पत्र क्र ११३ — शिकागो, स्वामी विवेकानंद आणि रोटरी

शिकागो, अमेरिकेतील तिसरे मोठे शहर. पण आपल्याला ह्या नावाचे अगदी शाळेतील दिवसांपासून आकर्षण असते. कारण स्वामी विवेकानंदांची सर्वधर्म परिषद इथेच झाली होती. नंतरच्या काळात शिकागो पुन्हा लक्षात राहिले ते...

कीर्ती वडाळकर
||4 min read

शिकागो, अमेरिकेतील तिसरे मोठे शहर. पण आपल्याला ह्या नावाचे अगदी शाळेतील दिवसांपासून आकर्षण असते. कारण स्वामी विवेकानंदांची सर्वधर्म परिषद इथेच झाली होती. नंतरच्या काळात शिकागो पुन्हा लक्षात राहिले ते इथे सुरु झालेल्या, आणि हळूहळू जगभर पसरलेल्या रोटरी चळवळी मुळे .

एखाद्या मोठ्या शहराचा चेहरा शिकागो ला पण आहे. भल्या मोठ्या, गोड्या पाण्याच्या लेक मिशीगनच्या साक्षीने अनेक गगनचुंबी इमारती आकाशाला गवसणी घालत असतात. कुठूनही बघितले तरी ह्या उंच उंच इमारती दिसतातच. विमानतळाकडून शहराकडे जाताना आजूबाजूला काही बैठी घरे पण दिसतात. अनेक भागात ती तशी आहेत. मुख्य शहर मात्र खूप उंच आणि बसक्या इमारतींचा योग्य मिलाफ आहे. अनेक बगीचे शहराला प्राणवायू पुरवतात. तलावामुळे एक बाजू, नैसर्गिकरित्या खूप सुंदर सजली आहे. अर्थात त्या तलावाच्या काठाला सुशोभित करण्याचे काम लोकल कौन्सिल ने केले आहे. सुंदरसा किनारा, छान बांधून काढला आहे. तिथे तलावाला बाजूला घेऊन चालायला, धावायला, सायकल चालवायला खूप मज्जा येते. अनेक जण तिथे उन्हाची, पावसाची , थंडीची मजा घेत असतात. सोबतीला अनेक स्थलांतरित पक्षी पण असतात. तलावात काही भले मोठे पार्टी क्रूज पण उभे असतात. स्वतः चालवायच्या खाजगी बोटींचा धक्का पण तिथे आहे. कितीतरी गोष्टी आहेत.

पहिल्याच दिवशी बाहेर तापमान शून्य डिग्री होते. आता बाहेर फिरणे कठीण होणार हे नक्की. कारण शिकागो तिथल्या थंड आणि बोचऱ्या वाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. घर एकोणतिसाव्या मजल्यावर,तलावाच्या समोर. काय सुंदर नजारा होता म्हणून सांगू. एका बाजूच्या खिडकीतून समोरची, रस्त्यापलीकडची इमारत आणि दुसऱ्या बाजूला पसरलेला तलाव. त्या इमारती म्हणजे फाईव्ह स्टार अपार्टमेंट्स होते. एवढ्या मोठ्या इमारतीत दुसरे कोणी राहते कि नाही रे? कसला गोंधळ, गडबड नाही. ती लिफ्ट आपल्याच मजल्यावर थांबणार. पहिले दोन दिवस तर रिसेप्शन वरचा दादा फक्त दिसला. बाकी कोणी नाही. आजूबाजूला इतक्या मोठ्या इमारती पण खाली कुठे गर्दी नाही. उगाच जवळच्या मॉल मध्ये गेलो तर तिथेही गर्दी नाही. थंडीनी गोठलीत का रे सगळी? पण हि तर थन्डीची सुरवात होती. अजून पारा घसरायचाय थंडीच्या नावाने. थँक्स गिविंग साठी सगळे शहर सजले होते.

बोचऱ्या वाऱ्यात , तलावाच्या बाजूने फिरायला जाणे म्हणजे डोक्यातले सगळे कांदे बटाटे पूर्णपणे , गदगद हलवून सोडणे. केस तरी उरतात का नाही डोक्यावर अशी परिस्थिती. जे काही बांधले होते डोक्याला ते टीकतच नव्हते जागेवर. त्यातच तिथे अनेक कॅनेडियन गिज प्रवासातील थांबा म्हणून विश्रांती घेत होते. विश्रांती कसली? काठावर गोंधळ करत होते नुसता. सगळीकडे खरं तर पाट्या होत्या, "clean after your pet " पण काठावर तर शिटलेलं सगळीकडे. अरेच्चा ? आपली नाहीत न लोकं ही ? अशी उगीच भीती वाटून गेली. पण नंतर लक्षात आलं, ही जी हजारोंच्या संख्येने कॅनेडियन गिज आलीत न त्यांचा हा प्रताप. नेहेमी इंग्रजी अक्षर V च्या आकारात उडणारे हे मोठ्या आकाराचे पक्षी सहज लक्षात राहतात. एकजण समोर असतो तो वाऱ्याचा झोत कापत उडत असतो. त्याच्या मागचे दोघे , त्याच्या थोडे वर उडतात. मगचे दोघे अजून थोडे वर असे करत वाऱ्याच्या झोतापासून आपला बचाव करत ते, ताशी ४० मैल ह्या वेगाने उडतात. पुढचा थकला कि तो सरळ मागे येतो आणि नवा गडी पुढे जातो. दोन तीन हजार मैलांचा प्रवास करून ते थंडीपासून दूर पळतात. त्यांच्या त्या थव्याची इतकी मजा असते, छोटे बच्चे पण असतात त्यात, पण त्या सगळ्या ग्रुपचे बच्चे एक होतात आणि एकत्र राहतात, एकत्र पोहतात, एकत्रच उडतात, अशा बच्चे लोकांच्या एका ग्रुपमध्ये शंभरापेक्षा जास्ती बच्चे असतात. जन्मतःच ते पोहू शकतात, पहिल्या चोवीस तासात तर ते खोल बुडी मारायला लागतात. पण इतके बुद्धू असतात न, जे काही त्यांच्या समोर हलत असेल त्याला आई समजून त्याच्या मागे जातील, मग तो कुत्रा असु दे, माणूस असू दे नाही तर अजून काही. दोन महिन्याचे बच्चे उडायला शिकतात आणि लगेच आपल्या आई वडिलांबरोबर स्थलांतराला सुरुवात करतात. मोठे गिज, एकदा पार्टनर शोधला कि बदलत नाहीत, हा अगदीच जर पार्टनर स्वर्गवासी झाला तरच दुसरा शोधतात. जातीचे प्रवासी असतात ते. त्यांना थंडी, बर्फ आवडत नाही. आर्क्टिक प्रदेशातील जमात ही, पण थंडी पासून लांब पळतात. मजेत पाण्यातून जमिनीवर आणि परत पाण्यात असा कार्यक्रम चालू होता त्यांचा. एकोणिसाव्या शतकात जवळ जवळ नामशेष झालेली हि प्रजाती, खूप प्रयत्नांनी वाढवली आहे. अनेक पक्षांच्या पायात धातूच्या पट्ट्या होत्या. त्यावरून संशोधकांना त्यांच्या जीवनाचा अभ्यास करायला मदत होते. वर वर शांत वाटणारे हे पक्षी खूप भयंकर असतात. थोडा जरी धोका त्यांना जाणवला तर समोरून हल्ला करतात. मोठमोठ्याने ओरडतात, त्यांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्याला सळो कि पळो करून सोडतात. त्यांच्या थव्याकडे नीट बघितल्यावर इतरही अनेक प्रकारचे गिज त्यात दिसले. सगळ्यांना एकत्र राहू देतात पण त्यांची शिकार करणारा कोणी आला आहे असे जाणवले की एक होऊन हल्ला करतात. आकाराने बरेच मोठे असतात आणि आवाजही कर्कश्श असतो. सतत ओरडत असतात. अलीकडच्या काळात पाण्यानजीक जिथे जिथे म्हणून सुंदर वाढवलेल्या हिरवळी आहेत तिथे मस्त ठाण मांडून कल्ला करतात. थोडे दिवस राहतात, मग चले आगे. करड्या रंगाचे , काळ्या लांब मानेचे , मधेच पांढरा भाग असलेले साधारण अडीच तीन फूट उंचीचे हे पाहुणे आपल्याच धुंदीत सगळा किनारा व्यापून होते. त्यांच्या पासून बचाव करणे कठीण होत होते मग तेवढा भाग आम्ही मुख्य रस्त्यावरून पार केला. पुढचे काही दिवस शहराच्या इतर भागात फिरण्यात गेले. म्युझियम आणि शेड मत्स्यालय बघायला पुन्हा त्या भागात गेलो तर सगळा भाग स्वच्छ, एकही पक्षी तिथे नव्हता. ते गेले होते निघून त्यांच्या पुढच्या थांब्या कडे ........

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments