पत्र क्र ११७ — शिकागोचे आर्किटेक्चर आणि लेक मिशिगन
शिकागो, एक छानसे शहर. आर्किटेक्चर चा उत्तम नमुना असलेल्या अनेक इमारती इथे आहेत. अनेक वस्तू संग्रहालये आहेत. खूप पार्क्स आहेत. शहरात सगळीकडे सुंदर सुंदर शिल्प मांडलेली आहेत. लेक मिशिगन च्या साक्षीने...
शिकागो, एक छानसे शहर. आर्किटेक्चर चा उत्तम नमुना असलेल्या अनेक इमारती इथे आहेत. अनेक वस्तू संग्रहालये आहेत. खूप पार्क्स आहेत. शहरात सगळीकडे सुंदर सुंदर शिल्प मांडलेली आहेत. लेक मिशिगन च्या साक्षीने अनेक लोक रोज उपनगरांमधून शहराकडे धाव घेत असतात.
काही इमारतींचे आकार अगदी लक्षात राहण्याजोगे आहेत. काही चौकोनी, काही पंचकोनी तर काही गोल. एक तर अगदी भला मोठा ईडली स्टॅन्ड वाटावा अशी आहे. दुसरी नुसताच ठोकळा . एक घड्याळाचा टॉवर वाटावा अशी. एक फिरता पंखा वाटावा अशी. कुठे एकावर एक ठोकळे रचलेत, कुठे ते एक आड एक रचलेत, एक जरा ह्या बाजूला सरकलेला, दुसरा त्या बाजूला, कुठे चकचकीत काच निळी पांढरी दिसतेय, कुठे इमारतीला दोन शिंग आलीत वर. आर्किटेक्चर चा विद्यार्थी असलेला माझा भाचा रोज विचारायचा आज कोणती नवीन इमारत बघितलीस? कोणते नवीन शिल्प बघितलेस? त्यामुळे सगळी माहिती घेणे भाग होते. ट्रम्प टॉवर आणि त्याच्या पुढ्यातील छत्रीतली ब्रॉन्झ ची माणसे, एका बाजूला शिकागो नदी, समोर सगळे चित्र विचित्र आकाराचे ठोकळे उभे, आपण वाऱ्याला चुकवायला थोडा आडोसा घेऊन उभे राहू, अर्थातच ते ब्रॉन्झ मधले शिल्प बघत. आणि हो फोटो काढणे तर अनिवार्य आहेच.
शिकागो नदीच्या काठावर उभे शिकागो आर्किटेक्चर सेंटर शहराची छान टूर करून आणते आणि सगळ्या छान छान इमारती, शिल्पांची ते माहिती देतात. त्यांच्या सेंटर मध्ये जगभरातील विशेष इमारती छोट्या मॉडेल्स च्या रूपात बघायला मिळतात. सगळ्या इमारतीं तज्ञांच्या नजरेतून बघताना त्या त्या इमारती बद्दल नवीन माहिती मिळते.
ते सेंटर बघून निघालो आणि बाहेर जरा कुडकुड
व्हायला लागले, एकावर एक कपडे , जॅकेट होते तरी. तसेही शिकागो मध्ये खूप थंड वारा आणि तिथे पोचल्या दिवसापासून शून्य तापमान असा झगडा सुरूच होता. बाजूलाच असलेल्या बस शेड मध्ये गेलो. तेवढ्यात आलेल्या बसमधून एक आजी व्हीलचेयर वरून उतरली. मस्त हसली. खूप गप्पा मारल्या. "एकटीच राहते म्हणाली मी. कॅन्सर मधून बरी झालीय. पण माझे शहर मस्त आहे हा. सगळं बघा" म्हणाली. आमची चौकशी केली. "काय काय बघितलं शिकागोत? इतके छान शहर नाही दुसरे." म्हणाली, "म्युझियम वगैरे तर छानच आहेत, ते सगळे बघा. आमचे लिंकन पार्क बघा, अहो एवढ्या मोठ्या पार्क मध्ये प्रवेश मात्र मोफत आहे हा. विचार करा आमचे कौन्सिल शहरावर किती खर्च करते. तुम्ही आमचे युनियन स्टेशन बघून या, शिकागो चे दुसरे टोक बघून या, चायना टाऊन बघा. एकदा मेट्रो चा प्रवास करा," ह्यातले आम्ही बहुतेक करून झाले होते, युनियन स्टेशन मात्र बघितले नव्हते. तिच्याशी बोलताना लक्षात आले तिला तिच्या ह्या कर्मभूमीचा खूप अभिमान आहे. लगेच म्हणाली, "एक खंत मात्र आहे ग मला. हे शहर गुन्हेगारीत पण पुढे आहे ग. किती गुन्हे घडतात म्हणून सांगू इथे. मग आमच्या पोलिसांना किती काम पडते बघ. ह्या एकाच गोष्टीचे मला वाईट वाटते".
तर लगेच मोर्चा त्या युनियन स्टेशन कडे. खरोखर मस्त इमारत. रस्त्यात जाताना सगळीकडे थँक्स गिविंग साठी सजलेले शहर बघत गेलो. तर शंभर वर्षे जुनी त्या युनियन स्टेशन ची इमारत पण लखलखत होती. छान छान देखावे मांडले होते. सजावट अप्रतिम होती. कुठली तरी गाडी निघायच्या तयारीत होती तर स्टेशनात जरा गडबड होती. ती गाडी गेल्यावर मात्र शुकशुकाट. इमारत भव्य आणि दगडी बांधकामात आहे . भव्य, पांढरे शुभ्र , उंच उंच , कोरीव खांब, त्या समोरचा तसाच पांढरा जिना, त्या दगडी इमारतीची शोभा वाढवतात. पलीकडे एक पोलर एक्सप्रेस चे इंजिन सुंदर सजवून ठेवलेय, त्याच्या खाली कापूस पसरवलाय बर्फाचा फील यायला. तिकडे एक मोठ्ठ ख्रिसमस ट्री सजवून उभे केलय , दुसऱ्या कोपऱ्यात लहान लहान ख्रिसमस ट्री सोबत काही वेगळी सजावट आहे. भिंतींवर सुंदर सजावट आहेच. छान बाक आहेत बसायला. इमारतीची उंची प्रचंड आहे, ते उंच छत बघायला टोपी पडेल इतकी. खूप प्रसन्न इमारत. बरं झालं आलो.
घराच्या बाजूलाच नेव्ही पियर. अतिशय हॅपनिंग जागा. पुढे सगळा लेक मिशिगन. मात्र वारा आणि थंडी वैतागच आणत तिथे गेल्यावर. मी एक दोनदा सकाळची चालायला गेले आणि रस्ता बदलून दुसरीकडेच जाऊन आले. नकोच तो वाऱ्याचा वैताग . मुलगा गमतीने म्हणाला देखील, "असं चालत नाही बरं , शिकागो ला गेले आणि नेव्ही पियर वर फिरले नाही तर इमिग्रेशन ऑफिसर रागवेल. "
परिसर छानच विकसित केला आहे. ते भले मोठे "शिकागो आय" अर्थात आकाशपाळणा आहेच, इथे पण. बसेस चा पहिला थांबा आहे तो. भव्य उद्यान, त्यात एका बाजूला किनारा सगळा परिसर सुंदर आहे.
हाही भाग शंभर वर्षांपेक्षा जुना आहे. सुरवातीला फक्त जहाजांचा धक्का म्हणून ह्याचा वापर होत असे. कालांतराने लोकांना करमणुकीची अनेक साधने उपलब्ध करून देत अतिशय लोकप्रिय जागा झाली आहे ती. अगदी सुरवातीच्या काळात केवळ जलवाहतुकीसाठी ह्या भागाचा उपयोग होत असे, तेव्हा म्युनिसिपल पियर असे त्याचे नाव होते. पहिल्या आणि दुसऱ्या महायुध्दाच्या काळात अमेरिकन नौसेनेला हा भाग देण्यात आला. सैनिकांना आणि खलाशांना ट्रेनिंग देण्यासाठी ह्या इमारतीचा आणि संपूर्ण भागाचा वापर केला जाऊ लागला. त्या काळाची आठवण आणि अमेरिकन नौसेनेला मानवंदना म्हणून एक खलाशाचे छान शिल्प पण उभे आहे तिथे. महायुद्ध संपल्यावर ह्या भव्य इमारतीचे नामकरण नेव्ही पियर करण्यात आले. नंतर इलिनॉय युनिव्हर्सिटी ला हा भाग काही काळासाठी देण्यात आला कारण त्याच्या कडे विद्यार्थी वाढू लागले होते आणि जागा कमी पडत होती. तसेही जलवाहतूक तोवर कमी झाली होती त्यामुळे ती इमारत ओस पडली होती. युनिव्हर्सिटी ला जेव्हा स्वतःची जागा मिळाली तेव्हा त्यांनी स्थलांतर केले आणि कौन्सिल ने ह्या भागाचा विकास लोकांच्या मनोरंजनासाठी करायचा ठरवलं. आज मोकळ्या जागेत अनेक कार्यक्रम, जत्रा, वगैरे होतात. सगळा भाग फक्त लोकांसाठी वापरला आहे. शनिवार रविवारी तिथे अलोट गर्दी असते , अनेक कार्यक्रम असतात, सगळा परिसर रंगारंग झाला असतो.
आधीच खूप थंडी त्यातून खूप जोराचा वारा वाहायला लागला आणि सोबत खूपशी पांढरी धूळ उडायला लागली. आधी बस च्या शेड मध्ये उभे राहिलो, घर जवळच तर होते पण सोसाट्याचा वारा आणि ती पांढरी धूळ , काही सुचू देईनात. चला जाऊ घरी,
हे काय मेलं केवढी ती पांढरी धुळ! कसेबसे घरी आलो. ती धूळ आता जमिनीवर जमू लागली आणि आमची ट्यूब पेटली, बर्फ पडायला लागला होता. शिकागोतला मुक्काम आवरता घ्यायला हवा आता .....
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.