पत्र क्र ७८

खूप रंगांची उमललेली अनंत फुले. चालवत रहा गाडी. रस्ते पण सुंदर आहेतच, गर्दी नसते सुट्टी नसेल तर. तशी ती लंडन वगळता फारशी कुठे दिसतच नाही. वातावरणात खूप शांतता. नैसर्गिक रंगांची उधळण सगळीकडे. मधेच पाऊस...

कीर्ती वडाळकर
||4 min read

तर आपण इंग्लंड च्या कॉट्सवल्ड भागात फिरत होतो. खरंच सांगते, आजही सगळं दृश्य डोळ्यासमोर आहे. रस्त्याच्या दुतर्फा, बघावे तिकडे छान , घट्ट , हिरव्या गवताने आच्छादलेल्या ,छोट्या छोट्या टेकड्या, मधेच मेंढ्या चरत आहेत. कुठेतरी छोटेसे गाव लागते. पिवळसर रंगाच्या दगडात बांधलेली , सारख्या आखणीची, उतरत्या छपरांची घरे. सभोवती सुंदरसा बगीचा. त्या घरांना ते "मधाच्या" रंगाची घरे म्हणतात. कुठेतरी खूपसे फळांचे मळे. पुढे भाजीचे हिरवेगार शेत. मधेच एखादा सुंदरसा पक्षाचा थवा उडतो. शेतांच्या मधून पाण्याचे ओहोळ लचकत मुरडत वाहणारे. कुठेतरी खूप रंगांची उमललेली अनंत फुले. चालवत रहा गाडी. रस्ते पण सुंदर आहेतच, गर्दी नसते सुट्टी नसेल तर. तशी ती लंडन वगळता फारशी कुठे दिसतच नाही. वातावरणात खूप शांतता. नैसर्गिक रंगांची उधळण सगळीकडे. मधेच पाऊस उगाच शान मारून गेला आहे. पण त्यामुळे सगळीकडे छान गारवा पसरलाय, झाडं डोक्यावर पाण्याचे थेंब मिरवत आहेत , गवत पण एकदम चमकायला लागले आहे. सूर्य पुन्हा ढगातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय.

बर्टन ऑन द वॉटर , कॉट्सवल्ड मधलं एक सुंदर गाव. तुमची गाडी नीट पार्क करा गावातील मुख्य रस्त्याच्या जवळपास, आणि चला गाव फिरायला. ह्या गावात कोणी राहतेय का नाही? असा प्रश्न पडावा, इतके स्वच्छ आणि सुंदर. जेमतेम सव्वा तीन हजार लोकवस्तीचे, ग्लुसेस्टर शायर मधले गाव. रिव्हर विंडरश वाहते गावातून. आणि त्या गावाला अजूनच सुंदर करून जाते. नदी म्हटल्यावर आपल्या डोळ्यापुढे येणारे विस्तीर्ण पात्र बाजूला करा. ह्या नदीची रुंदी साधारण १२ ते १५ मिटर हा फक्त. आणि पाणीही उथळ. अहो जास्ती रुंद किंवा खोल कशी असेल? चित्रातल्या नदीसारखी वाटणार नाही न मग ती ? दोन्ही काठ दगडात बांधून पक्के केलेत त्यामुळे अजूनच सुंदर दिसते. काठावर छानशी हिरवळ आहे. ह्या काठावरून त्या काठावर जायला, ठिकठिकाणी अनेक सुंदर साकव बांधलेत. ते गावाच्या सौंदर्यात भर घालत आहेत. स्वच्छ अशा नदीच्या पाण्यातून अनेक पाणपक्षी मजेत विहरत आहेत. काही बाजूच्या हिरवळीवर पंख सुकवत आहेत. अनेक रंगाचे ते पक्षी उगाचच भाव खात आहेत. लहान मुलांसारखे आपण मजेत ह्या साकवावरून पलीकडे जाऊ आणि त्या पलीकडच्या साकवावरून इकडे येऊ, जरा मज्जा. गोल कमानीच्या त्या साकवावर, मधोमध उभे राहू आणि दोन्ही कडच्या नदीचे सौंदर्य डोळ्यात भरून घेऊ. तो बघा नॉर्दर्न शॉवलर , हिरव्या डोक्याला नितळ सुंदर पाण्यात डुबकवून काढतोय पूर्ण कोलांटी मारून. आणि ती बदकं बघा, पंख सुकवत आहेत काठावर. पण आता पुढे चला हा. पलीकडे ते मोटर म्युझियम बघा. बाहेर ती प्रतिकृती किती छान केलीय न, गाडीला पूर्ण वेढलेय झाडांनी. आत जुन्या कार आणि खेळण्यांचा संग्रह आहे. आणि इकडे डावीकडे बघा, नदीच्या ह्या काठाने निवांत चहा कॉफी पीत , काहीतरी खात बसायला किती सुंदर पण छोटी छोटो हॉटेल्स आहेत. इथे ब्रेकफास्ट भरपूर करा, दुपारचे जेवण करा, संध्याकाळची ब्रिटिश लोकांची टी पार्टी करा. फारशी गर्दी नसल्यामुळे मजा येते. बाजूलाच ते हस्तकलेच्या वस्तूंचे दुकान बघा. ती फ्रिज मॅग्नेट जरा बाजूला ठेवा, इथे नाही बनलीत ती. इथले ते छोटेसे दुकान बघू या. कॉट्सवल्ड पर्फ्युमरी . मस्त वास आला न गुलाबाचा? ते छोटे छोटे दागदागिने पण मस्त आहेत. मोजून ९, १० दुकानं . अरे ते लोकरी आणि धागे विकणारे दुकान बघा, ते तर हवेच न? ते पुरातन वस्तू चे दुकान बघा, आणि टी रूम पण. इथे संध्याकाळच्या चहाला खूप महत्व बरं . चहा तर घ्यायचाच गरम पण सोबत बिस्कोटी, टोस्टेड केक, ब्राउनी असलं काही खायचं. मग रात्री जेवायला फारसं काही नसतं , एखादे सूप वगैरे , बस. आणि ते लेदर वस्तूंचे चे दुकान पहा, नावंच शिप स्किन, इथे सगळे त्या मेंढयांभोवतीच फिरते. पॉटरी पण सुंदर न? इतकी छोटी छोटी दुकानं आहेत ही, बाहेरून बघताना वाटणार पण नाही न आत काही फारसं विकत असतील ते? पण इथे नैसर्गिक सौंदर्य सोडल्यास भव्य काहीच नाही.

चला जरा गावातून फेरफटका मारू. काय सुंदर घरं आहेत न? आणि बगीचे पण. मात्र गावात जनता काही फारशी दिसत नाही. मात्र हे गाव पर्यटकांचे अगदी आवडते बरं का. बघितलं नाही त्या दुकानांमधून वस्तूंच्या किमती? अरे त्या पलीकडच्या घरात बघा, एवढी जास्त फुलं कशी आली असावीत बा ? हा हवा, पाणी किती छान आहे. पण ह्या झाडांचे संगोपन हि खूप करावे लागते. त्या म्हाताऱ्या आजी बाई करत आहेत बागकाम. आजोबा पण मदत करत आहेत. वा, छानच!

रस्त्याच्या मधोमध खांबांवर, कडेला, फुटपाथच्या बाजूला केवढी फुलं ! त्या लोकल काऊंटी चा उद्योग हं हा. आणि वर टांगलेले ते प्रचंड मोठे प्लॅंटर्स पण बघा. केवढी सुंदर फुलं डोकावत आहेत त्यातून. आधीच सगळा भाग "Area of outstanding natural beauty " त्यात लोकल काऊंटी आणि रहिवासी पण चार चांद लावतात.

ही विंडरश नदी किती सुंदर आणि स्वच्छ आहे न पण फारशी खोल नाही ती. दर वर्षी उन्हाळ्यात ह्या नदीच्या पात्रात एक मजेदार स्पर्धा होते, फुटबॉल ची. त्याला ते मेडिएव्हल फुटबॉल म्हणतात. सव्वाशे वर्ष जुनी हि प्रथा, एका दुपारी, कंटाळलेल्या काही लोकांनी सुरु केली. ते सहज म्हणून त्या नदीच्या गुढघाभर पाण्यात उतरले, आणि खेळायला लागले. तेव्हापासून आजतागायत हि प्रथा पाळली जात आहे.

प्रेक्षक काठावर खुर्च्या टाकून बसतात. खेळाडू पात्रात उतरतात. रेफ्री काहीतरी फॅन्सी ड्रेस करून आलेले असतात. गोलपोस्ट पण नदीच्या पात्रातच असते. आणि खेळही फ़ुटबॉलचाच असतो पण एका चमूत फक्त पाच जण असतात. प्रति पक्षाच्या खेळाडूला किती जास्तीत जास्त भिजवता ह्यात सगळा खेळ असतो. अक्षरश: त्या खेळाडूला नदीत बुडवायचे, ह्या सगळ्यात दोन्ही काठावरच्या प्रेक्षकांना हि खूप भिजवायचे. सगळ्यांना आधीच सांगितलेले असते तुम्हाला भिजायचे नसेल तर लांब बसा किंवा रेनकोट घालून या. नदीचे पाणी खूप थंड असते, जोडीला गार वाराही वाहत असतो. अर्धा तास नुसता पाण्याचा जल्लोष असतो. तिथल्या फुटबॉल च्या टीम साठी ह्यातून निधी जमवतात.

बाकी दिवस कोणी त्या नदीला त्रास देत नाहीत. आणि पाण्यात उतरत ही नाहीत.

किती मजा येत असेल न, त्या पाण्यात गोंधळ घालायला?

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments