पत्र क्र ११२ — युरोप आणि अमेरिकेतील फरक
युरोप आणि अमेरिकेत एकदम टोकाचा फरक मला जाणवला. युरोपात छोट्या जागेत जास्तीत जास्त घरे आहेत. घरांचा आकार बहुतेक ठिकाणी छोटा, खोल्या छोट्या, आजूबाजूला आवार ही छोटेसे, सुबक. त्या उलट अमेरिकेत, तिथे जागा...
युरोप आणि अमेरिकेत एकदम टोकाचा फरक मला जाणवला. युरोपात छोट्या जागेत जास्तीत जास्त घरे आहेत. घरांचा आकार बहुतेक ठिकाणी छोटा, खोल्या छोट्या, आजूबाजूला आवार ही छोटेसे, सुबक. त्या उलट अमेरिकेत, तिथे जागा हा प्रश्न नाहीच. त्यामुळे घरांचे आकार मोठे, खोल्या भव्य, आजूबाजूचे आवार हि ऐसपैस. अर्थात ही झाली श्रीमंतांची कथा असे मला वाटले तर, सर्व साधारण व्यक्ती पण अशी घरे घेताना दिसले. मात्र शहरांचा चेहरा वेगळा. तिथे सगळ्याच शहरांची असते तीच कथा. लोकसंख्या जास्त, मग घरांची मागणी जास्त. शहरात लोक राहणे पसंत करतात कारण त्यांचे ऑफिस तिथे जवळ पडते. बाकी मुलांचे शिक्षण वगैरे सगळीकडे सारखेच , त्यामुळे ते कारण काही शहरात राहण्यास भाग पाडत नाही. लोक शहरापासून जरा लांब असलेल्या छोट्या गावांमधून राहण्या ला जास्ती प्राधान्य देतात तसे. ते अनेक दृष्टीने सोयीचे पडते.
मात्र अमेरिकन शहरं सुंदर आहेत. शहरांच्या अधेमधे , शहरांचे फुफ्फुस असलेले मोठे मोठे बगीचे सगळीकडे दिसतात. उंचच उंच इमारतींच्या मोठ्ठ्या कॉम्प्लेक्स जवळ एक प्रशस्त बाग हमखास असणारच. तिथे चालण्यासाठी एक लांब ट्रॅक, लहान मुलांना खेळण्यासाठी साधने, पाळीव प्राण्यांची वेगळी बाग, सिगारेट ओढणाऱ्यांची वेगळी जागा असे सगळे असते. ती शाश्वत विकासाची मूलभूत गरज असते. जेव्हा मोठमोठ्या इमारतींमधून लोक राहतात, तिथे त्यांच्या वर अनेक निर्बंध असतात. घरातल्या घरात नुसते बसून राहणे कठीण असते. त्यामुळे ह्या जागा तयार करून देणे गरजेचे आहे.
प्रत्येक शहरात एखादी नदी, किंवा तलाव किंवा समुद्रकिनारा असे काहीतरी पाण्याचे असते. त्याभोवती सगळे जनजीवन छान वसते. कुठे त्या नदीच्या बाजूने रिव्हर वॉक करतील, कुठे तलावाच्या बाजूने करतील. समुद्र तर पर्वणीच, त्या किनाऱ्यालगत काय करू न काय नको असे होऊन जाते अगदी त्यांना. आणि महत्वाचे म्हणजे जनता ह्या सगळ्याचा पुरेपूर आनंद घेते. सकाळ होत नाही तर लोक धावायला अन चालायला बाहेर. दिवसभर कोणीतरी तिथे जीव दमवत असेलच. पाऊस असला तरी कोणीतरी नक्की असेल.
मग प्रत्येक शहराच्या "आकर्षणे" यादीत ह्या पार्कचा समावेश असेल. काही ठिकाणी तर प्रत्येक गल्लीत छोटीछोटी बाग आहे. आजूबाजूला उंचच उंच सुळके आणि मधेच हा हिरवा तुकडा. रस्त्याच्या कडेला सुंदर बाग. हा नुसती कडेला नाही हा, रस्ता वळतो तिथे, रस्ता दुभाजकावर , जमेल त्या जागेत छोटी छोटी झाडे लावलेली दिसतील. कुठे नुसतीच शोभेची झाडे, कुठे खूप फुललेली फुलझाडे, पण ती बाग अगदी लक्षवेधी असते. मला एक प्रश्न सुरवातीला पडला, की ह्या झाडांना सतत फुले कशी असतात? इथे सुकलेली, थकलेली झाडे आपल्याला कधीच कशी दिसत नाहीत. तर त्याचा ही शोध लागला. लोकल कौन्सिल त्यांच्या नर्सरी तुन ही रोपे तयार करतात. भरपूर फुले आलेली झाडे आणून , छान आखीव रेखीव नियोजन बद्ध मांडतात. हे मेहेनतीचे काम करण्यात काही मशिन्स ची मदत पण घेतात. मला ते काम इतके आवडले न , असं वाटलं, आहे तितके दिवस आपणही जावे मदतीला. प्रत्येक इमारतीत सजावट वेगळी. ते पण त्यांच्या पद्धतीने ह्या लोकल कौन्सिल ला मदत करत असतात. जसा ऋतू असेल, तशी हि सजावट असते. मग त्या थँकस गिविंग ला खूपसे पाईन चे फुलं वापरून सजावट करतील, वसंतात सगळी फुलेच फुले, खूप आकर्षक सजावट करतात. आणि किती मेहेनत करतात त्यासाठी?
शहराचा चेहरा आकर्षक राहिला पाहिजे ह्यासाठी सगळी धडपड.
बरं , त्या उंच उंच इमारती बघा हं . प्रत्येक शहराची जणू चढाओढ असते, माझ्याकडे जास्त उंच इमारती कि तुझ्याकडे? पण मला तर लांबून त्या सगळ्या इमारती सर्व शहरांमधून एकाच प्रकारच्या वाटतात. पण तसे नाही हं , प्रत्येक इमारतीला आपली अशी वेगळी नजाकत आहे. मग त्या गर्दीत ही ती इमारत वेगळी आणि उठून दिसते. आणि प्रत्येक इमारत अगदी बाहेरून पण साफ करतात. गच्चीवरून ती माणसे दोराच्या सहाय्याने खाली उतरतात बाहेरून काचा पुसत पुसत खाली येतात. बघूनही माझ्या पोटात गोळा येतो.
बहुतेक शहरांमधून वेगवेगळी पर्यटनाची आकर्षणे असतात तशीच खाऊ ची पण. कुठे कॉफी चांगली मिळते तर कुठे पिझा, कुठे आईसक्रीम छान मिळते तर कुठे बर्गर. खरेदी मात्र सगळीकडे मला सारखीच वाटली. कारण तीच मॉल ची चेन न. पण काही भागांमधून स्थानिक कलाकारांच्या वस्तूंचे बाजार पण भरतात. ते मात्र नक्कीच रंगीत आणि आकर्षक असतात. त्या मॉल मधून पण मजा येते कधीतरी फिरताना. वस्तू छान मांडलेल्या, रोजच्या ऑफर वेगळ्या, मग त्यानुसार काही वस्तू मागे पुढे मांडणार. काही वस्तूंवर भली मोठी सवलत असते तर काही उगाच महाग वाटतात आपल्याला. त्या वॉलमार्ट मध्ये तर किती तास निघून जातील कळणार नाही. इकडे भाज्या, फळे, बेकरी, तिकडे कपडे,पलीकडे पेय, ह्या बाजूला घरगुती वस्तू, पुढे फर्निचर, काय न काय. तुम्ही म्हणाल ते सगळं मिळेल. मग कधी लोक एखाद दोन वस्तू घेऊन बाहेर पडणं शक्यच नाही. ती गाडी थोडीतरी भरतेच, ही भाजी घेऊ, ती फळं घेऊ करत. फळं मात्र खरंच खूप छान मिळतात.
अशीच कथा त्या CVS मधून फिरताना. इतक्या प्रकारची आणि वेगवेगळ्या किमतीची सौंदर्य प्रसाधने मांडलेली असतात नं की चक्रावूनच जायला होते. काय घ्याल नी किती घ्याल? आणि कपड्यांचे मॉल तर विचारूच नका. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते कि बऱ्याच गोष्टी ह्या बाहेरून आलेल्याच असतात. अमेरिकेत बनलेल्या वस्तू जरा कमीच दिसतात.
शहरातून फिरताना अजून एक गोष्ट जाणवते ती म्हणजे जरी मुख्य रस्त्यावरून अनेक गाड्या धावत असल्या तरी अनेक लोक सायकली चालवतात. लोकलचा वापरही मोठ्या प्रमाणावर करतात. प्रत्येक शहराची आपली ट्रान्सपोर्ट सिस्टिम आहे. अनेक लोकांना त्यातून आपले इच्छित स्थळ गाठता
येते. असं सगळं सारखं असलं न तरी प्रत्येक शहर आपला वेगळा चेहरा जपतो. चला बघू या अशाच काही शहरांचा वेगळा चेहरा....
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.