पत्र क्र ८४
अतिशय विचित्र हवामान आणि दिवस रात्रीचे आपल्यापेक्षा वेगळेच गणित युरोपात बघायला मिळते. आपण साधारण संध्याकाळ झाली, रात्र पडू लागली कि घरी असावे, असु तिथून परतावे, अशा विचारसरणीचे सामान्यपणे असतो. त्या...
अतिशय विचित्र हवामान आणि दिवस रात्रीचे आपल्यापेक्षा वेगळेच गणित युरोपात बघायला मिळते. आपण साधारण संध्याकाळ झाली, रात्र पडू लागली कि घरी असावे, असु तिथून परतावे, अशा विचारसरणीचे सामान्यपणे असतो. त्या अंधाराचा इतका विचित्र पगडा आपल्यावर असतो न की आता अंधारात कुठे निघालीस? किंवा दिवसा उजेडी जा आता, असे अनेकवेळा आपण ऐकलेले असते. मात्र ह्या भागातील लोकांना अंधाराचा असा बाऊ करून चालणार नाही. हिवाळ्यात दुपारी दोन नंतरच संध्याछाया पसरू लागतात. चार पर्यंत गडद अंधार. सकाळी आठ वाजले तरी सूर्यनारायणाचा पत्ता नसतो. उणेपुरे सहा, सात तास काय तो उजेड , बाकी अंधारच. मग घड्याळाचे काटे मागे पुढे करा, एक तास वेळ कमी जास्त करा, हे सगळं येतं . त्याची मला जरा मजाच आली, आता दिवस लहान होणार आहे, आपआपले घड्याळ एक तास मागे न्या. नेतो बापडे. डे लाईट सेविंग टाईम ! नैसर्गिक उजेडाचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी घड्याळच मागे पुढे करायचे, वसंत आला कि पुढे आणि शिशिर आला कि मागे! मग सकाळी नऊ वाजता दिसणारा उजेड आठला दिसतो. आणि उन्हाळ्यात पहाटे पावणे चारला उगवण्याऐवजी सूर्य पावणे पाचला उगवेल.
उत्तर गोलार्धातील बऱ्याच देशांमधून ही पद्धत पाळली जाते.
ब्रिटन मध्ये वर्षभरात लवकरात लवकर म्हणजे पहाटे पाचला आणि उशिरात उशिरा म्हणजे सकाळी नऊ पस्तीसला सूर्योदय होतो. तर सूर्यास्त लवकरात लवकर म्हणजे दुपारी साडे तीनला आणि उशिरात उशिरा रात्री सव्वा नऊला होतो. घड्याळ मार्च - एप्रिल मध्ये एक तास पुढे आणि ऑक्टोबर च्या शेवटी मागे करायचे.
एवढ्या जास्ती वेळ अंधार म्हणजे जरा बोअर च नाही का? लोक मात्र सरावलेत. अंधारात, डोक्याच्या टोपीला लाईट अडकवून सायकलिंग किंवा मोठे लाईट लावून व्यायाम करत असतात, चालत असतात, बगिच्यांतून. हिवाळा जरा जास्तीच अंगावर येणारा . उन्हाळ्यात अगदी उलट परिस्थिती, सकाळी सहा पासून ते रात्री दहा पर्यंत उजेड!! तो हि सहन करायला कठीण. आणि सुसह्य हवामान म्हणता म्हणता आता ह्या भागातूनही प्रचंड उन्हाळा जाणवू लागला आहे. मात्र तो दुपारी दोन,तीनला च होणारा अंधार उगाचच निराश करतो.
गावं मात्र आखीव रेखीव , चित्रातील, डोंगर दऱ्यातून वसलेली. स्वच्छ. हवा सुंदर असल्यामुळे सुंदर बगीचे . ह्या बगीच्यांचे रूप हिवाळ्या आधी इतके कोरडे होऊन जाते न, कि केवळ काड्या उरतात. बापरे! मेलीत कि काय झाडे? पण नाही, ती सगळी सुप्तावस्थेत जातात. आणि वसंत ऋतूत फुलून उठतात. खूप प्रकारची झाडे बघितली पण एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली, सुवासिक फुले कमी आहेत. कदाचित म्हणून अत्तराचा वापर जास्त असावा आणि गजरे, हार ह्या वस्तू फारशा प्रचलित नसाव्यात.
ब्रिटनच्या कॉट्स वल्ड भागात अनेक लॅव्हेंडर ची शेते आहेत. ह्या झाडाच्या फुलांपासून अत्तर, सुवासिक तेल बनते.
बर्कशायर मध्ये सगळ्यात जास्ती भारतीय राहतात. काही अगदी त्या संस्कृतीत विलीन झालेत, तिथल्या सारखेच बगीचे वगैरे घराभोवती आहेत त्यांच्या, आणि दर रविवारी ती लोकं बगीच्यात कामं करताना पण दिसतात. मात्र एका भागात गेलो, आधी बराचसा औद्योगिक भाग होता, आणि नंतरची नागरी वस्ती अगदी रंगहीन होती. सगळीकडे नुसते बांधकाम, कपडे वाळत आहेत, कचरा, टाकाऊ वस्तू जमवल्या आहेत घराबाहेर, अरेरे वाईट वाटलं. अर्थातच बरीचशी भारतीय आणि आशियाई लोकांची वस्ती तिथे होती. साऊथऑल भाग होता तो, त्या रेल्वे स्टेशन च्या पाट्या इंग्लिश बरोबर गुरुमुखीत पण लिहिलेल्या आहेत. दिवाळी जवळ आलेली होती. सगळ्या बाजारपेठा फुलून गेलेल्या होत्या. दिवे लावलेले होते. खूप सजावट केलेली होती. तिथल्या काही दुकानांमधून अगदी अनारसे पासून सगळे फराळाचे पदार्थ मिळत होते. अगदी आपल्या इथल्या एखाद्या दुकानात असेल इतकी व्हरायटी होती पदार्थांची. अनेक भारतीयांबरोबर तिकडचे लोक हि ह्या पदार्थांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करत होते. आपल्या रंगीत कपड्यांची दुकाने आकर्षक दिसत होती. तिथल्या सर्वणा भवनम नी दक्षिण भारता ची आठवण दिली. ही एक मोठी फूड चेन आहे. सिंगापूरला पण सापडले होते आणि जगात अजूनही बऱ्याच शाखा त्यांच्या आहेत. १९९० च्या सुमारास चेन्नई मधील श्री राजगोपालन सर्वप्रथम सिंगापूरला गेले. तिथल्या मॅकडोनाल्डच्या शाखा बघून त्यांनाही आपण काही करावे असे वाटले. आधी ते भारतात परतले आणि चेन्नई मध्ये अनेक ठिकाणी सर्वणा भवनम उभे केले. त्यानंतर सिंगापूरचे थाटले. आणि थोड्याच अवधीत अमेरिकेपासून न्यूझीलंड पर्यंत सगळीकडे शाखा स्थापन केल्या. भारतीय लोक तिकडे घेऊन जाऊन त्यांना काम ते देतात. सर्व हॉटेल्स शाकाहारी आणि चविष्ट दक्षिण भारतीय पदार्थ बनवणारे. साऊथऑल ला पण असेच मोठे हॉटेल आहे. नम्बर लावून वाट बघावी लागते. पण नंतर जे काही पुढ्यात येते त्यांनी सगळी मरगळ दूर होते. उत्तम चवीच्या पदार्थांची मजा आपल्या बरोबर अनेक परदेशी लोक घेताना बघून छान वाटते. तिथे अजूनही अनेक हॉटेल्स होती, सगळ्या भारतीय पदार्थांची, वडापाव पासून अगदी पंजाबी पदार्थांपर्यंत, आणि अनेक गोड पदार्थही ताजे समोर करून देणारे.
दिवाळीची लगबग खूप मनापासून अनुभवली आणि परदेशात आपले लोक आपली संस्कृती जपत आहेत हे बघून छान वाटले. एका मोठ्या मॉल मध्ये गेलो. सगळे भारतीय पदार्थ मिळत होते. विक्रेते सर्व भारतीयच होते आणि मालकही भारतीयच होता. त्यांची पण अनेक ठिकाणी अशीच दुकाने आहेत.
हा सगळा भाग इतका भारतीय होता न कि इतकी धावपळ करून काढलेला तो व्हिसा फुकट गेला की काय असे वाटावे.
बर्कशायर मधले कारखाने आणि उद्योग प्रगत आहेत. स्लाव्ह आणि रिडींग मोठी गावं आणि रेल्वेची महत्वाची ठिकाणं आहेत. रिडींग हुन अनेक ठिकाणी रेल्वे ने जाता येते. तेरेसा मे , डेव्हिड कॅमरून असे पंतप्रधान ह्याच भागातले. आणि ईटन कॉलेज मधून शिकलेले तर बरेच जण पंतप्रधान झाले.
शहरी भागापासून जवळ, आपले वेगळेपण जपणारा हा भाग पण खूप छान आहे.
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.