पत्र क्र १२५ — जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी

ह्या मालिकेतले शेवटचे पत्र. ५ पत्रांचे टार्गेट ते १२५ पत्रांचा प्रवास — प्रवासाचे, अनुभवांचे, आणि माणसांचे वर्णन. चरैवेती चरैवेती...

कीर्ती वडाळकर
||3 min read

तर हे ह्या मालिकेतले शेवटचे पत्र!

मी सूरवात केली ते आपण ५ पत्र पाठवू, ह्या विचाराने. एवढ काय सांगु शकणार न आपण? जरी प्रवास करत असलों, तरी काय सांगायचे न? प्रवासी तर सगळेच आहेत. हल्ली प्रवासी कंपन्या जाग़ोजागी आहेत, लोक सहज म्हणुन यूरोप फ़िरुन येतात. युरोपचा एक प्रवास मी ही केला एका कंपनी बरोबर आणि लक्षात आले, "हाय कम्बख़्त तूने पीही नही". तो नुसता प्रवास होता, हे बघा टिक मार्क करा, पुढे चला. माझ्यासारख़्या चौक़स प्रवाशाचे ते काम नोहे.

तर काय लिहावे बर मग पत्रात? सकाळी पाचला उठलो, तयारी केली, ब्रेकफास्ट केला, त्यात हां मेन्यू होता, अस? अरे देवा, हे तर आपणच वाचणार नाही, लोकांवर क़शाला अत्याचार? मुळात हे कुठलेच "प्रवासवर्णन" नाही, मग दिनक्रम क़शाला? मग ठरवले आपण आपले अनुभव नक्कीच सांगू शकतो. मग ठरलं तर वर्णन करु या आपल्या, प्रवासात घेतलेल्या विविध अनुभवांचे.

५ पत्रांचे टार्गेट तर पूर्ण झाले, आणि अजुन काही डोकयात राहिलेच होते. चला आता ११ लिहु यात, मग २५ पर्यंत टार्गेट नेले, मग ५०, मग १००, आणि अरेच्चा! अजुन तर बराच प्रवास बाक़ी आहें! काय करावे? खर तर कोणाचाही प्रवास क़धी थांबु नये, चरैवेती चरैवेती……...

एक मैत्रिण म्हणाली, "तुला इतके कसे लक्षात राहते?"

खरं सांगु, मला जीवनात ख़ुप रस आहें. विधात्याने निर्माण केलेली सृष्टि, त्यात मानवी बुद्धिने घातलेली भर, अनेक प्रकारची माणसे, किती तरी अनुभव घेण्याजोगे, सगळे मला आकर्षित करते. आणि मग त्या सगळयाची माहिती मिळवायला माझी धडपड सूरू होते. ती माहिती मी टिपुन ठेवते, क़धी लेख लिहिते, क़धी स्वतःच वाचते क़धी कुठे तरी छापायला देते.

जो कोणी माझा गाईड होईल त्याला मी प्रश्न विचारून हैराण करते, असे माझ्या मुलाला वाटते. पण त्या त्या भागातील रहिवाशांना त्यांच्या राहणीमानाविषयी, त्यांच्या जागेविषयी विचारले न की ते खूप खुशीत सगळी माहिती देतात. तिथला इतिहास, भूगोल, सामाजिक जीवन सगळं सगळं अगदी तपशीलवार सांगतात. मग तुम्ही भारतात फिरत असा किंवा जगात कुठेही.

मुलाचे म्हणणे, "अगं गुगल कर सगळं मिळेल." पण गुगल हल्ली आले, माझा प्रवास अनेक वर्षांचा आहे. शिवाय हल्ली सुद्धा जो भाव, जी आत्मीयता त्या व्यक्तीकडून मिळेल, ती गुगल कडून कशी बरं मिळेल? हो गुगल माहिती नक्की देईल, पण मानवीय आत्मीयतेचा स्पर्श त्यात नसेल.

जे तुम्हाला बालीचा न्योमान सांगेल, शिकागो ची आजी सांगेल, युगांडाची व्हिक्टोरिया सांगेल किंवा गोव्यातली मावशी सांगेल, ते गुगल नक्कीच नाही सांगू शकणार.

प्रवास करताना आजु बाजूला चौकस डोळस पणे बघितले न कि खूप काही नवीन गवसते, असे मला वाटते. नवीन झाडे, पक्षी, प्राणी, इतकंच काय इमारती सुद्धा खूप काही सांगून जातात. माणसें तर हिरीरीने पुढे येऊन खूप काही सांगतात.

एक गोष्ट मी नेहेमी लक्षात ठेवते, "जाऊ तिथले होऊ." उगाच तिथली आपली तुलना नाही करत बसायची. काही गोष्टी जशा आपल्या चांगल्या तशाच काही गोष्टी परक्या भूमीवर पण चांगल्या असतात, तेवढ्याच घ्यायच्या न, कशाला वाईट गोष्टी धुंडाळायच्या?

प्रत्येक ठिकाणचे अनुभव सांगताना मी त्या त्या जागेला मनाने पुन्हा भेट दिली. सगळा क्रम आठवला, आणि तिथे भेट देण्याचा आनंद पुन्हा घेतला. पहाटे जाऊन बघितलेले ते सूर्योदय, संध्याकाळच्या कातरवेळी अनुभवलेले ते सूर्यास्त, अनेक ठिकाणचे समुद्र, नद्या, प्राणी, पक्षी, झाडे, इमारती, व्यक्ती, सगळं सगळं मी पुन्हा जगले. आणि प्रत्येक प्रवासाचा पुनश्च आनंद घेतला.

"प्रत्येक पत्रासोबत तू एखादा फोटो का नाही ग देत?" असे अनेकांनी विचारले. दुसरे सांगू, जर चित्र आयतं दिसलं तर आपली कल्पनाशक्ती कमी काम करते. म्हणजे असं कि, मी जर लिहिलं "सूर्यास्ताला अनेक रंग दिसत होते", किंवा "सगळीकडे पिवळी फुले होती" तुमच्या मनापुढे ते चित्र तयार होते. तुमची कल्पनाशक्ती खूप छान काम करते मग.

प्रवास जसा आपल्याला काही खूप छान शिकवून गेला तसेच त्यातून मी लोकांना थोडं फार काही देऊ शकले ह्याचा आनंद मला खूप आहे. "न लिहिलेली पत्रे" चे मला विशेष आभार मानायचे आहेत कारण माझ्यातल्या आळशी लेखणीला त्यांच्या मुळे शब्दांचे सातत्य सापडले.

मला माहित आहे अजून बरेच अनुभव बाकी राहिलेत सांगायचे, अख्खा युरोप बाकी आहे, मलेशिया बाकी आहे, अजूनही बरेच बाकी आहे. पण काहीतरी बाकी राह्यलाच हवे न. आता लिहायची आणि त्यात सातत्य राखण्याची सवय लागलीच आहे तर........

"मी पुन्हा येईन"

— कीर्ती हेमंत वडाळकर

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments