पत्र क्र ११८ — लास वेगास, वाळवंटातले चमकते शहर

मी लास वेगास ला जातेय म्हटल्यावर सगळ्या मैत्रिणींमध्ये एक उत्साह संचारला. अनेक सूचना येऊ लागल्या. तू असे कर तिथे , तू तसे कर तिथे. अग कसले मस्त शहर आहे ग ते, खूप शॉपिंग कर हा, कॅसिनो मध्ये पैसे लाव,...

कीर्ती वडाळकर
||4 min read

मी लास वेगास ला जातेय म्हटल्यावर सगळ्या मैत्रिणींमध्ये एक उत्साह संचारला. अनेक सूचना येऊ लागल्या. तू असे कर तिथे , तू तसे कर तिथे. अग कसले मस्त शहर आहे ग ते, खूप शॉपिंग कर हा, कॅसिनो मध्ये पैसे लाव, बेटिंग पण कर हा. आता रामा! मला त्या शहराबद्दल भीतीच वाटायला लागली. नक्की काय करायचे आहे आपण तिथे ते कळेना. कारण ह्यातले मी काही करेन असे मला वाटेना.

विमानातून बघताना दृश्य सुंदर होते. वाळवंटच होते सगळे. उघडे बोडके , विविध आकारांचे डोंगर, मधेच कुठे बर्फ पडलेला. मग पायलट ची उद्घोषणा, " खाली ग्रँड कॅनियन बघा, ब्राईस कॅनियन बघा, ती कोलोरॅडो बघा, किती पवनचक्क्या आहेत बघा" सगळ्या गोष्टी बघण्यात वेळ मजेत गेला. सूर्य प्रकाश स्वच्छ होता आणि वेळ सकाळची त्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसल्या. वेगास चा भव्य विमानतळ आवडला, दर दोन मिनिटाला एक अशी विमाने उतरत आणि उडत होती. किती तरी प्रवासी खुशीत ये जा करत होते.

पुढचे काही महिने मुलगा तिथे राहणार होता. घर, गाडी त्याने आधीच बुक करून ठेवले होते. "वर्क फ्रॉम होम" चा त्याने पुरेपूर फायदा उठवत, अमेरिकाभर मुक्काम हलवत, मनसोक्त पर्यटन केले. दोन महिने न्यूयॉर्क , दोन महिने बोस्टन, तीन महिने शिकागो असे अनेक शहरांमधून , अक्षरश: भटकेपण अनुभवले.

वेगास च्या भागातून फिरत फिरत निघालो. शहर भरपूर पसरलेले आहे. जगभरातील अनेक प्रवासी ह्या स्वप्न नगरीत येतात. मोहावे वाळवंटातील एक मोठे शहर. अशा रीतीने वसवले गेले कि जगभरातील लोकांना त्याची भुरळ पडू लागली. जगातील ,सगळ्यात मोठे,"रिसॉर्ट चे शहर" किंवा मनोरंजनाचे शहर, सगळ्यात मोठया आर्थिक उलाढालीचे शहर, अशा अनेक ओळखी ह्या शहराच्या आहेत. अमेरिकेतील सगळ्यात लोकप्रिय "बिझिनेस कन्व्हेंशन सेंटर" असेही वेगास ला म्हणतात.

१९०५ मध्ये हे शहर वसायला सुरुवात झाली. आणि पुढच्या काही वर्षातच वेगाने शहर पसरत गेले. विसाव्या शतकाच्या शेवटाला हे शहर एकदम लोकप्रिय शहर झालेले होते, अगदी शिकागो सारखेच, लोकांचे आवडते झाले होते. खरं तर जो भाग लास वेगास स्ट्रीप म्हणून ओळखला जातो तेवढाच शहराचा भाग होता. पण आता अनेक उपनगरांमधून जनता राहते आणि ते सगळे भाग लास वेगास चे भाग म्हणूनच ओळखले जातात.

वाळवंटा च्या मध्यभागी वसलेले, अमेरिकेतील सगळ्यात कोरडे शहर, पाऊस ही खूप कमी पडतो, पण आम्ही पोचलो तेव्हा मात्र आमचे स्वागत पावसानेच केले. कधीतरी होते असे. मुख्य स्ट्रीप वर सगळी हॉटेल्स आहेत. पण आम्ही राहत होतो तो भाग अतिशय छान होता. छोट्या छोट्या बंगल्यांची सुंदर सोसायटी होती ती. नुसते तिथेच फिरलो असतो तरी चालले असते. तिथून मुख्य स्ट्रीप दोन अडीच मैलांवर होती. पण जायला रस्ता सरळ आणि बसेस पण होत्या. लोकल कौन्सिल ने खूप सोयी केल्या आहेत कारण येणाऱ्या पर्यटकांवरच त्यांचा महसूल अवलंबून आहे.

"लास वेगास" ह्या स्पॅनिश शब्दाचा अर्थ कुरण. पूर्वी तिथे अनेक जंगली कुरणं आणि खूप छान छान छोटे झरे होते. तिथे हे शहर वसणार म्हणून त्याचे नाव "लास वेगास"! अनेक वर्षांपूर्वी तिथे रेड इंडियन्स होते, असेहि सांगतात. १८२९ मध्ये काही फिरस्त्या पर्यटकांना हि जागा सापडली. जॉन फ्रेमोन्ट ने त्याच्या लिखाणातून नंतर ती प्रसिद्ध केली. आज हि मुख्य रस्त्याला फ्रेमोन्ट स्ट्रीट म्हणतात.

पुढील दहाच वर्षात एका विशिष्ट जातीच्या ख्रिश्चन समाजाने हा भाग , मध्यवर्ती म्हणून निवडला. सॉल्ट लेक सिटी आणि लॉस अँजेल्स ह्या दोन मुख्य शहरांमधून वाहतूक करताना ह्या भागात राहणे सोपे होते. त्यांनी तिथे एक किल्ला पण बांधला होता. आज हि त्याचे अवशेष दिसतात तिथे. केवळ ११० एकरांवर वसलेले हे शहर आता किती गजबजलेले आहे.

१९३१ च्या सुमारास , जेव्हा हुव्हर धरण बांधायला सुरवात झाली, तेव्हा बांधकामाचे मजूर ह्या भागात अनेक आले. त्यांनी हा परिसर भरून गेला. त्याच काळाच्या आसपास, नेवाडा राज्याने जुगाराला कायदेशीर स्थान दिले. घटस्फोटाचे नियम खूप शिथिल केले. मग काय विचारता? ह्या भागाला एकदम चलती आली. १९४१ च्या सुमारास इथे आर्मी बेस आला. आजही अमेरिकन आर्मीचा बेस तिथे आहे.

दुसऱ्या महायुद्धानंतर वेगास ला हॉटेल्स, जुगार, कॅसिनो, मनोरंजनाचे वेगवेगळे शोज, सर्कस वगैरे जोमाने वाढले. १९५१ च्या सुमारास, वेगास पासून ६५ मैलांवर नेवाडा टेस्ट साईट वर आण्विक चाचण्या सुरु झाल्या. असे म्हणतात, दूर दूर पर्यंत लोकांना मश्रुम सारख्या आकाराचे लोट उठताना दिसत. १९६३ मध्ये जेव्हा आण्विक चाचण्या न करण्याचा करार झाला तेव्हा ते टेस्ट सेंटर बंद करण्यात आले.

क्लार्क काउंटी मध्ये मोहावे वाळवंटात , वसलेल्या वेगास शहराच्या सर्व बाजूला डोंगर आहेत. इथले हवामान अतिशय विचित्र असते. म्हणताना, वाळवंट, पण अचानक येणारे पूर ह्या शहराला नवीन नाहीत. अचानकच धो धो पाऊस येतो, सगळे जलमय होते. पण शहराने ह्याचा ही बंदोबस्त केला, उत्तम ड्रेनेज सिस्टिम आखून. पुराचे हे प्रकार सुरवातीला फार त्रास देत, मग त्यावर उपाय शोधला गेला. आज कुठे ही पाणी अडत नाही आणि त्यामुळे नुकसान टळते. शिवाय पडणारे पाणी जमवले जाते.

वाळवंट आणि पाण्याचे दुर्भिक्ष असले तरी शहरात अनेक ठिकाणी सुंदर हिरवळी, बगीचे आहेत. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. वापरलेले पाणी शुद्ध करून झाडांना घालतात. काही ठिकाणी पाण्याचे होणारे बाष्प गोळा करून त्यावरच बगीचा वाढवतात. पर्यावरण रक्षणासाठी खूप प्रयत्न लोकल कौन्सिल करते.

ह्या भागाला भूकंपाची खूप जास्त भीती वर्तवण्यात येते. वैज्ञानिकांच्या मते येत्या ५० वर्षात इथे मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. असे झाले तर, काय होईल ह्या शहराचे?

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments