पत्र क्र ९६

अनेक शतकांपूर्वी बांधलेल्या , तरीही उत्तम स्थितीत जतन केलेल्या अनेक इमारती आपल्याला लंडन मध्ये भेटतात, तशाच आधुनिक आर्किटेक्चर चा उत्तम नमुना म्हणून गणता येईल अशाही अनेक इमारती गगनाला भिडताना दिसतात....

कीर्ती वडाळकर
||4 min read

अनेक शतकांपूर्वी बांधलेल्या , तरीही उत्तम स्थितीत जतन केलेल्या अनेक इमारती आपल्याला लंडन मध्ये भेटतात, तशाच आधुनिक आर्किटेक्चर चा उत्तम नमुना म्हणून गणता येईल अशाही अनेक इमारती गगनाला भिडताना दिसतात.

पॅडिंग्टन स्टेशन हुन बस मध्ये बसून, सगळा परिसर , पिकॅडली सर्कस ,ऑक्सफर्ड स्ट्रीट वगैरे बघत ट्रॅफल्गार स्केअर ला उतरलो की अशा अनेक नव्या जुन्या इमारतींची भेट होते. ब्रिटनच्या सरकारात महत्व असलेला हा भाग. जवळच डाउनिंग स्ट्रीट, ह्या बाजूला कलारेन्स हाऊस , समोरच ती admiralti arch , त्याच्या पलीकडे स्कॉटलंड यार्ड चे मुख्यालय, परिसरात सगळ्या मोठमोठ्या देशांचे दूतावास, सेंट जेम्स पार्क पार करून आलो कि समोरच भव्य बकिंगहॅम पॅलेस, ह्या सगळ्या इमारती वातावरणात एक दबदबा निर्माण करत असतात.

नॅशनल गॅलरीचे भव्य पांढरे खांब ट्रॅफल्गार ला सुंदर पार्श्वभूमी बहाल करतात. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला हा भाग विकसित झाला. पूर्वी चेरिंग क्रॉस म्हणत. आजही जवळचे ट्यूब स्टेशन म्हणजे चेरिंग क्रॉसच . मधोमध , उंच खांबावर ऍडमिरल नेल्सनचा पुतळा, त्याने ट्रॅफल्गार च्या युध्दात मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून दिमाखात उभा आहे. त्याच्या बाजूला चार सिंह, शौर्याचे प्रतीक आहेत. बाराशे साल पासून हा भाग अति महत्वाचा भाग म्हणून ओळखला जातो. संपूर्ण भागाचा विकास राजांनी विचारपूर्वक केला आहे. जवळून बघा लांबून बघा सुंदरच दिसतो सगळा भाग. एकीकडे कॅनडा हाऊस , समोरच युगांडा हाऊस , मागे नॅशनल गॅलरी. सगळ्या इमारतींच्या मागे, डावीकडे तो लंडन आय, अर्थात अर्धाच दिसणार आपल्याला, इमारतींच्या डोक्यावर आलेला अर्धगोल. रात्री दिव्यांच्या रोषणाईत सगळा भाग उजळून निघतो.

थेम्सच्या दिशेने चालत निघाल्यावर मध्ये व्हाईट हॉल गार्डन लागते. तिथे आधी व्हाईट हॉल चा राजवाडा होता आणि १५३० ते १६९८ पर्यंत तिथे राजे राहत होते. आगीत जळल्यामुळे ह्या राजवाड्याचे मोठे नुकसान झाले. आज जरी राजवाडा नसला तरी त्या जागेचे नाव तेच आहे. खूप विस्तीर्ण प्रदेशावर हा सगळा भाग पसरलेला आहे. सरकारी महत्वाच्या कचेऱ्या ह्याच राजवाड्यामुळे तिथे आहेत. पांढऱ्या दगडात घडवलेले बांधकाम म्हणून व्हाईट हॉल. १२४० मध्ये तिथल्या धर्मगुरूंनी ती जागा विकत घेऊन तिथे भव्य बांधकाम केले. आणि बरेच वर्ष ती जागा चर्च च्या ताब्यात होती. १५३० मध्ये आठव्या हेनरिराजाने ती ताब्यात घेतली. आणि त्यात बरेच बदल आणि वाढ केली. बऱ्याच कचेऱ्या आणल्या. वेगवेगळ्या खेळांच्या सुविधा त्याने तिथे निर्माण केल्या. स्वतः राह्यला आला. दोन लग्ने केली आणि त्याचा शेवट हि तिथेच झाला. १६११ मध्ये शेक्सपियर च्या the tempest चा पहिला प्रयोग इथेच झाला. राजघराण्यातील काही लग्न आणि अनेक कडू गोड आठवणींचा हा वाडा साक्षीदार झाला. अनेक वेळा वाढ आणि बदल केल्यामुळे, १५०० पेक्षा जास्ती खोल्या बांधल्या गेल्या होत्या, पण त्यात काही सुसूत्रता नव्हती. ज्या सरदार दरकदारांना तिथे जागा दिली होती, ते आपल्याच मर्जीने वाटेल तसे बांधकाम करून घेत. त्यामुळे एकसंध , राजवाडा न राहता ते एक विखुरलेलं खेडं असावं असे वाटू लागले. १६९१ मध्ये एका नोकराच्या चुकीने राजवाड्याला आग लागली आणि अथक प्रयत्न करून सुद्धा, अनेक तास धुमसत असणाऱ्या त्या आगीने सर्व नष्ट केलं. केवळ भिंती उरल्या. नंतर त्यात काही भाग बांधण्यात आला. आठव्या हेनरी ने बांधलेला काही भाग उरला आहे. त्याने बाजूच्या जमिनी पण विकत घेतल्या आणि त्यात गार्डन्स बनवले. एका भागाला सेंट जेम्स पार्क नाव दिले. त्यात प्राणी संग्रहालय केले. अनेक सुंदर आणि दुर्मिळ प्राणी तिथे ठेवले. बाकीच्या भागात खेळांची मैदाने केली. आज तिथे एका भागात

ब्रिटनच्या रक्षा मंत्रालयाचे मुख्यालय आहे. तर घोड्यांच्या परेड साठी काही भाग वापरला जातो. एका बाजूचा राजवाडा पुनर्बांधणी नंतर हॉटेल साठी वापरण्यात येतो.

थोडं पलीकडे चालत गेलं कि थेम्स. चालत पलीकडे जायला हंगरफोर्ड ब्रिज म्हणजेच गोल्डन ज्युबिली ब्रिज वापरा. हा हंगरफोर्ड ब्रिज सर इसामबाड किंगडम ब्रुनेल ह्या प्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञानी प्रथम बांधलेला होता १८४५ साली . सस्पेन्शन पद्धत वापरून, म्हणजे मोठ्या केबल्स आणि मधले खांब त्या पुलाला उचलून धरतात. तेव्हा ही पद्धत नवीन होती. १८५९ ला नव्यानेच उघडलेल्या चेरींग क्रॉस स्टेशनसाठी साऊथ ईस्टर्न रेल्वे ने तो विकत घेतला. मग त्याचे डिझाईन जरा बदलले. सर जॉन हाँकशॉ ह्या प्रसिद्ध वास्तुरचनाकाराने तो डिझाईन केला. पण आधीचा सर ब्रुनेल ह्यांचा पूल पण उत्तम स्थितीत होता. मग ते सामान वापरून ब्रिस्टल जवळ क्लीफ्टन चा पूल बांधण्यात आला. सर ब्रुनेल यांनी बांधलेल्या पुलाचा दगडी पाया आजही कार्यरत आहे. आधी चालण्यासाठी हा पूल बांधला होता, त्यात बदल करून तो रेल्वेसाठी केला गेला. मग चालणाऱ्यांसाठी दोन मार्गिका वाढवण्यात आल्या. रेल्वेची जसजशी वाढ होत गेली ह्या पुलाच्या रचनेत बदल करत गेले. पण १९९० पर्यंत तो धोकादायक अवस्थेत पोचला. पुन्हा नव्या पुलासाठी स्पर्धा घेण्यात आली.

आर्किटेक्ट लीफशुल्झ डेव्हिड्सन सँडीलँड्स आणि अभियंते कम्पनी WSP ग्रुप ह्यांनी ती जिंकली. पण बांधकामाला सुरुवात झाली आणि रेल्वेला काही धोके लक्षात आले. मग ते डिझाईन जरा बदलून आजचे देखणे डिझाईन आले. आणि २००२ साली बांधून पूर्ण झाले. राणी एलिझाबेथ द्वितीय म्हणजे हल्लीच्या राणींच्या कारकिर्दीला ५० वर्षे झाल्याबद्दल ह्या पुलाला गोल्डन ज्युबिली ब्रिज असे नाव देण्यात आले. पण प्रचलित नाव आजही हंगरफोर्ड ब्रिजच आहे.

तर आपण हंगरफोर्ड किंवा गोल्डन ज्युबिली ब्रिज पार करून आलो कि पलीकडे ज्युबिली गार्डन आहे. १९५१ मध्ये सर्वप्रथम हि जागा लोकांच्या आणि लोकल कौन्सिल च्या लक्षात आली. आधी नुसतीच उघडी पडलेली, नंतर कार पार्क म्हणून वापरात आलेली ही जागा ऐन मोक्याच्या ठिकाणी होती. नुसत्या गाड्या उभ्या ठेऊन तो भाग काही आकर्षक दिसेना.

रेल्वेनी नवीन बांधलेली ज्युबिली लाईन आणि तो ज्युबिली ब्रिज, ह्याच्या बांधकामात आधीच्या बगिच्याचे मोठे नुकसान झाले होते.

त्या भागात भेट देणाऱ्या पर्यटकांची सतत वाढती संख्या बघता लंडनच्या मेयरनी तिथे छान बगीचा करण्यासाठी आदेश दिले. त्यानुसार ट्रस्ट बनवण्यात आला. आणि लोकसहभागासाठी आवाहन करण्यात आले. अनेक संस्था, कंपन्या , सेवाभावी संस्था पुढे आल्या. त्यातून सुंदरसे आखीव रेखीव गार्डन तयार झाले, तब्बल २५ वर्षांनंतर! राणींच्या कारकिर्दीला पंचवीस वर्षे झाली तेव्हा हा बगीचा उघडण्यात आला. म्हणून ते ज्युबिली गार्डन. ब्रिटन चे सगळे जीवन राणीं भोवती फिरते हे पदोपदी जाणवते.

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments