत. व्हिएतनाम च्या पडेल चलनामुळे हे जे डॉलर देत ते बऱ्याच मोठ्या रकमेत व्हिएतनामी डाँग बनत. तिथेही गरिबी होतीच, पैसा कमवायचा हा मार्ग सोपा होता. अशा बातम्या लपून थोड्याच राहतात? मग बाजूच्या अशाच गरीब लाओस आणि कम्बोडियातील मुली इथे येऊन ह्या व्यवसायात पडल्या. अमेरिकन सैनिकांना सोपे झाले. व्हिएतनाम मधून कोणी सोबत आणणे नको. थायलंडच्या अत्यन्त गरीब भागातून मुलींनी ह्या व्यवसायात येणे सुरु केले. एखाद्या बार शी एक किंवा दोन वर्षाचा करार करायचा. तिथे संध्याकाळी गिऱ्हाईक शोधायचं. पुरेसे पैसे जमले कि घरी परत. तिथे अजून एक विचित्र प्रथा आहे, मुलींना त्यांच्या लग्नासाठी खूप खर्च करावा लागतो. मग पैसा कमवायचा हा मार्ग सोपा आणि जलद.

पण अनेक रोग पसरू लागले, त्या मुलींच्या प्रकृतीचे प्रश्न तयार होऊ लागले. अनेक समस्या उदभवू लागल्या. मग सरकारने कायदा करून ह्या सगळ्यांवर बंदी घातली. "आणि तरी राजरोस हा प्रकार चालू?" असं मी विचारल्यावर त्या म्हणाल्या, " नाही हो, नुसता कायदा करून कुठे भागतंय ? त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नाही. पोलीस करतात प्रयत्न, पण भ्रष्टाचार आड येतो, आणि सगळं चालू राहतं " बाजूच्याच गरीब देशांतून मुलींना आणून ह्या व्यवसायात अडकवतात. त्यासाठी लागणारी गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात आहे. आधी लाओस, कम्बोडिया, म्यानमार मध्ये असेच व्यवसाय होते. त्या देशांनी अनेक प्रयत्न करून कमी केले पण इथे मात्र त्या प्रयत्नांना फारसे यश अजून मिळालेले नाही.

अलीकडच्या काळात काही सामाजिक संस्था प्रयत्न करून मुलींना दुसऱ्या व्यवसायाकडे वळवतात. उद्योगधंद्याचे दुसरे मार्ग शिकवतात. हे सगळे प्रयत्न तसे तोकडे आहेत. त्यामुळे ह्याचा नीट असर होईपर्यंत तरी "थायलंडला जातोय " म्हटलं की ऐकणाऱ्याच्या भुवया उंचावणारच.

--

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments