पत्र क्र १११ — मुंबई विमानतळावरचे अनुभव
एकदा गडबडीत मुंबई विमानतळावर सेक्युरिटी वगैरे सोपस्कार पार पाडत होते. कितीही वेळा गेलं न तरी मला त्या सेक्युरिटी वाल्यांची एक अनामिक भीतीच वाटते. कसे शोधत असतील हे लोक गुन्हेगार? कसे सगळं सांभाळत...
एकदा गडबडीत मुंबई विमानतळावर सेक्युरिटी वगैरे सोपस्कार पार पाडत होते. कितीही वेळा गेलं न तरी मला त्या सेक्युरिटी वाल्यांची एक अनामिक भीतीच वाटते. कसे शोधत असतील हे लोक गुन्हेगार? कसे सगळं सांभाळत असतील? कोण गेला ? कोण काय घेऊन गेला? किती बारीक लक्ष ठेवावे लागते त्यांना. न जाणो आपल्या सामानात काही वस्तू सापडावी आणि आपण इथेच अडकून पडायचो. काय न काय. मन वढाय वढाय ...... तर मी त्या रांगेत लागले. समोरची सेक्युरिटी वाली खूप प्रेमाने हसली. "परत निघालात? आत्ताच आलात न कुठून तरी? " अरेच्चा हिला कसे कळले? माझा गोंधळलेला चेहरा पाहून म्हणाली, "तुम्ही किती प्रवास करता! मी नेहेमी मार्क करते तुम्हाला. कुंकू मस्त लावता हा" पोलीस झाली म्हणून काय बाईच ती शेवटी.
असंच एकदा त्या इमिग्रेशन वाल्या मावशीने पण माझी विकेट काढली. "काय पुन्हा बाहेर?" मी पुन्हा चकित, म्हणाली,"माझ्या लक्षात राहता तुम्ही". पण मी काही एकाच इमिग्रेशन ऑफिसर च्या समोर उभी राहत नाही न? म्हणाली ,"आमचे चौफेर लक्ष असते"
आता मला ह्या गोष्टी पचायला जरा जड होतात, अहो त्या मुंबई विमानतळावरून रोज हजारो लोक ये जा करतात, मीच बरी ह्यांच्या लक्षात राहिली. चांगल्या थंड वातानुकूलित हवेत मला उगाचच घाम फुटला.
पण खरंच मी तेवढा प्रवास करत होते. तो स्टारबक्स वाला तर मी येताना दिसली कि माझी आवडती कॉफी एकदम तयार ठेवत असे. कसं एकदम व्ही आय पी झाल्यासारखं वाटे मला. आणि हाय रे दैवा! कुठून ते करोना नामक संकट आलं, तर जगाच्या पाठीवर कधीही कुठेही जायला तयार असलेली मी, कोपऱ्यावर भाजी घ्यायला जायला घाबरायला लागली. ऑनलाईन मागव, आहे ते संपव , जायलाच नको कुठे. दिड वर्ष घरात! ते घर सुद्धा कंटाळले असेल , किती दिवस घरात बसलीये ही म्हणून.
आणि दीड वर्षांनंतर प्रवासाचा योग आला बाबा एकदाचा. तशी आधी कधीतरी ती विमानं सुरु झाली होती, पण दोन डोस पूर्ण करायच्या वयाच्या अटीत न बसल्याने ती विमानं आम्हाला न घेताच उडाली. पण फायनली आलाच तो सोनियाचा दिनू.....
सगळं चित्र बदललं होतं . मनात एक अनामिक भीती होती. आधी ती टेस्ट करायची होती. त्याची धाकधूक.... नेहेमी पॉसिटीव्ह असणारी मी पहिल्यांदा नेगेटिव्ह असण्यासाठी देवाचा धावा करत होती. एकदाचा आला तो रिपोर्ट नेगेटिव्ह. हुश्श सुटलो. नाही हो, आता खरे सुरु झालो. त्या विमानतळावर सतत मनात भीती, पूर्णवेळ तोंडावर मास्क. दर वेळ पेक्षा किती तरी कागद वाढले होते. सगळे सांभाळत पुढे पुढे निघालो. इमिग्रेशन वाला काही सेकंदासाठी मास्क खाली घ्यायला सांगे. पुन्हा पॅक . पंधरा तासाचा शिकागो पर्यंत प्रवास पूर्णवेळ मास्क घालून. ती होस्टेस येऊन चक्क रागवायची कोणी मास्क काढला तर. कसले दिवस आले बिचारीवर, मला उगाच मनात विचार आला.
काय मजा असायची प्रवासाची काय वेळ आली नाही? विमानं पण कमी संख्येत होती. प्रवासी होते पण सगळेच धाकधुकीत दिसत होते. अर्थात नेहेमीचा माणसं वाहणारा विमानतळ नव्हता तो. बरीचशी दुकानं पण बंद होती. कुठेतरी त्याचीही शान मला कमी झालेली वाटली. प्रवासी कमी झाले कि असे होणारच न?
प्रवासाचा येणार नाही इतका थकवा त्या मास्क मुळे आला. पण जाणे महत्वाचे न , मग करा सहन. विमानतळांमधून तर ते सेक्युरिटी वाले खूप रागवत होते, मास्क वर करा! अरे देवा . आधी लांबच्या प्रवासात मध्ये ब्रेक घेणे चांगले असे सगळे सांगत, पण आता नाही बरं , तुम्ही जिथे ब्रेक घेणार तिथे जर करोना जास्ती असेल तर? तुम्हाला १५ दिवस वेगळं राहावे लागणार. हि अजून एक शिक्षा. मेलं जाणार किती दिवस, त्यात पंधरा दिवस असेच गेल्यावर काय करावे माणसाने ?
आणि त्या टेस्ट करणे भारतात ठीक आहे हो, फोन केला , माणूस घरी आला. रिपोर्ट मेल नी आला. डोक्याला तापच नाही. पैसे हि कमीच. आणि त्या अमेरिकेतून परत येताना? अहो टेस्ट साठी फुकट वाली केंद्र होती आणि तुम्हाला लवकर रिपोर्ट हवा असेल तर कमीतकमी ११० डॉलर भरा. विमानतळावर जाऊन केलीत तर १३५ आणि जाण्या येण्याचा खर्च वेगळा! जसजसे परतीचे दिवस जवळ आले त्या केंद्रांचा शोध घेणे सुरु झाले. ते गुगल एक मदतीला होतेच. तिथे घराजवळच एक फुकट वाले केंद्र होते. सहज म्हणून तिथे चौकशीला गेलो , दोन मुली हाताचे नेलपेंट वाळवत होत्या. गुगलचा रिपोर्ट पण वाईट होता. आता दुसरे केंद्र, ते म्हणे आम्ही शनिवार रविवार बंद असतो. तुमची टेस्ट शनिवारी होईल पण रिपोर्ट बुधवारी मिळेल. आणि बुधवारी मिळून काय कामाचा ग? परतीचे विमान सोमवारी आहे. म्हणाली मग तुम्ही ११० डॉलर भरा प्रत्येकी, तेच बेस्ट. तो रिपोर्ट दहा तासात येतो. आमच्या आधी आठ दिवस गेलेला एक मित्र, त्याचा तेवढ्यात फोन आला, "कुठल्याही परिस्थितीत फुकट टेस्ट च्या नादी लागू नका, आमचा रिपोर्ट विमानात अगदी बसायच्या वेळी मिळाला, तोवर किती ते टेन्शन." आता काय करावे? शनिवारी गेलो पुन्हा घराजवळच्या केंद्रावर. तिथला सिन एकदम बदलला होता. समोर एक मुलगी बुरखा घालून बसली होती. बाजूला दुसऱ्या टेबलवर एक मुलगा, मास्क, हातमोजे वगैरे बंदोबस्त करून बसला होता. त्यांनी सांगितले दोनच दिवसापासून इथले सगळे बदलले आहे, आता आधीसारखा अनुभव तुम्हाला येणार नाही. आम्ही कोड स्कॅन करून एकमेकांशी बोलत फॉर्म भरत होतो. तशी एकदम ती बुरख्यातून चित्कारली, "आप इंडिया से हो?" मग काय विचारता? सगळ्या चौकशा झाल्या. ते दोघे बहीणभाऊ हैदराबाद चे होते . शिकायला आले होते मेडिकल फिल्ड मध्ये. पार्ट टाइम हे काम करत होते. माझ्यातील आई जागी झाली. टेस्ट करून घरी आले. मुलासाठी घरात बराच खाऊ करून ठेवला होता. त्यातल्या पुरणपोळ्या , थेपले फॉईल मध्ये बांधले आणि गेले परत, पडत्या पावसात. पोरं काय भारावली म्हणून सांगु ......
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.