पत्र क्र ११९ — नेवाडाचे वाळवंट आणि डेथ व्हॅली

वाळवंट म्हटले कि आपल्या डोळ्यापुढे लांब लांब पर्यंत पसरलेले वाळूचे ढिगारे येतात. पण नेवाडा राज्यातले वाळवंट तसे नाही. वाळूचे खडक बनलेले, दूरदूर पर्यंत छोटी छोटी काटेरी झुडपे असलेले, त्यात मधेच...

कीर्ती वडाळकर
||4 min read

वाळवंट म्हटले कि आपल्या डोळ्यापुढे लांब लांब पर्यंत पसरलेले वाळूचे ढिगारे येतात. पण नेवाडा राज्यातले वाळवंट तसे नाही. वाळूचे खडक बनलेले, दूरदूर पर्यंत छोटी छोटी काटेरी झुडपे असलेले, त्यात मधेच कुठेतरी चरणारे वाळवंटी प्राणी असे दृश्य दिसते. वाऱ्यामुळे ह्या वाळूच्या खडकांना अनेक ठिकाणी सुंदर आकार आलेले आहेत आणि त्याचे बरेच नॅशनल पार्क्स आपल्याला आकर्षित करतात. लोकल कौन्सिल आणि नॅशनल ऑथॉरिटी नी सगळीकडे सोयी केल्यामुळे आपल्याला त्या वाळवंटाची दाहकता फारशी जाणवत नाही.

लास वेगास अशाच वाळवंटातील एक मोठे शहर. मनोरंजन आणि खरेदी, जुगार आणि बेटिंग, वाळवन्टा तील हिरवळ असलेली स्वप्न नगरी म्हणजे लास वेगास. अमेरिकेच्या कितीतरी सफरींमध्ये बघाल तर लास वेगास असतेच. नसले तर लोक मागून घेतात. अनेक देशांचे , असंख्य पर्यटक दर वर्षी वेगास कडे धाव घेतात. नवीन वर्ष साजरे करायला असो, ख्रिसमस असो किंवा इतर कधी असो. हे शहर ओस पडलेय असे होत नाही.

उत्तर अमेरिकेतील अतिशय कोरडे, भरपूर गरम आणि माफक थंड असे हे शहर आहे. तिथल्या एका अधिकाऱ्याने जेव्हा सांगितले कि ,"आमच्या शहरावर देवाची कृपा आहे कारण वर्षातील जवळजवळ सगळे दिवस आमच्या कडे उत्तम सूर्यप्रकाश असतो. " तेव्हा मला जाणवले, एखाद्या जागेसाठी "सूर्यप्रकाश" हि पण मार्केटिंग ची गोष्ट असू शकते. वर्षाचे सगळे दिवस ऊन चांगले असते, उन्हाळ्यात तर चांगले ४० डिग्री सेल्सियस तपमान असते. हिवाळा त्यामानाने सुसह्य असतो आणि पाऊस अधून मधून आगंतुकासारखा हजेरी लावून जातो. हिवाळ्यात दिवस लवकर संपतो. चारला अंधार पडू लागतो हिवाळ्यात तसे तापमान जाते शून्याजवळ पण ८, १० दिवसच. कधीतरी बर्फ हि पडतो. आजूबाजूच्या डोंगर शिखरांवर अनेक ठिकाणी बर्फ पसरलेला दिसतो हिवाळ्याच्या दिवसात .

वेगासला जसजसे पर्यटन आकार घेऊ लागले तसतसे शहर पसरू लागले. बांधकाम वाढू लागले. नागरी वस्ती वाढू लागली. आणि मुख्य पाण्याचा

प्रश्न भेडसावू लागला. सगळे वाळवंट च ते, पाण्याचे दुर्भिक्ष असणारच. तिथले पाण्याचे नियोजन करणारे अधिकारी, कधीही पाण्याचा पुरवठा बंद करू शकतात. त्यांना तसे अधिकार दिलेले आहेत. इतक्या पसरलेल्या शहराला मग पाणी कुठून आणि कसे मिळते?

साधारण १९०० चा सुमार होता. ह्या भागाला पाण्याचा प्रश्न तर होताच पण अचानक येणारा धो धो पाऊस पूर घेऊन यायचा. पाणी ओसरले की त्या पावसाचा त्रासच झालेला असायचा. कोलोरॅडो नदी ह्याच भागातून वाहते. अमेरिकेची अतिशय महत्वाची नदी. भरपूर भूभाग सुजलाम करणारी, अनेक लोकांची तृष्णा भागवणारी. तब्बल अकरा नॅशनल पार्क्स ची जननी. तिच्यावर अनेक ठिकाणी धरणे बांधून, कालवे काढून तिच्या पाण्याचा प्रवाह वळवला गेला आहे. आणि त्याचा वापर करून खूप शेती पिकवली गेली आहे. अनेक गावांना पाणी पुरवले गेले आहे.

वेगास त्यातीलच एक . इथून जवळच मोठ्ठे सिमेंट चे धरण आहे, "हुव्हर". जेव्हा ह्या भागातील पाण्याचे अनेक प्रश्न विचाराधीन होते, तेव्हा म्हणजे १९०० च्या सुमारास , ह्या भू भागाचा अभ्यास केला गेला. कोलोरॅडो अनेक डोंगर कापत,

खोल दऱ्या निर्माण करत, खळाळत वाहते. अशाच एका दरीची निवड केली गेली.

इतके मोठे बांधकाम एका कम्पनीच्या आवाक्यातील गोष्ट नव्हती. त्या भागातील मोठ्या सहा कम्पन्या एकत्र आल्या , त्यांनी "सिक्स कम्पनी" ह्या नावानेच एक नवीन कम्पनी काढली आणि हे कंत्राट त्यांना दिले गेले.

१९३१ च्या सुरवातीला धरणाचे बांधकाम सुरु झाले. सगळी परिस्थिती अत्यन्त बिकट. कामगारांना आवश्यक गरजा पुरवणे पण कठीण होते. ह्या भागात धरणाचे मोठे बांधकाम होणार आहे अशी बातमी पसरली आणि बेरोजगार कामगारांचा ओघ वेगास कडे सुरु झाला. तोवर जेमतेम ५००० वस्तीचे छोटेसे गाव असलेले वेगास ह्या मजुरांच्या येण्याने पसरू लागले. हे कामगार कुटुंब कबिल्यासकट इथे आले. काम मिळेल आणि पुढचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल हि आशा. आधी असे ठरले होते की ज्या "सिक्स कम्पनीला" हे बांधकामाचे कंत्राट दिले होते त्यांनी बोल्डर सिटी हि वसाहत आधी उभी करायची मग धरणाचे बांधकाम सुरु होईल. पण राष्ट्रध्यक्ष हुव्हर ह्यांनी जानेवारी १९३१ मधेच बांधकामाचे आदेश दिले , तोवर बोल्डर सिटी तयार झाली नव्हती. मग तात्पुरते बंकर्स उभे करून काही ठिकाणी एकेकट्या कामगाराला राहू दिले गेले त्यांचे कुटुंब कुठे राहील हे त्यांनी बघायचे होते. उष्णता खूप होती. एक महिन्याचा काळात सोळा कामगार मृत्युमुखी पडले. बांधकाम कामगार घेण्यात पण वर्ण द्वेष होता. तिथे राहणे कठीणच होते. कामगारांनी ह्या विरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली. पण वरिष्ठ मानेनात . मग सगळे कामगार आपआपला पगार घेऊन , काम सोडून निघून गेले. दोन चार दिवस काम बंद राहिले. मात्र पुन्हा सर्व कामगार कामावर परतले. १९३१ च्या शेवटी बोल्डर सिटी बांधून झाली आणि कामगारांचे प्रश्न मार्गी लागू लागले.

चार वर्षात हे भले मोठे सिमेंटचे धरण बांधून झाले. त्यासाठी सुरुवातीला नदीचा प्रवाह वळवला गेला. अर्धगोल आकाराचे बांधकाम पूर्ण झाले. नियोजित वेळेच्या आधीच पूर्ण झालेलं धरण राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण केले गेले. आणि आता ह्या धरणाचे नाव काय ठेवायचे? जरी हे धरण बांधायला त्यावेळचे अध्यक्ष हुव्हर ह्यांनी पुढाकार घेतला होता तरी बांधून पूर्ण होईपर्यंत ते निवडणूक हरले होते आणि रुझवेल्ट अध्यक्ष झाले होते. त्यांना हुव्हर हे नाव पसंत नव्हते, मग त्यांनी "बोल्डर धरण" च म्हणायला सुरु केले. काही लोकांनी त्याचा विरोध केला. आता अर्धी जनता हुव्हर तर अर्धी बोल्डर म्हणू लागली. काही वर्षात असे लक्षात आले कि ह्या धरणासाठी जी बिले पास झालीत त्यावर सगळीकडे "हुव्हर धरणासाठी" असा शेरा होता. जवळजवळ १२ वर्षांनंतर शेवटी हुव्हर हेच नाव सरकारने पास केले.

बाजूलाच तयार झालेल्या लेक मिड मुळे ह्या सर्व भागाची पाण्याची चिंता मिटली. तो जगातील एक मोठा मानवनिर्मित तलाव आहे. त्याच्या कडेनी पाण्यातील क्षार आणि खनिजांनी रंगीत झालर तयार झाली आहे. धरणावर अर्थातच भले मोठे वीज निर्मिती केंद्र पण आहे. छान से संग्रहालय आहे. भव्य अशा त्या धरणावरून चालत किंवा गाडीने पलीकडे जाऊ शकतो. आधी हाच रस्ता होता पण नंतर तो हायवे बदलून, बाजूने मोठा पूल बांधून त्यावरून वळवला गेला. त्या पूलाला दोन्ही बाजूला मार्गिका आहेत त्यावरून पर्यटक धरणाचे विहंगम दृश्य बघू शकतात. "शतकातील विशेष बांधकाम" असा दर्जा प्राप्त झालेले हे धरण , त्याचा

बांधकामाचा आवाका बघून हरखूनच जायला होते.

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments