पत्र क्र ११६ — शिकागोचा नगर विकास आणि आराखडा

नगर विकास आणि शहरांचे आराखडे ह्याचा उत्तम नमुना म्हणजे शिकागो शहर. इतक्या उंच उंच इमारती चहूबाजूंनी आपल्याला वेढुन उभ्या असतात, आपणही कुठल्या तरी उंच इमारतीतच असतो, ह्या सगळ्या इमारतींचे सांडपाणी...

कीर्ती वडाळकर
||4 min read

नगर विकास आणि शहरांचे आराखडे ह्याचा उत्तम नमुना म्हणजे शिकागो शहर. इतक्या उंच उंच इमारती चहूबाजूंनी आपल्याला वेढुन उभ्या असतात, आपणही कुठल्या तरी उंच इमारतीतच असतो, ह्या सगळ्या इमारतींचे सांडपाणी कुठे जात असेल, कचरा कसा जमा करत असतील, थंडी, वारा , ऊन , पाऊस , बर्फ अशा सगळ्या विषम हवामानात शहर कसे जगत असेल, लोक कसे राहत असतील, ह्या सगळ्या प्रश्नांचा अभ्यास करून वसवलेले शिकागो शहर, आलेल्या पर्यटकांना आवडेल अशी पूर्ण व्यवस्था आहे.

एवढ्या इमारतींमधून राहणारे लोक, रस्त्यावर काही दिसत नव्हते आणि खरंच इथे लोक राहतात न? असा प्रश्न पडत होता. पण सकाळीच शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावरून धावणाऱ्या असंख्य गाड्या बघितल्या आणि निदान काम करायला येणारी जनता खूप आहे ह्याची खात्री पटली.

"तुला गर्दी बघायची आहे का?" मुलाने विचारले. "नाही रे, ती आमच्या कडे खूप आहे. मला फक्त कुतूहल हे कि दिवसा सगळे रस्ते ओस कसे पडलेले असतात."

शनिवारी सकाळीच मुलाने, "चला आज शहराचा वेगळा फ्लेवर दाखवतो तुम्हाला " सांगितले. मला वाटले काही वेगळे टुरिस्ट आकर्षण असेल. चालत निघालो मिशिगन रस्त्याकडे प्रत्येक इमारतीची माहिती घेत. एक छोटासा जिना चढून वर आलो त्या मिशिगन स्ट्रीट वर, त्याला मॅग्निफिसंट माईल पण म्हणतात, आणि बाप रे! बघावे तिकडे माणसेच माणसे, इतक्या प्रकारची ही माणसे आलीत कुठून? एवढ्या थंडीत पोरं बाळ काखोटी मारून फिरताहेत रस्त्यावर. त्या रस्त्यावर जग भरा तील अनेक नामांकित ब्रँड ची मोठी स्टोअर आहेत. सुंदरसा रस्ता, मध्ये आणि कडेला शिस्तीत लावलेली रंगीत फुलझाडे, दोन्ही बाजूला ती मोठं मोठी दुकाने, अनेक जुन्या पध्धतीच्या दगडी इमारती, काही आधुनिक गगनचुंबी इमारती, एकूण च रस्ता खूप आकर्षक आहे. शनिवार ची सुट्टी घालवायला जनता आली होती रस्त्यावर. थंडी असली तरी अजून बर्फ पडत नव्हता. त्यामुळे हातात असलेले दिवस मजेत घालवायला सगळे जमले होते.

ह्या रस्त्यावर स्टारबक्स ची रोस्टरी आहे. जगभरात अशी सहाच रोस्टरी आहेत. शिकागोचे सगळ्यात मोठे. चला जाऊ तिथे. आणि बघतो तो काय, आत शिरायला भली मोठी रांग. अरे देवा , नको ती कॉफी रे, नंतर येऊ. परवाच तर येऊन गेलो न? असे एकमेकांशी संवाद सुरु झाले. पण मुलगा अशी हार मानायला तयार नव्हता. असू दे ग रांग, घाबरतेस काय, आत्ता सरेल बघ गर्दी . खरं सांगू का, आपण भारतीय लोकांना पेशन्स जरा कमी असतो. इतकी घाई असते न, रस्त्यावर आपल्याला दिसतेच ती जागोजागी, जणू काही कुठलेसे चांद्रयान आपल्यासाठी खोळंबले आहे आणि आपण नाही धावलो तर सुटेल ते. रांगेशी तर आपले काय वाकडे असते कळत नाही, रांग दिसली तर ती मोडायची कशी हाच विचार आपण करत असतो. पण आता थांबलो बाबा रांगेत, थंडीत. यथावकाश आत गेलो. कॉफी च्या मस्त वासाने स्वागत केले, आणि लक्षात आले बरं झालो थांबलो. भव्य ५ मजली रोस्टरी आहे ती. मोठमोठे तांब्याचे पाईप सगळीकडे कॉफी बीन्स पुरवायचे काम करतात. अनेक देशांच्या कॉफी तिथे मांडल्या आहेत. त्यांची माहिती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. समोरच कॉफी तयार करण्याची मशिन्स आहेत. ती सगळी कृती समजावून सांगतात. तुम्ही बघू शकता, कॉफी कशी बनते आहे ते. तुम्ही घाईत असाल तर इथे कॉफी चा बंद कप घ्या आणि मार्गस्थ व्हा. पहिल्या मजल्यावर कॉफी च्या जोडीने काही वस्तू विकत घेता येतात. दुसऱ्या मजल्यावर केक , पिझा , पेस्ट्री,पास्ता वगैरे मिळतात. तिसऱ्या मजल्यावर ग्वाटेमाला ची कॉफी मोठ्या बॅरेल्स मध्ये भरून ठेवली होती. तिच्या जोडीने अजूनही काही देशांची कॉफी होती, कोस्टा रिका, कम्बोडिया, ब्राझील, व्हिएतनाम वगैरे . चौथ्या मजल्यावर "कॉकटेल" बार, अरे नको तिथे आपले काय काम? तर ते कॉकटेल चहा किंवा कॉफी चे बरं का, म्हणजे, चहा किंवा कॉफीत कुठे काकडीचा रस टाक , कुठे पुदिना टाक , वेगवेगळी फळे बारीक चिरून टाक , फळांचा रस टाक , असे कॉकटेल आहे ते. पाचवा मजला म्हणजे गच्ची , पण थंडी मुळे बंद होती ती. एका कॉफीचे किती प्रकार असू शकतात, ते बघायला इथे नक्की भेट द्यावी. प्रत्येक देशाच्या कॉफीची चव वेगळी. त्या बिया किती आणि कशा भाजतात त्यावर हि चव बदलते. आणि त्यात तुम्ही काय टाकता त्यानेही चव वेगळी लागते. थंड कॉफीत ते सगळे कॉम्बिनेशन्स चांगले लागतात, पण इथे इतक्या थंडीत ती थंड कॉफी घ्यायची? मग गरम मध्ये घाला वेगवेगळ्या वस्तू. पण नको, आपल्याला आपली नेहेमीची गरम कॉफीच बरी. थंडीत थंड खाणे म्हणजे बाहेरून तर थंडी वाजतच असते , आतून पण ती वाजायला लागते. नको रे देवा!

समोरच्या मिशिगन रस्त्यावरून लोक वाहात होते. शनिवारचा दिवस सगळे बाहेर आले होते न. मग ती शिकागोतील सर्वात उंच ३६० इमारत पण बघणे आलेच ओघाने. सगळ्यात वरच्या मजल्यावरून शहराचा नजारा सुंदरच दिसतो. तो क्लाऊड गेट सुद्धा माणसांनी भरला होता आज. बाजूलाच असलेले ओपन एअर थिएटर मध्ये काही कार्यक्रम चालू होता. लोक मजेत बघत होते. त्या थिएटर चे बांधकाम वेगळ्याच आकारात आहे. स्टील चे पडदे असावेत असे पॅनेल्स लावलेत. बगीचातील काही झाडे लाल झाली होती, पानगळीची तयारी झाली होती त्यांची. खूप लोक बगिच्यात फिरत होते. बाजूच्या मैदानात जत्रा भरली होती, काही स्टॉल्स पण होते. अंधार पडू लागला तसा सगळा बगीचा सुंदर दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाला. मस्त नजारा होता तो. एकुणात ते मिलेनियम पार्कच खूप छान आहे.

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments