पत्र क्र ९५

थेम्स नदी लंडन चा एक अविभाज्य भाग आहे. पण जसजशी लोकसंख्या वाढत गेली, तीराच्या पलीकडे जाणे क्रमप्राप्त झाले. एकच पूल बांधून भागणार नव्हते. मग अनेक ठिकाणी पूल बांधले गेले. लंडनचा अजून एक प्रसिद्ध पूल...

कीर्ती वडाळकर
||5 min read

थेम्स नदी लंडन चा एक अविभाज्य भाग आहे. पण जसजशी लोकसंख्या वाढत गेली, तीराच्या पलीकडे जाणे क्रमप्राप्त झाले. एकच पूल बांधून भागणार नव्हते. मग अनेक ठिकाणी पूल बांधले गेले.

लंडनचा अजून एक प्रसिद्ध पूल म्हणजे टॉवर ब्रिज. लंडन म्हटलं कि ह्या पुलाची प्रतिकृती येते समोर नेहेमी. बरेचदा, कवितेतला "लंडन ब्रिज" हाच असावा अशी गल्लतही केली जाते.

नदीच्या पात्रात उभ्या दोन चौकोनी इमारती, वर आणि खाली पुलांच्या फळ्यांनी जोडलेल्या. आणि बाजूने काठाशी जोडलेल्या. वरची फळी सलग आहे तर खालची दोन तुकड्यात मधोमध विभागलेली. आणि ह्या सगळ्यातून जाणाऱ्या जाड जाड केबल्स, काठाशी रोवलेल्या. लांबून बघा, जवळून बघा, इतका छान आहे न तो पूल. भव्य! तरी अंगावर न येणारा . मला तर फार आवडला, आम्ही कितीवेळा पार केला तो. ह्या बाजूला टॉवर ऑफ लंडन जवळ आहे तर दुसऱ्या बाजूला अनेक प्रसिद्ध इमारती. पार्लमेंट हाऊस , लंडन च्या मेयर ची ती प्रसिद्ध काचेची कचेरी , इतका सुंदर परिसर आहे न फिरायला. आजूबाजूला भव्य टॉवर ब्रिज चे अस्तित्व आणि भुरभुरणाऱ्या पावसातून आपण फिरतोय. छान कॉफीचा कप घ्या आणि मजेत फिरा , ते फिरणे एकदम मस्तच .

ह्या पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे खालचा जो सगळ्यांसाठीचा पूल आहे त्यात वाहने , पादचारी आणि सायकलस्वार ह्यांना वेगवेगळ्या मार्गिका आहेत. दोन्ही बाजूच्या चौकोनी इमारतींमधून पुलासंबंधी प्रदर्शन आहे. इमारतींच्या खालच्या भागात, पुलाच्या फळ्या उघडबंद करणारी भव्य चाके आहेत. खालचा पूल एकदम स्पेशल आहे. जेव्हा बांधकाम चालू होते तेव्हा थेम्स नदीतून जाणारी जहाजे लक्षात घेऊन हा खालचा पूल दोन भागात विभागला आहे. जेव्हा जहाज नदीतून जाणार असते तेव्हा ह्या पुलाचे, मधोमध विभागलेले दोन भाग , ८६ डिग्री च्या कोनात , काहीच मिनिटात वर उचलले जातात. जहाजासाठी योग्य उंची तयार होते. जहाज विनासायास पार जाऊ शकते. ते पार गेल्यावर पूल पुन्हा जोडला जातो आणि वाहने , माणसे सायकलस्वार पलीकडे जाऊ शकतात. आजही हे पुलाचे उघडबंद होणे चालू आहे. १९५२ साली, असा प्रसंग झाला कि एक बस त्यावरून जात होती. मधोमध , जिथे पुलाचे दोन भाग एकमेकात जोडले जातात तिथे ती बस पोचतच होती आणि अचानक पूल उघडला जाऊ लागला. चालकाच्या लक्षात हि गडबड आली, त्याने त्या वाढत चाललेल्या फटीवरून बस अक्षरश: उडवली आणि दुसऱ्या बाजूला पळवली. प्रवासी सुखरूप राहिले. नंतर त्या चालकाचा सत्कार करण्यात आला . पण पुन्हा अशी गडबड होऊ नये म्हणून मग आधीच पूल उघण्याच्या वेळा जाहीर केल्या जातात. आजही वर्षाकाठी निदान नऊशे वेळा तरी हा पूल जहाजांसाठी उघडला जातो. प्राधान्य नेहेमी जल वाहतुकीला कारण नदी हा सर्वप्रथम त्यांचा रस्ता आहे, पूल आपण आपल्यासाठी बांधला आहे.

बाजूच्या एका इमारतीमधून वर जाऊन, पुलाची सगळी माहिती घेता येते. वरची बाजू जोडणारा पूल आधी फक्त पादचाऱ्यांसाठी होता. जिन्याने वर चढून जायचे, वरच्या पुलावरून पलीकडे पोचले कि उतरून जायचे. एवढे वर चढून पलीकडे जाण्याला लोक कंटाळत. आणि ह्या भागाचा गैरवापर सुरु झाला. समाजविघातक घटकांनी त्याचा ताबा घेतला. मग मात्र तो भाग लोकांसाठी बंद करून तिथे प्रदर्शन मांडण्यात आले. वरच्या पुलाचा तळ पारदर्शक केला आहे , त्यावरून चालत जाताना खालचे सगळे इतके मनोहारी दिसते. खालच्या फळीवरून जाणाऱ्या असंख्य गाड्या, त्याही खाली उसळणारी आणि प्रवाही थेम्स. मज्जा येते.

१८९४ साली बांधून पूर्ण झालेला हा पूल आजही उत्तम स्थितीत आहे.

तो लंडन ब्रिज सारखा त्रास देऊ लागला, आणि जास्त वाहतूक करायची तर मोठा आणि मजबूत पूल हवा अशी गरज निर्माण झाली. १८७६ साली लंडन कॉर्पोरेशन नी चांगला पूल बांधण्यासाठी एक स्पर्धा घेतली. वास्तुरचनाकारांनी त्यांची कल्पना स्पर्धेत उतरवायची होती. ५० स्पर्धक आले. त्यातले काही आराखडे आजही तिथल्या प्रदर्शनात मांडलेले आहेत. सगळ्या आराखड्यांचा अभ्यास करून, १८८४ साली होरेस जोन्स आणि जॉन वुल्फ बॅरी यांचा आराखडा मंजूर करण्यात आला. १८८६ च्या एप्रिल महिन्यात बांधकाम सुरु झाले आणि ३० जून १८९४ ला पूल पूर्णपणे कार्यरत झाला.

सुरवातीला गडद चॉकलेटी रंगात रंगलेला हा पूल, १९७७ साली, एलिझाबेथ राणींच्या राजवटीच्या रौप्य महोत्सवानिमित्त पांढरा , लाल आणि निळ्या रंगात आकर्षक पणे रंगवण्यात आला . त्यानंतर २०१२ साली, राणींच्या हीरक महोत्सवी वर्षात ह्या पुलाला विशेष महत्व देण्यात आले. मिरवणूक ह्या पुलावरून नेण्यात आली.

जवळ जवळ अडीचशे मीटर लांबीचा हा पूल आहे. दोन बाजूला असलेले दोन टॉवर म्हणजे ह्या पुलाला आधार देणारे खांब आहेत. जाडजूड केबल्स नी सगळा ढाचा धरला आहे. ११००० टन लोखंड वापरून बनलेला हा पूल लंडन च्या स्काय लाईन चा अविभाज्य भाग आहे.

अनेक कडू गोड आठवणी ह्या पुलाच्या गाठीशी आहेत. १९१२ साली सर्वप्रथम, फ्रान्सिस मॅकलिन, स्टंट करायला म्हणून दोन पुलांच्या मधून आपले छोटे विमान घेऊन गेला आणि रातोरात प्रसिद्ध झाला. ह्या यशानंतर त्याने अजूनही काही पुलांच्या खालून विमान उडवले. १९१२ मध्ये एक लहान मुलगा खाली वाकून बघत असता पाण्यात पडला. त्याला वाचवायला एका माणसाने नदीत उडी घेतली पण मोठे मालवाहू जहाज तेवढ्यात तिथून जात होते आणि दोघेही त्याखाली बुडाले .

१९५४ साली, कॉमनवेल्थ देशांची मोठी सफर करून राणी आणि त्यांचे कुटुंबीय परत आले, तेव्हा "रॉयल यॉच ब्रिटानिया" ह्याच पुलाखालून लंडन ला आले. हजारो लोक काठावर जमून राणींना अभिवादन करत होते. पुलाला खूप सजावट करण्यात आली होती.

१९६८ साली, रॉयल एअर फोर्स च्या सुवर्ण महोत्सवात विमानांचे संचलन होणार नव्हते म्हणून चिडलेल्या एका वैमानिकाने त्याचे विमान अतिशय कमी उंची वरून उडवत पार्लमेंट कडून , ताशी ३०० मैलाच्या वेगाने आणून, दोन पुलांच्या मधून सुसाट घेऊन गेला. अर्थातच त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाही होऊन त्याला काढून टाकण्यात आले. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष बिल क्लिंटन ब्रिटनच्या दौऱ्यावर असताना, थेम्सच्या काठी भोजन समारंभ उरकून पार्लमेंट कडे जाताना, ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा आले. एका जहाजासाठी पुलाच्या फळ्या उघडणार होत्या. त्यांच्या ताफ्यातील काही मोटरसायकली पुढे गेल्या आणि पुलाच्या फळ्या उघडण्याची वेळ झाली. सगळा ताफा थांबून राहिला.२०१२ च्या ऑलिम्पिक खेळांचा टॉर्च, वेगवान बोटीतून, स्टेडियम मध्ये जाण्यापूर्वी, ह्याच पुलाखालून नेण्यात आला. पुलाला नेत्रदीपक सजावट करण्यात आली होती तेव्हा. एकदा पूर्वपरवानगी न घेता एक जहाज आले, पण त्याच्या साठी पूल उघडणे शक्य नव्हते. परत फिरायच्या गडबडीत त्या जहाजाने एका इमारतीला ठोस दिली. पण फारशी हानी झालेली नव्हती.

लंडनच्या जीवनात अनेक रंग भरणारा हा पूल उत्तम स्थितीत असण्याचे कारण म्हणजे त्याचे सतत जतन करणारी ब्रिज हाऊस इस्टेटस ही कम्पनी. इतका मोठा पूल इतक्या निगुतीने सांभाळतात, रंगरंगोटी अगदी छान दिसावी म्हणून एका टोकापासून रंगवायला आणि साफ करायला सुरु करतात, दुसऱ्या टोकाला पोहचे पर्यंत वर्ष संपतं , पुन्हा मागे येऊन ह्या टोकापासून सुरुवात!

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments