पत्र क्र ७९

जगाच्या पाठीवर कुठेही जा, त्या त्या भागाचे आपले असे एक वैशिष्ट्य असते. पदार्थ वेगवेगळे असतात. मानवी जीवनाला मनोरंजन आवश्यक असते, तर ते हि करायच्या प्रथा वेगवेगळ्या असतात. प्रत्येक भागाची मजा न्यारी...

कीर्ती वडाळकर
||4 min read

जगाच्या पाठीवर कुठेही जा, त्या त्या भागाचे आपले असे एक वैशिष्ट्य असते. पदार्थ वेगवेगळे असतात. मानवी जीवनाला मनोरंजन आवश्यक असते, तर ते हि करायच्या प्रथा वेगवेगळ्या असतात. प्रत्येक भागाची मजा न्यारी आणि आपण खुल्या मनाने तिथे जाऊन तिथल्या रहिवाशांच्या दृष्टिकोनातून , ती मजा अनुभवायला हवी. उगाच आपल्याशी तुलना करू नये असे मला वाटते.

आता हेच बघा न, कॉट्स वल्ड चा इतका निसर्ग सुंदर भाग. मग लोकांकडे कल्पना पण अनेक असल्याचं पाहिजेत.

एकूणच ब्रिटन मध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करतात. आणि खूप प्रकारच्या खेळांच्या स्पर्धा घेऊन मनोरंजन करत असतात. ऐतिहासिक वास्तू जपतात. इतिहासात रमतात.

कॉट्स वल्ड भागातले ब्रॉडवे टॉवर . १७९४ साली, जेम्स व्याट नावाच्या इंग्लिश आर्किटेक्ट ने बार्बरा नावाच्या एका श्रीमंत स्त्री साठी आखलेला वाडा म्हणजे ब्रॉडवे टॉवर . ह्या भागातील दुसऱ्या नंबरच्या उंचीची टेकडी म्हणजे ब्रॉडवे हिल. त्यावर हे टॉवर बांधण्याची कल्पना अशी होती कि लेडी बार्बराला एकदा असा विचार आला, हि टेकडी जर खरंच उंच असेल तर त्यावर अजून एक उंच टॉवर बांधल्यास, त्याच्या टोकावरून दाखवलेला लाईट आपल्या, वुर्स्टर च्या घरून दिसेल का? तिचे घर साधारण २२ मैल म्हणजे ३५ किलोमीटर दूर होते. झाले, मॅडम च्या ह्या कल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी इमारती चा आराखडा तयार झाला. दगडी बांधकामाचा सर्व खर्च तिने दिला. पासष्ट फुटी उंच टॉवर बांधून तयार झाला. आणि खरंच तिच्या घरून त्याच्या छतावर लावलेला दिवा दिसत होता. तीन गोलाकार बुरुजांच्या मध्ये खोल्यांसारखे बांधकाम केले आहे. उंच टेकडीच्या मधोमध उंच मनोरा. तिथल्या छतावरून खूप लांबपर्यंतचे सुंदर दृश्य दिसते.

इतके मोठे टॉवर बांधून तयार तर झाले, पण राहणार कोण? मग सुरुवातीच्या काळात तिथे सर थॉमस फिलिप्स ह्यांनी स्वतःचा छापखाना तिथून चालवला. १८७० च्या सुमारास तीन कलाकार, विल्यम मॉरिस, एडवर्ड ब्रन्ट जोन्स आणि डांटे गेब्रिएल रॉसेटी ह्यांना वापरायला दिले. सुंदर सुंदर कलाकृती, पेंटिंग्स वगैरे इथेच बनली. हल्ली मात्र पर्यटकांना ते खुले केलेले आहे. तिथे एक वस्तू संग्रहालय आहे. ह्या तीन कलाकारांनी केलेल्या काही वस्तू त्यात आहेत. बाहेरचे सुंदर दृश्य बघून झाल्यावर त्या संग्रहालयाला भेट देऊन आतल्या सुंदर वस्तू पण आकर्षित करून घेतात. बाजूला लांब लांब पर्यंत छान हिरवळ पसरलेली आहे. त्यावर काही हरणे चरताना दिसतात. मेंढ्या पण मजेत चरत असतात. ह्या टॉवर ला भेट फारच आवडली. ते ब्रॉडवे गाव पण खूप सुंदर होते.

ते चिपींग कॅम्पडेन गाव पण छान होते. पूर्वी तिथे मेंढ्यांचा मोठा बाजार भारत असे, म्हणून त्याला कॉट्स वल्ड चे मार्केट टाऊन म्हणतात. आजही तो दगडी मार्केट हॉल त्यांनी सांभाळून ठेवला आहे. तिथे एका चॉकलेट च्या दुकानात गेलो होतो. मागच्या भागात चॉकलेट्स बनत होती. वेगवेगळ्या आकाराची आणि प्रकारची सुद्धा. काही डार्क चॉकलेट्स, काही मिल्क, काही वेगवेगळ्या फ्लेव्हर्स ची. घरातील मुख्य स्त्री आणि बरोबर घरचाच मुलगा असावा. दोघे निगुतीने चॉकलेट्स बनवत होती. सोनेरी चंदेरी कागदांमधून गुंडाळून तयार करून देत होती. त्याचे पॅकिंग पण इतके सुंदर होते. परिसरात चॉकलेटचा सुगंध पसरलेला होता. त्या बाईंशी जरा बोलले. हा त्यांच्या कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय होता. चॉकलेटची रेसिपी पण त्यांची वेगळी होती, असे ती म्हणाली. मशीनचा वापर फार कमी होता. त्यांचे आकार काही साच्यांमधून काढत होती ती. काउंटर वर बसलेले काका, कोणी गिर्हाईक आल्यास कॅशियर बनत, बाकी वेळ पॅकिंग करत. ती म्हणाली, "आम्ही एका ठराविक प्रमाणात रोज चॉकलेट बनवतो आणि सगळी विकली जातात. कालची चॉकलेट्स आज स्वस्तात देऊन टाकतो. पण फारशी उरतच नाहीत. " मोठमोठ्या मॉल्स मधून

चॉकलेट्स नी खच्चून भरलेली कपाटे आपल्याला आकर्षित करतात पण ह्या दुकानात काहीतरी विशेष होते. ते कुटुंब अत्यन्त आपुलकी ने सर्व कामे करत होते.

तसेच एका बेकरीत पण गेलो. ताज्या ताज्या ब्रेड, केकचा सुवास भरला होता सगळीकडे. छोटे छोटे केक भाजून बाहेर येत होते. लाकूड जाळून त्यावर ओव्हन मध्ये ते भाजत होते. खमंग , खरपूस वस्तू तयार होत होत्या. हे पण त्यांच्या कुटुंबाचे दुकान होते. त्यात बऱ्याचशा कौटुंबिक, पारंपरिक रेसिपी होत्या. घरचीच मंडळी काम करत होती. त्या छोट्याशा बेकरीचे स्वरूप , तिथल्या वस्तू सगळंच नेत्रसुख देणारं होतं. वस्तू अतिशय चविष्ट होत्या. त्यांचेही तेच, एका दिवसात संपतील तितकेच आम्ही बनवतो. उरलेले संध्याकाळी स्वस्तात विकून टाकतो. नवा दिवस नवीन वस्तू.

खरं तर ती गावं खूप लहान होती. फारशी वस्तीपण तिथे दिसत नव्हती. पर्यटक आणि रहिवासी मिळून कितीशी विक्री होत असेल ह्या लोकांची?

थंड हवा आणि ताजे हिरवे गवत म्हणजे गायी आल्याचं. अनेक शेतमालक उत्तम प्रतीच्या गायी पाळून आहेत. त्यामुळे ह्या भागात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खूप असतात. ते लोक चहा कॉफीत तर क्वचितच दूध घालतात. पण बाकी बऱ्याच पदार्थांमध्ये क्रीम वापरतात. लोणी आणि चीज मात्र सढळ हस्ते वापरतात. इथल्या अनेक ठिकाणचे चीज प्रसिद्ध आहे.

सगळ्या गोष्टी मशिन्स च्या मदतीने होत असल्या तरी ह्या भागात बेकारी फार कमी आहे . लोक कष्टाळू आहेत. लोकर उत्तम प्रतीची तयार होत असल्यामुळे लोकरीचे कापड विणण्याचे माग पण आहेत.

Area of outstanding natural beauty म्हणून प्रसिद्ध असला तरी कॉट्स वल्ड भागात मुख्य व्यवसाय आहे स्थावर मालमत्तेची खरेदी विक्री आणि जागा भाड्याने देणे. त्यानंतर शेती आणि पशुपालन हा मोठा व्यवसाय. मेंढ्यांबरोबर गायी आणि डुकरे पण पाळतात. मांसविक्री हा एक त्यातूनच निघणारा व्यवसाय. मत्स्यपालन करतात. शिक्षण क्षेत्र हि प्रगत आहे आणि त्यावर अनेक लोक उदरनिर्वाह करतात. पर्यटन तर आहेच. आणि पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. काय काय ते बघूच.

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments