पत्र क्र ११५ — शिकागो शहराचा इतिहास

१८३३ मध्ये जेमतेम २०० लोकांच्या वस्तीने सुरु झालेले शिकागो शहर, पुढच्या शंभर वर्षात प्रचंड वाढले. पहिल्या सात वर्षातच चार हजार आणि एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी दहा लाख लोकवस्ती असलेलं हे शहर...

कीर्ती वडाळकर
||4 min read

१८३३ मध्ये जेमतेम २०० लोकांच्या वस्तीने सुरु झालेले शिकागो शहर, पुढच्या शंभर वर्षात प्रचंड वाढले. पहिल्या सात वर्षातच चार हजार आणि एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी दहा लाख लोकवस्ती असलेलं हे शहर अमेरिकेच्या प्रमुख शहरांच्या यादी मध्ये जाऊन बसलं. जल वाहतुकीला सोयीचे म्हणून वसलेले त्यामुळे अनेक वस्तूंची कोठारं झपाट्याने वाढू लागली. मग अनेक कामगार इकडे स्थलांतरित झाले. अनेक आफ्रिकन अमेरिकन्स ह्याच काळात शिकागोत आले. अनेक वंशाचे, धर्माचे लोक इथे राहतात.

आज घडीला , उद्योगाच्या दृष्टीने , हे जगातले चौथ्या क्रमांकाचे महत्वाचे शहर मानले जाते. अनेक मोठ्या कपंन्यांची ऑफिसेस इथे आहेत. अनेक गगनचुंबी इमारतींमधून खूप लोक काम करतील अशी सोय आहे. आपण रस्त्याने चालत निघालो कि सगळ्या बाजूंनी उंच उंच इमारतींनी वेढलेलो असतो. अर्थात शहराचा बराच भाग बगिच्यांमध्ये पण विभागला आहे. आणि काही भागांमधून बैठ्या इमारती पण आहेत. शिकागो नदी शांतपणे शहरातून वाहते. दोन्ही काठांवर आकाशाला गवसणी घालणाऱ्या इमारती , अनेक ठिकाणी जुन्या नव्या बांधकामातले सुंदरसे खूप पूल, दोन्ही काठांच्या कडेने चालायची सोय , थोड्या थोड्या अंतरावर बसायची आणि परिसराची मजा घेण्याची सोय , खूप सुंदर वाटते ती शिकागो नदी. काठावर असलेल्या काही महत्वाच्या इमारतींची माहिती देण्यासाठी रिव्हर क्रूझ आहेत. हि नदी शिकागो वासियांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आज जरी खूप स्वच्छ आणि सुंदर वाटत असली तरी अनेक वर्षे ह्या नदीने वाईट दिवस बघितलेत. नदी मध्ये शहराचे सगळे सांडपाणी सोडलेले होते. त्यामुळे मिथेन गॅस तयार होऊन बुडबुडे येत, वास येई. उपहासाने लोक तिला "बबली रिव्हर" म्हणत. नदी काठी फिरणे म्हणजे नाकावर रुमाल असे गमतीने सांगत. १९५५ साली जे महापौर आले त्यांनी ह्या नदीला सुशोभित करण्याचा चंग बांधला. सर्वप्रथम नदी काठ सुशोभित केला. ते सांडपाणी कुठून येते त्याचा शोध लावून त्यावर प्रक्रिया करणारी युनिट्स बसवली. नदीत खराब पाणी सोडणे बंद झाले. तसेही जसजशी लोकसंख्या वाढू लागली, शहराचे सगळे सांडपाणी प्रक्रिया केंद्रात वळवले गेले. प्रक्रिया करणारी अनेक संयंत्र बसवली गेली. नदीकाठ सुशोभित झाला, लोकांना वापरण्या योग्य झाला. पाणी स्वच्छ झाले आणि ती नदी "बबली रिव्हर" उरली नाही. वासही गेला. बगीचे, चालण्यासाठी रस्ते, ह्या सगळ्याने नदीचे अस्तित्वच बदलून गेले. आज शहराच्या सौंदर्यात हि नदी चार चांद लावते आहे. ह्या सगळ्याचा आनंद म्हणून, पहिल्या वर्षी, प्लम्बर्स असोसिएशन ने एक रंग वापरून सगळी नदी हिरवी केली. महापौरांना खरं तर लेक मिशिगन हिरवा करून आनंद साजरा करायचा होता. पण त्यासाठी रंग जास्ती लागेल आणि एकूणच ते हाताबाहेर जाण्याची शक्यता जाणून प्लम्बर्स असोसिएशन चा अध्यक्ष आणि महापौरांचा मित्र मध्ये पडला. त्याने समजावून मग फक्त नदीच हिरवी करायचे असं ठरलं. मात्र आजता गायत तो रंग काय असतो ते कोणाला कळले नाही. त्या असोसिएशन ने आपला फॉर्मुला एकदम सिक्रेट ठेवला आहे. पर्यावरण वादी लोकांनी खूप वेळा आक्षेप घेतला पण अजूनही दर वर्षी नदीला हिरवे करतात. एक बोट ती पावडर पसरवते दुसरी पाणी ढवळते, आणि हिरवा रंग पसरतो. सगळे पात्र मस्त हिरवेगार होते. आजूबाजूच्या उंच इमारतींवरून, काठावरून , पुलांवरून, हा सोहळा बघण्यासाठी, थंडीची पर्वा न करता अनेक लोक जमतात . काही तासां चा हा खेळ अनुभवतात.

मला ह्या शहरात एक गोष्ट विशेष प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे खूप ठिकाणी लोखण्डी, किंवा इतर धातूंच्या विविध प्रकारच्या कलाकृती मांडल्या आहेत. कुठे छत्र्या घेतलेली माणसे, कुठे सिंह, कुठे घोडा,कुठे अब्स्ट्रॅक्ट , कुठे लोखण्डी सांगाडे, कुठे माणसे, बापरे किती तरी प्रकारची शिल्पं . शहर सुशोभीकरणाचा हा एक अतिशय सुंदर प्रकार आहे. अनेक ठिकाणी , अगदी मोठं मोठ्या इमारतींच्या गराड्यात, दिमाखात उभी असलेली हि शिल्पं नक्कीच आपले लक्ष वेधून घेतात. किती विचारपूर्वक मांडली आहेत ती? आणि घडवलीत पण फार सुंदर. असेच एक मोठ्ठे शिल्प म्हणजे "द बिन" किंवा "क्लाऊड गेट". हा भव्य बिन दुरूनच नजरेत भरतो. मूळ भारतीय वंशाचे ब्रिटिश कलाकार अनिष कपूर ह्यांच्या कल्पकते तुन साकारलेले हे भव्य शिल्प लूप भागात मिलेनियम पार्क मध्ये चमकत उभे आहे. स्टेनलेस स्टीलच्या अनेक प्लेट्स एकमेकात जोडून बनलेल्या, एखाद्या आडव्या पडलेल्या चवळीच्या किंवा कॉफीच्या दाण्यासारख्या आकाराचे हे भव्य शिल्प खूप छान आहे. त्याच्याजवळ उभे राहून, खालून जाऊन, बाजूने, त्या चकचकीत पॉलिश केलेल्या स्टेनलेस स्टीलच्या आरशात आपले प्रतिबिंब बघत विविध कोनातून फोटो काढण्यात जनता मग्न असते. द्रवरूप पाऱ्याचा भासावा इतका तो पृष्ठभाग चकचकीत केलेला आहे. ह्या पार्क मध्ये काहीतरी भव्य उभे करायचे म्हणून एक स्पर्धा घेतली गेली. त्यात आर्किटेक्ट कपूर ह्यांनी सादर केलेले हे शिल्प निवडले गेले. त्यांनी ह्याचे नाव क्लाऊड गेट ठेवले होते. लांबून बघितल्यास त्याचा वरचा भाग ढगात असल्यासारखा वाटेल, किंवा वरच्या चकचकित पृष्ठभागातून परावर्तित होणारे आकाश, आणि आजूबाजूच्या उंच उंच इमारतीं च्या प्रतिबिंबामुळे ढगांच्या जवळ गेल्या सारखे वाटेल अशी काहीशी त्यांची कल्पना होती. सुरवातीला लोकांनी बरीच टीका केली. आणि क्लाऊड गेट ऐवजी हे तर बिन वाटते असे म्हणायला लागले. कपूर ना हे नाव आवडले नव्हते पण त्यांनी ते नंतर मान्य केले. आधी अगदी फोटो काढायला पण परवानगी नव्हती. अर्थात आतंकवाद्यांच्या भीतीपोटी ते करणं बरोबरही नव्हते. अतिशय कल्पकतेने बांधलेले हे शिल्प म्हणजे उत्तम कल्पना आणि उच्च तंत्रज्ञान ह्यांचा छानसा संगम आहे. हे शिल्प बांधताना काही प्रश्न तयार झाले होते. शिल्प स्टील मध्ये असणार आणि गोलसर आकारात सर्व दिशांनी बंद असणार. म्हणजे तिथल्या अतिविषम हवामानात हे कसे उभे राहणार? उन्हाळ्यात आत किती गरमी तयार होईल? ह्या सगळ्यावर उपाय शोधले गेले. एक मोठा प्रश्न तर बाहेरच्या बाजूला कसे स्वच्छ ठेवायचे? हा होता. वरून उडणारे पक्षी नेमके शिटणार , लोक हात लावून खराब करणार, मग ती चकाकी कमी होईल. अस्वच्छ शिल्प ठेवणे अर्थातच प्रशासनाला मान्य नाही. मग रोज सकाळी दोन तास मोठमोठे पाईप, पाणी, पम्प अशा सगळ्या सामुग्रीसकट एक टीम इतके मोठे हे शिल्प स्वच्छ धुते, पुसते आणि दिवसभरासाठी पर्यटकांना आठवणीत राहतील असे फोटो काढण्यासाठी, दुरून दिसणाऱ्या सगळ्या उंच इमारतींच्या प्रतिबिंबाकडे बघत त्या दृश्यात हरवून जाण्याची संधी देते .

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments