पत्र क्र ८५

बर्फ पडेल, काही सांगू शकत नाही. मग ते लोक म्हणतात, हवामानाला दोष नका देऊ, तुम्ही चुकीचे कपडे घालून बाहेर पडलात. जसा वसंत ऋतू सुंदर तसाच फॉल किंवा शिशिर ऋतू. पानगळीच्या पहिले पानांचे रंग केशरी, लाल,...

कीर्ती वडाळकर
||4 min read

"ब्रिटन ला आलीच आहेस तर स्कॉटलंड ला जाऊन ये," भावाने फर्मान काढले. "आणि तू तर नॉटिंगहॅमला जाते आहेस, तिकडून जवळच आहे. " ऐकणाऱ्याला वाटावे, "जवळ" म्हणजे बसलो लोकल मध्ये अन पोचलो दादरला. बर्कशायर हुन नॉटिंगहॅम आणि तिथून पुढे स्कॉटलंड म्हणजे देशाच्या अगदी ह्या टोकापासून त्या टोकाला पोचायचे होते. आपल्याला कोणती गाडी चालवायची होती म्हणा? हीथ्रो हुन बस मध्ये बसलो. किती छान बस होती ती! आणि रस्ते तर सांगायलाच नकोत, कसे आहेत ते. शिवाय सोबतीला हलका पाऊस, कुठेतरी थोडी बर्फाची भुरभुर, सुंदर गावे मागे टाकत प्रवास कधी संपतो समजतच नाही. रस्त्यात काही गावे दिवाळीसाठी सजली होती. त्यातले लिस्टर पूर्ण लक्षात आहे. त्या गावात, अनेक भारतीय आहेत. गुजराती, बंगाली, हिंदी भाषा बोलणे अगदी सहज होते. तिथल्या कौन्सिल वर अनेक भारतीय आहेत. सगळा गाव दिवाळी साठी सुंदर सजला होता. तशी दिवाळी अजून दहा बारा दिवस लांब होती. ती सजावट ख्रिसमस पर्यंत राखतात. खूप आकाशकंदील, रंगीत तोरणे , पाईन वगैरे सुकलेल्या फुलांपासून, रंगवून, बनवलेले गुच्छ, सगळं आकर्षक होतं. बाजारपेठ सजली होती. बसमध्ये फारसे प्रवासी नव्हते. ड्रायव्हर सोफिया एकदम मस्त व्यक्ती होती. छान गप्पा मारल्या तिने. बरीच माहिती दिली. आम्ही स्कॉटलंड ला जातोय म्हटल्यावर बालमोराल ला नक्की जा म्हणाली. ती नुकतीच जाऊन आलेली होती आणि ती ग्लासगो ची रहिवासी होती. नॉटिंगहॅमला आमची नीट सोय होतेय का नाही ते अगदी जातीने बघितले तिने.

नॉटिंगहॅम हुन पुढे जाताना कुठेतरी अपघात झाल्यामुळे रस्ते बंद होते, आणि आम्ही लॉकर्बी ला पोहोचे पर्यंत अर्धी रात्र उलटून गेली होती. आता जिथे उतरणार तो हॉटेलवाला जागा असेल कि नाही? पण तो इतका चांगला होता, सतत फोनवर संपर्कात होता आणि रस्ता सांगत होता. वास्तविक, तिकडे असा नियम आहे कि रात्री एका ठराविक वेळेनंतर हॉटेलमध्ये स्टाफ काम करू शकत नाही. पण तो जागा राहिला. आम्हाला तर भीती वाटली कि हा आता नियम दाखवून आपल्याला बाहेरच थांबवतो की काय. स्कॉटलंडमध्ये झालेले हे स्वागत अगदी लक्षात राहण्यासारखे होते.

सकाळ मात्र खूप सुंदर होती, रात्रीचा सगळं शीण दूर पळून गेला. स्कॉटलंड चे ते मनोहारी दर्शन मनाला आनंद देऊन गेले.

लॉकर्बी गाव १९८८ च्या विमान हल्ल्यासाठी ओळखले जाते. २१ डिसेम्बर १९८८ ला लंडन च्या हीथ्रो विमानतळावरून न्यूयॉर्क च्या दिशेने निघालेले पॅन ऍम चे बोईंग ,फ्लाईट १०३ , आतंकवाद्यांनी फोडलेल्या बॉम्ब मुळे हवेतच फुटले आणि लॉकर्बी वर कोसळले. विमानातील २५८ आणि गावातील १२ असे , २० वेगवेगळ्या देशांचे , २७० प्रवासी मृत्युमुखी पडले. त्यात लंडन ला एक वर्षाच्या exchange program साठी आलेले ३५ विद्यार्थी होते. ते ख्रिसमस च्या सुट्टीसाठी घरी जात होते. त्यांच्या नावाने आजही युनिव्हर्सिटी स्कॉलरशिप देते. लॉकर्बीजवळच एका बागेत, दगडात नावे कोरलेले ह्या सगळ्यांचे मेमोरियल आहे.

इंग्लंड आणि स्कॉटलंड च्या हद्दीतले पहिलेच गाव असावे लॉकर्बी. स्कॉटलंडला तीन बाजूंनी अटलांटिक ओशन, नॉर्थ सी आणि आयरिश सी आहे तर एका बाजूला साधारण दीडशे किलोमीटरची बॉर्डर म्हणजे इंग्लंड आहे. एवढ्या पाण्याच्या जवळ असलेल्या स्कॉटलंड मध्ये आठशे च्या आसपास बेटं आहेत. छान थंड हवा, डोंगर, समुद्र, सगळ्यांच्या मध्ये वसलेले स्कॉटलंड खरंच सुंदर आहे.

तिथे भेटलेली एक जण म्हणाली, "उन्हाळा सोडून कधीही या स्कॉटलंडला." उन्हाळ्याची खरी दहशत तर आमची, ही काय मला भीती घालतेय? "किती असतं ग उन्हाळ्यातील टेम्परेचर?" म्हणाली, जास्तीतजास्त १७ डिग्री. हात्तिच्या , अग त्याच्या अडीचपट असते आमच्याकडे टेम्परेचर. बिचारी दचकलीच. उन्हाळ्यात १५ ते १७ डिग्री टेंपरेचर असते आणि काही भागात तर रात्र नसतेच. संपूर्णपणे काळोख न होणारा काही भाग मग मध्यरात्री गोल्फ खेळायला पर्यटकांना बोलावतो. अनेक ठिकाणी लंडन पेक्षा चार चार तास जास्ती वेळ उजेड असतो. हिवाळा मात्र खूप बोचरा, जास्तीतजास्त ५ डिग्री टेम्परेचर असणारा. बऱ्याच ठिकाणी बर्फ पडते. काही ठिकाणी ते वर्षभर असते. डोंगरांमुळे थंड हवा जास्ती आहे. सगळ्यात सुंदर दिवस वसंताचे. खूप रानफुले उमललेली असतात, सुसह्य थंडी असते. पण नेहेमी स्कॉटलंड चे हवामान हा चेष्टेचा विषय असतो. दिवसभरात काय दिसेल ते सांगू शकत नाही, मधेच ऊन पडेल. ते बघून , सुटसुटीत कपडे घालून बाहेर पडलात तर लगेच पाऊस सुरु होईल, कुठेतरी बर्फ पडेल, काही सांगू शकत नाही. मग ते लोक म्हणतात, हवामानाला दोष नका देऊ, तुम्ही चुकीचे कपडे घालून बाहेर पडलात.

जसा वसंत ऋतू सुंदर तसाच फॉल किंवा शिशिर ऋतू. पानगळीच्या पहिले पानांचे रंग केशरी, लाल, पिवळे होतात आणि सगळी सृष्टी जणू रंगहीन थन्डीच्या दिवसांपूर्वी एकदा रंग उधळून घेते. त्या थंडीत झाडं म्हणजे नुसती लाकडं, साधारण काळ्या रंगाची, सगळीकडे बर्फ ! जुन्या काळातले कृष्ण धवल चित्र असल्यासारखेच ! डोंगर शुभ्र बर्फाची स्वच्छ चादर पांघरून गारठून झोपी गेल्यासारखे दिसतात. आणि लोक बर्फातल्या खेळांची साधने घेऊन डोंगराला उठवायला येतात. सगळं पांढरं पांढरं आणि त्यावर माणसांचे ठिपके, कुठे उंचावरून स्कीईंग करत घसरून येत आहेत, कुठे स्नो बोर्डिंग करत उड्या मारत आहेत, कुठे सायकली घेऊन निघालेत तर कुठे नुसतेच डोंगरदऱ्या पालथे घालायला बाहेर पडलेत. तिथल्या अधिकाऱ्यांना बरेच काम असते ह्या काळात, कुठे बर्फाची वादळे झाली, तो डोंगर बंद करा, वादळ कमी झाले , लोकांसाठी उघडा, जागोजागी सूचना द्या.

स्कॉटलंड च्या सफरीला सुरुवात झाली ती अगदी तिथल्या हवामानाची पूर्ण कल्पना देतच. लॉकर्बीला सकाळी सुंदरसे ऊन पडले होते. आणि पुढे निघालो तसे आधी पाऊस , मग बर्फ़ानेच गाठले. अगदी रस्ता चुकेपर्यंत !

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments