पत्र क्र ११४ — शून्य डिग्री तापमानातला शिकागो

सकाळीच शून्य डिग्री तापमान बघून जरा धास्तावायलाच झालं. हो पण दुपार पर्यंत ते जरा वाढलं म्हणजे २, ३ असं. खरं तर घर छान गरम करून ठेवलं होतं आणि बाहेरच्या तापमानाची थोडी सुद्धा तोशीस जीवाला पडत नव्हती,...

कीर्ती वडाळकर
||4 min read

सकाळीच शून्य डिग्री तापमान बघून जरा धास्तावायलाच झालं. हो पण दुपार पर्यंत ते जरा वाढलं म्हणजे २, ३ असं. खरं तर घर छान गरम करून ठेवलं होतं आणि बाहेरच्या तापमानाची थोडी सुद्धा तोशीस जीवाला पडत नव्हती, पण गुगल सांगतोय न , शून्य डिग्री? मग जरा हुडहुडी भरू द्या. असे ते शिकागो चे दिवस. घरातल्या त्या गुगल ला सारखं बाहेरचं तापमान विचारायचा चाळाच लागला होता मला. उगाच आपलं पाऊस येणार आहे का? बर्फ पडणार आहे का? मी तिथून निघाल्यावर हुश्श केलं असेल त्या गुगल ने.

असाच एक सर्दावलेला थंड दिवस. तो सूर्य कुठे होता कोण जाणे. सकाळपासून दिसलाच नव्हता. घड्याळात वाजले न दहा, चला निघू या फिरायला. ते कार्ड खिशात टाका , ते कुठेही चालते, चढा बस मध्ये नाहीतर ट्रेन मध्ये. दिवसाचा चार्ज पण कमी. ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळं शहर पालथं घालता येतं . खूप चांगली सिस्टिम. बस आणि ट्रेन वेळेवर येणाऱ्या, आपल्या गुगलच्या मदतीने आपण कुठेही फिरू शकतो. चालत फिरायला जास्त मजा येते पण मग दूरचे अंतर कसे कापणार न?

शिकागो १८३७ साली वसले, ते प्रामुख्याने लेक मिशिगन, लेक ह्युरॉन , लेक सुपीरियर ह्यांच्या जवळच्या भागातील जमिनीवर , तिन्हीतला एक दुवा म्हणून. जल वाहतुकीला मदत म्हणून ह्या भूभागाचे खूप महत्व होते. १८३७ ला वसायला सुरु झालेले हे गाव पुढच्या पंचवीस वर्षात खूप पसरले. लोकसंख्या झपाट्याने वाढली. पण १८७१ मध्ये काही भागात मोठी आग लागली. बराच भूभाग ह्या आगीत बेचिराख झाला. लाखभर लोक बेघर झाले. पण तरीही शिकागो शहर न डगमगता पसरत राहिले, आडवे आणि उभे सुद्धा. १९०० साल उजाडेपर्यंत चांगलेच पसरलेले शहर अनेक बाबींमध्ये इतर शहरांना मार्गदर्शक ठरत होते. शहराचे प्लॅनिंग उत्तम कसे असावे? शहराचे सौंदर्यीकरण कसे करावे? लोखंडी ढाच्याच्या उंच इमारती कशा बांधायच्या? अशा अनेक बाबींमध्ये हे शहर मैलाचा दगड ठरायला लागले होते. शिकागो स्कुल ऑफ आर्किटेक्चर पण १९०० साल पर्यंत जोमाने कामाला लागले होते. कारखाने, आंतरराष्ट्रीय व्यापार , संस्कृती, शिक्षण , दूरसंचार, तंत्रज्ञान, दळणवळण ह्या सगळ्यात खूप प्रगती होत होती. अनेक गोष्टींमध्ये शिकागो शहर आघाडीवर आले आणि आज घडीला अमेरिकेचे एक मुख्य शहर झाले आहे. इथला आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातला सहावा व्यस्त विमानतळ आहे. ह्या शहराला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक ठिकाणी पर्यटकांनी भेट देण्यासारख्या छान जागा आहेत.

इथले तापमान अतिशय विषम असते असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. मे महिन्यात भरपूर गरम होणारे शहर ऑक्टोबर पासून खूप थंड पडायला सुरु होते. नोव्हेंबर मध्ये बर्फ पडायला लागतो आणि पारा शून्याच्या आसपास येतो. पुढेपुढे तर तो शून्याच्या बराच खाली जातो. दिवस लहान होतो. सूर्य लवकर घरी जाण्याची घाई करू लागतो आणि जणू काही त्या थन्डीने तो हि आळसावतो आणि लवकर यायलाच तयार होत नाही. अधून मधून पाऊस पडतो आणि थंडी ला फोडणी घालून खमंग करतो. एक मैत्रीण म्हणाली, "अगं पूर्वी उन्हाळा फारसा नसे पण हल्ली सगळीकडेच तो खूप जास्त असतो तसा शिकागोत पण फार जाणवतो. " इथे जास्ती प्रकर्षाने मला जाणवला तो थंड आणि बोचरा वारा . थंडीचे दिवस असल्याने जास्तीच होता तो. तो लेक मिशिगन पण थन्डित बर्फाचे तुकडे, गोल गोल चकत्या घेऊन येतो. कोणी त्याला बर्फाचे पॅनकेक म्हणतात. थंडीचे तीन महिने फारच बोचरे असतात. अर्थात लोकांना सगळी सवय झालेली आहे, आणि ते फारसे न डगमगता सगळ्या हवामानाला सामोरे जातात. रस्त्यावरही बर्फ जमतो. बरेचदा पावसाबरोबर तो येतो. जसजसा हिवाळा वाढतो तसतसा सगळीकडे बर्फाचा थर पसरू लागतो आणि शहराचा रंग पांढरा व्हायला लागतो. अनेक फुटांचा बर्फ रोजचे जगणे पण कठीण करून सोडतो.

तर त्या शून्य डिग्री तापमानात आपण बाहेर पडलोय. शिकागो नदीच्या बाजूने सुंदरसा रिव्हर वॉक आहे. तो पार करत, मिलेनियम रस्त्यावर येऊ. तिथून बस मध्ये बसून शहराची मजा घेत लिंकन पार्क ला जाऊ. इतके छान आहे न ते प्राणी संग्रहालय. किती विविध प्रकारचे प्राणी! त्यांना साजेशा सजावटीत ठेवलेत. प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवक पण होते. त्या त्या प्राण्यांची आणि पक्ष्यांची काळजी घ्यायला. सिंहांच्या पिंजऱ्याजवळ एक बरीच वयस्कर महिला स्वयंसेवक म्हणून काम करत होती. तिला ती काय करते विचारल्यावर ती खूषच झाली. मग ती कशी ह्या पिंजऱ्यातल्या सिंहांवर प्रेम करते, ती कशी त्यांच्यावर लक्ष ठेवते, ते काय खातात, एकूण किती जण आहेत, त्यातले सिंह किती, सिंहीणी किती, वगैरे माहिती तिने अतिशय उत्साहात पुरवली . मला कौतुक वाटले तिचे, ह्या वयात ती किती उत्साही होती. तिचा आनंद खूप ओसंडून वाहत होता कारण तिची एक सिंहीण पिल्लांना जन्म देणार होती. तिची आता कशी काळजी घ्यायची ह्याची चिंता ह्या मातेला लागून राहिली होती. मला म्हणाली," तू भारतातून आलीस न? अग भारतात सिंह असतात न? तुला माहिती आहे का हिची काय काळजी घ्यावी ते?" अरे देवा ! मला कसे माहित असेल? पण ती इतक्या तळमळीने विचारत होती . मग वन्य प्राण्यांची अभ्यासक असलेली आमची एक नातेवाईक आठवली, मी त्या स्वयंसेविकेला हीचा नम्बर दिला, काय खुश झाली ती. म्हटलं, पण आत्ता नको करुस फोन, भारतात मध्यरात्र असेल. तशी हसली, म्हणाली, खरंच ग, मला ह्या सिंहिणीच्या काळजीपुढे काही सुचतच नाही बघ. ते पार्क खूप मोठे आहे. बऱ्याच प्रकारचे प्राणी, पक्षी उत्तम पद्धतीने ठेवलेत. मात्र फिरताना तो थंड वारा हैराण करत होता. तेवढ्यात ती स्वयंसेविका म्हणाली, आता दिवस अजून लहान होईल आणि थँकस गिविंग साठी हा सगळा पार्क दिव्यांच्या रोषणाईने सजून जाईल. दिवे लावण्यासाठी सगळीकडे काम चालू दिसत होते. दुसऱ्याच दिवशी पासून तो दिव्यांचा खेळ संध्याकाळी सुरु होणार होता. नक्की या, बघण्यासारखा असतो, वगैरे तिने सांगितले. आम्ही पण नक्की येऊ सांगून निघालो. बाकी ठिकाणी फिरण्यात बरेच दिवस गेले. मग एकदा संध्याकाळी गेलो ती रोषणाई बघायला. पार्कच्या प्रवेशद्वारापाशी रांग दिसली, आपणही लागू रांगेत करत रांगेचा शेवट शोधायला लागलो, तर तो चांगला पाऊण किलोमीटर पुढे! आणि गर्दी झाल्यामुळे आत सोडत पण नव्हते तरी लोक शांतपणे थंडीत कुडकुडत रांगेत उभे होते.

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments