पत्र क्र १२४ — सान फ्रान्सिस्को आणि कॅलिफोर्निया

सान फ्रान्सिस्को , एक सुंदर शहर. एकूणच कॅलिफोर्निया प्रांत फार छान आहे. अनेक जागा पर्यटकांना आकर्षित करून घ्यायला सज्ज आहेत. सुंदरसा सागर किनारा आहे. लांबच लांब गोल्डन गेट ब्रिज च्या पार्श्वभूमीवर...

कीर्ती वडाळकर
||4 min read

सान फ्रान्सिस्को , एक सुंदर शहर. एकूणच कॅलिफोर्निया प्रांत फार छान आहे. अनेक जागा पर्यटकांना आकर्षित करून घ्यायला सज्ज आहेत. सुंदरसा सागर किनारा आहे. लांबच लांब गोल्डन गेट ब्रिज च्या पार्श्वभूमीवर सगळे शहर मस्त जगते. अमेरिकेत प्रत्येक मोठ्या शहराची ओळख म्हणून एखादी भव्य वास्तू आहे. तसाच हा गोल्डन गेट ब्रिज. सान फ्रान्सिस्को ची खाडी आणि पॅसिफिक समुद्राला जोडणाऱ्या चिंचोळ्या पट्टीला "गोल्डन गेट" म्हणतात. इथल्याच दोन डोंगरांना जोडणारा तो गोल्डन गेट ब्रिज.

हे शहर १७७६ मध्ये वसलं. स्पेन हुन आलेल्या धर्मगुरूंनी ह्या भागात वस्ती आणली. त्यांच्याच एका धर्मगुरूंच्या नावावरून शहराचे नाव सान फ्रान्सिस्को पडले. सगळं शांतपणे चालू होते आणि १८४८ मध्ये जवळच एका भागात सोने सापडले.

बातमी पसरली आणि देशभरातून लोक कॅलिफोर्निया कडे धावू लागले. तिथे राहणारी जनता आणि हे उपरे लोक ह्यांच्यात संघर्ष होऊ लागला. पण सोन्याच्या लालसेने ह्या भागात आलेले इथेच राहिले. आणि सगळा भाग विकसित होऊ लागला. पन्नास वर्षातच केवळ दोनशे च्या लोकसंख्येची वस्ती काही लाखांच्या घरात गेली. सगळ्या भागाला राज्याचा दर्जा मिळाला. खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस आले.

पॅसिफिक सागराच्या कडेला असल्याने बंदर, गोदी सगळं तयार झाले. मालवाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरु झाली. आजही मोठमोठी जहाजे सान फ्रान्सिस्को बंदराकडे येताना दिसतात. जशी वाहतूक वाढली तशी रोज लागणाऱ्या वस्तूंची मागणी वाढली. अशा वस्तू पुरवणारे एक मोठे दुकान आले. डॉमिन्गो घिरडेलींनी चॉकलेट बनवायची छोटी फॅक्टरी टाकली. अनेक चिनी लोक आले. १८८० पर्यंन्त जवळजवळ दहा टक्के जनता चिनी होती. त्यांनी लाल सोनेरी रंगात सजलेले चायना टाऊन वसवले. सगळा भाग गजबजून गेला. मोठ्या इमारती आल्या. छोट्या छोट्या टेकड्यांवरून उतरचढ करणारे रस्ते आले. शिक्षण संस्था आल्या. कला संस्कृती ची वाढ आणि जतन होऊ लागली.

१९०६ साली एप्रिल महिन्यात एका भल्या पहाटे

सान फ्रान्सिस्कोला मोठा भुकंम्पाचा धक्का बसला. इमारती कोसळल्या. गॅस ची पाईपलाईन तुटून भयानक आग लागली. अनेक जण होरपळून मेले. अनेक बेघर झाले. शहर अक्षरश: बेचिराख झाले. पण सिटी कौन्सिल हार मानायला तयार नव्हती. उत्तम अभियंते आणून, कर्ज काढून शहर पुन्हा वसवले गेले. पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत केला. पुढील काहीच वर्षात हे शहर अमेरिकेची व्यापारी राजधानी झाली. अनेक मोठ्या कम्पन्या इथे आल्या आणि आजही आहेत. सर्व भाग सर्वार्थाने विकसित झाला.

काही वर्षात समुद्रमार्गे येणारी मालवाहतूक कंटेनर मध्ये येऊ लागली. सान फ्रान्सिस्को चे बंदर जुन्या पद्धतीचे होते. ही अवजड वाहतूक मग ओकलॅंड कडे वळली . आणि त्यानंतर पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे शहर म्हणून

सान फ्रान्सिस्को ओळखले जाऊ लागले. अनेक ओळखी असलेले हे शहर अनेक

प्रश्नाना सामोरे जाऊ लागले. कधी बाहेरून येणाऱ्या लोकांचा प्रश्न , कधी अश्वेत लोकांचा प्रश्न, कधी बेघरांची समस्या, कधी गे राईट्स ची चळवळ, काय न काय.

शहरात फिरणे खूपच सोपे. ट्राम्स चे जाळे विणले आहे अगदी. कुठूनही कुठेही जाता येणे सोपे आहे. आजूबाजूला नजर टाकल्यास वळणावळणाच्या नागमोडी रस्त्यातून खाली येणाऱ्या गाड्या खूप मस्त दिसतात. बे एरिया , पियर ३९ आणि तिथले संग्रहालय नक्कीच बघण्यासारखे आहे. भणाण वारा सगळीकडेच आहे. समुद्रात बोटीने जाऊन एंजल आयलंड ला जाऊन या, किंवा ट्वीन पिक्स वरून शहराचा सुंदर नजारा बघा, फिरायला अनेक जागा आहेत. हो आणि घिरडेली कडे जाऊन हॉट चॉकलेट प्यायला विसरू नका. गोल्डन गेट पार्क आणि ब्रिज तर आहेतच.

सगळ्या प्रकारचे आणि देशांचे लोक इथे आहेत. पण एवढ्या रंगीत शहराला गालबोट म्हणजे बेघरांचा प्रश्न. अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर, स्टेशन मध्ये सामानसुमान घेऊन राहताना दिसतात. कितीतरी ठिकाणी तर

रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या कॅम्पर व्हॅन मधून लोक राहतात. गरिबी पण बरीच आहे. त्यामुळे चोऱ्यामाऱ्या जास्त आहेत. गेल्यागेल्या पहिलीच सूचना मिळाली ," गाडीत सीटवर काही ठेवून जाऊ नका. गाडीची काच फुटलीच म्हणून समजा." अरेरे काय हे? एवढ्या प्रगत भागात अशी अवस्था?

आम्ही सान फ्रान्सिस्को मुख्य शहरापासून जरा दूर माउंटन व्यू भागात राहत होतो. एखाद्या सुंदर चित्राचा पोत एखाद्या चुकार फराट्याने बिघडावा तसेच ह्या बेघरांमुळे सगळ्या भागाचे होते.

मात्र सगळीकडे सोयी सुविधा खूप आहेत. अनेक भागात चालत जाऊन

आम्ही तो भाग अक्षरश: पिंजून काढला होता. इथे येण्याचे मुख्य कारण स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये मुलाच्या ग्रॅज्युएशनला उपस्थित राहणे हे होते. जगप्रसिद्ध स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी चा फेरफटका अनेकदा मारला. अगदी त्यांच्या मंगळवार बाजार पासून ते सर्व वाचनालयांपर्यंत सगळे मजेत फिरून आलो. अतिभव्य असा तो परिसर. इथे येणारा प्रत्येक विद्यार्थी विशेष असतो. जगभरातील अनेक होतकरू आणि हुशार विद्यार्थी इथे विविध विषयांचा अभ्यास करत असतात. भारतीय मुलेही आहेत. जगाची छोटी प्रतिकृतीच म्हणा न. त्यामुळेच मुलांना मिळणारा अनुभव उत्तम असतो.

दिवसभर चालणाऱ्या ग्रॅजुएशन सोहळ्यामध्ये सर्व विषयांच्या, डिग्री घेणाऱ्या मुलांना आधी एका मोठ्या स्टेडियम मध्ये, सुंदरशा परेडने आणले जाते . त्यांना मार्गदर्शन करायला कोणीतरी जगप्रसिद्ध व्यक्ती असते. कृतार्थ पालक प्रेक्षकात असतात. सोहळ्याचे विशेष म्हणजे आधीच्या अनेक वर्षांचे पास झालेले लोक , त्यांच्या असोसिएशन तर्फे सगळीकडे खाऊ वाटत असतात. आलेल्या लोकांना अगदी आग्रहाने बोलावून ते आदरातिथ्य करतात. त्या त्या डिपार्टमेंट तर्फे नंतर जेवण तर असतेच.

आमच्या मुलाला एवढ्या मोठ्या विद्यापीठात डिग्री घेता आली ह्याचा आनंद मानत , पुढच्या सोहळ्यासाठी आम्ही डिपार्टमेंटच्या सभागृहाकडे गेलो. बघतो तर काय ? बसायला कुठेच जागा नाही. सभागृहाच्या एका भागात अनेक आफ्रिकन्स जागा अडवून बसले होते. रांगेच्या ह्या कडेला दोघे, त्या कडेला दोघे मधल्या खुर्च्या रिकाम्या! आणि कोणाला बसूही देईनात. अरे असे काय? शेवटी मी एका रांगेत घुसले आणि त्या स्त्रीला विचारलेच. तिने सांगितले, आफ्रिकेतल्या कुठल्याशा अतिदुर्गम भागातून ते पन्नास जण आले होते. त्यांच्या गावची एक मुलगी त्यादिवशी सिव्हिल इंजिनियरिंग मध्ये डॉक्टरेट घेणार होती, हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचे होते. त्यांच्या पद्धतीचा ढोल ताशा सगळं घेऊन त्यांच्या पारंपरिक वेशात ते आले होते. तिनेही तशाच वेशात डिग्री घेतली. माझी त्यांची मैत्री झाल्यामुळे त्यांनी आम्हाला बसायला जागा तर दिलीच पण आमचा मुलगा जेव्हा डिग्री घ्यायला गेला तेव्हा त्यांचा ढोल पुन्हा बडवला, नाच केला, आनंदाचे चित्कारही केले . लोकांना कळेना नक्की आम्ही कुठल्या देशाचे आहोत ते.

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments