पत्र क्र १२३ — आर्चेस नॅशनल पार्क, मोआब
अमेरिकेत, ग्रँड कॅनियन पासून पाच सहा तासाचा रंगीबेरंगी प्रवास. आजूबाजूला वाळूच्या खडकांचे अनेक आकार बघत आपण जातो. रस्ताभर दृश्य खूप मस्त. पिवळे लाल वाळूचे खडक, लहान मोठे , उंच बुटके, कोरलेले, विविध...
अमेरिकेत, ग्रँड कॅनियन पासून पाच सहा तासाचा रंगीबेरंगी प्रवास.
आजूबाजूला वाळूच्या खडकांचे अनेक आकार बघत आपण जातो. रस्ताभर दृश्य खूप मस्त. पिवळे लाल वाळूचे खडक, लहान मोठे , उंच बुटके, कोरलेले, विविध आकार धारण केलेले , नजरेच्या टप्प्यात सगळे हेच. कुठे ते खूप लाल रंगाचे तर कुठे एकदम पिवळे धमक्क . अधे मध्ये लागणारी छोटी मोठी गावे , अगदी सुंदर असा तो प्रवास अशाच एका चित्रातल्या गावात घेऊन जातो. मोआब. ते गाव येण्याआधीच आर्चेस नॅशनल पार्क मध्ये आपली कोण वाट बघत आहे त्याची झलक मिळते. रस्त्यात सगळ्या गाड्या कडेला उभ्या राहून लोक उतरत होते. काय असावे ? चला बघू म्हणून उतरलो. रस्त्याच्या कडेला थोडे डोंगर चढून गेल्यावर खडकात कोरलेली सुंदर कमान दिसली. वा! क्या खूब! असे म्हणत आपण चढतो आणि त्या कमानी पलीकडचा सुंदर मोहक नजारा बघून खुश होतो. पलीकडे असेच खडकांचे निरनिराळे आकार. खरं तर ,"काय मेलं ते दगड धोंडे बघायला जायचं? " असं कोणाला वाटेल. पण त्या निर्जीव दगड धोंड्यातही इतके सुंदर दृश्य तयार होऊ शकते हे बघायला आर्चेस पार्कलाच जायला हवे.
पहिलीच कमान सुंदर होती त्यामुळे चला आता काही हरकत नाही पुढे जायला, म्हणत उत्साहात आपण मोआब कडे रवाना होतो.
सुंदरसे गाव . त्याला जाग राहते ती आर्चेस पार्क मुळेच. असंख्य पर्यटक निसर्गाची कलाकारी बघायला येतात. जवळ कोलोरॅडो आहेच. आणि वाळूच्या खडकांची काय कलाकारी आहे म्हणून सांगू? कोलोरॅडो नदीच्या उंच पठारावर असलेले वाळूचे दगड , विविध आकारात आपल्याला भेटतात, कुठे सुंदरशी कमान करून तर कुठे पूल बांधून , कुठे तरी एखादी खिडकी बनून, कुठे एखाद्या अतिउंच इमारतीचा आकार बनून आणि कुठे एखादा भलामोठा खडक, छोट्याशा दगडावर आपले वजन सांभाळत उभा असलेला, कुठे वाळूची भिंत तयार झालेली, असे वाटावे कि हात लावला तर पडेल कि काय?
काय बघू अन कुठे बघू असे होऊन जाते. पार्क मध्ये माहिती केंद्र आहेच. असे म्हणतात काही लाख वर्षांपूर्वी, इथे समुद्र होता. तो आटला आणि सगळे मीठ तिथेच जमून राहिले. कोलोरॅडो नदी होतीच. त्यातून लाल रंगाचे खडक वाहत येऊन ह्या मिठाच्या थरावर जमत गेले. नंतरच्या काळात इथे वाळवंट तयार झाले आणि त्यातच वालुकाष्म तयार होत गेले. त्या थराला नवाहो सँडस्टोन म्हणतात. पुन्हा काही लाख वर्षे उलटली. त्या काळात नवीन सँडस्टोन तयार होत गेला. मिठाचा थर आत दबला होता. त्याने ह्या सगळ्याला वर ढकलायला सुरवात केली. त्यामुळे अनेक ठिकाणी क्षारयुक्त घुमट तयार झालेले आहेत. भूगर्भातील हालचालींमुळे वरचा थर सतत उचलला जात होता. वरून जमत जाणारा सँडस्टोन आणि खालून होत असलेली हालचाल, ह्यामुळे अनेक ठिकाणी वेगवेगळे खडकांचे आकार बनत गेले. त्या हालचालींमुळे वरच्या थरात खडक एकमेकांवर आपटून घर्षण होऊ लागले. त्यांच्यातली वाळू सुटून पडू लागली. वारा अशी सुटी वाळू वाहून नेण्याचे काम आनंदाने करू लागला. ह्या भागात पाऊस जास्त होत नाही. पण जे काही पाणी पडे ते कपारींमधून झिरपत आत जाऊन गोठून बसे. वितळताना तो बर्फ पुन्हा आजूबाजूची वाळू कोरून काढे. ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम होऊन वरच्या खडकांमधून विविध आकार तयार होऊ लागले.
जो भाग घट्ट होता तो तसाच राहिला पण सुट्टा भाग वाहून गेला.
अनेक वर्षांच्या ह्या मेहेनतीचे फळ आजचे पार्क आहे.
ह्या भागात मनुष्य वस्ती होती असे मानतात. सातशे वर्षांपूर्वी स्पेन हुन मिशनरी आले. त्यांना ह्या लोकांनी राहू दिले नाही. दोनशे वर्षे गेली. नागरी भागातील धनिक शेतकरी ह्या भागात मोठ्या हवेल्या बांधून राहण्याच्या उद्देश्याने आले पण त्यांनाही लोकांनी येऊ दिले नाही. मग जवळच्या मोआब टाऊन ला त्यांनी आपला मुक्काम हलवला. १८५५ नंतर काही लोक आले. त्यांना ह्या भागाचे निसर्गसौंदर्य सगळ्यांना बघता यावे असे वाटले. पर्यटक येऊ लागले. भूगर्भ शास्त्राचे अभ्यासक विशेषकरून यायला लागले. साहसी पर्यटक, ह्या भागाच्या दुर्गम भागातील सुंदर जागा शोधून काढू लागले. हळूहळू अनेक सुंदर जागा सापडल्या. आणि ह्या तीनशे सव्वा तीनशे चौरस किलोमीटर च्या क्षेत्राला टप्प्या टप्प्याने नॅशनल पार्क जाहीर करण्यात आले.
२००० पेक्षा अधिक कमानी असलेल्या ह्या पार्क मध्ये फिरण्यासाठी रस्ते केलेत. पर्यटकांसाठी सोयी केल्यात. पण अनेक कडक नियम लागू केले आहेत. कोणीही कमानींवर, दगडांवर, किंवा इतर आकारांवर चढू शकत नाही, त्या भागात जाऊन उड्या मारू शकत नाही, दोरीवरचे साहसी खेळ करू शकत नाही. गाडी ठेवण्यासाठी उत्तम जागा केल्या आहेत. त्या त्या भागातील विशेष कमानी बघायला जायला रस्ता आखून दिला आहे. बऱ्याच कमानींसाठी चालत , डोंगर चढत उतरत जावे लागते. पण तिथे जाण्याचे श्रम सार्थकी लागले अशीच भावना त्या सुंदर कमानी बघून होते. अनेक प्रकारचे सरपटणारे प्राणी, आकाशात उडणारे रंगीबेरंगी पक्षी, मोठे फाल्कन, लाल कोल्हे असे अनेक सजीव ह्या भागात आहेत. खूप प्रकारची झुडपे, काही मोठे वृक्ष लाल वाळूच्या पटलावर वेगळा रंग भरतात.
नितळ निळ्या आभाळात मधेच एखादा पांढरा ढग अशा पार्श्वभूमीवर लालसर रंगाच्या कमानी अतिशय उठून दिसतात. मधेच जर एखाद्या ढंगाने सूर्याला झाकले तर जी काही रंगसंगती बघायला मिळते ती केवळ अप्रतिम. पहिल्याच दिवशी डेलिकेट आर्च बघायला गेलो. फक्त दीड मैलांचा डोंगरातला रस्ता. असे वाटते त्यात काय, सहज पार करू. पण ती आर्च दिसेपर्यंत चांगलीच दमछाक झाली. मात्र इतकी सुंदर कमान आहे न ती, खरोखर नाजूक वाटते. बरेच जण त्या कमानीखाली उभे राहून फोटो काढण्यासाठी रांग लावून शांतपणे उभे होते.
तिथे फारसा पाऊस नसतो असे सांगितले होते. पण दुसऱ्या दिवशी आम्ही "वॉल आर्च" बघायला गेलो आणि पावसाने गाठले. साधारण दोन मैलांचा रस्ता पार करून तिथे पोचावे लागते. सकाळच्या प्रहरी छान पाऊस पडून ती लांबलचक कमान इतकी स्वच्छ धुतली गेली होती. सुंदरशा उन्हात , अगदी लखलखीत होऊन आमचे स्वागत करत होती.
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.