पत्र क्र ८०
ब्रिटन मधल्या कॉट्स वल्डला आपण भेट देत आहोत. Area of outstanding natural beauty म्हणून जाहीर झालेला हा भाग. पर्यटक तर आकर्षित होतातच पण अधिकाधिक लोक येण्यासाठी त्यांचा खूप प्रयत्न असतो. अनेक प्रकारचे...
ब्रिटन मधल्या कॉट्स वल्डला आपण भेट देत आहोत. Area of outstanding natural beauty म्हणून जाहीर झालेला हा भाग. पर्यटक तर आकर्षित होतातच पण अधिकाधिक लोक येण्यासाठी त्यांचा खूप प्रयत्न असतो. अनेक प्रकारचे कार्यक्रम त्यासाठी आयोजित केले जातात.
मी तिथे एकीला, "इथे फेस्टिवल्स कोणते असतात?" असं विचारलं असता, तिने सांगितले,"फेस्टिवल्स? भरपूर असतात. साहित्य आणि संगीताचे खूप फेस्टिवल्स असतात. " आणि तिने वर्षभर चालणाऱ्या विविध संमेलनांची एक मोठी जंत्रीच वाचली. हा भाग अनेक संगीतकारांचे माहेरघर म्हणून ओळखला जातो. १८०५ मध्ये जन्मलेले एडविन रान्सफोर्ड पासून अगदी अलीकडच्या काळात जन्मलेल्या अनेक संगीतकारांच्या कारकिर्दीची सुरुवात कॉट्स वल्ड मधूनच झाली. म्हणूनच कि काय अनेक संगीत संमेलन इथे होतात. आणि त्या म्युझिक फेस्टिवल्स ना लांब लांबून लोक हजेरी लावतात.
तसेच काही प्रसिद्ध लेखक ही ह्या भागात होऊन गेले. स्ट्रॅटफोर्ड अपॉन एव्हन विल्यम शेक्सपियर चे गाव आहे. त्यांचे घर एक सुंदर स्मारक म्हणून जतन केले आहे. एक स्मारक नाही, ते गाव सगळेच शेक्सपियरमय आहे, त्याचे जन्म स्थान,
त्याचे घर, त्याचे थडगे, त्याचा पुतळा. बघावे तिकडे शेक्सपियर. कौतुक करावे तर ह्यांनीच असे वाटून जाते. लंडन च्या भर वस्तीत पण एका घरावर, "Samuel Johnson , Author, lived here , B १७०९, D १७८४" असा चकचकीत पितळी बोर्ड बघून मला अगदी भरून आले होते.
कॉट्स वल्ड मध्ये शेक्सपियर शिवाय अनेक प्रसिद्ध लेखक राहून गेले. अगदी अलीकडच्या जे के रोलिंग, जेन ऑस्टिन, सगळ्यांना कॉट्स वल्ड नी अनेक कलाकृतींसाठी प्रेरणा दिली. लोकांना संगीत आणि साहित्यात विशेष रुची आहे, आणि म्हणूनच अनेक प्रसिद्ध कलाकार इथल्या फेस्टिवल्स ना हजेरी लावतात. प्रत्येक कलाकाराच्या नावाचं , त्यांच्या कलाकृती असलेलं , संमेलन विविध वेळी विविध ठिकाणी भरवलं जातं.
अगदी शांत असलेला हा भाग अशा अनेक प्रसंगी जागून उठतो आणि सगळ्याच गोष्टींचे मनापासून रसग्रहण करतो.
इतक्या निसर्ग सुंदर भागात चित्रकार न झाले तरच नवल. आपल्या सारखे साधे लोक पण एखादे चित्र काढू शकतील असा सुंदर देखावा समोर असतो, तर मोठमोठे चित्रकार आले नाहीत असं कसं होईल न? अनेक आर्ट गॅलरीज इथे आहेत. सुंदर चित्रं त्यात दिसतात, आणि अनेक नवनवीन कलाकार येऊन आपल्या कलेचा कस तिथे अजमावत असतात.
कॉट्स वल्ड पॉटरी पण विशेष प्रसिद्ध आहे. अनेक मूर्तिकार इथे आहेत. इथला दगड प्रसिद्ध असल्याने दगडातून कोरलेल्या वस्तू पण आहेत. लोकर तर आहेच, त्यामुळे लोकरीच्या अनेक सुंदर वस्तू विणून त्याचे प्रदर्शन भरवतात. एक कायमस्वरूपी प्रदर्शन बाथ गावी आहे. त्यात १०० वस्तू मांडल्या आहेत. दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी इथे कलाकार आपल्या नवीन वस्तू मांडतात. एक सुई, दोन सुयांचे विणकाम करून उत्तम वस्तू बनवलेल्या असतात.
विल्यम मॉरिस कॉट्स वल्ड च्या आर्ट आणि क्राफ्ट्स चा जनक मानतात. त्यांचे उन्हाळी घर आता वस्तू संग्रहालय झाले आहे. त्यात सुंदर वस्तू अक्षरश: खच्चून भरल्या आहेत. तिथेच एक छोटेसे दुकान काही वेगळे नमुने आणि प्रतिकृती विकत असते.
तलम धाग्यापासून विणून तयार केलेले सुंदर कापड कसे विसरू शकतो आपण? पण सगळे डिझाइन्स निसर्गाचे सौंदर्य दाखवणारे. पडद्याचे कापड, गालिचे, सोफ्याचे कापड, म्हणजे अनेक कलाकृतीच. अनेक स्त्रिया सिल्क चे स्कार्फ आणि इतर वस्तू हातमागावर विणतात. चित्र मात्र प्रामुख्याने निसर्गाची.
तिथल्याच जंगलात होणाऱ्या ऍश , ओक, चेरी वगैरेंच्या खोडापासून, हाताने बनवलेले लाकडी फर्निचर आणि घरगुती वस्तू बघण्यासारख्या असतात.
एकूण काय, प्रेरणा देणारा निसर्ग सगळ्या कलाकारांना कामाला लावतो.
चार प्रकारचे ऋतू इथे असतात. उन्हाळा, पानगळ, हिवाळा आणि वसंत ऋतू. पाऊस अधून मधून हजेरी लावतो, पण ऑक्टोबर मध्ये जरा जास्त असतो. ते म्हणतात, इंग्लिश हवामान काही भरवशाचे नसते, केव्हाही काहीही घडू शकते. कधी पाऊस तर कधी ऊन. कॉट्स वल्ड मध्ये साधारण जून ते सप्टेंबर उन्हाळा असतो. ह्या काळात सूर्यास्त रात्री दहाच्या सुमारास होतो. ह्या मोठ्या उजेडाचा फायदा घेत अनेक संमेलनं , खेळ वगैरे भरवले जातात. दिवसा जरी ऊन असले तरी रात्री छान थंडी पडते. अनेक फुलं उमललेली बघायला मिळतात, विशेषतः गुलाबाची. अनेक फळं, स्ट्राबेरी ,रासबेरी वगैरे, पिकलेली असतात, शेतांमधून फळं वेचण्याचा पण कार्यक्रम असतो. ठराविक रक्कम भरून तुम्ही शेतात जायचे, त्यांनी दिलेला एक बॉक्स घेऊन. हवी ती फळे तोडून घ्यायची, त्या बॉक्स मध्ये मावतील एवढी.
पानगळ होण्यापूर्वी, वृक्ष पानांचे रंग बदलतात. हे फॉल कलर्स! वेगवेगळे वृक्ष वेगवेगळे रंग धारण करतात. निसर्गाची रंगपंचमीचा जणू. काही काळ पर्यंत हा रंग सोहळा अनुभवायला मिळतो. पानगळ झाली कि मात्र सगळं उजाड, कोरडं होऊन जातं . पुढे येणाऱ्या कठीण थंडीला तोंड देण्यासाठी हि तयारी.
थंडी खूप पडते. अनेक ठिकाणी बर्फ असतो. तापमान शून्याच्या खाली जाते. दवबिंदू गोठलेले असते. अनेक ठिकाणी केकवर पिठीसाखर भुरभुरल्या सारखा बर्फ दिसत असतो. पाऊस हजेरी लावत असतो. सूर्योदय सकाळी आठ नंतर होतो आणि दुपारी तीनच्या सुमारास सूर्यनारायण रजा घेतात. नाताळचा सण अशातच साजरा होतो. थंडीचा काळ जास्ती असतो. दिवस मोठा होण्याची आणि वसंत ऋतूची सगळे आतुरतेने वाट बघत असतात.
पुन्हा सृष्टी बहरते. कोवळ्या कोवळ्या पानांनी वृक्ष सजतात. वेगळेच रंग ह्या वसंत ऋतूत दिसतात. खूप फुलं जिकडेतिकडे उमलतात. कोवळी उन्ह, छानशी थंड हवा, भुरभुर पाऊस, असे हवामान झाडांना खुश करून जाते. वातावरणात एक प्रकारची प्रसन्नता भरून जाते.
अशा रंगीत ऋतूत कूपर हिल भागात एक मजेदार स्पर्धा घेतात.
दरवर्षी वसंत ऋतूतल्या बँकेच्या सुट्टीच्या दिवशी एक खेळ असतो
. सुंदर सजवलेल्या
, गोल लाकडी पेटीत चीज चे गोल चक्र बंद करतात आणि टेकडीच्या टोकावरून सोडतात
. ते घरंगळत खाली येऊ लागले कि
स्पर्धक त्याच्या मागे धावतात .
ते चक्र फिनिश लाईनपार करण्याआधी जो पकडेल तो जिंकला
. दोनशे वर्षांपूर्वी तिथल्या छोट्याशा खेड्यात सुरु झालेली हि स्पर्धा आता जगप्रसिद्ध झाली आहे. अनेक देशांचे स्पर्धक ह्यात भाग घ्यायला येतात. विजेत्यांना बक्षीस म्हणून चीज देतात. एका दिवसात अनेक स्पर्धा होतात. हल्ली स्त्रिया, पुरुष आणि मुलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा ठेवतात. दिवसभर धमाल चालते. सर्व ऋतूंची मजा घेतलीच पाहिजे न?
literature फेस्टिव्हल - जेन ऑस्टिन
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.