पत्र क्र ९०
एखादा पूल. एखादा किल्ला. आणि निसर्गातली खूपशी शांतता. लॉक नेस म्हणजे इथला असाच एक सुंदर तलाव. नेस नदी ह्यातून उगम पावते म्हणून नाव नेस. ह्या तलावाची ख्याती अशी कि ह्यात म्हणे एक भला मोठा, अजस्त्र...
आपण आईल ऑफ स्काईला निघालो होतो. मधेच तो पूल लागला आणि वेळ गेला. स्कॉटलंड मध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत, जी छोट्या छोट्या बेटांवर आहेत. तिथे जाताना , रस्त्यात निसर्गाची अनेक रूपे दिसतात. काही भाग खूप हिरवा आहे. घनदाट झाडे , काही फुले निसर्गात रंग भरतात . काही भाग मात्र अगदी उघडा बोडका, दगड धोंडे नुसते. पण त्यांची हि शोभा अवर्णनीय . किती रंग घेतात ते दगड ! आणि जोडीला विविध आकारही. बाजूला कधीतरी समुद्र येतो साथीला, कुठेतरी नॉर्थ सी, कुठेतरी अटलांटिक ओशन. नितळ निळाई. लांबच लांब किनारा म्हणजे आता नक्की हवा दमट होऊन गरमी होणार अशी भीती वाटते. पण नाही, समुद्राकडून येणारी थंड हवा मन प्रसन्न करते. कुठे मधेच ते स्कॉटिश लॉक्स म्हणजे तलाव असतात. दूरदूर पर्यंत दिसणारे डोंगर. त्याच्या पायाशी ते लॉक. छान पिण्याचे पाणी साठवणारे हे तलाव लांबरुंद पसरलेले, त्यात मधेच एखादा खडक डोकं वर काढतोय, एखादे छोटेसे बेट आळसावलेय. एखादा पाणपक्षी इकडून तिकडे उडतो तेवढीच आसमंतात हालचाल होते. पाणी म्हणजे आरसाच जणू. सगळ्या वरच्या गोष्टींचे प्रतिबिंब पाण्यात बघताना खरे वरचे कि खालचे असा संभ्रम पडावा. ते दृश्य बघतोच आहे तोवर बाजूला लांबवर पसरलेली हिरवळ येते. किती तो हिरवा रंग! आणि पाठीमागे निळे आकाश किंवा समुद्र. त्या हिरवळीवर चरणारे प्राणी, कुठे गायी, कुठे हरणं . लांब कुठेतरी एखादा पूल. एखादा किल्ला. आणि निसर्गातली खूपशी शांतता.
लॉक नेस म्हणजे इथला असाच एक सुंदर तलाव. नेस नदी ह्यातून उगम पावते म्हणून नाव नेस. ह्या तलावाची ख्याती अशी कि ह्यात म्हणे एक भला मोठा, अजस्त्र प्राणी राहतो. अगदी ते डायनॉसोर होते न? तसाच. प्रेमानी त्याला नेसी म्हणतात. सगळ्यांना दिसेलच असे नाही. आज वर दिसलाही फार कमी लोकांना म्हणे, ते ही इतिहासात कधीतरी. खरा खोटा देवच जाणे पण आपल्याला अगदी नाट्यपूर्ण वर्णन करून डोळे फाडून बघायला लावतात, दिसतोय का शोधा बरं ? शांत रहा , येईल बघा तिकडून!! कसलं काय? गोड्या पाण्याचा दुसऱ्या नंबरचा मोठा तलाव, पण लांबी आणि खोली जास्ती असल्यामुळे असे म्हणतात इंग्लंड आणि वेल्स च्या सगळ्या तलावांचे पाणी एक केले तरी ह्यात जास्ती पाणी आहे. एका टोकाला इन्व्हरनेस आणि दुसऱ्या टोकाला फोर्ट विल्यम असा मोठा पसारा आहे. पाणी मात्र फारसे पारदर्शक नाही. आजूबाजूच्या भागातून वाहत येणाऱ्या नद्यांमुळे असेल कदाचित. अनेक प्रकारचे मासे ह्यात आहेत. दोन जलविद्युत प्रकल्प पण लॉक नेस च्या पाण्यावर चालतात. हायलँड्स च्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे लॉक नेस.
इन्वर्नेस च्या बाजुलाच वाहणारा प्रसिद्ध Caledonian क़ालवा. सतराव्या शतकात एका धर्मगुरूने भाष्य केले कि इन्व्हरनेस च्या बाजूने मोठी मोठी जहाजे जाणार आहेत थेट फ़ोर्ट विल्यमपर्यंत. तेव्हा कोणाला खरे वाटले नाहीं. पण १७२६ मधे काही इंजीनियर्स नी असा काही क़ालवा बांधता येऊ शकेल का हयाची शक्यता तपासायला सुरू केले. हया कालव्याचा उपयोग दळणवळणासाठी होईल अशी कल्पना होती. पण कँप्टन एडवर्ड बर्ट हयांनी ती धड़कावुन लावली कारण त्यांच्या मते उंचसखल भूभाग आणि डोंगरातून येणारा भणाण वारा हयाने जहाज़ चालवणे कठिण होऊन बसेल. मग इंजिनियर्स नी जहाजांच्या लॉकची आणि पुलांची कल्पना मांडली. आणि १८०३ मध्ये कायदा करून तत्कालीन राजाने ह्या कालव्याला मान्यता दिली. बांधकाम दोन्ही बाजूने जोरात सुरु तर झाले पण अनेक अडचणी उभ्या ठाकल्या. शेतात कापणी चा हंगाम आला, मजूरच मिळेनासे झाले. मग बाहेरून ते मागवले तर रहिवाशांनी विरोध केला इथल्या लोकांना काम देणार असे वचन असताना बाहेरून लोक नकोत. मग कुठे गाळ च खूप भरे. मुख्य इंजिनियर जॉन टेलफोर्ड ह्या कामावर होते. त्यांना कामाचा ताण सहन न होऊन ते वारले. मग पुन्हा नवा गडी नवा राज... अशा अनेक संकटांना तोंड देत, मूळ बजेट च्या अनेक पटीत खर्च होत शेवटी १८४३ मध्ये हा कालवा बांधून झाला. पण तोवर जहाजांचा आकार मोठं झाला होता. पुन्हा नव्याने कालवा मोठा केला. इतके छान लॉक बांधलेले, एवढा मोठा कालवा पण त्याचा फारसा उपयोग होईना. १८७३ साली व्हिक्टोरिया राणी ह्या कालव्यात सफर करायला आल्या आणि कालव्याला खूप प्रसिद्धी मिळाली. अनेक पर्यटक येऊ लागले. अनेक वर्षे तो कालवा पर्यटकांसाठी वापरला जातो. २००६ मध्ये बऱ्याच ठिकाणी डागडुजी करून अद्ययावत दुरुस्त्या करून, आजही पर्यटनासाठी त्याचा वापर होतो.
ही दोन महत्वाची ठिकाणं बघून आईल ऑफ स्काई ला पोचलो. शांत , सुंदर, थंड वेळ. फिरा हवे तेवढे. पोर्टी राजधानी. मासेमारी करणारे काही जण इथे आहेत. एखाद्या भारावलेल्या जागी आपण आलो आहे कि काय असे वाटावे इतकी शांतता आणि निसर्ग सौंदर्य. एक जुने लाईट हाऊस आहे, तिथून समुद्रात शार्क, व्हेल्स, डॉल्फिन्स दिसतात. चालत फिरायला अनेक जागा आहेत. अनेक जागांची नावं , "हा पऱ्यांचा तलाव," "हा पऱ्यांचा कडा" , वगैरे आहेत. ह्या बेटाला भेट देण्याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे इथे दिसणारी , निसर्गाची, रंगांची अद्भुत उधळण. हिवाळ्यात इथे ते प्रसिद्ध नॉर्दर्न लाईट्स दिसतात. म्हणजे रात्रीच्या वेळी आकाशात निळ्या , हिरव्या , केशरी, लाल रंगाचा नाच दिसतो. समुद्राचे निळेशार पाणी, वर निळेच आभाळ, त्यात ढगांनी काढलेले पांढरे आकार, हिरवी झाडे आणि असे बरेच रंग. मावळत्या सूर्याला निरोप द्यायला नेस्ट पॉईंट ला पोचलो आणि खरोखर अद्भुत नजरा बघायला मिळाला. ढगांच्या विविध आकारांमध्ये सूर्याची भडक केशरी आकृती क्षितिजाला टेकत होती. तसे ढग काळे दिसू लागले, त्यांचा वेगवेगळा आकार, त्यांच्या मधल्या रिकाम्या जागांमधून सूर्याची केशरी केशरी किरणं पसरत आहेत, सगळी जागा केशरी झाली. काही काळासाठी केशरात न्हाऊन निघाली. खूप हवाहवासा संधी प्रकाश. आजूबाजूला संध्याछाया जशा पसरू लागल्या तशा काळ्या रंगाने जागा भरत गेली आणि समुद्रात बुडणारा सोन्याचा गोळा आपला सगळीकडे पसरलेला केशरी रंग आपणच गोळा करून घरी घेऊन गेला.
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.