पत्र क्र ८७
भारतीय हॉटेल सापडले. मालक केरळी होता. तिथे मिळणारे सर्वच दाक्षिणात्य पदार्थ उत्तम होते. त्याची बायको डॉक्टर व्हायला आली होती एडिंबरा युनिव्हर्सिटीत, तेव्हा तिला एका ट्रिप मध्ये हे गाव फार आवडले. तिने...
इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर
आयर्लंड मिळून युनाइटेड किंगडम किंवा ग्रेट ब्रिटन तयार होते. ह्या चारही भागांना स्वतःची सरकारी सिस्टिम आहे, जसे स्कॉटिश पार्लमेंट, वेल्स ची सेनेद , नॉर्दर्न आयर्लंड ची असेम्बली आणि लंडनची असेम्बली. हाताळायला सोपे म्हणून असेल कदाचित चारही भागांना वेगळा दर्जा आहे. सगळ्यांची पद्धत वेगळी असली तरी राणी सर्वांची एकच आहे.
स्कॉटलंड तिथल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि थंड हवामानासाठी प्रसिद्ध आहे. नैसर्गिक सौंदर्य इथे सगळीकडेच उत्तम जतन केलेलं आहे. स्वच्छता रक्तात भिनलेली आहे. म्हणूनच परिसर सुंदर दिसतो. शिस्त आहेच. आणि आपल्या भूमीवर प्रेमही आहे. तुम्हाला भेटणारी प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या ह्या देशाबद्दल भरभरून बोलताना आढळेल.
स्कॉटलंड ची राजधानी एडिंबरा एक आखीवरेखीव शहर आहे. ब्रिटन मधले सगळ्यात सुंदर शहर म्हणून एडिंबरा ची ओळख आहे. कला आणि संस्कृतीच्या वेगवेगळ्या संमेलनांसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा लोकांचा सगळ्यात जास्त आवडता. जगभरातले हजारपेक्षा जास्त लेखक ह्या मेळ्यात सहभागी होतात. ह्या शिवाय रंगीबेरंगी ख्रिसमस मार्केट्स पण लोकांना आकर्षित करतात. आणि आतंरराष्ट्रीय कला मेळावा तर कलाप्रेमींसाठी पर्वणीच असते. दोन राजवाडे , वस्तू संग्रहालये, दगडी इमारतींमधले एडिंबरा बघण्यासारखे आहे. बऱ्याच गोष्टी राजघराण्याभोवती फिरतात, राजवाडे, वस्तू संग्रहालये, बगीचे, इतकंच काय एक छान मैलभर चालून दोन्हीकडची मजा बघत जायला पण, "walk the royal mile " म्हणतात. राजघराण्याचा बराचसा संबंध स्कॉटलंड शी आहे. अनेकदा राजघराण्यातील मंडळी ह्याच भागात राहत असतात. एडिंबरा युनिव्हर्सिटी जगप्रसिद्ध आहे.
हायलँड्स, लो लँड्स आणि आयलँड्स असा इथला भूभाग विभागला गेला आहे. बर्फाच्छादित डोंगर, हिरवी हिरवी कुरणं , मधेच एखादा तलाव, खूपशी झाडं , कुठला तरी धबधबा, असा हा भूभाग. अनेक प्रकारचे पक्षी, प्राणी इथे आहेत. पर्यटन हा एक व्यवसाय आहेच तरी स्कॉटलंड, इथल्या व्हिस्की साठी प्रसिद्ध आहे. स्कॉटिश शॉर्ट ब्रेड, जॅम, वगैरे पण प्रसिद्ध आहेत. जहाज बांधणी, कोळसा खाणकाम, पोलाद असे मोठे उद्योग तर आहेतच. कापड व्यवसाय पण प्रसिद्ध आहे. इथले कापड एका विशिष्ट डिझाईन चे असते, चौकडी चौकडी चे, आणि रंग पण जरा गडद हिरवा, लाल असे. लोकरीतून विणलेले.
पेहेराव तर, पुरुषांना कील्ट नावाचे, स्कर्ट सारखे एक गुडघ्यापर्यंतचे वस्त्र, वर शर्ट, कोट, बो टाय, आणि बूट, मोजेपण गुडघ्यापर्यंत असतात. कधी कोटा ऐवजी शर्ट वर एक खांद्यावरून तिरपा, स्कर्टच्या कापडाचा पट्टा बांधलेला असतो. स्त्रियांना लांब स्कर्ट, ब्लाऊज किंवा एक मोठा फ्रॉक असा पोशाख असतो. कापड मात्र तेच, चौकडी चौकडीचे प्रामुख्याने.
साधारण राखाडी रंगाची घरे आहेत सगळीकडे, उतरत्या छपराची. बाहेरच्या सतत बदलत्या हवामानाला तोंड द्यायला राखाडी रंग कमी येतो असे ते म्हणतात. बऱ्याच ठिकाणी दगडी घरे आहेत. अनेक ठिकाणी काही सरदार दरकदार यांचे वाडे उत्तम स्थितीत राखून पर्यटकांना खुले केलेले आहेत.
नेस नदीच्या उगमा जवळचे मोठे शहर इन्व्हर्नेस . पोचलो तोवर अंधार झाला होता. तसा तो दुपारी चारलाच होत होता म्हणा. इन्व्हरनेस म्हणजे हायलँड्स ची राजधानी , डोंगराच्या माथ्यावर वसलेले असेच एक चित्रातले गाव. संध्याकाळच्या थंडीत गारठलेले. तरी जागे. उण्यापुऱ्या साठ पासष्ठ हजार लोकवस्तीचे, पण राहण्यास पाचव्या क्रमांकाचे उत्तम शहर. नुकत्याच केलेल्या सर्व्हेत सगळ्यात खुश गाव म्हणून समोर आले आहे. का नाही असणार? डोंगरमाथा आणि उतारावर वसलेले, हिरवाईने नटलेले, कष्टाळू रहिवासी असलेले, त्या प्रसिद्ध "हायलँड काऊज" मुबलक असलेले, शांत गाव. पुरातत्व विभागाचा जास्ती आवडता गाव कारण अनेक पुरातन वस्तू, संदर्भ, घरे, वगैरे इथे आजही उतखननात सापडतात. अगदी अलीकडे म्हणजे २०१० साली एका शेतात खणताना काही सांगाडे आणि वस्तू सापडल्या. त्यावरून हे गाव ख्रिस्तपूर्व साडेसहा हजार वर्षे तरी अस्तित्वात होते असा कयास बांधला गेला. ख्रिस्तपूर्व तीन हजार वगैरे सालची एक दफनभूमी , १९९६ साली सापडली. त्यात लोखंडाचा वापर केलेला सापडला. ह्या भागाचे इतर भागाशी देवाणघेवाण होते असे प्रस्थापित करणारे पुरावे सापडले. इतिहासाच्या सर्वच काळात इथे वस्ती होती आणि त्याचे अनेक पुरावे ठिकठिकाणी सापडतात. दगडावर कोरलेले लेख, लोखंडी वस्तू, हत्यारे, असे अनेक ऐतिहासिक ऐवज इथे सापडले आहेत.
इन्व्हर्नेस जसे ऐतिहासिक महत्त्वाचे तसेच भौगोलिक कारणासाठी पण प्रसिद्ध. औषधी पाणी घेऊन वाहणारे अनेक झरे इथे आहेत. ह्या झऱ्यांतील पाणी बरेच रोग बरे करू शकते अशी मान्यता आहे. जसे एका झऱ्यातील पाणी लावल्यास डोळ्यांची शक्ती वाढते, दुसरीकडे एकात कातडीचे रोग बरे होतात, एक तर समुद्रात झाकलेला झरा आहे त्याचे पाणी प्यायल्याने कॉलरा बरा होतो , अशा मान्यता आहेत.
नेस नदीचा उगम आणि अनेक मोठे तलाव असल्याने बऱ्याच ठिकाणी बेटं तयार झालीत. त्यांना जोडायला सुंदरसे पूल बांधलेत. शहर मुख्य भागाशी सर्वच मार्गांनी जोडलेले आहे. रस्ते तर आहेतच, विमानतळ आहे, नेस नदीच्या उगमापाशी बंदर आहे आणि शिवाय रेल्वे ने हे शहर ग्लासगो , एडिंबरा वगैरे मुख्य शहरांना जोडलेले आहे. ती रेल्वे आणि तिचा प्रवास खूप सुंदर आहे असे ऐकले होते, पण अनुभवायला नाही मिळाले.
एक मोठे कॉलेज आहे ज्यासाठी बरेच विद्यार्थी येतात. हे कॉलेज हायलँड्स युनिव्हर्सिटी च्या अखत्यारीत येते.
संध्याकाळ म्हणजे पूर्ण अंधार असून हि शहर जागे होते कारण तो शनिवार होता. शहराच्या मुख्य भागातून फिरताना अनेक हॉटेल्स, पब्ज वगैरे दिसतात. पर्यटक आणि विद्यार्थी खूप असल्याची पावतीच जणू. असेच फिरत असताना एका पाटी ने अक्षरश: खेचत नेलं आम्हाला. "Georges - Indian restaurant ". जगाच्या पाठीवर, खरंच इतक्या लांब कुठेतरी भारतीय हॉटेल सापडले. मालक केरळी होता. तिथे मिळणारे सर्वच दाक्षिणात्य पदार्थ उत्तम होते. त्याची बायको डॉक्टर व्हायला आली होती एडिंबरा युनिव्हर्सिटीत, तेव्हा तिला एका ट्रिप मध्ये हे गाव फार आवडले. तिने ठरवले कि इथेच राहायचे. ती तिथेच डॉक्टरकी करत होती आणि हा हॉटेल चालवत होता. त्याच्या कडून ह्या भागाची खूप माहिती मिळाली. तो पंचवीस वर्षे तिथे राहत होता. थंडीत पर्यटक कमी असतात का? असे विचारल्यावर म्हणाला, कधीही पर्यटक कमी नसतात, बर्फ, थन्डी, पाऊस , ऊन सगळेच इथे आकर्षक आहे. आणि जोडीला अनेक मेळावे, खेळांच्या स्पर्धा वगैरे पर्यटकांना यायलाच लावतात.
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.