पत्र क्र ८२

आग्नेय इंग्लंड मधील एक अति सुंदर भाग म्हणजे बर्कशायर काउंटी. भाऊ तिथेच राहत असल्यामुळे त्या भागात खूप फिरणे झाले. रिडींग हे एक मोठे शहर, बाकी सर्व "गावे". १९५७ मध्ये राणी एलिझाबेथ द्वितीय, म्हणजे...

कीर्ती वडाळकर
||4 min read

आग्नेय इंग्लंड मधील एक अति सुंदर भाग म्हणजे बर्कशायर काउंटी. भाऊ तिथेच राहत असल्यामुळे त्या भागात खूप फिरणे झाले. रिडींग हे एक मोठे शहर, बाकी सर्व "गावे". १९५७ मध्ये राणी एलिझाबेथ द्वितीय, म्हणजे सध्याच्या राणी, ह्यांनी ह्या काउंटी ला रॉयल काउंटी चा दर्जा बहाल केला कारण विंडसर हा बर्कशायर काउंटी चा भाग आहे. अति भव्य असा विंडसर चा महाल राणीचा आवडता तर आहेच पण त्यांच्या पती सकट वंशातील अनेकांना इथल्या सेंट जॉर्जेस चॅपल मध्ये अंतिम विश्रांती दिलेली आहे.

अनेक सुंदर सुंदर गावांमधून फिरताना तो नेहेमीचा ब्रिटिश निसर्ग सोबत असतो. आणि सतत बदलते इंग्लिश हवामान पण. हीथ्रो विमानतळ जवळ आहे. त्यामुळे अनेक हायवे इथे जाळं विणतात. पण त्या हायवे पासून जरा खाली उतरले कि त्या रहदारीची पुसटशी चिन्हे पण उरत नाहीत. छोट्या छोट्या गावांमधून सुखेनैव वसणारे बर्कशायर.

प्रत्येक गावाला आपले स्वतःचे चित्र आहे. पहिल्याच दिवशी इटन कॉलेज परिसरात फिरताना ह्या भागाचा अंदाज आला. कॉलेजेस मधून मुलांना नुसते शिक्षण न देता अनेक गोष्टी करायला लावतात त्याचा प्रत्यय आला. इंग्लिश पाऊस कधी हि येतो. तसा तो भुरभुरत होता. हिरवळ सुंदर पसरलेली,अनेक झाडे आपला दिमाख मिरवत उभी आणि मधूनच वाहत जाणारी थेम्स.

१४४० साली, केम्ब्रिज च्या किंग्ज कॉलेज ला जोड म्हणून ईटन कॉलेज ची स्थापना झाली. जगातल्या सगळ्यात महागड्या शिक्षण संस्थांमध्ये ईटन कॉलेज चा समावेश होतो. ब्रिटनच्या राजघराण्यातील आणि जगातील अनेक नामवंत व्यक्ती इथे शिकून गेलेत. इथे त्यांच्या हॉस्टेल वर राहणे अनिवार्य असते. कला, भाषा ह्या विषयांना जास्त प्राधान्य आहे. अत्यन्त प्रगत वातावरण आणि सोयी सुविधा विद्यार्थ्यांना पुरवल्या जातात. खेळांवर इथे खूप लक्ष दिले जाते. २०० एकर पेक्षा जास्ती जागा खेळांच्या मैदानांनी व्यापली आहे. क्रिकेट, फुटबॉल, रग्बी, हॉकी वगैरे मैदानी खेळ तर आहेतच पण ईटन कॉलेज त्यांच्या नौकानयनासाठी प्रसिद्ध आहे. २०१२ च्या ऑलिम्पिक नौकानयनाच्या स्पर्धा ईटन कॉलेजच्या डाँर्नी लेक रोइंग फिल्ड मधेच झाल्या होत्या. हा सगळा भाग , ऑलिम्पिक साठी

कॉलेज तर्फे मुद्दाम विकसित करण्यात आला. स्पर्धांच्या दरम्यान तिथे दररोज तीस हजार पेक्षा जास्त लोक भेट देत होते. आणि स्पर्धांचे उत्तम ठिकाण म्हणून प्रेक्षकांनी ह्या भागाला पसंती दिली होती.

ते रोइंग फिल्ड, आणि सगळा परिसर तसा शांतच होता. पण हल्ली तिथे मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयारी करतात. अशाच काही चमू आपापली रंगीत बोट उचलून आणत होत्या, आणि भुरभुरत्या पावसात , थंड आणि स्वच्छ अशा त्या पाण्यात झोकून देत होत्या . उरलेल्या जागेत अनेक पाणपक्षी हवामानाची मजा घेत होते.

थेम्स आणि तिच्या उपनद्यांनी परिसराला सुजलाम सुफलाम केलेले आहे. कुठेही जा फिरायला , एखादी नदी बाजूनी वाहतेच . नदीच्या काठाने चालायला छोटे रस्ते, बगीचे आहेत. हा चालण्याचा अनुभव खूप छान होता. एका बाजूला गाव, ती टिपिकल इंग्लिश घरे आणि दुसऱ्या बाजूला वाहती नदी, अनेक पाणपक्षी पाण्यावर, काठावर विहरत असतात. छान शी झाडे पण तुमची सोबत करतात.

असेच फिरत असताना, खूप फळांनी लगडलेली झाडे दिसली. हिरवी, लाल, गुलाबी सफरचंद, पीच, ब्लूबेरी, वगैरे सगळीकडे दिसत होती. अर्थातच कोणी तोडत नाहीत. एकदा लोकल काउंटी नी लोकांना अपील केले की रविवारी या आणि हवी तेवढी फळे घेऊन जा. मला वाटलं किती हाणामारी होईल? पण लोक छोट्या छोट्या बास्केट्स घेऊन आले. दोन चार फळे घेतली , एकमेकांना आभिवादन केले आणि निघून गेले. असा सिन अर्थातच नेहेमी होतो. अनंत हस्ते कमलावरने..... अशी भावना असावी बहुतेक.

मेडनहेड भागात एक अजून गम्मत बघायला मिळाली. छोटी छोटी विमाने घरघर करत होती. फारशी उंच उडतही नव्हती. जरा पुढे गेल्यावर, दिसला, तिथला फ्लाईंग क्लब. लोकांची स्वतःची छोटी छोटी विमाने बाजूच्याच पार्किंग लॉट मध्ये पार्क केलेली होती. काही बाहेर निघत होती. काही उड्डाण करत होती, काही परत येत होती. तिथे विमान उडवायला शिकवतात. एक प्रशिक्षक असतो सोबत. छोटी छोटी विमाने, उडून एक छोटासा राउंड मारून परत येत होती. आपआपल्या पार्किंग लॉट मध्ये जाऊन बसत होती. खूप मजेदार दृश्य होते.

बर्कशायर आणि बकिंगहॅमशायर च्या सीमेवर वसलेले गाव मार्लो . इतके सुंदर आहे न, मधून थेम्स वाहते, बाजूला घरे आहेत. घराच्या मागच्या अंगणात नदी. प्रत्येकाची आपली छानशी बोट तिथेच पार्क केलेली. तिथल्या रस्त्याने चालत जाताना, आपण आजूबाजूच्या निसर्गचित्रात इतके रमून जातो न की "टेम्पल लॉक"ला कधी पोचलो ते लक्षातच येत नाही. उंच सखल टेकड्यांच्या भागातून नदी आपले रूप दाखवत वाहते. पण अशा उंच आणि लगेच खोल झालेल्या भागावरून बोटींनी कसे चालावे? त्यांच्या साठी हा "लॉक" असतो. बरेचदा ह्या बद्दल वाचले होते पण आज प्रत्यक्ष बघायचे होते. समोरून एका पांढऱ्या शुभ्र , सजवलेल्या बोटीतून आजोबा आले. बोट उभी केली. उंचावर होती ती. मग खालच्या भागातले पाणी वाढवण्यासाठी त्यांनी एक चक्र फिरवले. पाणी वाढले, तसे त्यांनी गेट उघडले. आता दोन समोरासमोर गेट च्या मध्ये बोट आली. जिथे जायचेय तो पुढचा भाग तर बराच खाली होता. आता ही बोट खाली कशी उतरणार बा? आजोबा पुन्हा बोटीतून बाहेर आले. मागचे गेट बंद केले. म्हणजे पाणी येणे बंद झाले. आता ज्या दोन गेट मध्ये बोट उभी होती, तिथले पाणी कमी करणे आले, म्हणजे पुढच्या भागाशी ते समतल होईल. मग पुन्हा त्यांनी एक चक्र फिरवले. तसे पाणी कमी होऊन बोट खाली खाली जाऊ लागली. पाण्याची पातळी एक झाली. आजोबांनी गेट उघडले, बोटीत उडी मारली, आमच्या सारख्या प्रेक्षकांना अभिवादन केले , बोट पुढे नेली, लॉकची स्थिती होती तशी केली आणि मजेत पुढचा प्रवास सुरु केला.

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments