पत्र क्र ९२

स्कॉटलंड चे ते हायलँड गेम्स तर खूपच प्रसिद्ध आहेत. आपण त्यातले काही बघितले पण अजूनही त्यात काही मजेदार गेम्स आहेत. मात्र सगळे खेळ वजन उचलून भिरकावणे, उंच किंवा लांब ह्यावरच आहेत. खेळ सुरु झाले तेव्हा...

कीर्ती वडाळकर
||4 min read

स्कॉटलंड चे ते हायलँड गेम्स तर खूपच प्रसिद्ध आहेत. आपण त्यातले काही बघितले पण अजूनही त्यात काही मजेदार गेम्स आहेत. मात्र सगळे खेळ वजन उचलून भिरकावणे, उंच किंवा लांब ह्यावरच आहेत. खेळ सुरु झाले तेव्हा ते शेतात, शेतीतील सामानातून खेळायचे असे होते. आणि त्यातूनच शेतीसाठी मजूर, टोळीसाठी शिपाई वगैरे शोधत असत. आपले बळ दाखवण्यासाठी होतकरू तरुण मग खूप मेहेनतीने ह्या खेळात भाग घेत. हल्ली मात्र मनोरंजन हाच मुख्य उद्देश आहे ह्या खेळांचा.

sheaf toss हा असाच एक खेळ. एका पोत्यात किंवा बारदानात, गहू, बारीक लाकडी तुकडे, चारा असं काही भरतात. दोन दातांच्या एका मोठ्या फोर्कने ती बॅग उचलायची आणि उंच बांधलेल्या एका बार वरून पलीकडे फेकायची. पूर्वी तर हि बॅग म्हणजे शेतावरच्या सुकलेल्या गवताच्या गासड्याच असायच्या हल्ली जरा त्याच रूप बदललं . तो फोर्क दोन किंवा तीन दातांचा असतो. त्याला जास्ती हलवायचे नाही, फक्त ती बॅग उचलून वर फेकायला काय हलेल तेवढेच. तीन प्रयत्नात तुमची बॅग नीट पणे पलीकडे पोचली पाहिजे. नवशे, व्यावसायिक खेळाडू, स्त्रिया, पुरुष, अशा चार वर्गात हा खेळ असतो आणि प्रत्येक गटाला वेगवेगळ्या वजनाची बॅग फेकायची असते. त्या काळी उंच उंच कोठारांमधून गवत साठवून ठेवत. ते रचण्यासाठी हे मजूर कामी येत असावेत. ते लाकडाचे ओंडके सरळ रेषेत फेकण्याचा खेळ पण , छोट्या छोट्या ओहोळांवर पूल बांधण्यासाठी ओंडके टाकत, ते सरळ पडायला लागत. ह्या खेळातून ,ज्याचे कसब उत्तम, त्याची निवड करून ओहोळांवरून पूल बांधायला घेऊन जात.

स्कॉटलंड म्हणजे संगीत आणि नृत्य. त्यांची पण ह्या स्पर्धेत रेलचेल असतेच आणि स्पर्धा पण असतात. एकल स्पर्धक, गटातून स्पर्धक, वगैरे असतात. ते स्कॉटलंड चे कील्ट किंवा टारटन मात्र प्रत्येकाने घातलेच पाहिजेत. स्कॉटलंड चे वाद्य म्हणजे बॅगपाइप आणि ड्रम! ह्या खेळांत दोन्ही चे वाजवणे तर आहेच पण ते वाजवत परेड करणे पण आहे. त्या रंगीबेरंगी परेड बघायला लोक खूप गर्दी करतात. गटागटाने स्पर्धक हि वाद्ये वाजवत जातात. छानसं संगीत प्रेक्षकांना ऐकायला मिळते.

इथला सगळ्यात लोकप्रिय खेळ म्हणजे रस्सीखेच. ह्या खेळासाठी प्रेक्षक आणि स्पर्धक ह्यांची खूप गर्दी असते. एका टीमला जिंकण्यासाठी, तीन वेळा एकाच प्रतिस्पर्धी टीमला, मध्य बिंदूपासून , चांगले बारा फूट आपल्या बाजूला ओढावे लागते. तीनवेळा खेचले कि, खेचणारी टीम जिंकली. जोशपूर्ण संगीताच्या तालावर सगळेच जण नाचत ओरडत ह्यात सहभागी होतात.

कर्कवाल नावाच्या गावी नाताळ किंवा नवीन वर्षाच्या दिवशी, एक विचित्र खेळ खेळतात. संपूर्ण गावाचे विभाजन दोन गटात होते. गावातील चर्चच्या उत्तरेला जन्मलेले "डाऊनीज " आणि दक्षिणेला जन्मलेले "अपीज" असे दोन गट असतात. कोणी उत्तरेला जन्मून घर बदलून दक्षिणेला आला असेल तर त्याच्या मर्जीप्रमाणे तो कोणत्या टीम मध्ये भाग घ्यायचा ते ठरवू शकतो . फुटबॉल सारखाच हा खेळ असतो. लेदर च्या पिशवीत, व्हिस्कीच्या बाटलीची बुचं भरून, ओबडधोबड बॉल बनवतात. सगळं गाव खेळाचे मैदान बनते. चर्च पासून स्पर्धा सुरु होते. आणि अक्षरश: हाणामाऱ्या करत, स्पर्धक तो बॉल घेऊन, पलीकडे गावाच्या शेवटी जातात. अपीज नी तो जास्तीत जास्त वेळा उत्तरे कडच्या डाऊनीज च्या भागात, गावाच्या शेवटी न्यायचा आणि तिथल्या एका ठरलेल्या भिंतीवर आपटवून आणायचा आणि डाऊनीज नी अपीज च्या भागात, गावाच्या शेवटी असलेल्या समुद्रात बुडवून आणायचा. जी टीम जास्ती वेळा हे करेल ती जिंकली. आणि असं करताना , त्या एका बॉल मागे प्रचंड गोंधळ करतात. शेवट तो बॉल म्हणजेच ट्रॉफी बनून विजेत्या गटाला मिळतो.

स्कॉटलंड चा अजून एक आवडता विषय म्हणजे कवी रॉबर्ट बर्न. उण्यापुऱ्या सदतीस वर्षांचे आयुष्य लाभलेला एक अत्यन्त गरीब कवी. खूप हलाखीच्या परिस्थितीत सर्व आयुष्य घालवलेला हा कवी मरणानंतर अक्षरश: अमर झाला. लोक त्याच्या साहित्याचे चाहते झाले. अनेक ठिकाणी त्याची स्मारके , पुतळे उभारले गेले. डम्फ्री गाव तर रॉबर्ट बर्नमय झाले आहे. त्याचे घर म्युझियम झाले, त्याला मरणोत्तर पुरले ती जागा स्मारक झाली. त्याच्या कविता आजही सगळीकडे आवडीने वाचल्या जातात. त्याचा जन्म २५ जानेवारी १७५९ ला झाला तर मृत्यू २१ जुलै १७९६ ला. त्याच्या जन्म दिवशी म्हणजे २५ जानेवारीला दर वर्षी मोठा उत्सव करतात, बर्न्स नाईट . अनेक ठिकाणी रात्रीच्या भोजनाच्या पार्टी ठरवल्या जातात. त्यात पारंपरिक स्कॉटिश पदार्थ वाढले जातात. स्कॉच व्हिस्की तर असायलाच पाहिजे. आणि जोडीला रॉबर्ट बर्न च्या साहित्य कृतींचे वाचन, गायन आणि त्या वर उहापोह. सगळे मिळून त्याचे लोकप्रिय काव्य गातात. रॉबर्ट बर्न ला गरिबी आयुष्भर पुरली. त्याच्या हयातीत त्याने कधी असा विचार पण नसेल केला कि अनेक दशकां नंतर सुद्धा लोक त्याला आठवत, त्याच्या साहित्यकृतींचा आस्वाद घेतील. त्याच्या मृत्यू नंतर पाचच वर्षात म्हणजे १८०१ सालापासून, हा उत्सव सुरु झाला आणि तो आजतागायत सुरु आहे.

त्याशिवाय तिथे अनेक कला, संगीताचे आणि साहित्याचे उत्सव होत असतात. दर वर्षी ऑगस्ट मध्ये एडिंबरा शहरात मोठा उत्सव असतो, "एडिंबरा फ्रीन्ज " हा जगातला सगळ्यात मोठा महोत्सव असतो. तीन आठवडे चालणाऱ्या ह्या उत्सवात नाटक, नृत्य , संगीत, कला प्रदर्शने, लहान मुलांसाठी साहीत्य, अशा विविध विषयांवरील कार्यक्रमांचे आयोजन असते. रस्त्यावर कसरतीचे खेळ, हुला हूप च्या रिंग्ज नी खेळ असतात, गायक गात असतात, कोणी वाद्य वाजवत असते, कोणी रस्त्याच्या कडेला बसून काही कलाकृती निर्माण करत असतात. सगळं शहर रंगीबेरंगी झालेलं असते. पूर्णपणे कला साहित्य संस्कृती मध्ये, जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेले प्रेक्षक डुंबून गेलेले असतात.

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments