पत्र क्र ९८

हल्ली कोणत्याही देशात जा, राजधानीच्या शहरात असो किंवा इतर मोठ्या शहरात असो,अत्याधुनिक गगनचुंबी इमारती सर्वदूर दिसतात. आर्किटेक्टस त्यांच्या कल्पनाशक्तीची पुरेपूर ताकद दाखवत असतात. संरचनाकार ती कल्पना...

कीर्ती वडाळकर
||5 min read

हल्ली कोणत्याही देशात जा, राजधानीच्या शहरात असो किंवा इतर मोठ्या शहरात असो,अत्याधुनिक गगनचुंबी इमारती सर्वदूर दिसतात. आर्किटेक्टस त्यांच्या कल्पनाशक्तीची पुरेपूर ताकद दाखवत असतात. संरचनाकार ती कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी झटत असतात. आणि शहरांचा चेहरामोहरा बदलत जातो. आधीच मर्यादित असलेली जमीन आणि अमर्याद वाढत चाललेली लोकसंख्या पर्यायाने वाढत जाणारी घरांची संख्या, कचेऱ्यांची संख्या, ह्या सगळ्याचा ताळमेळ जमवताना उभ्या दिशेने प्रसरण पावत चाललेली शहरे! ह्या सगळ्याला ब्रिटन कसे अपवाद असेल न?

जुन्या पद्धतीच्या घरांची रचना जपण्याकडे जरी लोकल कौन्सिल चा कल असला तरी अनेक कारणांनी मोठमोठ्या इमारतींना गगनाला गवसणी घालण्याची परवानगी द्यावीच लागते. ब्रिटनच्या कंट्रीसाईड ला कदाचित असे दृश्य दिसणार नाही पण मुख्य शहरांमधून नक्कीच खूप उंच इमारती दिसतात. लंडचेच उदाहरण घ्या न .

नॉर्मन फॉस्टर, ब्रिटनचे जगप्रसिद्ध आर्किटेक्ट. अत्यन्त गरिबीत जन्म झालेले, आई वडिलांचे एकुलते एक अपत्य . प्रथेप्रमाणे घरा बाहेर शिकायला तर गेले पण गरिबीमुळे इतर मुलांकडून अवहेलना पदरी पडे . कोवळ्या वयातील ते कठोर दिवस होते, पण नॉर्मन फक्त स्वतःच्या अभ्यासाकडे लक्ष देई. चांगले गुण मिळवून आपल्याला काहीतरी चांगले करायचे आहे एवढाच ध्यास. सोळाव्या वर्षी शाळेतून बाहेर पडून, प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून , एक छोटीशी सरकारी नोकरी पकडली. अठराव्या वर्षी रॉयल एअर फोर्स मध्ये, विमानांचे आकर्षण आणि स्वतःचा छंद म्हणून नोकरी पकडली. २, ३ वर्षे तिथे काम करून, आईवडिलांच्या सांगण्याला न जुमानता ती नोकरी सोडून , एका प्रसिद्ध आर्किटेक्ट कडे नोकरीला लागला. तिथल्या काही लोकांनी त्याला आर्किटेक्ट चे काम म्हणजे तुला चांगला पोर्टफोलिओ तयार करावा लागेल, असे सांगितल्यावर त्याने सुंदर सुंदर कल्पनांचे छान आराखडे काढून दाखवले आणि ड्रॉईंग विभागात त्याची बढतीवर बदली झाली. इथूनच त्यांचा आर्किटेक्चर चा प्रवास सुरु झाला. त्यानंतर, वयाच्या एकविसाव्या वर्षी म्हणजे १९५६ साली त्यांनी मँचेस्टर युनिव्हर्सिटीत आर्किटेक्ट च्या पदवीसाठी प्रवेश घेतला. मात्र शिष्यवृत्ती न मिळाल्याने छोटोमोठी, कामे करून स्वतःचे शिक्षण त्यांना करावे लागले. अनेक बक्षिसं मिळवत त्यांनी ही डिग्री पूर्ण केली. त्यानंतर मास्टर्स साठी अमेरिकेच्या येल युनिव्हर्सिटी मध्ये गेले आणि तिथे त्यांना त्यांचा भविष्यातील कम्पनीचा पहिला पार्टनर भेटला. जीवनात अनेक टक्के टोणपे खात सुरु झालेला त्यांचा प्रवास, जगातील अत्यन्त नामांकित आर्किटेक्ट म्हणून बहरत गेला. जगभरातील अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. जगभरातील अनेक प्रसिद्ध इमारती त्यांनी डिझाईन केल्या. अलीकडे शाश्वत विकासाच्या कामामध्ये ते जास्ती लक्ष घालतात.

लंडनमध्ये फिरताना एक वेगळ्या आकाराची इमारत आपले लक्ष वेधून घेते. म्हणाल तर एखादी उभी बंदुकीची गोळी, म्हणाल तर "घरकीन" (छोटी काकडीसारखी एक भाजी), तिचे खरे नाव "३० सेंट मेरी ऍक्स " पण लोक हल्ली घरकीन च म्हणतात. सर नॉर्मन फॉस्टर ह्यांचे डिझाईन. आधीची बाल्टिक एक्सचेंज ची इमारत आयरिश सेनेच्या आतंकवाद्यांनी उडवल्यावर, तिला दुरुस्त करायची होती. पण तिचे प्रचंड नुकसान झाले होते. मग नवीनच काहीतरी बांधायचे तर हे अतिशय कल्पक डिझाईन बनवले. १८० मीटर्स उंच म्हणजे साधारण ६० मजली, आणि पाच लाख १६ हजारापेक्षा जास्ती क्षेत्रफळ असलेली हि इमारत तिच्या आकाराच्या इमारतींनी वापरली असती त्यापेक्षा निम्मीच वीज वापरते ती त्या विशिष्ट डिझाईनमुळे. शंकरपाळ्याच्या आकाराचे काचेचे पॅनेल्स उत्तम रंगसंगती करून बाहेरून बसवले आहेत. आणि तिचा आकार टोकाकडे निमुळता होत जातो, म्हणूनच बंदुकीची गोळी मोठ्या आकारात उभी केली आहे कि काय असा भास होतो. दोन वेळा विकली जाऊन आता मात्र तिचा उपयोग पूर्णपणे ऑफिसेस साठी होतो. वरचे काही मजले मोठ्या समारंभासाठी भाड्याने दिले जातात. ह्या शिवाय अनेक छान छान इमारती सर नॉर्मन फॉस्टर ह्यांनी डिझाईन केल्या आहेत. टॉवर ब्रिजच्या काठाच्या भागात एक इमारत आपले लक्ष वेधून घेते, अंडाकृती, जराशी कललेली , काचेच्या पॅनेल्स मध्ये बनलेली. सिटी हॉल इमारत म्हणजे लंडनच्या महापौरांचे ऑफिस. कारभारातील पारदर्शकतेचे प्रतीक म्हणून काचेची इमारत. अशा अनेक इमारती सर नॉर्मन फॉस्टर ह्यांनी तयार केल्या.

त्याशिवाय लंडनच्या स्कायलाईन चा अविभाज्य भाग असलेल्या अजूनही काही इमारती, म्हणजे चीज ग्रेटर बिल्डिंग, द शार्ड , लॉईड्स, वॉकी टॉकी बिल्डिंग वगैरे, रिचर्ड रॉजर्स आणि इतर अनेक जगप्रसिद्ध आर्किटेक्टनी साकारलेल्या, अनेक आकारातील सुंदर इमारती.

ती चीज ग्रेटर बिल्डिंग म्हणजे चक्क आपल्या स्वयंपाकातल्या उभ्या आकाराच्या किसणीची भव्य प्रतिकृती. कशी मस्त कल्पना आहे न? २२५ मीटर उंच म्हणजे साधारण ७५ मजली किसणी. अगदी तसाच आकार, वरचा भाग म्हणजे किसणीचे हॅन्डल अगदी तसेच वाटते, ते किसणीचे अनेक डोळे म्हणजे इथले काचेचे पॅनेल्स, मधून मधून तिरप्या लोखण्डी गजांनी बांधून धरलेले. हा वेगळा आकार देण्याचे मुख्य कारण म्हणजे तिथे उपलब्ध असलेली मर्यादित जागा. शिवाय जवळच असलेले सेंट पॉल चर्च. हे चर्च महत्वाचे , ते दुरून दिसले पाहिजे म्हणून ह्या इमारतीचा वरचा भाग चपटा केला. शहरात एक वेगळेच आकर्षण निर्माण झाले.

लॉइड्स इमारत किंवा आतला भाग बाहेर असलेली "inside out " इमारत. त्या इमारतीच्या सगळ्या सर्व्हिसेस म्हणजे लिफ्ट, जिने, पाण्याचे आणि ड्रेनेजचे पाईप, वगैरे सगळं बाहेरून आहे जेणेकरून आतील जागा जास्तीतजास्त वापरली जाईल. दिसायला छानच आहे ती. पण ज्या सर्व्हिसेस बाहेरून काढल्या त्या वाऱ्याच्या प्रचंड झोतामुळे सतत दुरुस्तीला येतात. अनेक ऑफिसेस ह्या इमारतीमध्ये आहेत.

त्याच परिसरात असलेली वॉकी टॉकी इमारत. त्या

वॉकी टॉकीच्या सेटसारखी दिसणारी. वरचे काही मजले स्काय डेक हॉटेल. तिथे जायचे म्हणजे प्रचंड सेक्युरिटीमधून पार पडावे लागते. मात्र हल्ली असलेल्या अतिवेगवान लिफ्टमुळे ३८व्या मजल्यावर काही सेकंदात नेते. वरच्या हॉटेलमधून सगळ्या लंडनचे विहंगम दृश्य दिसते. तिथे पोचलो तेव्हा आकाश निरभ्र होते त्यामुळे सर्व कोनातल्या शहराचे दर्शन झाले. खरं तर गेलो होतो "द शार्ड " च्या वरच्या मजल्यावरून शहर बघायला पण काही करणास्तव त्यादिवशी पर्यटकांना आत सोडत नव्हते. "द शार्ड " म्हणजे ब्रिटन मधली सगळ्यात उंच इमारत. रेंझो पियानो नावाच्या प्रसिद्ध इटालियन आर्किटेक्ट नी आखलेली. थेम्स मधून वर येणारे ३१० मीटर उंच शिखर दिसावे अशी त्यांची कल्पना. कुठूनही दिसते हि इमारत, एक त्रिकोणी सुळका, वर निमुळता होत जाणारा. सुरवातीला परंपरावादी लोकांनी फारच टीका केली ह्या कल्पनेची, म्हणे ती पारंपरिक ब्रिटिश आर्किटेक्चर ला साजेशी नाही, भदाडी दिसेल, शहर विद्रुप होईल, वगैरे. मग रेंझो पियानो आणखीनच जोमात कामाला लागले आणि इमारतीला बाहेरून अनेक गोष्टींनी सुंदर करण्यात आले. आजही लंडनला गेलं कि ही इमारत पदोपदी दिसते. अनेक सिनेमांमधून दिसलेली,"द शार्ड " कतार च्या सरकारी मालकीची आहे. काही जणांच्या अति उत्साहीपणामुळे अनेकदा चर्चेत आली आहे. काहींनी तिच्या टोकावरून उड्या मारल्या काहींनी उंचावरून रॅपलिंग करत तळ गाठला, कधी कुठल्या चांगल्या कामाला मदत म्हणून तर कधी कुठल्या वाईट कामाचा निषेध म्हणून बातम्यांत येण्यासाठी लोकांनी द शार्डचा वापर केला. अनेक प्रसिद्ध ऑफिसेस, हॉटेल्स ह्या इमारतींत आहेत म्हणूनच सुरक्षा चोख ठेवण्यासाठी कुठेही जरासे खुट्ट वाजले तरी पर्यटकांना आत येणे बंद.

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments