पत्र क्र १२१ — झायन, ब्राईस कॅनियन आणि कॅपिटॉल रिफ
तर लास वेगास ची ती "स्ट्रीप" तर आपण बघितली, पण एक महत्वाची गोष्ट ह्या शहराबद्दल अशी आहे कि अनेक सुंदर सुंदर नॅशनल पार्क्स इथून जवळ आहेत. मग त्यातली काही बघायलाच हवीत न? अगदी १६० मैलांवर आहे झायन...
तर लास वेगास ची ती "स्ट्रीप" तर आपण बघितली, पण एक महत्वाची गोष्ट ह्या शहराबद्दल अशी आहे कि अनेक सुंदर सुंदर नॅशनल पार्क्स इथून जवळ आहेत. मग त्यातली काही बघायलाच हवीत न?
अगदी १६० मैलांवर आहे झायन नॅशनल पार्क. रस्ता अर्थातच छान आहे आणि सगळा रंगांचा खेळ, आजूबाजूला असलेल्या खडकातून डोकावणाऱ्या निसर्गाचा, डोंगर दऱ्यांचा आणि मधेच असणाऱ्या झाडांचा. स्प्रिंगडेल नावाच्या चित्रातल्या वाटणाऱ्या गावाजवळ हे पार्क आहे. छोटेसेच गाव. त्या झायन पार्क मध्ये जाण्यासाठी बसेस आहेत. सरळ रस्ता पार्कच्या प्रवेशद्वाराजवळ नेतो. तिथून आत जायलाही बसेस आहेत. तुम्हाला जायचे त्या ठिकाणी उतरा, आणि तिथल्या रस्त्याने चालत फिरा . निसर्गाचा सुंदर अविष्कार दिसेल. ह्या पार्कचे वैशिष्ठय म्हणजे इथे, डोंगर, दऱ्या, मोठमोठी झाडे, वाळवंट, कोरीव कॅनियन्स, सगळं आहे. 'व्हर्जिन रिव्हर' पार्कच्या सौंदर्यात आपले अस्तित्व दाखवते. फिरायला सोपे आणि सगळ्याच दृष्टीने सोयीचे म्हणून इथे गर्दी बरीच असते. पक्षी, प्राणी खूप आहेत. बाहेर शून्य तापमान आणि हॉटेलच्या बाहेर, हिरवळीवर मस्त हरणं फिरताहेत, सुंदरच. सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळी, त्या डोंगराची उघडी बोडकी शिखरे सोन्याची भासतात. तेव्हाही रंगांचा अप्रतिम खेळ बघायला मिळतो. पहाटेच, बाहेर गोठलेले दवबिंदू काचेचे वाटत होते. आणि थोड्याच वेळात सूर्यनारायणाने ऊन सावलीचा आणि त्याबरोबर बदलत जाणाऱ्या रंगांचा खेळ दाखवला. काही ठिकाणी गोठलेले पाणी काचा पसरल्या आहेत कि काय असे भासत होते. सकाळीच एका ट्रेल वर गेलो. खडक, झाडं , नदी सगळं डोळ्यात सामावत, चढ उतार पार करत निघालो. एका गुहेत झिरपणारे पाणी गोठून इतका सुंदर देखावा तयार झाला होता. वरून तर पाणी येतेय पण मधेच थांबून जातेय, बर्फ बनून. वा!
झायन पार्कपासून साधारण ७५ मैलांवर असलेले ब्राईस कॅनियन पार्क. निसर्गतःच बनलेले अनेक भव्य अँफी थिएटर्ससाठी प्रसिद्ध आहे. इतके भव्य आकार खडकांनी घेतले आहेत न आणि सोबतच अनेक खनिजांनी त्यात रंग भरलेत. "डोळ्याचं पारणं फिटणं" म्हणजे काय ते कळतं . दूर दूर पर्यंत, नजर पोचेल तिथपर्यंत अगदी, हे चित्र विचित्र आकार आणि पांढरा , पिवळा, केशरी, लाल, झाडांचा हिरवा रंग! इथे थंडी खूप असते, रात्रीला दव पडते ते गोठते, उन्हाने वितळते, आणि खडकाला झिजवते. खडकांना पडलेल्या भेगांमधून बर्फ साठतो, तो वितळला कि आजूबाजूच्या पृष्ठभागाला झिजवतो. वारा ह्या सगळ्याला मदत करतो, आणि खडक अजून झिजत जातो. काय निसर्ग आहे न? काय करेल सांगता येत नाही. त्या अँफी थिएटर मध्ये सगळ्यात मोठा, ब्राईस अँफी थिएटर, १२ मैल लांब,३ मैल रुंद आणि ८०० फूट खोल आहे. कल्पना करा, एवढ्या मोठ्या पसाऱ्याची आणि कलाकुसरीची. बघाल तिकडे घासले गेलेले खडक, विविध आकारांचे, त्यात काही सरळ खांबांसारखे, त्याला हुडु म्हणतात. असे अनेक हुडु आजूबाजूला असतात. आपण डोंगराच्या टोकावर जाऊन हे सगळं दृश्य बघू शकतो. सगळ्यात उंच जागा साधारण साडे नऊ हजार फुटांवर आहे, तिथे गाडीने जाताना लक्षात आले, एका जागी रस्त्याच्या दोन्ही कडेला खोल दरी आहे. दृश्य अर्थात च सुंदर. हा टोकाचा भाग थंडीत बंद असतो कारण खूप बर्फ पडतो आणि रस्ते बंद होतात. सकाळी बघितलं, हॉटेलच्या बाजूने वाहत असलेली नदी अगदी शांत होती. पाणी वाहत आहे असे जाणवतच नव्हते. अरेच्चा! असे का? ते सगळे पाणी गोठलेले होते. काचेची चादरच जणू. सूर्य जसजसा वर येऊ लागला, तापमान शून्याच्या वर आले आणि अचानक नदी खळखळून वाहायला लागली. ती बर्फाची चादर फाडून, तिचे तुकडे पण वाहून घेऊन जायला लागली.
जरा आड रस्त्यावर असल्यामुळे झायन पार्क एवढे पर्यटक काही येत नाहीत. थंडी हि बरेच दिवस असते, बर्फ खूप पडते आणि काही भाग बंद करावा लागतो. अनेक प्राणी आणि पक्षी ह्या भागात आहेत. तिथल्या हिरवळीवर , त्याच भागात दिसणारे अनेक "म्यूल डिअर" दिसले. जसजसे आपण डोंगरात वर जातो, हिरवळ कमी होत जाते. तिथे पक्षी जास्त दिसतात मग. चिपमंक आपली शेपटी सांभाळत पळताना दिसतात. लांब पंख पसरून उंच उडणारा फाल्कन आणि कॅलिफोर्निया कॉंडोर लक्षवेधी दिसतात.
ब्राईस पासून साधारण शंभर मैलांवर कॅपिटॉल रिफ पार्क आहे. तिथे जायला दोन रस्ते, एक नेहेमीचा हायवे दुसरा अतिशय निर्जन पण सुंदर सभोवताल असलेला. अर्थात दुसरा रस्ता निवडला आम्ही. इतक्या प्रकारचे खडकांचे आकार बघितले न जाताना कि काय सांगू. रस्ता खरंच निर्जन, पण अधेमधे छोटी छोटी गावे होती. आणि एका ठिकाणी तो हि रस्ता सोडून डोंगरात शिरलो. आता मात्र कुठे हि चिटपाखरू नव्हते. सभोवताली फक्त वेगवेगळ्या आकाराचे केशरी, लाल, पिवळे, पांढरे खडक.
कॅपिटॉल रिफ नॅशनल पार्क अजून दुर्गम भागात आहे. इथे अनेक वर्षांपूर्वी फ्रेमोन्ट आदिवासींची वस्ती होती, तशा नोंदी अनेक खडकांवर दिसतात. त्या काळातील खोदलेली चित्रे अनेक ठिकाणी सापडतात.तिथल्या नदी किनारी दगडी धान्यकोठारे बांधून, मका आणि इतर धान्य त्यात साठवत. संत्र, सफरचंद वगैरे फळांची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली होती. घोडेही पाळले होते. त्यानंतर दुष्काळ पडला आणि सगळी वस्ती तिथून हलली . काही वर्षांनंतर पियूट जमात तिथे आली. त्यांनी तीच दगडी घरे, धान्यकोठारे वापरली. नदीच्या आजूबाजूला शेती करणे तसे चांगले होते कारण जमीन सुपीक होती पण डोंगरातले बर्फ वितळले कि मधेच नदीला पूर येई, आणि सगळे वाहून जाई . तशाच कारणासाठी कदाचित हा भाग पुन्हा निर्जन झाला असावा. अमेरिकेतील यादवी युद्धानंतर पुन्हा इथे काही लोक वस्तीला आले. १८७० वगैरे साल पर्यँत तिथे वस्ती असावी कारण तसे शिलालेख, दगडात कोरलेली चित्रे वगैरे सापडली आहेत आणि ती बघता येतात. आत अनेक मैलांचे ट्रेक आहेत. दोन दिवस सगळा भाग अगदी मनसोक्त फिरलो. खडकांच्या कपारींमधून रस्ता शोधत दूरदूर भटकलो. सूर्यास्ताचा मनोहारी रंग खेळ बघितला. सगळा पार्क एकदम निर्जन. आम्ही आणि खडक, मधेच एखादा प्रेअरी डॉग रस्ता क्रॉस करायचा, मध्ये एखादा कोल्हा, कुठे ते बिग हॉर्न डेझर्ट शिप, कुठे आपल्या हरणाचे अमेरिकन भाऊ म्यूल डियर , आकाशात घिरट्या घालणारे फाल्कन्स, मधेच झपकन उडणारे रंगीबेरंगी पक्षी बस! माणूस नावाचा प्राणी क्वचितच. पार्कच्या प्रवेशावर स्वतःच तिकीट काढायचे, ते द्यायला कोणी नाही , फक्त एक मशीन . तुमचा पास असेल तर तो तुम्हीच मशीन मध्ये स्कॅन करायचा .
मात्र सगळीकडे वेग मर्यादा लिहिलेले फलक आवर्जून होते. इथे औषधाला सुद्धा माणूस नाहीये आणि वेगमर्यादा कसली घालताहेत? कोण पाळणार न? आणि नाहीच पाळली तरी पकडायला आहे कोण? बरं ती मर्यादा तरी किती? ताशी २० मैल! गाडी मुलगा चालवत होता. त्यामुळे वेग अर्थातच कमी जास्त होत होता. उतारावर तर .... जाऊ दे आहे कोण इथे? सगळी फिरस्ती झाली. बाहेर निघायच्या दारावर रेंजर ची गाडी लांबूनच दिसली. अरे माणसे आलीत वाटते. आणि मुलगा एकदम चिडचिडला. का रे काय झाले? त्या रेंजर ने सांगितले, "तुमची गाडी अमुक तमुक ठिकाणी ताशी ४० मैलांच्या वेगात होती. थोडीफार जास्त असती तर ठीक होते पण अहो, आपण इथे वेगाने जायला नाही निसर्ग बघायला आलोत न? मग वेग वाढवलात का? " उत्तर देण्यात अर्थ नव्हता. "पुन्हा असे करू नका , पण आजसाठी थोडा दंड तर तुम्हाला पडेलच", भरतो बाबा.
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.