पत्र क्र ९३
अनेक प्रथांमध्ये आनंदी आयुष्य घालवणारे स्कॉटलँडचे रहिवासी. अगदी नवीन वर्षाच्या हॉगमनी पासून सुरु होऊन वर्षभर काहीतरी सण , उत्सव ह्यात मन रमवणारे . अनेक खेळ, कला, संस्कृती , संगीत, नाटक, वगैरेंचे...
अनेक प्रथांमध्ये आनंदी आयुष्य घालवणारे स्कॉटलँडचे रहिवासी. अगदी नवीन वर्षाच्या हॉगमनी पासून सुरु होऊन वर्षभर काहीतरी सण , उत्सव ह्यात मन रमवणारे . अनेक खेळ, कला, संस्कृती , संगीत, नाटक, वगैरेंचे प्रदर्शन म्हणजे वर्षाचे सण मानणारे स्कॉटिश लोक. निसर्ग सुंदर आहे म्हणताना जीवनमान हि तेवढेच सुंदर राखण्याचा प्रयत्न करत असतात.
ऑक्टोबरच्या शेवटी येणारा हॅलोविन फेस्टिवल पण जरा वेगळ्या पद्धतीनेच साजरा करतात. मला ह्या प्रकाराबद्दल जरा जास्तीच कुतूहल होतं , दर वर्षी त्याचे फोटो बघून हे लोक नक्की काय करतात, ते बघायचे होते. नेहेमी भाऊ मला सांगायचा ,"अगं हॅलोविन म्हणजे सर्वपित्री अमावस्याच असते ह्या लोकांची, फक्त साजरी करायची पध्दत वेगळी." पुढच्या भयंकर हिवाळ्याची ही तयारी आहे असंही काही मानतात. हिवाळा म्हणजे दिवस लहान होत जाणार, अंधाराचे साम्राज्य वाढत जाणार मग त्या काळ्या रंगाशी सामना करण्यासाठी मनाची तयारी म्हणजे हा सण .
आपल्या आजूबाजूचे सगळे वाईट नष्ट होऊन चांगलं व्हावं यासाठीही हा सण . कारण काहीही असो, साजरा मात्र जोरात करतात.
असं मानतात कि हॅलोविन च्या दिवशी, मध्यरात्रीपूर्वी सर्व गत आत्मे जागृत होऊन पृथ्वीवर संचार करतात. त्यांना खुश ठेवणे क्रमप्राप्त आहे. मग रात्रीच्या जेवणाच्या वेळी एक खुर्ची रिकामी ठेवतात, त्यापुढे संपूर्ण ताट वाढून ठेवतात. नाहीतर ते तुमचा घास घेणार. मेजवानी वाढल्यावर, कुटुंबातील मृत व्यक्तींच्या आत्म्याला प्रार्थना करून जेवायला बोलवायचे, आम्हाला सुखी ठेव असे सांगायचे. त्या रिकाम्या खुर्चीत पूर्वज येऊन बसणार अशी मान्यता आहे.
पृथ्वीवर आलेले हे आत्मे रस्त्यावरून
फिरणार, त्यांनी आपल्याला ओळखू नये म्हणून लोक भूत, चेटकीण बनून रस्त्यावर ओरडत फिरतात. स्कॉटलंड ची मुळ प्रथा म्हणजे भुताखेताचे वेष घेतलेले हे लोक शेजारी पाजारी जाऊन काही गाणी म्हणत, गोष्टी किंवा विनोद सांगत, नाच किंवा गटाने एखादे नाटक करत. त्यावेळी ज्वलंत असलेला एखादा विषय ते निवडत. वेशभूषा घरीच तयार करायची. ह्या सगळ्या साठी तो गट सराव पण करत असे. सरावादरम्यान अनेकजण एकमेकांचे मित्र बनत, समाजात सलोखा निर्माण होण्यासाठी ह्याची खूप मदत होई. साधारण संध्याकाळी, वेशभूषा केलेले हे ,"गायझर्स" रस्त्यावरून निघत. शेजारच्या घराची कडी वाजवून , त्यांनी दार उघडल्यावर त्यांची करमणूक करत. ज्यांच्या घरी हे सगळं केलं ते आलेल्या प्रत्येकाला काहीतरी छोटीशी भेट वस्तू , खाऊ, चॉकलेट वगैरे देत. पूर्वी सगळे जण ते चित्र विचित्र कपडे करत नसत तर फक्त लहान मुलांना ते काळ्या रंगाने रंगवून देत कारण त्यांच्यावर वाईट आत्म्याची नजर पडू नये. हल्ली सगळेच तसे कपडे वगैरे करतात. सगळ्या वस्तू मॉल मधून विकत मिळतात, घरी काही करावे लागत नाही. आणि ते गायझर्स पण आता लुप्त पावत चाललेत. हल्ली ,अमेरिकेत करतात तसे फक्त, "ट्रिक ऑर ट्रीट?" विचारतात आणि भेटवस्तू घेऊन जातात.
अमेरिकन लोक, दाराशी भोपळा कोरून , त्यात मेणबत्ती लावून ठेवतात . ते बघून आजकाल जरी ब्रिटन मध्ये सगळीकडे
भोपळेच कोरून ठेवत असले तरी स्कॉटलंड मध्ये मात्र नवलकोल कोरून ठेवतात. त्यावर अनेक भीतीदायक चेहरे कोरतात. अशी वदंता आहे कि ते चेहरे बघून सर्व दुष्ट शक्ती घाबरून निघून जातील. ह्या कोरलेल्या नवलकोलमध्ये दिवा लावून तो टांगतात, किंवा त्याच्या माळा करतात आणि दिवे लावून टांगतात. हे नवलकोल आकाराने लहान असल्याने कोरायला खूप कठीण जातात. मग हल्ली कोरायला सोपे भोपळे बऱ्याच ठिकाणी दिसतात.
अनेक ठिकाणी हॅलोवीनच्या निमित्ताने जलसे करतात. सगळं गाव जमतं . मग त्यात काही वेगवेगळे खेळ , प्रथा म्हणून घेतात. "dooking for apple" मध्ये पाण्याच्या टबात सफरचंद टाकतात, ते तोंडाने उचलायचे किंवा तोंडात जेवणाचा काटा घेऊन काढायचे. हात अजिबात लावायचा नाही. हात मागे बांधूनच टाकतात. तुम्ही ते सफरचंद काढेपर्यंत कोणीतरी मागून डोक्यावर टपली मारणार आणि तुमचे तोंड पाण्यात बुडणार. हि प्रथा फार प्राचीन काळापासून चालत आली आहे. अगदी रोमनांनी आक्रमण केले होते तेव्हापासून. मध्ययुगात त्याचे स्वरूप बदलले. गावातील विवाहेच्छुक तरुण काही खूण करून ते सफरचंद पाण्यात टाकत. गावातील तरुण मुलींनी ते फळ शोधायचे. पहिल्या प्रयत्नात असे फळ सापडले कि तिचा विवाह त्या तरुणांबरोबर सफल होणार. दुसऱ्या प्रयत्नात मिळाले तर नुसतेच प्रेम होणार विवाह नाही होऊ शकणार, आणि तीन प्रयत्नात मिळाले तर काहीच शक्य नाही.
अजून एक प्रथा, ज्यांचं लग्न ठरलं आहे त्या स्त्री पुरुषांनी, थंडीसाठी पेटवलेल्या अग्नीत एकेक हेजलनट टाकायचा. जर तो शांतपणे जळला तर त्यांचे वैवाहिक आयुष्य मजेत जाईल असे मानायचे.
केल नावाची वनस्पती तिथे खूप प्रमाणात होते. भाजी, सॅलड मध्ये तिचा उपयोग करतात. ह्या हॅलोविन च्या दिवशी, विवाहेच्छुक मुली , डोळे मिटून ते केल चे झाड उपटायच्या. जितके लांब झाड उपटले तितका उंच नवरा तिला मिळणार. आणि जितकी जास्त माती त्या झाडांच्या मुळांना चिकटून आली तेवढा तो श्रीमंत असेल. हे सगळे वर्णन रॉबर्ट बर्न च्या हॅलोविन कवितेत पण आहे.
छोटे छोटे, साखरेच्या चिकट पाकात बुडवलेले , पाक गळणारे, स्कोन्स दोरीला टांगतात. लोकांच्या डोळ्याला पट्टी बांधून त्यांनी ते स्कोन्स शोधायचे आणि हात न लावता खायचे, असला चिकट राडा होतो म्हणतात.
काही ठिकाणी ह्या निमित्ताने साहित्याचा उत्सव पण भरवतात. चांगले चार पाच दिवस सगळं गाव विविध विषयांवरचे लेख, नाटक, कविता वाचन करत असते.
बेन नेव्ही, स्कॉटलंड मधले सगळ्यात उंच शिखर. तिथे पोचलो, वर जाण्यासाठी केबल कार आहे. "वरती बर्फाचे वादळ चालू आहे त्यामुळे जाता येणार नाही " असा बोर्ड होता. जरा फिरून परत आलो आणि तिकीट काढायला खिडकीत डोके घातले मात्र "तिला" बघून मी जोरात किंचाळले. घाबरतच मागे आले. एखादी चित्रातली चेटकीण बसली होती तिथे. एक गोरी मुलगी, डोळ्या भोवती मोठ्या त्रिकोणात लावलेली काळी शॅडो, ओठांना अर्धं लाल अर्धं काळं लिपस्टिक, चेहऱ्यावर, मांजराच्या मिशीसारख्या काळ्या रेघा , नाकाचा शेंडा काळा , केस विचित्र पिंजारलेले, काळा च ड्रेस आणि लांबच लांब नखांना काळे नेलपेंट! कसला तो अवतार! मला बघून विचित्रस हसली ती. हॅलोविन दोन दिवसावर आले होते न.
--
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.