पत्र क्र ८३

ब्रिटन म्हटलं कि राजघराण्याचे भव्य प्रासाद डोळ्यासमोर येतात. लंडनच्या भर वस्तीत असलेले, बकिंगहॅम पॅलेस , क्लॉरेन्स हाऊस , केन्सिंग्टन वगैरे भव्य प्रासाद येता जाता , लंडन च्या सफरी मध्ये दिसतात. मात्र...

कीर्ती वडाळकर
||4 min read

ब्रिटन म्हटलं कि राजघराण्याचे भव्य प्रासाद डोळ्यासमोर येतात. लंडनच्या भर वस्तीत असलेले, बकिंगहॅम पॅलेस , क्लॉरेन्स हाऊस , केन्सिंग्टन वगैरे भव्य प्रासाद येता जाता , लंडन च्या सफरी मध्ये दिसतात. मात्र काही निसर्गरम्य जागी असलेल्या राजवाड्यांना वाकडी वाट करून जावे लागते.

हीथ्रो विमानतळ जसा जवळ येतो तसा विमानातून दिसणारा विंडसर राजवाडा. राणीचा अतिशय आवडता. अलीकडे त्या तिथेच असतात. पण आधी दर आठवड्याच्या सुट्ट्यांना त्या तिथे असत . बर्कशायर मधले एक विशेष महत्वाचे ठिकाण. त्या भागात गेल्यावर लांबूनच आपल्याला हा राजवाडा दिसतो. त्याच्या त्या लांबलचक पायऱ्या, तिथे पोचणारा सरळ रस्ता, ज्यावर लग्न वगैरे विशेष कार्यक्रमांना जाताना, आपण राजघराण्यातील अनेकाना टीव्हीवर बघितले आहे. दुरूनच त्या पायऱ्या दिसतात. पर्यटकांसाठी ह्या राजवाड्याचा काही भाग खुला केलेला आहे. आत जाताना तिकीट घेतले कि सुरक्षेचे सोपस्कार पार पडावे लागतात. सगळीकडे अनेक महिला कर्मचारी दिसतात.

आत दगडी बांधकामातला राजवाडा , पर्यटकांसाठी खुला भाग आणि राणीचा खाजगी भाग असा विभागला आहे. खाजगी भागावर जर राजघराण्याचा ध्वज फडकत असेल तर राणी आत आहेत, युनियन जॅक असेल तर नाहीत. हा ध्वज बदलणे कार्यक्रम अत्यंत शिस्तीत पार पडतो. जेव्हा राणीना घेऊन येणारी गाडी एका विशिष्ट कमानीखाली येते, बरोबर त्याच वेळी युनियन जॅक खाली उतरवून राजघराण्याचा ध्वज वर चढतो, तो ध्वजाचा खांब रिकामा राहता कामा नये. त्या बाहेर निघतानाही अशीच प्रक्रिया. इथे खरं तर, एका विशिष्ट व्यक्तीसाठी नव्हे तर अधिकाराच्या त्या जागेला मान असतो. जो कोणी किंवा जी कोणी व्यक्ती त्या जागेवर आहे ती त्या राजवाड्याची मालक पण आहे. काही राजवाडे हे त्या हुद्द्यावरील व्यक्तीचे आहेत आणि काही, राजघराण्यातील व्यक्तींच्या खाजगी मालकीचे आहेत.

अकराव्या शतकात नॉर्मन लोकांनी इंग्लंड वर हल्ला केला होता. त्यातील विल्यम नावाच्या राजाने, हा राजवाडा साधारण १०६६ नंतर बांधला. त्याच्यानंतरच्या अनेक राज्यकर्त्यांनी त्यात भर घातली. आज युरोपातील सगळ्यात जास्ती काळ वापरला गेलेला, आणि सगळ्यात जास्ती लोक वस्तीस राहिलेला राजवाडा म्हणून विंडसर कॅसल चा उल्लेख करतात. १३००० एकरांवर पसरलेला हा राजवाडा म्हणजे एक छोटसा गावच आहे. अर्थातच ह्या राजवाड्यामुळे बाजूचे विंडसर गाव फार व्यस्त राहते. म्हणाल तर किल्ला नाही तर राजवाडा, काहीही नाव चालेल. पुरातन वास्तूला खरं तर चांगले जपले होते पण १९९२ साली तिथे मोठी आग लागली, आणि बरेच नुकसान झाले. त्यानंतर होती तशी ती वास्तू पुनर्निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. आज आपण तो जळलेला भाग आणि त्याचे पुनर्निर्माण केलेले बघू शकतो. ती आग इतकी भयंकर होती. २० नोव्हेंबर १९९२ ला सकाळी अकराच्या सुमारास एका तीस फुटी पडद्याने , बाजूला असलेल्या दिव्यामुळे पेट घेतला. त्वरित फायर अलार्मस वाजले. अग्निशमन यंत्रणा कार्यरत झाली. पण आगीचे लोळ इतके प्रचंड प्रमाणात पसरत होते, की राजवाड्याची स्वतःची यंत्रणा कमी पडू लागली. लांबलांबून अग्निशमन यंत्रणा मागवण्यात आल्या. सोबतच राजवाड्यातील अनेक ऐतिहासिक महत्वाच्या वस्तू आगीच्या ठिकाणाहून वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. काही कुटुंबीय तिथे मुक्कामाला होते, काम करणारे लोक होते. एकीकडे आग पसरतेय , एकीकडे तिच्यावर पाणी फवारले जातेय, लोकांना वाचवले जातेय, वस्तू बाहेर काढणे चालू आहे. बापरे! पंधरा तासाच्या लढाईनंतर आगीचा प्रसार थांबला पण थोडे थोडे धुमसणे चालूच होते. त्या लढाईत जसे नुकसान झाले तसेच खूपशा गोष्टी वाचवण्यात यशपण आले. त्या राजवाड्यात अनेक वर्षे जतन केलेले कलाकुसरीचे नमुने होते. फर्निचर होते. एक दीडशे फुटी लांबचलांब मोठे टेबल, १२० फुट लांब गालिचा, अनेक चित्र, ३०० घड्याळं , ऐतिहासिक दस्तऐवज, अमूल्य पुस्तके, खूपशी छोटी चित्रे, मूळप्रतीतले नकाशे, काय न काय. सगळं वाचवलं. मनुष्यहानी मात्र नाही झाली. काही लोक जखमी झाले त्यांना त्वरित उपचारार्थ दवाखान्यात हलविले. अर्थात इमारतीचे नुकसान झाले होते, खूप. मुख्य नुकसान राजवाड्यातील कापडाचे झाले होते, सगळीकडे वापरलेले किमती पडदे, गालिचे, देखावे, सगळं भस्मसात झाले. लाकडी छताने आगीला पसरण्यास मदत केली होती. शंभर खोल्या जळल्या होत्या. अनेक मोठे हॉल आगीत सापडले होते, खूप ठिकाणचे छत पडले होते. मोठी पेंटिंग्ज, काचेच्या वस्तू, काचेची झुंबरं , स्वाहा झाली होती.

हे सगळं दुरुस्त करायचे म्हणजे खूप मोठा खर्च होता, तो कोण करणार? मग असे ठरले कि राजवाड्याला भेट देणाऱ्या पर्यटकांकडून तिकीट घेण्यात यावे, त्यातून काही भाग खर्च उचलला जाईल. राणींनी स्वतः काही भाग दिला आणि तेव्हापासून त्या आयकर

देऊ लागल्या. जे नुकसान झाले होते ते आणि जेवढे पाणी वापरले होते ते, लक्षात घेता असा अंदाज वर्तवला गेला की हा राजवाडा सुकवायला दहा वर्षे लागतील आणि सर्व सुरळीत व्हायला त्याहून अधिक. आगीपेक्षा ती विझवण्यासाठी वापरलेले पाणीच जास्त त्रासदायक होईल कि काय अशी परिस्थिती निर्माण

झाली. पण तिनच दिवसात पर्यटक येऊ शकले, पंधरा दिवसात राणी आत आल्या, महिन्याभरात बराचसा भाग वापरात येऊ लागला. मुख्य नुकसान झालेला भाग चार वर्षात पुनर्निमित झाला होता.

हे सगळं बघून , तिथले मोठे मोठे हॉल, कलाकृती, वगैरे डोळ्यात साठवत आपण बाहेर आलो की बगीचा बघत, सेंट जॉर्जेस चॅपल कडे जातो. अति भव्य असे हे चर्च. राजघराण्यातील अनेक सोहळे बघितलेला तो हॉल. राणी येण्यासाठी रस्ता वेगळा आहे. दगडी घडणीतले , रंगीत काचांतले , गॉथिक स्टाईल चे बांधकाम असलेले ते पुरातन चर्च, चौदाव्या शतकात बांधलेले आहे. बाजूलाच राजघराण्यातील काहींना अंतिम विश्रांती दिलेली जागा पण आहे.

वाड्याच्या एका बाजूला चालण्यासाठी मोठी जागा, बगीचा केलेला आहे. अर्थात पर्यटक तिथे नाही जाऊ शकत.

राणीच्या ताफ्यातले, ते विशिष्ट शिरस्त्राण घातलेले सैनिक त्यांच्या कवायती करत होते. सगळी भ्रमंती करून बाहेर आलो, अनेक महिला पोलीस तिथे आहेत. एकजण प्रेमाने हसली, तर तिच्याशी थोडे बोलले. अनेक वर्ष ती तिथे होती, राणीबद्दल अतिशय आदराने, अभिमानाने बोलत होती.

दरवर्षी लाखो पर्यटक ह्या राजवाड्याला भेट देतात त्यामुळेच कि काय सर्व व्यवस्था, कानात घालून माहिती देणारे फोन्स, वगैरे सेवा अद्ययावत आहेत. सगळा परिसर अतिशय सुंदर, रम्य आहे त्यात तो भव्य राजवाडा , विंडसर कॅसल! कोणालाही आवडण्यासारखाच आहे.

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments