पत्र क्र ८९

कॅम्पर लावून सुट्टीचा आनंद घेणारी मंडळी, गावातील तुरळक वस्ती, अधून मधून पसरलेले Lochs म्हणजे तलाव, एकूण काय सुशेगात असा स्कॉटलंडचा हायलँड भाग. मोठी शहरे म्हणजे ग्लासगो, एडिंबरा हि लोलँड्स मध्ये...

कीर्ती वडाळकर
||4 min read

डोंगर, समुद्र, लांब लांब पर्यंत पसरलेल्या हिरवळी , त्यावर चरणारे गायी, हरणं , मेंढ्या वगैरे, कुठेतरी पसरलेला बर्फ, कुठेतरी छानसे धबधबे, कमानी कमानींचे दगडी पूल, वळणावळणाने जाणारा रस्ता, मधेच कुठे थोडी घरे, कुठेतरी कॅम्पर लावून सुट्टीचा आनंद घेणारी मंडळी, गावातील तुरळक वस्ती, अधून मधून पसरलेले Lochs म्हणजे तलाव, एकूण काय सुशेगात असा स्कॉटलंडचा हायलँड भाग. मोठी शहरे म्हणजे ग्लासगो, एडिंबरा हि लोलँड्स मध्ये येतात. हायलँड्स इथल्या निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध तर आहेच पण इथले "हायलँडर्स" सुद्धा त्यांच्या आगत्यासाठी प्रसिद्ध आहेत. अलीकडच्या काळात अनेक हायलँडर्स त्यांचे गाव सोडून जगभरात स्थलांतरित झालेत. अतिशय विपरीत हवामान पर्यटकांना थोड्या काळासाठी छान वाटते, पण रोजचेच झाले तर? जगण्यासाठी ची धडपड पूर्वजांनी भले केली असेल पण आपणही तेच का करा? असा विचार करत खूप जनता दूरदेशी गेली. सुट्टी साठी येतात कधीतरी आता. त्यामुळेच गावं ओस पडलेली वाटतात. युद्धात पण खूप नुकसान झाले जनतेचे. अनेक कारणांनी स्थलांतर झाले. हायलँडर म्हणजे कमीतकमी सहा फूट उंच आणि तगडे पुरुष अशी ख्याती होती. लहान लहान टोळ्यांमधून जनता राहत होती. हायलँड आणि लोलँड , एकमेकांना पाण्यात बघत होते. लो वाल्यांना हाय वाले अडाणी आणि मागास वाटायचे. हायलंड मध्ये काही कायदा नसतो, नुसते टोळ्यांचे नियम असतात, वगैरे वदंता होती. स्कॉटलंडच्या राजांना पण ह्या टोळ्यांपासून धोका वाटू लागला.

सर्व छोटी छोटी राज्य मिळून १६०३ मध्ये ब्रिटन चे राजे एक झाले . तेव्हा हायलँड विकसित करण्यासाठी योजना बनवली गेली. त्यात टोळ्यांना एक करून मुख्य प्रवाहात आणण्याची प्रक्रिया सुरु झाली. त्यातच जमीनमालक सावकार झाले होते. भाडेकरू लोकांची पिळवणूक चालू होती. मालक फक्त स्वतःच्या तिजोरीचा विचार करत आणि कष्टकरी जनता भरडली जात होती. अगदी मेंढ्यांसाठी मोठे कुरण तयार करण्यासाठी लोकांची राहती घरे उठवून कुरणे तयार केली गेली. अठराव्या शतकात राजाने थोडे लक्ष घालून अशा विस्थापित जनतेला आधार द्यायला सुरु केले. तोवर जनतेने आपले पारंपरिक वस्त्र, तो स्कर्टसारखा कील्ट किंवा टारटान बाजूला सारले होते. १८२२ मध्ये चौथा राजा जॉर्ज ह्या भागात आला. त्याने तेव्हा सर्वप्रथम कील्ट घातला, आणि ह्या वस्त्राची मागणी प्रचंड वाढली. लोकांना रोजगार मिळाला आणि त्या कील्टला स्कॉटिश वस्त्र म्हणून ओळख. ह्या भागात सतत अन्नधान्याची टंचाई जाणवून दुष्काळ पडत असे. मग शेतीच्या विकसित पद्धती त्यांना शिकवून थोडेफार धान्य उगवू लागले. पण कील्ट वगैरे विकून त्या बदल्यात धान्य आणणे सुरु झाले. व्हिस्की चा व्यापार हि होताच सोबतीला. लोलँड्स कडे जाऊन शिकून आलेल्यानी शेतीचा विकास करायला सुरुवात केली. नवीन प्रकारची पिके घेण्यात येऊ लागली. शेतीत पैसे आहे म्हटल्यावर जमीन मालकांनी भाडेकरूना हाकलायला सुरुवात केली. त्यातच मग अनेक जण इतर सोयीच्या शहरांमध्ये निघून गेले. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला पुन्हा अनेक ठिकाणी शेती ऐवजी मेंढीपालन सुरु झाले. पुन्हा भाडेकरूंची हकालपट्टी सुरु झाली. उरलेल्या शेतीत, किडींचा प्रादुर्भाव वाढला. मग नुकसान वाढले. थोडक्यात काय तर अनेक कारणांनी इथले गरीब आणि मध्यमवर्गीय लोक हा भाग सोडून गेले.

व्हिस्की चा व्यवसाय आजही जोरात आहे. अनेक डिस्टीलरीज आहेत . आपण एखाद्या अशा डिस्टिलरी ला भेट देऊ शकतो अर्थात तिकीट काढून. त्या परिसरातच वास भरलेला असतो. मोठ्या मोठ्या अत्याधुनिक इंडस्ट्रीयल शेड्स मधून हा व्यवसाय चालतो. आपल्याला सगळी प्रोसेस दाखवतात. आणि तिथेच विक्री पण होत असते. आपण आपले बघावे आणि बाहेर पडावे, लोक मात्र तुटून पडले होते, उच्च प्रतीची व्हिस्की तिथे बनते.

"आईल ऑफ स्काई ला आज आपण जाणार" , असे ड्रायव्हर ने सकाळीच सांगितले, हि जागा म्हणजे स्वर्ग आहे, तुम्हाला सगळा परिसर खूप आवडेल वगैरे ऐकून जरा मन सुखावलेच. आपण स्कॉटलंड बद्दल असेच चित्र मनात घेऊन जातो. अनेक सुंदर सुंदर बेटांची सफर इथे करता येते. आणि रस्ताभर फक्त बाहेरचा बदलता नजरा डोळ्यात साठवत रहा .

स्काई नावाच्या बेटाला आधी बोटीनेच जावे लागायचे. १९९५ साली ह्या बेटाला जोडणारा पूल बांधण्यात आला. हा पूल बांधायला हवा कि नको ह्यावर अनेक उलटसुलट चर्चा , १९७० पासून होत होत्या. अंतर जास्ती नव्हतं आणि पूल बांधायची साधने, ज्ञान सगळं होतं . पण त्या स्काई बेटावर फारशी जनता राहत नव्हती. मग इतक्या कमी लोकांसाठी एवढा खर्च करावा का? ह्या उहापोहात दोन दशकं उलटली. तोवर गाड्या फेरी बोटीत घालून पलीकडे नेत. एका वेळी फक्त २८ गाड्या जाऊ शकत. मग जेव्हा पर्यटकांचा ओघ जास्ती असे तेव्हा फेरी साठी मोठमोठ्या रांगा लागू लागल्या. मग मात्र पूल बांधणे अनिवार्य झाले. आता पुलासाठीचा खर्च आणि ती फेरी बंद पडल्यावर होणारी बेकारी, ह्यांचे काय करायचे ह्यावर चर्चा. मग जे कंत्राटदार होते त्यांनीच तो खर्च करावा आणि टोल च्या रूपात नंतर वसूल करावा असे ठरले. पूल ३ वर्षात बांधून तयार झाला. मात्र आधी अंदाज केल्याप्रमाणे १५ दशलक्ष पौंड खर्च होण्याऐवजी तो प्रत्यक्षात २५ दशलक्ष पौंड झाला. त्यावर येण्याजाण्याचा टोल ११.४ पौंड लावला त्यामुळे हा प्रवाशांसाठी युरोपातील सगळ्यात महाग पूल ठरला. थोडे वर्ष भरला लोकांनी टोल . मग मात्र आंदोलन सुरु केले. ती फेरी बोट स्थानिकाना मोफत नेत असे. आता इतके जास्त पैसे पडू लागले. मारामाऱ्या, वाद, कोर्टकचेऱ्या सुरु झाल्या. अनेक जण अगदी तुरुंगापर्यंत गेले. कोर्टाने टोल वसुली ग्राह्य धरल्यामुळे राणींकडे केलेले अपील त्यांनी बरखास्त केले. शेवटी २००४ मध्ये सरकार ने तो पूल कंत्राटदाराकडून २७ दशलक्ष पौंडाला विकत घेतला, तोवर त्या पुलावर ३३ दशलक्ष पौंड टोल जमा झाला होता. त्या पुलावरून जायला खूप छान वाटते. सुंदरसा तो पूल दुरूनच दिसतो. आजूबाजूला कोणी नाही बघून गाडी थांबवून ड्रायव्हर ने हि सगळी कहाणी ऐकवली. तो सुद्धा त्या आंदोलनात होता.

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments