पत्र क्र ७७
अतिशय सुंदर म्हणून प्रसिद्ध असलेला ब्रिटन मधला कॉट्सवल्ड हा भाग. ८०० वर्ग मैल एवढ्या मोठ्या भागावर आणि पाच राज्यांमधून पसरलेला. अजूनही विसाव्या शतकात असल्यासारखा , जुन्या इंग्लिश सिनेमांमधून दिसायचा...
अतिशय सुंदर म्हणून प्रसिद्ध असलेला ब्रिटन मधला कॉट्सवल्ड हा भाग. ८०० वर्ग मैल एवढ्या मोठ्या भागावर आणि पाच राज्यांमधून पसरलेला. अजूनही विसाव्या शतकात असल्यासारखा , जुन्या इंग्लिश सिनेमांमधून दिसायचा तसाच भाग. कॉट्सवल्ड शब्दाचा अर्थ छोट्या छोट्या टेकड्यांवरच्या मेंढ्या बांधायच्या जागा! तिथे खरंच खूप सुंदर छोट्या छोट्या टेकड्या आहेत. लांब लांब पर्यंत सुंदर हिरवळींनी आच्छादलेल्या ! शेती पण भरपूर कारण सर्वार्थाने समृद्ध भाग आहे तो. ह्या भागात चुनखडीच्या दगडांचे डोंगर आहेत. विविध रंगांचे दगड असलेले डोंगर आहेत. हाच दगड वापरून घरे बांधलेली दिसतात. एकाच रंगाची सगळी घरे. खूपशा मेंढ्या असल्यामुळे अर्थातच तिथली लोकर फार प्रसिद्ध आहे. "Area of outstanding natural beauty " म्हणून १९६६ साली ह्या भागाला विशेष दर्जा मिळाला. आणि ते निसर्ग सौंदर्य त्यांनी आजता गायत जपलेले आहे.
अनेक सुंदर सुंदर गावांतून आम्ही तिथे फिरलो. इतके रम्य आणि आखीव रेखीव. खरंच चित्रातले दृष्य प्रत्यक्ष अवतरलेले वाटत होते. कुठेही मोठ्या मोठ्या इमारती नाहीत, काँक्रिटचे जंगल नाही, कान छेदणारे आवाज नाहीत, एक मुख्य रस्ता सोडल्यास फारशी कुठे वाहने नाहीत. शांतता वातावरणात भरून होती.
बर्टन ऑन द वॉटर, ब्रॉडवे, बरफोर्ड , चिपींग कॅम्पडेन , चिपींग नॉर्टन, मोअरटन इन मार्श, स्टो ऑन द वर्ल्ड, अशी मजेदार नावे . बऱ्याच गावांची नावे म्हणजे एकामागोमाग येणारे ट्रेनचे डब्बे! नाव म्हणता म्हणता बराच वेळ जाईल. पण ती सगळीच गावं इतकी सुंदर आहेत न. कोणी म्हणे बर्टन ऑन द वॉटर गाव सगळ्यात सुंदर आहे, कोणी म्हणे कासल कोंबे खूप सुंदर आहे, पण उडदामाजी काय निवडावे, काळे आणि गोरे? हि छोटी गावं तर आहेतच पण बाथ, ग्लुसेस्टर, स्वीन्डन अशी जरा मोठी गावं पण आहेत. ऑक्सफर्ड चा भाग कॉट्सवर्ल्ड मध्ये येतो. चिपींग कॅम्पडेन हे विविध कला आणि खेळांचे सेंटर मानले जाते. सतराव्या शतका पासून तिथे दर वर्षी कॉट्सवर्ल्ड ऑलिंपिक खेळ घेतले जातात. आठशे वर्ग मैलांच्या भागातील जवळजवळ ऐंशी टक्के भागावार शेती आहे. चालण्यास रम्य असल्यामुळे ३००० मैलांपेक्षा जास्त लांबीचे फुटपाथ आहेत. आणि ४००० मैलांपेक्षा जास्त लांबीच्या दगडी भिंती आहेत. सगळी बांधकामे दगडीच आहेत.
अति सुंदर नैसर्गिक सौंदर्याचा भाग जाहीर झाल्यापासून इथे पर्यटन वाढीला लागले. लंडन स्थित अति श्रीमंत व्यक्ती इथे घरे घेऊन , हवापालट करायला येऊ लागल्या. ह्या भागाचा मुख्य व्यवसाय पर्यटन असला तरी शेतीतून सुद्धा चांगले उत्पन्न मिळते. सगळीकडे हिरवाई दिसतच होती. लांब लांब पर्यंत शेतीचा विस्तार दिसत होता. गवताळ प्रदेश पण अर्थातच आहे कारण हा भाग मेंढयांसाठी प्रसिद्ध आहे. अत्यन्त प्रगत मशिन्सच्या साहाय्याने शेती होताना दिसते. गहू, बार्ली, तेलबिया, भाज्या, फळे इथे मुबलक होतात. हवा स्वच्छ, पाणी मुबलक अशा सर्वार्थाने पूरक वातावरणात चांगले पीक न आले तरच नवल. कॉट्स वर्ल्ड भाग तिथल्या लांब लांब पसरलेल्या लॅव्हेंडर फार्म साठी पण प्रसिद्ध आहे. जेव्हा हि सगळी, जांभळी जांभळी , लॅव्हेंडर ची फुले एकदम फुलतात, तेव्हा परिसराला भेट देणे म्हणजे डोळ्यांचे पारणे फिटणे ह्या उक्तीचा प्रत्यक्ष प्रत्यय. ग्लुसेस्टर भागात पॉपी ची शेती पण आहे. दूर दूर पर्यंत दिसणारी केशरीसर पॉपीची फुले हवेवर मजेत डोलताना बघणे हा एक छान अनुभव.
मेंढ्या खूप असल्यामुळे लोकर ह्या भागातील फार छान असते. लोकरीच्या वस्तू विणून त्या गावच्या दुकानांमधून विक्रीला दिसल्या. दोन हजार वर्षांपूर्वी रोमन लोक ह्या भागात आले. थंडी खूप असल्यामुळे ते स्वतःच्या मेंढ्या घेऊन आले होते. आणि तेव्हापासून लोकर व्यवसाय सुरु झाला असे सांगण्यात येते. मुळात, कॉट्स ह्या शब्दाचा अर्थ मेंढी. रोमनांनी त्यांच्या मेंढ्या जाताना इथेच सोडून दिल्या. मग त्या मेंढ्या , आधी लोकल चर्च नी घेतल्या आणि नागरिकांच्या हवाली केल्या. त्यांनी दूर दूर पसरलेल्या गवताळ प्रदेशात ह्या मेंढ्या चारून, त्यांची लोकर काढून विक्री सुरु केली. थोड्याच कालावधीत हि लोकर जगप्रसिद्ध झाली. इटली, रोम, आणि नंतर संपूर्ण युरोप इथून लोकर खरेदी करू लागले. उत्तम दर्जाची हि लोकर इंग्लंड ला खूप परकीय चलन मिळवून देऊ लागली. आणि मध्ययुगा पर्यंत गमतीने असे म्हणत कि इंग्लंडची अर्धी संपत्ती मेंढीच्या पाठीवर आहे. इथल्या उंच सखल टेकड्या, गवताळ प्रदेश, पाण्याचे अनेक ओहोळ आणि स्वच्छ हवा ह्यामुळे उत्तम दर्जाची लोकर प्राप्त करण्यास वातावरण पोषक ठरेल असा रोमनांचा कयास थोड्याच अवधीत खरा ठरला.
चिपींग कॅम्पडेन , बरफोर्ड , स्टो ऑन द वर्ल्ड, वगैरे गावांमधून फिरताना आजही
राखीव शेफर्ड्स लेन सांभाळलेल्या दिसतात . अनेक मेंढ्या व्यवस्थित घेऊन जाण्यासाठी ह्या लेनस ची आखणी आणि बांधणी अगदी विचारपूर्वक केली होती . जेव्हा इथून लोकरीचा मोठा व्यापार होत असे तेव्हा इथे एक मेंढ्यांचा बाजार भरत असे. असं म्हणतात, वीस हजार मेंढ्या एका वेळी बाजारात असत. त्या व्यवस्थित आत आणण्यासाठी ह्या लेन होत्या. प्रत्येक लेन ला एक दरवाजा होता, जेणेकरून एकदम सगळ्या मेंढ्या आत न सोडता ठराविक आकडे आत सोडत. आणि गोंधळ कमी उडे . कॉट्स वर्ल्ड लायन जातीच्या मेंढ्या सगळ्यात लोकप्रिय होत्या. त्यांच्या पासून सोनेरी रंगाची लोकर मिळे. तिचा भाव सगळ्यात जास्ती असे. ह्या मेंढीला कधी कधी विक्रेते सोनेरी पावडर फासून पण आणत , जास्ती भाव मिळण्यासाठी. मेंढीला लोकर विक्रीसाठी नेण्याआधी, स्वच्छ करून, तिचे केस व्यवस्थित करून पाठवत. उगाच गुंतलेले केस भाव कमी करणार. अगदी सोन्याचांदीसारखा हा लोकरीचा व्यापार चाले.
आजही काही भागात "कॉट्स वर्ल्ड लायन" बघायला मिळतात. ह्या भागातील अजून एक जाणवण्यासारखी गोष्ट म्हणजे इथले "वुल चर्चेस". लोकरीच्या व्यापारातून मिळालेल्या भरमसाठ पैशातून श्रीमंत झालेल्या व्यापाऱ्यांनी, खेडोपाडी भव्य अशी दगडी चर्चेस बांधली. त्यावर आपले नाव मोठमोठ्या पितळी पाट्यांवर घालून लावले . आपल्या लोकरीचा मार्क पण ठेवला. चिपींग कॅम्पडेन चे , १२० फूट उंच टॉवर असलेले सेंट जेम्स चर्च, खूप लांबूनच दिसायला लागते. ते बांधणारे ग्रेवेल कुटुंब होते, त्यांच्या नावाची अति भव्य पाटी त्या चर्चवर आहे. त्याच्या समोरच त्या कुटुंबाचे अति आलिशान असे घर आहे, त्यावरून ह्या व्यापाऱ्यांनी किती धन जमवले असू शकते त्याची कल्पना करता येते. समोरच
एक भव्य हॉल आहे जिथे अनेक लोकर व्यापारी भेटत असत. असाच देखावा अनेक गावांमधून आहे. एकूणच ह्या मेंढ्यांनी त्यांना किती तारून नेले बघा.
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.