पत्र क्र ८८

इन्व्हरनेस ला जसे अनेक पुरातन काळातले अवशेष सापडले तसेच काही पुरातन वास्तूही त्यांनी जतन करून पर्यटकांना खुल्या केलेल्या आहेत. स्कॉटलंडचे निसर्ग सौंदर्य बघायला अनेक पर्यटक येतात. तो ओघ सतत वाढता...

कीर्ती वडाळकर
||4 min read

इन्व्हरनेस ला जसे अनेक पुरातन काळातले अवशेष सापडले तसेच काही पुरातन वास्तूही त्यांनी जतन करून पर्यटकांना खुल्या केलेल्या आहेत. स्कॉटलंडचे निसर्ग सौंदर्य बघायला अनेक पर्यटक येतात. तो ओघ सतत वाढता राहावा ह्यासाठी पर्यटकांना काहीतरी नवीन द्यावे लागते. अनेक प्रकारचे मजेदार खेळ इथे घेतले जातात. अनेक विषयांवरची संमेलने भरवली जातात, एकूण काय पर्यटक सतत आकर्षित होत राहिले पाहिजे. अनेक लहान मोठ्या उद्योग, व्यवसायाना त्याने चालना मिळते. तिथल्या अनेक छोट्या छोट्या व्यावसायिकांचा एक सामुदायिक बाजार ते भरवतात. त्यात अगदी तिथेच पिकणाऱ्या फळांपासून केलेल्या टिकावू वस्तू, लोकरीच्या वस्तू, तारेपासून विणून केलेल्या हस्तकलेच्या वस्तू, विकायला असतात. बऱ्याच अशा मार्केट्स मधून विक्रेत्या अगदी आजी होत्या. मजेत काउंटरवर बसून हात चालवत वस्तू करत, येणाऱ्या लोकांशी संवाद साधत होत्या.

स्कॉटलंड चा बराचसा भाग National scenic area मध्ये संरक्षित आहे. म्हणजे त्या भागात आहे ते निसर्ग सौंदर्य अबाधित राखण्यासाठी सरकार अनेक नियम घालून देते. अशा बऱ्याच भागांना भेटी द्यायला मिळाल्या. त्यातलेच एक, एलियन डोनान बेट. डॉर्नि गावापासून अगदी जवळ हे बेट आहे. सर्व बाजूनी समुद्र. मग भरती ओहोटी चे रम्य दृष्य ओघाने आलेच. आजूबाजूला डोंगर. मुख्य भूमीपासून बेटावर पोचायला एक छानसा दगडी पूल आहे. बेटावर एक कॅसल आहे. बेट अगदीच छोटेसे आहे. तो किल्ला मात्र उत्तम जतन केलेला आणि बघण्यासारखा आहे. तेराव्या शतकात बांधलेला आहे तो.

अगदी लांबून हा किल्ला नजरेस पडतो. अथांग सागराच्या पार्श्वभूमीवर, दुरून दिसणारा किल्ला अगदी चित्रातला वाटतो.

तेराव्या शतकाच्या सुरुवातीला, ह्या भागावर समुद्रातून काही आक्रमणे होत होती. अनेक लुटारू टोळ्या समुद्रमार्गे येत, ह्या भागातून जमीनीवर प्रवेश करून , लूटमार करून परत जात. दुसरा अलेक्झांडर त्यावेळेस इथला राजा होता. त्याने हे बेट हेरले. सर्व बाजूंनी समुद्र, जराशा उंचीवर असलेला थोडासा भूभाग, त्यावर टेहेळणी करण्यासाठी आणि येणाऱ्या टोळ्या थोपवण्यासाठी एखादा किल्ला असावा म्हणून हा किल्ला बांधला गेला. संपूर्ण तटबंदी असलेला किल्ला होता तो आधी. अनेक टोळी युद्धांत आणि स्कॉटलंडच्या संग्रामात ह्या किल्ल्याने महत्वाची भूमिका बजावली. असे अनेक वर्षे चालले. मॅकरे कुटुंबाच्या ताब्यात हा किल्ला अनेक वर्षे आहे. स्कॉटलंड मध्ये अनेक टोळ्या पूर्वीपासून होत्या. त्यांचेही आपापसात हेवेदावे ,युद्ध होत.

तेराव्या शतकात केलेल्या बऱ्याचशा बांधकामाची युद्धांमधून पडझड झालेली होती. लाटांच्या उंचीची तटबंदी ढासळली होती. मुख्य म्हणजे डॉर्नि गावातून ह्या बेटावर जाणे म्हणजे कठीण काम होते. १९१९ च्या सुमारास लेफ्टनंट कर्नल जॉन मॅकरे गिल्स्ट्रॅप ह्यांनी किल्ल्याची डागडुजी करायला घेतली. सर्वप्रथम मुख्य भूमीला जोडायला , समुद्रातून एक सुंदरसा, दगडी कमानींचा , पादचारी पूल बांधला.

मग, पहिल्या विश्वयुद्धात , त्यांच्या टोळीतील शहिद झालेल्यांचे स्मारक तिथे बनवले. युद्धात वापरलेल्या छोट्या तोफा तिथे ठेवल्या. आणि कवी जॉन मॅकरे च्या प्रसिद्द "In Flanders field " ह्या युद्ध कवितेच्या ओळी कोरलेली शिळा बसवली. १९५५ साली मॅकरे कुटुंबाने पर्यटकांसाठी हा किल्ला खुला केला आणि दर वर्षी खूप लोक इथे भेट देतात. कुटुंबातील व्यक्ती ह्या इमारतीची देखभाल करत होत्या. १९८३ मध्ये कुटुंबाने एक ट्रस्ट बनवली, त्याकडे ह्या इमारतीचे मालकी हक्क सुपूर्द केले.

छान दगडी बांधकाम, स्वच्छ परिसर, छोटे छोटे जिने चढ उतर करत सगळं किल्ला बघावा लागतो. मुख्य भूमीवर visitor सेंटर आहे. तिथे तिकीट घेऊन आपण किल्ल्याच्या दिशेने निघतो. त्या सुंदर पुलावर चढण्याआधी तिकीट तपासतात, सूचना देतात, नकाशा पण मिळतो. तो पूल सुद्धा इतका छान आहे, त्यावरून दिसणारे समुद्राचे दृश्य अप्रतिम आहे. प्रवेशद्वार म्हणजे लोखंडी जाळी आहे, वरती गोलाकार असलेल्या दगडी दरवाजातून वरून खाली येणारी. त्यावर, " जोवर आत मॅकरे राहत आहे तोवर बाहेर फ्रेझर सुखात राहू शकणार नाही" अशा अर्थाचे , स्कॉटलंड मधल्या एका गेलिक नावाच्या बोली भाषेतील वाक्य कोरलेले आहे. फ्रेझर एका टोळीचे नाव आहे.

आत तीन मजली इमारत आहे. तळ मजल्यावर मोठा हॉल आहे. त्यात आल्यागेल्या पाहुण्यांचे स्वागत होत असे. अनेक सुंदर सुंदर वस्तू तिथे मांडून ठेवल्या आहेत. सगळे दगडी बांधकाम आपल्याला पुरातन काळात घेऊन जाते. जुन्या खुर्च्या, टेबल, कपाटे, गालिचा, संदूक, मोठी खुर्ची , सगळे खूप आकर्षक आहे. दगड रचून भिंती बनवल्यात , ते आकार इतके मस्त दिसतात.

खाली बैठकीचा हॉल, त्यावरच्या मजल्यावर जेवणाचा मोठा हॉल आहे. त्यातले मोठे टेबल, खुर्च्या सगळी सजावट कोणी पाहुणे आत्ताच येणार आहेत कि काय अशी वाटते.

दोन्ही हॉल मधून छोट्या छोट्या बोळी काढून बाजूच्या खोल्यांत जाता येते. बरेच झरोके आहेत. त्यातून समुद्राचे मनोहारी दृष्य बघता येते. कॅनडा तील मॅकरे टोळीने भेट पाठवलेल्या "डग्लस फर" ह्या पाईन वृक्षाच्या लाकडापासून छताच्या तुळया बनलेल्या आहेत . आणि आजही उत्तम स्थितीत आहेत. सर्व मजले जोडणारा गोलाकार टॉवर मधला जिना छान आहे. काही ऐतिहासिक वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. पुरातन काळात वापरलेली शस्त्रास्त्र आहेत. १७१९ मध्ये झालेल्या युद्धातील, ह्या किल्ल्यावर डागलेले तोफगोळेसुद्धा ठेवलेत. ते स्वयंपाकघर अगदी जिवंत केलेय आणि आराम करायच्या खोल्यासुद्धा. आत सगळे इतके छोट्या बोळींनी जोडले आहे आणि खोल्यांचा आकार काही फारसा मोठा नाही. दगडी बांधकामामुळे आतले तापमान छान राखले जाते.

स्कॉटलंडचे "Most photographed monument " म्हणून ह्या किल्ल्याचा उल्लेख करतात. स्कॉटिश व्हिस्की, शॉर्टब्रेड, कुकीज सारख्या अनेक वस्तूंच्या जाहिरातींवर हा किल्ला दिसतो. अनेक इंग्रजी , एका हिंदी आणि एका तामिळ सिनेमांचे शूटिंग पण इथे झाले. अनेक हौशी लोक लग्न समारंभासाठी इथला काही भाग भाड्याने घेतात. मात्र पर्यटकांना किल्ला सदैव उघडच असतो.

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments