पत्र क्र ८६

फळांच्या भाराने वाकलेली फळझाडे. उतरत्या छपराची घरे. अनेक रंगात रंगवलेली, कुठे दगडी. घरांना छोट्या छोट्या बास्केट मधून लटकवलेली शोभेची झाडे , त्यांना अधिकच सुंदर करत होती. कधी चढ, कधी उतार , कधी...

कीर्ती वडाळकर
||4 min read

आज बालमोराल कॅसल ला जायचे असे ठरवून निघालो. सुंदर सूर्यप्रकाश होता. थंडी काही फारशी नव्हती. गुगलवर सगळं क्लिअर दाखवत होतं . आणि एकूण अंतर लक्षात घेता जेमतेम दोन तासात पोचणार होतो. तिथे जायला आधीच बुकिंग करावे लागते. तसे ते केलेले होते. आणि बुक केलेली वेळ चार तासानी होती. आता उरलेला दोन तास वेळ कसा घालवायचा ह्याची चर्चा करत मजेत मार्गक्रमण करत होतो. सुंदर सुंदर स्कॉटिश खेडी मागे पडत होती. डोंगरातून वर खाली जाणारा रस्ता इतका मोहक दिसत होता. बाजूची घरे अगदी रस्त्यालगत होती. सुबक अंगण, त्यात मोजकी फुलझाडे, कुठेतरी फळांच्या भाराने वाकलेली फळझाडे. उतरत्या छपराची घरे. अनेक रंगात रंगवलेली, कुठे दगडी. घरांना छोट्या छोट्या बास्केट मधून लटकवलेली शोभेची झाडे , त्यांना अधिकच सुंदर करत होती. कधी चढ, कधी उतार , कधी आजूबाजूला नुसतीच खूप झाडे. एकूण "सुंदर" शब्द कमी पडावा. सगळं मजेत चालले होते. एका डोंगरावर चढून आलो, जरासा पाऊस पडायला लागला. हवा ढगाळ झाली. आधीच लहान दिवस, त्यामुळे अगदी सकाळी दहाला संध्याकाळ झाल्यासारखे वाटायला लागले. थोडा वेळ गेला. थोडे बर्फ भुरभुरायला लागले. इतकी मज्जा वाटत होती म्हणून सांगू. लहान मुलांच्या डोक्यावर वाढदिवसाला तो कापूस टाकतात न? अगदी तसाच कापूस उडत होता. बर्फ म्हणजे मजा असेच मनात आले. आजूबाजूला आता बर्फाचे मोठे डोंगर दिसू लागले होते. मजा वर्गात मोडणारा बर्फ अक्राळविक्राळ भासू लागला. पुढं जाणं अशक्य वाटू लागलं. दोन तास कसले, चार तास संपत आले तरी अजून तो राजवाडा खूप लांब होता. मग त्यांना फोन करून परिस्थितीची कल्पना दिली, त्यांनी पण वेळ अड्जस्ट करू सांगितले आणि आम्ही कसे बसे पोचलो.

पार्किंग मधून , आत जायला रिव्हर डी ओलांडून जावे लागते. त्यासाठी १८५६ मध्ये इसामबाड किंगडम ब्रुनेल ह्या प्रसिद्ध वास्तुशात्रज्ञानाने बांधलेला पूल आहे. त्या पुलावर कोणतेही नाव आधी कोरलेले नव्हते. राणींच्या हे लक्षात आले आणि २००६ साली, त्या महान अभियंत्याच्या द्विशतकि जन्मदिवसाच्या निमित्ताने, तब्बल दीडशे वर्षांनी, राणींचे पती प्रिन्स फिलिप ह्यांनी त्या पुलाला एक सुंदरशी पितळी पाटी लावली. इतक्या वर्षांनी आजही तो पूल पूर्णपणे उत्तम अवस्थेत कार्यरत आहे. दोन्ही व्यक्तींबद्दल खूप आदर वाटून जातो ती पाटी बघताना. उशिरा का होईना योग्य व्यक्तीला योग्य मान मिळाला.

अतिशय दुर्गम भागात असलेला हा राजवाडा राजघराण्यातील लोकांचा अतिशय आवडता आहे. ह्याची मालकी राणींकडेच आहे. त्यामुळे आपण तिथे त्यांचे पाहुणे होतो, असे तिथल्या स्वागतिकेने सांगितले. आल्याआल्या , चहा, कॉफी, कुठलेसे शीतपेय जे हवे ते घ्या. स्कॉटिश कुकीज आणि शॉर्टब्रेड आणून ठेवतात आपल्या पुढे.

उन्हाळ्यात राणी इथे येतात. तेव्हा हा भाग पर्यटकांना बंद असतो. त्या आल्या कि पहिल्याच दिवशी सर्व कर्मचाऱ्यांना एक मोठी मेजवानी असते. त्यात त्या आणि कुटुंबातील उपस्थित सर्व व्यक्ती कर्मचाऱ्यांबरोबर नृत्य करतात आणि दुसऱ्या दिवशीपासून पर्यटकांच्या सेवेसाठी असलेले कर्मचारी सुट्टीवर जातात. मग जितके दिवस त्यांचा मुक्काम तिथे असेल तितके दिवस सगळे घरी. त्यातच एकदा ब्रिटनचे पंतप्रधान त्यांचे पाहुणे म्हणून येऊन जातात.

सर्व भाग खूप सुंदर आहे. मोठमोठ्या हिरवळी, दगडी इमारती, मध्ये मध्ये छोट्या बागा ,दूर दूर पर्यंत पसरलेले जंगल , बाजूच्या डोंगररांगा, संथ वाहणारी डी , कुठेही आसपास गर्दी नाही, माणसांची आणि इमारतींची पण. १८५२ मध्ये राजघराण्याने हा महाल घेतला. कालानुरूप त्यात अनेक बदल केले गेले. पन्नास हजार एकरांच्या परिसरात वसलेला हा महाल, त्यात अनेक हरणं , घोडे, स्कॉटिश गाई , कुत्री, वगैरे पाळलेली आहेत. आठ हजार एकरांवर अनेक वृक्ष दाटीवाटीने लावलेले आहेत. तीन हजार एकरांवर घनदाट जंगल आहे. त्यातून दहा हजार टन लाकूड दरवर्षी काढले जाते. अडीच तीन हजार हरणं जंगलात आहेत. शिकार, मासेमारी, पर्वतावर चढून जाणे, लांब लांब चालत जाणे, घोडेस्वारी करणे अशा कामात राणी व्यस्त असतात , जेव्हा त्या इथे येतात. अर्थात त्यांचे ऑफिस त्यांच्या बरोबर असतेच.

साधारण पन्नास कर्मचारी पूर्णवेळ आणि दीडशे कर्मचारी अर्धवेळ कामाला आहेत तिथे. अर्धवेळचे कर्मचारी राणी तिथे आल्या कि सुट्टीवर जातात. बाकी वेळ पर्यटकांना सेवा देण्यासाठी ते आहेत. पार्किंग मध्ये योग्य सूचना देण्यासाठी काही लोक आहेत. मुख्य दरवाजापासून एका उघड्या गाडीतून राजवाड्याजवळच्या स्वागत कक्षात घेऊन जाण्यासाठी काही लोक आहेत. त्या कक्षात पेय, खाद्यपदार्थ देऊन पर्यटकांचे स्वागत करतात. मग एक स्वागतिका आपल्याला राजवाड्याचा फेरफटका करायला घेऊन जाते. तेव्हा बाहेर बर्फ पडत होता. मग छत्र्या घेऊन , जमलेले पाणी चुकवत तिच्या मागे जाऊन बरीच माहिती मिळवली. तिलाही राणींबद्दल खूप आस्था आणि आदर होता. अनेक वर्षे ती तिथे होती, वयाची सत्तरी पार केली तरी आनंदाने काम करत होती. अजूनही जमेल तितके वर्ष करिन म्हणाली. "शेवटी वय म्हणजे काय ग? केवळ एक आकडा! आपण कायम विचारांनी तरुण राहावे, आपोआप आपण दुसऱ्याच्या उपयोगी पडू लागतो. मी जवळच्याच गावात राहते. रोज सायकलवरून येते. " तिचे पायच धरावेसे वाटले मला.

खूप आडजागी असलेला हा वाडा नक्कीच बघण्यासारखा आहे. फक्त हवामान फार खराब असते. आजूबाजूला खूप डोंगरदऱ्या, जंगल असल्यामुळे रस्ते सापडणे कठीण. त्यातून भयंकर बर्फ पडून रस्ते केव्हा बंद पडतील सांगता येत नाही. अगदी तसेच झाले. इतका सुंदर महाल बघून निघालो. भुरभुर पडताना हवाहवासा वाटणारा बर्फ आता भीतीदायक वाटू लागला. मोठ्या मोठ्या पांढऱ्या भिंतींनी रस्ते बंद पडत चालले होते. अंधार पसरू लागला होता. फोनला रेंज मिळत नव्हती त्यामुळे गुगल मावशी सरबरली होती. दूरदूरपर्यंत माणूस म्हणून दिसेना. आता काय करावे? मधेच दुरून एक जण देवासारखा येताना दिसला. त्याने योग्य रस्ता सांगितला आणि मोठ्या मुश्किलीने आम्ही इच्छित स्थळी पोचलो.

With thanks and regards. For STADD Engineers Mumbai Kirty Hemant Vadalkar ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- Authorized Dealers for STAADPro, ProSTEEL, RAM, STAADfoundation,STAADbeava software products since 1995. -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments