पत्र क्र ९४
"लंडन ब्रिज इज फाँलिंग डाऊन, ......... माय फेअर लेडी, " ही कविता जरी नर्सरीत शिकवत असले तरी हल्लीचा तो लंडन ब्रिज काही असा सहजी पडणाऱ्यातला नाही बरं . ब्रिटन ला गेलं आणि तिथल्या काही प्रतिष्ठित...
"लंडन ब्रिज इज फाँलिंग डाऊन, ......... माय फेअर लेडी, " ही कविता जरी नर्सरीत शिकवत असले तरी हल्लीचा तो लंडन ब्रिज काही असा सहजी पडणाऱ्यातला नाही बरं . ब्रिटन ला गेलं आणि तिथल्या काही प्रतिष्ठित इमारती बघितल्या नाहीत असं कसं होईल न? त्यासाठीच्या सेमिनारला तर गेलो होतो.
अनेक चांगल्या आणि जुन्या इमारती ब्रिटन मध्ये उत्तमरीत्या जतन केलेल्या आहेत. अनेक पूल त्या थेम्स नदीवर बांधलेले आहेत. एका पुलावर उभे राहून नदीच्या पात्राच्या अलीकडे आणि पलीकडे बघितल्यास अनेक प्रकारे बांधलेले, थोड्या थोड्या अंतरावरचे पूल नजरेत भरतात.
लंडन ब्रिज इज फॉलिंग डाऊन, असे का बरं म्हणत असावेत? कारण सगळ्या इमारती इतक्या उत्तम जतन केलेल्या आहेत तर तसा तो पूल का नाही जतन करत ? उगाच पाडतात बिचाऱ्याला .
तर त्या लंडन ब्रिज ची कथा जरा मजेदार आहे ह. फार पूर्वी, रोमन काळात , लाकडी ओंडके वापरून थेम्स वर एक पूल बांधला होता. लंडन शहरात राहणाऱ्या लोकांना जागा कमी पडू लागली आणि पलीकडच्या तीरावर बोटीने सततचे जाणे येणे कठीण होऊन बसले म्हणून तो बांधला होता. पण त्यावरून शेळ्या मेंढ्या, घोडे, माणसे, क्वचित प्रसंगी घोडागाडी इतकेच जाऊ शके. वाढत्या लोकसंख्येच्या वाढीव मागण्यांमुळे तो पूल जरा मोठा आणि मजबूत करण्याची गरज वाटू लागली.
मग रोमन काळात बांधलेला तो लाकडी पूल काढून त्या जागी , ११७६ साली तिथल्या धर्मगुरू ने नवा पूल बांधायला घेतला. त्याचे दोन मित्र सोबत होते. १२०५ साली ह्या धर्मगुरूंचे निधन झाले. १२०९ मध्ये तो पूल बांधून झाला. सुरुवातीच्या आखणीच्या काळात, परवानगी घेताना, बांधकामात आणि वापरात असताना, प्रत्येक टप्प्यावर अनेक अडचणींना त्या पुलाला सामोरं जावं लागलं. अडचणी आणि हा पूल म्हणजे हम साथ साथ है, असेच चक्र सुरु झाले.
दगडी कमानीचा तो ब्रिटन मधला पहिला पूल होता. दगडी पाया वर बांधलेला , दगडी कमानीत घडवलेला हा पूल ह्या काठावरून त्या काठावर तर पोचला पण बांधून झाल्यावर लक्षात आले कि त्याचे पिलर्स खूप जास्ती रुंद झालेत. आणि त्यामुळे, पाण्याचा खूप मोठा प्रवाह अडतोय . नदीला जणू अर्धवट बांधच घातला गेला. वेगाने वाहणारी थेम्स त्या कमानींमधून खूप वेगाने उसळी घेऊ लागली. बघायला हे दृश्य रमणीय वाटे आणि अनेक लोक ते बघायला गर्दी करत, पण ह्या अडलेल्या पाण्यामुळे आजूबाजूला पूर येणे क्रमप्राप्त होते. थंडीत बर्फ जमू लागले, किंवा वेगाने वाहणारी थेम्स अनेक बर्फाच्या शिळा ह्या पुलापर्यंत आणून सोडू लागली. आणि त्याचा ढाचा कमकुवत पडू लागला. मधेच पिलरच्या पायाखालची माती वाहून गेल्याने पूल धोकादायक अवस्थेत पोचला. मग त्यात खडी भरावी लागली आणि तात्पुरती डागडुजी झाली. असे वारंवार घडू लागले. सतत कराव्या लागणाऱ्या दुरुस्तींमुळे त्रास तर वाढलाच पण हा पूल टिकवण्यासाठी अनेक उपाय पुढे येऊ लागले. त्यात एखाद्या व्यक्तीला त्यात जिवंत गाडावे असेही काहीनि सुचवले, नरबळी दिला की ती वास्तू पावेल असा समज होता. २००७ साली जेव्हा तो पूल पाडायला घेतला तेव्हा त्यात काही नरदेहाचे सांगाडे सापडले.
त्या कवितेच्या तालावर खेळहि खेळतात लहान मुले. दोघेजण हातांची कमान करून उभे राहतात आणि सगळे त्या खालून जातात, जमतील तसे कडवे त्यात वाढवले जातात. त्याच त्याच ओळी परत परत म्हटल्या जातात. कविता संपल्यावर मात्र जो हातांच्या कमानीत येईल तो पकडला जाईल आणि त्याचा "बळी" जाईल. वदंता अनेक असल्या तरी
ती कविता मात्र पुढे आली. जसा पूल बांधून तयार झाला तसा लगेच आजूबाजूच्या जागेवर व्यापारी वापर वाढला. पुलाच्या दोन्ही टोकाकडे अनेक दुकाने झाली, घरे बांधली गेली. व्यापारी आणि रहिवाशांची प्रचंड ये जा सुरु झाली. पण हा पूल अगदी सुरवातीपासून अनेक संकटांचे कारणच बनला जणू. बांधून झाल्यावर, तिनच वर्षात ह्या सगळ्या इमारतींना आगीने वेढलं . लाकडी इमारती असल्यामुळे आग वेगाने पसरली आणि सगळं बेचिराख झाले. ३००० माणसे मेली. पण ह्या भागातून मिळणारा पैसा लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनी सगळे पुन्हा बांधून घेतले. १२८२ मध्ये वाहत आलेल्या बर्फाच्या शिळांमुळे पुलाच्या पाच कमानी ढासळू लागल्या. त्याही पुन्हा बांधून घेतल्या.
नागरी वस्ती पुलाच्या फारच जवळ बांधली गेली होती. त्यामुळे पुलाच्या देखभालीमध्ये अनेक अडथळे निर्माण होऊ लागले. पुरामुळे ह्या वस्तीचे खूप नुकसान होऊ लागले. मग लोकल कौन्सिल नी सगळी वस्ती हटवण्याचे ठरवले आणि १७६२ च्या सुमारास ती दुसरीकडे हलवली. तो पूल वाचवण्यासाठी जमतील ते सर्व उपाय करून बघितले गेले.
अनेक संकटांना तोंड देत , चांगली ६२२ वर्षे तो पूल अस्तित्वात होता आणि सेवा देत होता .
१८१० च्या सुमारास सिटी कौन्सिल ने त्याचा नाद सोडून नवाच पूल बांधायचं ठरवलं. जॉन रेनी नावाच्या अभियंत्याला हे काम सोपवलं. आराखडे तयार झाले पण १८२० मध्ये बांधकाम सुरु होण्याआधी जॉन रेनी ह्यांचे निधन झाले. त्यांच्या मुलांनी मग बांधकाम पूर्ण केले आणि १८२४ मध्ये नवीन पुलाचे उदघाटन राजाच्या हस्ते झाले. हा पूल दीडशे वर्ष राहिला. साधारण १९६८ नंतर ह्या पुलाची, नावं कोरलेली पितळी पाटी , अमेरिकेत नेण्यात आली. आणि हुव्हर धरणापासून दीडशे मैलांवर, कोलोरॅडो नदीवरच्या एका पुलावर बसवण्यात आली. आजही, अमेरिकेतील त्या पुलाचे नाव "न्यू लंडन ब्रिज" असे आहे. हल्लीचा लंडन मधला, जो लंडन ब्रिज आहे तो १९६८ ते १९७२ ह्या कालावधीत, अत्याधुनिक पद्धतीने बांधण्यात आलेला आहे. आणि अगदी सरळ, साधा आहे. मात्र उत्तमरीत्या जतन केल्यामुळे ती कविता काही त्याला लागू नाही होत हं .
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.