पत्र क्र १२० — लास वेगासची स्ट्रीप
लास वेगास म्हणजे "स्ट्रीप" असे समीकरणच आहे. वेगास शहरातील मुख्य रस्ता ज्यावर अनेक हॉटेल्स वगैरे आहेत त्या रस्त्याला स्ट्रीप म्हणतात. तुम्ही जेव्हा छोटीशी वेगास ची ट्रिप करता, तेव्हा इथल्याच एखाद्या...
लास वेगास म्हणजे "स्ट्रीप" असे समीकरणच आहे. वेगास शहरातील मुख्य रस्ता ज्यावर अनेक हॉटेल्स वगैरे आहेत त्या रस्त्याला स्ट्रीप म्हणतात. तुम्ही जेव्हा छोटीशी वेगास ची ट्रिप करता, तेव्हा इथल्याच एखाद्या हॉटेल मध्ये राहू शकता. वाळवंटात मानवाने केलेली भव्य निर्मिती म्हणजे ही स्ट्रीप. ह्या स्ट्रिपमुळे इथल्या सगळ्या भागाचा विकास झाला, असे मानतात. इतका रंगारंग भाग दुसरा नसेल कुठला. वेगास ला "सिन सिटी" म्हणतात ते ह्याच स्ट्रीप मुळेच. अनेक कॅसिनोज ह्या रस्त्यावर आहेत. भव्य बांधकामे आहेत.
सुरुवातच मोठ्या "वेलकम तो फॅबुलस लास वेगास" ह्या सुंदर बोर्ड नी होते. तुमचे वाहन इथे काही कामाचे नाही. चालतच निघा. दोन्ही बाजूची भव्य बांधकामे बघताना लक्ष राहू द्या गर्दी खूप असते. वर्षाचा कुठलाही काळ असू दे, लोक इथे असतातच. त्याच गर्दीत अर्धा ड्रेस कातडीच्या रंगाचा आणि थोड्याच भागावर रंगीत कापड, मागे पिसारा, किंवा डोक्यावर मोठी रंगीत टोपी, असा उत्तान ड्रेस केलेल्या मुली दिसतील. त्यांच्या बरोबर फोटो काढण्यासाठी गळ घालतील. अशा अनेक मुली फिरताना दिसतात. खूप खाण्यापिण्याची दुकाने आहेत. आणि अनेक ठिकाणी जगातील मोठी मोठी आश्चर्ये पण उभी केलेली आहेत. डिस्नी लँड पासून च स्ट्रीप सुरु होते. समोरच अमेरिकेची लिबर्टीचा पुतळा आहे. अरे हो सुरुवातीला असलेला भव्य पिरॅमिड राहिला न. त्याच्या टोकावरून रात्री रंगीत लाईटचा बीम दूरवर फिरत असतो. त्याच्या समोरचा स्पिंक्स पण अगदी हुबेहूब.
रस्त्यानी थोडे पुढे गेल्यावर , पॅरिस हॉटेल आहे, त्यात आयफेल टॉवर आहे.
पॅरिस ची च "आर्क दे ट्र्म्फ " समोरच दिसेल.
पॅरिस ची खरी कि ही हा प्रश्न पडावा. सीझर हॉटेल मध्ये जणू सगळा रोम उभा केलाय कि काय असा भ्रम व्हावा. रोम चे कलोयसम उभारलेय . डेव्हिड ची उभी मूर्ती आहे. पुढेच फोरम शॉप्स आहेत. रोमच्या प्रसिद्ध पँथियॉन चर्च सारखे गोलाकार छत ह्या फोरम शॉप्स ला आहे. रोम मधले ट्रेव्ही कारंजे इथेच बघून घ्या अर्थात जरा लहान स्वरूपात हा. त्या सीझर पॅलेस हॉटेल नी पाण्याचा असा काही सुंदर वापर केला आहे न कि आपण वाळवंटात आहोत ह्याचा पूर्णपणे विसर पडतो. सुंदर तलाव, त्याभोवती चे भव्य बांधकाम डोळे दिपवतात. पांढऱ्या रंगातले बांधकाम विशेष वाटते.
पलीकडे बेलाजीयो हॉटेल. कसले बांधलंय न! मोठी इमारत, समोरच भव्य तलाव. त्या तलावात संध्याकाळी कारंज्यांचा सुंदर शो असतो. फिरत फिरत जाताना दमलेले पाय विसावण्यासाठी उत्तम पर्याय. कारंज्यांचा सुखद नाच मनालाही ताजे करतो. पुन्हा आपण आजूबाजूला बघत पुढे निघतो. मिराज
हॉटेल च्या समोर तर चक्क ज्वालामुखी ची प्रतिकृती आहे.
हो स्ट्रीपवर आलो आणि एखाद्या मॉल मध्ये नाही घुसलो असे होत नाही. पायाचे तुकडे पडतील पण मॉल संपणार नाहीत. जगभरातील नामांकित ब्रँड ची दुकाने इथे दिसतील.
वेनेशन मॉल तुम्हाला थेट व्हेनिस ला घेऊन जाईल. अगदी थेट तसेच सगळे आर्किटेक्चर. तो रिआल्तो ब्रिज अगदी जशाच्या तसा आहे. वेनेशन मॉल म्हणजे एक अजून मजेदार जागा. आत जाऊ या. थंडीचे दिवस आहेत दुपारी चारलाच अंधारायला लागलाय. पण आत गेलो अन हे काय? चक्क स्वच्छ दिवस? तिथले छत असे केलेय कि बाहेरच्या प्रहराचा पूर्ण विसर पडावा आणि तुम्हाला सतत दिवस असल्याचा भास व्हावा छतावरचे नितळ निळे आभाळ बघून . आत व्हेनिस ची आठवण येते. तसलीच गोंडोला राईड, तेच नावाडी , त्यांचे गाणे, वा मस्तच! शिवाय मॉल च्या आत हा हे सगळे. दोन्ही बाजूला दुकाने, अगदी व्हेनिसमध्ये आहोत असे वाटावे. हा मॉल आणि कॅसिनो खूप मोठे आहेत.
मुळात लास वेगास हे शहरच जगातील , सगळ्यात मोठ्या हॉटेल्स , रिसॉर्ट्स आणि कॅसिनोज चे शहर आहे. हे कॅसिनो काय आहेत बा पण? थोडक्यात सांगायचे तर तुमच्या लाखाचे बारा हजार करणारे मशीन! पण माहिती घ्यायला हवीच आपल्याला, पैसे कशाला हरायचे? चला वेनेशन च्या कॅसिनोत. लखलखती दुनिया सगळी. कितीतरी दिवे , वेगवेगळी खेळायची मशिन्स. कुठे लोक पत्ते घेऊन खेळत आहेत. कुठे डॉलर देऊन कॉइन आणायचे आणि त्या मशीन मध्ये टाकायचे , हॅन्डल फिरवायचे , विशिष्ट नम्बर आला तर बक्षीस तुमचे. कुठे आकडे लावत आहेत. कुठे लाकडी बोर्डवर काही खेळ चालू आहे. अनेक जण आपले नशीब अजमावत आहेत. काही वेळ बघितल्यावर लक्षात आले, खेळणारा सुरवातीला जिंकत जातो, जस जसे त्याला पैसे मिळू लागतात त्याची लालसा वाढत जाते. तो अधिकाधिक पैसे लावू लागतो आणि एका क्षणी सगळे गमावतो, पण तरी लालसा त्याला स्वस्त बसू देत नाही, तो पेटून उठतो, असले नसले सगळे लावतो. जर एखादी व्यक्ती बराच वेळ खेळत असेल, जिंकत असेल तर लगेच एक मुलगी येऊन त्याला दारू वगैरे घेण्याचा आग्रह करते, फुकट देते. मग नशेत तो अजून पैसे लावतो. "इझी मनी" च्या मायाजालात फसत फसत लोक पैसे जिंकत हारत जातात. काही लोक असतीलही ज्यांना इथे पैसे मिळत असतील पण आपण तर बा असल्या भानगडीत नाही पडणार , अहो साध्या लकी ड्रॉ मध्ये कधी आपला नम्बर लागत नाही, इथे काय मिळणार ?
सगळा मॉल , कॅसिनो फिरून झाल्यावर बाहेर आलो तर काय आश्चर्य? बाहेर तर पूर्ण अंधार पडला होता, आत त्याची जाणीवही होत नव्हती. पण अंधार कुठे होता? आकाशात हो. बाकी सगळा परिसर अनेक दिव्यांच्या रोषणाई ने लख्ख उजळला होता. किती मोठं मोठे जाहिरातीचे फलक, रंगीबेरंगी दिव्यांनी झळकलेले. हॉटेल्स वर केवढी ती रोषणाई! रस्ता तर दुपारपेक्षा जास्त उजळला होता. रात्रीची स्ट्रीप वेगळीच होती.
रस्त्याच्या टोकाला असलेला ट्रम्प हॉटेल ते दुसऱ्या टोकाला असलेली लिबर्टी ची मूर्ती, सगळे रंगीत दिव्यांच्या रोषणाई ने लखलखत होते. हि वेळ आहे अनेक मनोरंजनाच्या शोज ची. प्रत्येक मॉल मध्ये आपला विशेष ठसा असेलेले शो असतात. "सर्क दे सोलेली" असतात. सर्कस, नृत्य, संगीत, ह्यांचा मिलाफ असतो. कुठे जायचे ठरवा. ते शो पण असेच, रंगीत, खूप लाईट्स नी झगमगलेले, मोठ्या आवाजातील संगीताने भारलेले. कुठे नाच करण्यासाठी डान्स फ्लोअर असतात. कुठे नुसतेच गाण्याचे शो असतात, अर्थात सगळे प्रेक्षक धुंद असतात. अनेक नामांकित गायक इथे आपली उपस्थिती लावून जातात.
१९३१ साली एका छोट्या कॅसिनो पासून ह्या सगळ्याची सुरुवात झाली. अनेक हॉटेल्स , कॅसिनोज त्यात भर घालत गेले, काही बंद झाले काही नव्याने आले. १९८९ मध्ये बांधलेल्या मिराज हॉटेल मुळे बांधकामाचा आवाका प्रचंड मोठा झाला. बगीचे आणि काही तरी भव्य कल्पना पुढे यायला लागल्या आणि थोड्याच काळात पूर्वीचे छोटे हॉटेल्स जाऊन मोठमोठी हॉटेल्स आली. मात्र प्रत्येक हॉटेल पर्यावरण रक्षणासाठी बऱ्याच गोष्टी करत असते, पाणी वाचवणे, सोलर लाईट, अशासारख्या अनेक गोष्टी ते आवर्जून करतात. शाश्वत विकासाबद्दल बरीच आस्था आहे त्यांना.
स्ट्रीप वरून घरी जाताना भव्य बांधकामे मागे पडतात. दिव्यांची रोषणाई मात्र आपला दूरपर्यंत पाठलाग करते.
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.