पत्र क्र ७६

साधारणपणे ग्रेट ब्रिटन मध्ये फिरायला गेलं कि लंडन, मँचेस्टर, बर्मिंगहॅम , ग्लासगो, अशी मुख्य शहरे बघितली जातात. ही शहरे तर सुंदर आहेतच आणि विचारपूर्वक वसवली आहेत. पण ब्रिटनची ,"कंट्री साईड " मला...

कीर्ती वडाळकर
||4 min read

साधारणपणे ग्रेट ब्रिटन मध्ये फिरायला गेलं कि लंडन, मँचेस्टर, बर्मिंगहॅम , ग्लासगो, अशी मुख्य शहरे बघितली जातात. ही शहरे तर सुंदर आहेतच आणि विचारपूर्वक वसवली आहेत. पण ब्रिटनची ,"कंट्री साईड " मला जास्ती आवडली. ह्या , मुख्य शहरांपासून लांब असलेल्या भागात फिरताना एक लक्षात आलं, कुठल्याही भागात जा, सगळं सारखंच दिसतं . स्वच्छ, आणि चांगले रस्ते. खूपशी झाडं . आखीवरेखीव बागा . घरांचे आकार सारखेच. एखादा ओहोळ, पाट जवळपास वाहत असेल तर त्याचे सौंदर्यीकरण इतकं मस्त केलेलं असेल.

प्रत्येक गावात, त्याला खेडं म्हणायची हिम्मत नाही हो माझी, पण ते मात्र village म्हणतात, एक मुख्य रस्ता. नदी, ओहोळ, पाट वाहत असेल तर त्याच्या बाजूनी जाणारा चालण्याचा रस्ता. त्यावर कल्पकतेने बांधलेले छोटे छोटे साकव . त्यात विहरणारे अनेक पक्षी. नदी, कालवा नसेल तर मुख्य रस्त्याच्या बाजूलाच चालण्याचा सुंदर रस्ता. लोकल काऊंटी तर्फे रस्त्यावर टांगलेल्या मोठ्या मोठ्या कुंड्या, त्यातून डोकावणारी रंगीबेरंगी फुले. एखादे खेळाचे मैदान, तिथेही जमेल तसा बगीचा. गावाच्या टोकाला एक दगडी बांधकामातील चर्च. त्याच्या बाजूला गावाची दफनभूमी. मुख्य चौकात एक युद्ध स्मारक. त्यावर रोज नव्याने चढवले जाणारे पुष्पचक्र. एखादे वस्तू संग्रहालय. एक किराणा आणि जनरल सामान विकणारे सुपर मार्केट. मुख्य रस्त्याच्या टोकाला एक पब. एखादे खाद्य वस्तू विकणारे हॉटेल सारखे दुकान. एक बेकर. हा एक अजून महत्वाचे, विसरून चालणार नाही, त्या त्या गावाचा एक चॉकलेटीयर. त्याचे हटके चॉकलेट्स घडवण्याची आणि विक्रीची जागा, एखादे छानसे दुकान, जिथे तुम्ही त्या चॉकलेट्स ची घडाई बघू शकता. एक गावाच्या हस्तकलेच्या वस्तू विक्री करणारे दुकान. एक गावात बनलेले अत्तर विकणारे दुकान.

मुख्य रस्त्याला छेद देत, आत जाणारे छोटे रस्ते. त्यांच्या दुतर्फा सुंदर बगीचे असलेली एकाच छापातील बैठी घरे. गावाच्या एका भागात लोकांना चालण्यासाठी, पिकनिक करण्यासाठी एक वेगळा बगीचा, त्यात अर्थातच एखादा तलाव, बसण्याची जागा, चालायला रस्ता, गाड्या ठेवायला मोठा पार्किंग लॉट. तिथे सगळे स्वयंचलित, गाडी लावा, मशीन मध्ये पैसे भरा. आत जा. सगळ्या परिसरात एक विलक्षण शांतता. गावात तर कुठेही कोणाचा फारसा आवाज नाही.

चालायला जाताना समोरून येणाऱ्या व्यक्तीला प्रेमाने हसून, काहीतरी बोलून अभिवादन केलेच पाहिजे. "छान सूर्यप्रकाश आहे न आज?" किंवा "जरा थंडी वाढलीय न?" किंवा, "तुमचा दिवस छान जाओ आज" किंवा, "किती स्मार्ट कुत्रा आहे तुमचा" वगैरे अगदी निरुपद्रवी वाक्य टाकायची. एक सुंदरसे हसू चेहऱ्यावर पसरायचे. आणि पुढे जायचे. तुम्ही वेगात चालत असाल तर थांबायची गरज नाही, त्या त्या प्रहराचे अभिवादन करा, स्मित करा, पुढे चला. माझ्या वडिलांनी तर इतक्या लोकांशी मैत्री केली होती त्या बगिच्यात येणाऱ्या लोकांशी आणि सगळ्यांना ते आपल्या देशाची, संस्कृतीची माहिती द्यायचे. ती मंडळी पण एकदम फॅन झाली होती वडिलांची.

गावात वातावरण एकदम सौहार्दपूर्ण. उगाच कोणी कोणाचे स्वातंत्र्य भंग होईल असे वागायचे नाही. आपला परिसर सुंदर ठेवायचा.

ते गावचे पब म्हणजे सगळ्यात "happening " जागा. इथून जायच्या आधीपर्यंत, "पब" म्हणजे दारुडे लोक जमून , दारू पिऊन धिंगाणा घालत असावेत अशी जागा, असा समज होता माझा. पहिल्याच दिवशी भावाने सांगितले ," तुला पब मध्ये नेतो". "बापरे! असली शिक्षा नको. करू काय मी तिथे? " म्हणाला, "बघ तर काय आहे तिथे ते" . तर गेलो, त्यांच्या गावाच्या पब मध्ये. साधारण शुक्रवार, शनिवार ची संध्याकाळ ह्या सर्व पब मध्ये खूप गजबज असते. गावातील मंडळी एक एक करून जमतात. एखादे साधेसे, त्या पब वाल्याने बनवलेले पेय ऑर्डर करतात. तिथे मोठ्या टीव्ही वर एखादा सामना चालू असतो. त्यावर मंडळी त्वेषाने तुटून पडतात. जो खेळाडू चुकेल त्याच्या नावाने इथे शिमगा करतात. त्यांचा खेळाडू किंवा संघ जिंकला तर जलसा, नाहीतर दुखवटा. दोन्ही कारणासाठी एक अजून "पाईंट " घेतात. मग कसे मस्त जिंकले, काय मस्त गोल केला, काय विकेट काढली, अशा चर्चा सुरु होतात. हरले असतील तर मात्र शिव्याशाप. आणि सगळ्या सामन्याचा उहापोह, असे कसे केले त्याने? अरे जरा पुढे होऊन मारायचे न? वगैरे सल्ले देण्याची स्पर्धा सुरु होते. हे करताना एकीकडे पेय संपत जातात. चर्चेचे विषय ज्वलंत असतात, पण वादग्रस्त नसतात. सगळे ती संध्याकाळ पूर्णपणे जगतात, पुढच्या आठवड्याला लागणारी भावनिक शिदोरी घेऊन, उशिराने घरी जातात. एखादा फारच ढगात गेला तर तो पब चा मालक त्याला अगदी घरी पोहचवून येतो. एकूण काय गावातील "सांस्कृतिक घडामोडीची" जागा म्हणजे पब. हसूच आले मला. गावात राहणारे ज्येष्ठ नागरिक ह्या संध्याकाळची वाट बघत असतात. त्यांना त्यांची मित्र मंडळी भेटणार असते, जरा विचारांची देवाण घेवाण होणार असते.

कुठल्याही गावात शनिवार, रविवार जरा चहल पहल असते. रविवारच्या संध्याकाळपासून शुक्रवारच्या संध्याकाळपर्यंत गावात शांतता. सगळे आपापल्या उद्योगात व्यस्त. गावात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांना सगळे मदत करतात.

लोकल काऊंटी घरांचा एक आराखडा पारित करते. कोणालाही त्यात फारसा बदल करण्याची परवानगी नसते. प्रत्येकाने आपल्या घराभवती सुंदर बाग लावणे अपेक्षित असते कारण त्यामुळे गावाच्या सुंदरतेमध्ये भर पडणार असते. काही ज्येष्ठ लोकांना जमत नसेल तर स्वयंसेवक असतात मदतीला. काहींना फार आवड असेल बागकामाची तर गावाबाहेर छोटे जमिनीचे तुकडे भाड्याने घेऊन ते तिथे आपली आवड जोपासू शकतात.

हे सगळं सगळ्याच गावांमधून साधारण थोड्या फार फरकाने सारखंच असलं तरी प्रत्येक गावाचे एक काहीतरी वेगळे वैशिष्टय आहे. ते जपण्यासाठी सगळं गाव झटत असतो.

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments