पत्र क्र ९७

साल संपून २००० साल सुरु होणार म्हणून जगभर अनेक गोष्टी केल्या गेल्या. एक शतक तर पार होणार होतेच पण नवे सहस्त्रक लागणार होते. कुठे Y२K म्हणून तर कुठे मिलेनियम नावाने अनेक लॅन्डमार्क्स बनवले गेले....

कीर्ती वडाळकर
||4 min read

१९९९ साल संपून २००० साल सुरु होणार म्हणून जगभर अनेक गोष्टी केल्या गेल्या. एक शतक तर पार होणार होतेच पण नवे सहस्त्रक लागणार होते. कुठे Y२K म्हणून तर कुठे मिलेनियम नावाने अनेक लॅन्डमार्क्स बनवले गेले. ब्रिटन का मागे राहील न, मग? जिथे अनेक पर्यटक येतात तिथे सततची काहीतरी नवीन भर घालावीच लागते म्हणजे पर्यटकांचा ओघ सुरु राहतो, असं मला वाटते.

२००० सालच्या स्वागतासाठी लंडन मध्ये काही नवीन आणि वेगळे आकर्षण पर्यटकांसाठी उभारले गेले. एक तर तो मिलेनियम फूट ब्रिज, ग्रिनिच ला असलेला तो भव्य मिलेनियम डोम आणि लंडन पासून सुरु झालेले आणि आज जगभर पसरलेले ते मिलेनियम व्हील, प्रचंड मोठा असा तो आकाशपाळणा !

ट्रॅफल्गार भागात हे मिलेनियम व्हील सगळीकडून दिसते. आपण गोल्डन ज्युबिली ब्रिज पार करून आलो कि ज्युबिली गार्डन मध्ये आपल्याला हे भले थोरले मिलेनियम व्हील दिसते. आत जाण्यासाठी अर्थातच रांग असते. आणि अगदी निरखून बघितले तरच कळते कि ते व्हील फिरते आहे. त्याला आता लंडन आय पण म्हणतात. प्रचंड उंचीमुळे सगळ्या लंडन चे मनोहारी दर्शन होते. युरोपमधले सगळ्यात उंच आणि मोठे असे हे व्हील वर्षाकाठी ३० लाखांपेक्षा अधिक पर्यटकांना आकर्षित करते. तिकीट लावून अनेक लोकांना आकर्षित करणारे तिथले ते सगळ्यात लोकप्रिय स्थान आहे. १३५ मीटर उंच आणि १२० मीटर व्यास असलेले ते भव्य चक्र आहे. २००० साली जेव्हा ते पर्यटकांना खुले केले गेले तेव्हा ते जगातले सगळ्यात मोठे चक्र होते. त्यानंतर मोठमोठ्या पर्यटन केंद्रात त्याचे लोण च पसरले. आजकाल तर कुठल्याही मोठ्या शहरात जा, असे चक्र दिसतेच. आधी चीनमधल्या नानचेन्ग मध्ये १६० मीटर चे, मग सिंगापूर मध्ये १६५ मीटर चे आणि आता लास वेगास चे सगळ्यात उंच १६७ मीटर चक्र आहेत. काहीही असो, लंडन आय चे आकर्षण आजही कमी झालेले नाही. तेरा वर्ष पर्यंत सगळ्यात उंचावरून लंडन दर्शन करवणारे ते चक्र होते. २०१३ मध्ये शार्ड नावाची उंच इमारत आली आणि लंडन आय चा नम्बर मागे गेला. आता वॉकी टॉकी इमारतींनी पण मधेच शिरकाव केला आहे. ज्युलिया बारफिल्ड आणि डेव्हिड मार्क्स ह्या दंपतीच्या मार्क्स बारफिल्ड आर्किटेक्ट कंपनीचा आराखडा असलेले हे चक्र सहा देशांमधून विविध भाग आणून जोडले गेले. मोठमोठ्या मालवाहू जहाजांनी ब्रिटन , इटली, नेदरलॅंड, फ्रांस, जर्मनी , झेक रिपब्लिक मधून विविध भाग आणून दिले. थेम्सच्या काठावर एकत्रित करून अभियंत्यांनी हळूहळू ते चक्र सरळ करायला घेतले. पूर्णपणे उभे झाल्यावर एक आठवडा तसेच ठेवले. मग दुसऱ्या टप्प्यात उरलेले बांधकाम पूर्ण केले. ३१ डिसेम्बर १९९९ ला तेव्हाचे पंतप्रधान टोनी ब्लेअर ह्यांनी त्याचे उद्घाटन केले पण पर्यटकांसाठी मार्च मध्ये ते उघडले गेले. १ ते ३३ नम्बर घातलेल्या त्या ३२, वातानुकूलित, अंड्याच्या आकाराच्या कॅप्सूल्स चक्राच्या बाहेरच्या बाजूला आहेत. १३ नंबर अशुभ मानत तो घातलेला नाही. ते चक्र अतिशय हळू फिरते त्यामुळे उतरण्या किंवा चढण्यासाठी थांबवावे लागत नाही, फक्त वयोवृद्ध किंवा दिव्यांग लोकांसाठीच थांबवले जाते. त्या कॅप्सूल मधून २५ लोक बसू किंवा उभे राहू शकतात.

सुरवातीला हे चक्र फक्त

पाच वर्षे सेवा देणार होते आणि त्यानंतर ते काढून टाकायचे असे ठरले होते. पहिल्याच वर्षी त्याची लोकप्रियता बघून त्याच्या ऑपरेटर्सनी अर्ज करून , हे चक्र राहू देण्याची विनंती केली आणि ती मानली गेली म्हणूनच आजही आपण ते बघू शकतो. २०२० साली, चक्राला वीस वर्षे झाली म्हणून काही वेगळे करण्यासाठी नाविन्यपूर्ण सेवा देतात, जसे एका कॅप्सूल मध्ये पब आहे, एकात खूप फुले मांडून गार्डन पार्टी करता येते. अर्थात हे सगळे वेगळा चार्ज देऊनच हा.

दुसरे अजून एक आकर्षण लंडन मिलेनियम फुटब्रिज. बँक साईड हुन लंडन कडे जाणाऱ्या पादचाऱ्यांसाठी बांधलेला, मोठमोठ्या केबल्स नी धरून ठेवलेला सस्पेन्शन ब्रिज. उदघाटनाला लोकांना जाणवले की तो फारच हलतो म्हणून लोकांनी त्याचे नाव "Wobbly bridge" ठेवले. १० जून २००० ला उदघाटन झाल्यावर जेव्हा हे झुलणे लक्षात आले तेव्हा लगेचच तो पूल बंद करून, आराखड्यात बदल करून घेण्यासाठी दोन वर्ष बंद ठेवला. पण त्यामुळे लोकांनी प्रचंड टीका केली आणि पैसा वाया गेल्या बद्दल गदारोळ सुरु झाला. अभियंत्यांच्या दृष्टीने ही बाब अत्यन्त दुःखद होती. त्यांनी मग दिवसरात्र मेहेनत करून , युनिव्हर्सिटी मध्ये अनेक प्रयोग करून , दोष शोधून काढला. त्याप्रमाणे, बदल आणि दुरुस्ती करून, फेब्रुवारी २००२ मध्ये हा पूल पुनःच कार्यरत झाला. ह्या पुलाची रचना अशी करण्यात आली आहे की एका बाजूला असलेले प्रसिद्ध सेंट पॉल कॅथड्रल दुसऱ्या बाजूने सुद्धा दिसते. अतिशय आकर्षक असा हा पूल आहे, शांत थंड संध्याकाळी आम्ही सेंट पॉल कडून येऊन त्या पुलावरून थेम्स चे सुंदर रूप बघत पूलाचेही निरीक्षण केले.

अशीच अजून एक भव्य वास्तू मिलेनियम डोम. शून्य रेखांशावर असलेल्या ग्रिनिच गावी , मुख्य रेखावृत्ताच्या जवळ असलेला हा भव्य डोम, घनफळामध्ये जगातील आठव्या क्रमांकाचा आहे तर आकारामध्ये जगातील सगळ्यात मोठा आहे. वर्षाचे ५२ आठवडे म्हणून ५२ मीटर उंच , १२ महिन्याचे १२ खांब आधाराला जे १०० मीटर उंच आहेत. घड्याळाचे १२ आकडे आणि ग्रिनिच प्रमाणवेळ ह्यांचा पण प्रतीक म्हणजे हे बारा खांब. वर्षाच्या प्रत्येक दिवसाचा एक मीटर म्हणून ३६५ मीटर

व्यासाचे वर्तुळ आहे. विशिष्ट प्रकारचे कापड वापरून हा तंबू तयार केला आहे. राणी एलिझाबेथ ह्याच्या उदघाटनाला आल्या होत्या, ३१ डिसेम्बर १९९९ ला.

इतकी भव्य वास्तू उभारली आणि त्यात एक मोठे प्रदर्शन भरवले. पण जेवढे अपेक्षित होते , त्याच्या

जेमतेम निम्मेच लोक भेट द्यायला आले. मग पुन्हा लोकांच्या रोषाला सामोरं जावे लागले. मात्र नंतर O२ नावाच्या कंपनीने तो चालवायला घेतला. ह्यात मोठा भाग खेळांना दिला गेला. २०१२ साली ऑलिम्पिक चे काही खेळ इथे घेतले गेले. काही भागात हॉटेल, पब, प्रदर्शने भरवण्यायोग्य जागा, बगीचा, वगैरे अनेक गोष्टी केलेल्या आहेत. बाजूलाच एक मोठा रोपवे उभारला आहे. थेम्सच्या पलीकडच्या काठावर जाण्यासाठी. त्यातून जाताना सगळ्या भागाचे सुंदर दर्शन होते. लंडन शहर, थेम्स वरचे अनेक पूल, उंच उंच इमारती, सगळं कसं चित्रातल्यासारखं वाटतं . इमिरेट्स ने त्यांच्या अद्ययावत विमाना ची प्रतिकृती उभारली आहे. ग्रिनिच च्या मुख्य रेखावृत्ताजवळ गेल्याचा आनंद ही आहेच न.

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments