पत्र क्र १२२ — ग्रँड कॅनियन, कोलोरॅडो नदी

अमेरिकेत लास वेगास ला गेलो आणि तिथून पुढे जाऊन ग्रँड कॅनियन नाही पाहिला तर ती कोलोरॅडो रागावते बरं ! "एवढी मी वर्षानुवर्षे वाहत , कलाकारी करून ठेवलीये आणि तुम्हाला बघायला यायला पण वेळ नाही? " जाऊ...

कीर्ती वडाळकर
||4 min read

अमेरिकेत लास वेगास ला गेलो आणि तिथून पुढे जाऊन ग्रँड कॅनियन नाही पाहिला तर ती कोलोरॅडो रागावते बरं ! "एवढी मी वर्षानुवर्षे वाहत , कलाकारी करून ठेवलीये आणि तुम्हाला बघायला यायला पण वेळ नाही? "

जाऊ बाबा ग्रँड कॅनियन ला मग. अर्थात इतकी सुंदर जागा आपण कशी सोडणार न?

वाळवंटाची चुणूक दाखवत रस्ता ग्रँड कॅनियन कडे जातो. प्रत्यक्ष तिथे पोचेपर्यंत उत्कंठा शिगेला पोचली होती. काय असेल तिथे?

सर्वप्रथम तिथले माहिती केंद्र बघितले पाहिजे. त्यात सगळी माहिती मिळेल न हे नक्की काय आहे आणि कसे झाले आहे. अतिशय छान ठिकाणी असलेले ते केंद्र तिथली माहिती तर देतेच शिवाय कॅनियन चा सुंदर नजारा पण दाखवते. हा सगळा परिसर नक्की किती जुना आहे ते अर्थातच ठाऊक नाही. अनेक हजारो वर्षे हि कलाकारी करायला नक्कीच लागली असावीत, ह्यात शंका नाही. नेटिव्ह अमेरिकन्स तिथे खूप काळ राहत आहेत. तिथल्या भागात त्यांचे अनेक पुरावे सापडतात, धान्याची कोठारे, राहण्यासाठी वापरात असाव्यात अशा, छोट्या मोठ्या कोरीव गुहा, वगैरे. आपण डोंगराच्या टोकावर असतो आणि दरीत कुठेतरी खोल ती कोलोरॅडो वाहत असते. चहूबाजूला सुंदर दृश्य घेऊन, ती नदी तिच्या अनेक उपनद्यांसह अविरत कोरीव काम करत वाहत आहे. साऊथ रिम आणि नॉर्थ रिम असे दोन मुख्य भाग असलेला हा भला मोठा परिसर खरोखरच नेत्रदीपक आहे.

फार पूर्वीपासून हा भाग शोधण्याचे प्रयत्न झाले. असं म्हणतात कि तिथले होपी नावाचे

नेटिव्ह येणाऱ्यांना रस्ता तर दाखवायचे पण अर्धवट. १५४० च्या सुमारास काही युरोपियन्स आले. होपी लोकांनी काही भाग पर्यंत त्यांना दरीत उतरायला मदत केली पण पाण्याअभावी ते लोक परत गेले. म्हणजे होपींना खाली कोलोरॅडो पर्यंत उतरायचा रस्ता तर माहित असायलाच हवा होता न, पण त्यांनी जवळपास अर्धी दरी उतरून वेड पांघरले आणि इथे कुठे पाणी नाही , आता काय करायचे? असे सांगितले. आलेले युरोपियन्स परत गेले. त्यानंतर जवळ जवळ दोनशे वर्षे कोणी तिकडे फिरकले नाही. साधारण १७७६ मध्ये काही ख्रिस्ती मिशनरी धर्मांतर आणि धर्म प्रसाराच्या हेतूने पुन्हा तिथे आले. नेटिव्ह ना कन्व्हर्ट करण्याचा त्यांचा हेतू पूर्णपणे असफल झाला, आणि ते परत गेले. तेव्हा त्यांनी ह्या जागेचे वर्णन करून ठेवले आणि साधारण कसे जायचे ते पण सांगितले. त्यांच्या जाण्याचा रस्ता अनेक वर्ष "फादर्स रूट" म्हणून प्रसिद्ध होता. त्यानंतर १८२६ मध्ये अमेरिकन्स आले ह्या भागात. तेव्हापासून खऱ्या अर्थी लोकांना ह्या जागेची भव्यता, निसर्गसौंदर्य कळले. अनेक जण येऊ लागले आणि १९०८ मध्ये ह्या जागेला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यात आले , पण नॅशनल पार्क जाहीर करायला पुढची अकरा वर्षे जावी लागली कारण अनेक खाण मालक ते होऊ देईनात, कारण त्यामुळे त्यांच्या कामा ला पूर्णविराम बसणार होता. अनेक प्रयत्नांनी १९१९ मध्ये हे नॅशनल पार्क जाहीर झाले. सर्व सोयी तयार केल्या गेल्या आणि पर्यटकांचा अविरत ओघ सुरु झाला. आत फिरण्यासाठी मोफत बस सेवा आहे. ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळीकडे सहज फिरता येते.

गाडी डोंगर चढून वर येते , आपण उंच पठारावरून कुठेही दरीत बघावे, सुंदर नजारा . रंगीबेरंगी खडकांचे थरांवर थर! किती प्रकार, बापरे! बघावे तिकडे खडकांनी रंगांची उधळण आणि कोरीव काम केलेले आहे. खोल कुठेशी खळाळत वाहणारी कोलोरॅडो अधून मधून कुठेतरी दिसते. कोलोरॅडो आणि तिच्या अनेक उपनद्यांचा प्रवाह, वारा , बराच काळ पडणारे बर्फ, मग येणारे ऊन, अशा सगळ्यांनी सयुंक्तिकरीत्या केलेल्या हमल्याने डोंगर झिजत गेला. विविध आकार तयार होत गेले. नदीचे पात्र आणखीन खोल होत गेले.

अनेक ठिकाणी पर्यटकांसाठी दृश्य बघण्याचे पॉईंट्स केलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी दरीत उतरून जाऊन साहसी पर्यटक गिर्यारोहणाचा आनंद घेऊ शकतात. हवे असल्यास माहितगार माणूस बरोबर घेऊ शकता. काही उत्साही लोक स्वतःच जाताना दिसत होते. अर्थातच तिथे स्वतःची जबाबदारी स्वतःच घ्यायची असते. नियम घालून दिलेले आहेत, योग्य सूचना ठिकठिकणी लावलेल्या आहेत. त्या पाळणे तुमचे आद्य कर्तव्य आहे. दरीत उतरून जाणे आणि काही अंतरावरून ते सगळे रंगीत खडक बघणे हा मस्त अनुभव होता. छोटी मोठी झाडेही साथीला होती. एका ठिकाणी खूप खोल असलेली नदी चक्क दृष्टीपथात होती. हिरवेगार पाणी घेऊन ती नटत मुरडत लांबून येत होती. वरून तर इतकी गुणी भासत होती, हि कशाला खडक कोरत असेल बा ?

सगळ्यात सुंदर अनुभव तर त्या सूर्यास्ताचा . खूप रंगीत थरांचे खडक दरीत आणि दरीच्या पलीकडे बघत आपण थंडीत , खडकांवर बसावे. इकडे तिकडे असलेली चुकार झुडपे त्यांची रंगीत फुलेही बघून घेऊ. समोरचा दरीतला आणि पलीकडचा नजारा हळूहळू रंग बदलायला लागेल . पिवळ्या रंगाच्या उजेडात पांढरे, काळे, पिवळे, हिरवे दिसणारे खडक आता खालच्या थरातून लाल भडक व्हायला लागतात. सगळा परिसरच हळूहळू भडक लाल रंगाची तेजस्वी चादर पांघरतो. सूर्य तर लखलखता सोन्याचा गोळा दिसू लागतो. खड्काआडून सूर्यकिरणांची तिरीप लांबवर जाते, तो खडक काळा दिसू लागतो आणि ती तिरीप म्हणजे त्याची प्रभावळ भासू लागते. लोकांचे कॅमेरे हे दृश्य टिपायला सरसावतात. डोळ्यांच्या कॅमेऱ्यात तर ते हवेच न कधीही न विसरण्यासाठी.

काही क्षणांचा हा खेळ, आपण डोळ्यात पूर्णपणे साठवूनच घ्यायचा प्रयत्न करत असतो तर खालून काळा रंग सगळया लाल रंगाला पुसत पुसत वर वर येत असतो. आणि आकाशात हळूच उगवणारी एक चांदणी , फिक्कटशी चंद्रकोर आणि अधिकच गार झालेला वारा आपल्याला गोंधळून टाकतो, अरे कुठे गेला तो लाल रंग? आत्ता तर इथेच होता.

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments