पत्र क्र ९१

स्कॉटलंड म्हटलं कि ते चौकडी चौकडी चा स्कर्ट घालून बॅगपाईप वाजवणारे बॅगपाईपर्स डोळ्यासमोर येतात. संगीत त्यांच्या नसानसात भिनलेले आहे आणि अजून काही मजेदार प्रथापण. मला वाटतं जिथे मनुष्य आहे तिथे प्रथा...

कीर्ती वडाळकर
||4 min read

स्कॉटलंड म्हटलं कि ते चौकडी चौकडी चा स्कर्ट घालून बॅगपाईप वाजवणारे बॅगपाईपर्स डोळ्यासमोर येतात. संगीत त्यांच्या नसानसात भिनलेले आहे आणि अजून काही मजेदार प्रथापण. मला वाटतं जिथे मनुष्य आहे तिथे प्रथा परंपरा आहेतच. त्या स्थळ काळ परत्वे बदलतात इतकेच. जगण्याला एक दिशा मिळत असते ह्या प्रथांमधून. आणि त्या मोडण्यापेक्षा पाळण्यात लोकांना जास्त मजा येते.

स्कॉटलंड सुद्धा ह्याला अपवाद नाही. बर्फात गोठलेल्या नाताळाला तर सगळेच मजेत पार पाडतात. स्कॉटलंड तिथल्या नवीन वर्षाच्या प्रथांसाठी आणि उत्साहासाठी प्रसिद्ध आहे. ३१ डिसेम्बर ला संध्याकाळी सुरु होणाऱ्या ह्या उत्सवाला ,"हॉगमनी " म्हणतात. त्यात अनेक मजेदार प्रथा पाळल्या जातात. नवीन वर्ष म्हणजे नवी सुरुवात, म्हणून सरत्या वर्षातील सर्व वाईट गोष्टींना तिलांजली देऊन नवे वर्ष नव्या उत्साहात सुरु करावे असा प्रघात आहे. ३० तारखेला सगळे घर संपूर्ण साफ केले जाते. त्यात प्रामुख्याने फायरप्लेस. सगळ्या हिवाळ्यात तिला सुट्टी न मिळाल्याने असेल कदाचित. अलीकडच्या काळात ह्या फायरप्लेस लुप्त होऊन अद्ययावत हिटर आलेत. पण ज्यांच्या घरी ती आहे ते तर आवर्जून हि प्रथा पाळतात. हिटर असले तरी एक कोपरा असतो फायरप्लेस म्हणून. तो सजवतात. कारण हॉगमनी मध्ये अग्नीला विशेष महत्व आहे. घराची सफाई झाल्यावर मनाची. कोणाशी काही वितुष्ट आले असेल तर साफ करायचे. आणि अजून एक सफाई खिशाची! शक्य तेवढी देणी देऊन टाकायची, नवीन वर्षात प्रवेश करताना कोणाचेही देणे नको डोक्यावर!

आमंत्रित व्यक्तींमधून एकाला किंवा एखाद्या ग्रुपला "फर्स्ट फुटर " म्हणून मान द्यायचा. असे मानतात कि हा फर्स्ट फुटर तुमच्यासाठी भाग्यवान ठरणार आहे. तुम्ही एखाद्या जरा गडद केसांच्या व्यक्तीला फर्स्ट फूटर म्हणून नियुक्त करायचे. ती व्यक्ती मध्यरात्रीच्या आधी तुमच्या घराबाहेर गेली पाहिजे. बरोबर बारा वाजता , जेव्हा चर्च बेल्स घणघणतील, तेव्हा हे फर्स्ट फुटर तुमच्या घरात प्रवेश करतील आणि तुम्हाला शुभेच्छा देतील. हे फर्स्ट फूटर्स , येताना हातात एक कोळशाचा तुकडा, मीठ, ब्लॅक बन नावाची पेस्ट्री, स्कॉटिश शॉर्टब्रेड आणि व्हिस्कीची बाटली घेऊन येतात. तुमच्या घरात ऊब , मुबलक अन्न , उत्तम अगत्य आणि खूप आनंद खेळता राहो असे ह्या सगळ्या वस्तूतून ते सांगत असतात.

स्वच्छ केलेल्या फायरप्लेस मधून मध्यरात्रीपर्यंत चांगली उब देत राहणारी आग असणेही महत्वाचे. जुनिपर बेरी चे सदाहरित, उपयुक्त फळे देणारे झाड ह्या भागात मुबलक होते. फळांचा उपयोग मसाला म्हणून, सुवासिक तेल काढायला किंवा पदार्थांची रुची वाढवायला केला जातो. सुवासिक तेलापासून अत्तर, साबण वगैरे बनवले जातात. ह्या झाडाची एक सुकलेली फांदी आणून ती सर्वप्रथम पेटवतात. सगळ्या घरामधून ती फिरवतात. तिचा धूर घरातील दुःख नष्ट करतो आणि सुख आणतो अशी मान्यता आहे. एकदा घरात खूप धूर केला कि काही काळासाठी सर्व खिडक्या दारे उघडून देतात, अगदी बाहेर कितीही थंडी असली तरी. त्यानंतर घरात फायरप्लेस मध्ये अग्नी पेटवला जातो. हा अग्नी रात्रभर विझायला नको.

अलीकडे विजेवर चालणारे हिटर असले तरी लोक टॉर्च घेतात हातात. मोठया शहरांमधून रस्त्यावर हातात मशाली, फायर बॉल्स वगैरे घेऊन, लोक परेड करतात. ती बघायला दुरदुरून पर्यटक येतात. बाराच्या ठोक्याला सुरु होणाऱ्या ह्या परेडचे नेतृत्व बॅगपायपर्स ची तुकडी करते. त्यांच्या मागोमाग, हातात तारेला लावलेले पेटते आगीचे गोळे नाचवत लोक परेड करतात. सगळ्या गावातून फिरून मग समुद्रावर जातात आणि हातातील आगीचे गोळे उंच करून पाण्यात भिरकावतात. सगळ्या गावातील वाईट गोष्टी त्याबरोबर समुद्रात स्वाहा झाल्या असे मानतात.

प्रसिद्ध स्कॉटिश कवी रॉबर्ट बर्न ची Auld Lang Syne ही कविता सगळे जण गोल रिंगण करून फिरत फिरत गातात . त्यांचा हा आवडता कवी. जोरजोरात हि कविता म्हणून झाली कि पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घ्यायला सगळे तयार. स्कॉटिश शॉर्टब्रेड, सूप , खारे मासे, ओटचे केक, खूप फळे वापरून केलेला ब्लॅक बन केक आणि जरासा मसालेदार अँकर स्टॉक ब्रेड असा बेत असतो. आणि जोडीला अर्थातच स्कॉच व्हिस्की. नवीन वर्ष चांगलेच जाणार.

मे ते सप्टेंबर मध्ये घेतले जाणारे हायलँड गेम्स पण खूप प्रसिद्ध आहेत. हजार पेक्षा जास्ती वर्षे हे गेम्स घेतले जात आहेत. असं म्हणतात फार पूर्वी प्रत्यक्ष युद्ध न करता, टोळ्यांचा वरचष्मा दाखवण्यासाठी हे गेम्स घेत. काही म्हणतात, टोळीतील तगडे जवान शोधून त्यांना सैन्यात आणण्यासाठी हे गेम्स उपयोगी पडत. कोणी म्हणे चांगले होतकरू मुलं हेरून टोळी प्रमुख आपल्या घरी कामाला घेऊन जात. हेतू काहीही असो, परंपरा मात्र आजतागायत चालू आहे आणि नुसते स्कॉटलंड मधेच नाही तर जगभरात जिथे कुठे स्कॉटिश लोक स्थलांतरित झाले तिथे सगळीकडे त्यांनी हे गेम्स आपल्या बरोबर नेले. सुरुवात मैदानी खेळांनी झाली. धावणे, उंच उडी, लांब उडी वगैरे. मग हळूहळू त्यात वाढ होत गेली. असे म्हणतात कि १९२० मध्ये ऑलिम्पिक कमिटीचे प्रमुख हे गेम्स बघायला आले होते आणि तेव्हापासून ऑलिम्पिक मध्ये भाला फेक,गोळा फेक वगैरे खेळले जाऊ लागले.

संपूर्ण दिवसाचा मजेचा कार्यक्रम आखून सगळं कुटुंब जमतं , बागपाइप वाजत असतो. सगळे मिळून खेळांची मजा घेतात. युनिफॉर्म मध्ये तो स्कॉटिश किल्ट किंवा टार्टान असतोच. दगड फेक, भाला फेक, रस्सीखेच, झाडाचा बुंधा फेक (केबर टॉस), हवेत वजने उंच उडवणे, वजने समोर लांब फेकणे, असे काही वेगवेगळे खेळ असतात. ह्यात, अगदी नवीन भाग घेणारे, प्रशिक्षित खेळाडू जे फक्त आमंत्रणावरूनच येतात, मास्टर्स म्हणजे चाळीशीच्या पुढचे आणि ९० किलोपेक्षा कमी वजनाचे खेळाडू असे चार ग्रुप असतात. कधीतरी महिला खेळाडूंचा विभाग हि असतो. सर्व खेळ प्रामुख्याने वजन वाहून नेणे किंवा ते एका विशिष्ट जागी फेकणे, अशाच प्रकारचे असतात. तो झाडाचा बुंधापण एका विशिष्ट वजनाचा असतो, तो दोन हातांनी उचलायचा आणि स्वतःच्या सरळ रेषेत पडेल असा फेकायचा. असे विविध खेळ बघायला अनेकजण जमतात. १८३८ मध्ये राणी व्हिक्टोरिया सर्वप्रथम हे खेळ बघायला आल्या आणि आजतागायत राजघराण्यातील व्यक्ती ह्या खेळांना हजेरी लावून जातात.

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments