पत्र क्र ७५

तर सगळं काही मरण्यासाठी! तुमची कलाकारी मरण्यासाठी, तुमचे काम मरण्यासाठी, तुमचे वागणे मरण्यासाठी , तुमची पूजा मरण्यासाठी, तुमची कमाई मरण्यासाठी आणि तुमचे जीवन पण मरण्यासाठी! चमकलात न? मी पण चक्रावले...

कीर्ती वडाळकर
||4 min read

... कधीतरी कुठेतरी

तर सगळं काही मरण्यासाठी! तुमची कलाकारी मरण्यासाठी, तुमचे काम मरण्यासाठी, तुमचे वागणे मरण्यासाठी , तुमची पूजा मरण्यासाठी, तुमची कमाई मरण्यासाठी आणि तुमचे जीवन पण मरण्यासाठी! चमकलात न? मी पण चक्रावले होते हे ऐकून. अरे, एवढे मौल्यवान जीवन मिळालेय तुम्हाला, मरण्यासाठी कसले जगता? पण बालीत तिथल्या प्रथेप्रमाणे कुणाचेही मरण हे अतिशय महत्वाचे.

तर झाले असे, ती गज गुहा शोधत फिरत होतो. त्यात शोधण्यासारखे काही नव्हते, मी गज गुहा म्हणत होते आणि आमचा न्योमान "गोआ गजा "! एकदाचा दोघांच्या भाषेचा ताळमेळ जमला आणि आम्ही पोचलो त्या प्राचीन उत्खनन केलेल्या मंदिरात. गुहेमध्ये गणपती ची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे, ती त्या जागेच्या

उत्खननात सापडली आहे. . इतरही काही मूर्ती आहेत. ह्या मंदिरात मात्र सरसकट सगळ्यांना प्रवेश कारण ते म्हणे उत्खननात सापडलंय अजून त्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा झालेली नाही. तिथे सगळ्या पाट्यांच्या वर, मधोमध, "sari " असे लिहिलेले होते. मला वाटलं, अरे इथे पण साड्या मिळतात कि काय? आमच्या गाईडला विचारले, त्याने त्या शब्दाचा उच्चार "सिरी" केला. म्हणाला, "काहीही लिहिण्या अगोदर त्या कोऱ्या पाटीवर सिरी लिहायचे" . अरे म्हणजे आपण "श्री" लिहितो तसेच कि! एकूणच मला आपल्यात आणि त्यांच्यात बरेच साम्य आढळले. चातुर्वर्ण पण आहेत आणि थोड्याफार फरकाने त्या नावांचा उच्चार ही आपल्यासारखाच आहे.

समुद्रकिनारी एका निवांत बाजारात गेले होते. मला बघून सगळ्या विक्रेत्या कुठलेसे हिंदी सिनेमाचे गाणे म्हणू लागल्या. मला म्हणे आम्ही सगळ्या हिंदी सिरियल्स आणि सिनेमे बघतो. मी मुंबईहुन आलेय सांगितल्यावर खूप खुष झाल्या माझ्यावर. अगं , मग तू रोजच लता मंगेशकर आणि अमिताभना भेटत असशील न? आमचा निरोप सांग हा त्यांना आम्हाला आवडतात ते. मुंबई म्हणजे त्यांना त्यांच्या गावासारखीच छोटीशी वाटली बिचाऱ्यांना.

एक जण म्हणे, "भारतीय स्त्रियांची काय मजा आहे नुसती , काही कामच नसते. सकाळी उठा, मेकप करा, बांगड्या घाला, भरजरी कपडे घाला. म्हणून तुम्ही सगळ्या इतक्या सुंदर दिसता. घरकामाला नोकर. तुम्ही फक्त नाचगाणे करत असता. आणि तरी पण भांडता एकमेकींशी, कशाला असं करता ग? आम्ही बघ, किती कष्ट करतो, मरण्यासाठी पैसा कमवतो. तुम्हाला तर सगळं आयतं मिळतं . "

मी कपाळावर हात मारून घेतला. तिला समजावयाचा निरर्थक प्रयत्न केला, "अगं , असं काही नाही बाई, भारतीय स्त्रिया किती कर्तृत्ववान असतात, केवढ्या शिकतात , कष्ट करतात. ते नोकर असणं वाटतं तितकं सुखावह नाही ग. " वगैरे. पण त्या कोणीच मानेनात , म्हणे," असं असेलच तर कुठल्याच सिनेमात किंवा सिरीयल मध्ये तसे का नाही?" आता काय सांगावे?

तिथल्या एका गावातुन जाताना बराच मोठा जलसा दिसला. गाडी बाजूला उभी करून आमचे गाईड आणि ड्रायवर तिकडे जाऊन आले. "काय होते रे?" तर म्हणे, " अंत्येष्टी". मी काही विचारायच्या आत त्याने सांगितले, "पण हि फायनल अंत्येष्टी नाही". आता त्यात सेमी फायनल आणि फायनल काय?

बालीत मरण सगळ्यात खर्चिक. जाणारा तर जातो, उरलेल्या लोकांपुढे प्रश्न निर्माण होतात. अंत्ययात्रा खूप थाटामाटात , वाजतगाजत झालीच पाहिजे. कोरीव

लाकडी काळे रेडे एक भव्य देव्हारा सदृश रथ ओढत नेतात. दोन्ही ची सजावट प्रचंड केलेली असते. त्या रथात , मृत व्यक्तीचा पारंपरिक वेषात सजवलेला देह ठेवायचा. गावातून मिरवणूक काढत, बांबूच्या घंटा वाजवत, तो रथ गोल गोल फिरवत ओढत न्यायचा स्मशानभूमी पर्यंत. तिथे दहन केल्यावर, गावाला आणि आलेल्यांना मोठे जेवण द्यायचे. ह्या सगळ्याचा खूप खर्च होतो. पण तो केलाच पाहिजे नाहीतर मृत व्यक्तीचा आत्मा हे जग सोडणार नाही. अरे देवा ! आणि नसेल त्या कुटुंबाकडे तेवढा पैसा तर? हरकत नाही. त्या मृत व्यक्तीचा देह एका सुंदरशा पेटीत घालून एका विशिष्ट जागी म्हणजे गावातील "पुरा प्रजापती" जवळ पुरून ठेवतात. पुरा म्हणजे मंदिर. गावचे असे अनेक देह तिथे पुरलेले असतात.

मग ते कुटुंब अंत्ययात्रेला पैसा जमवायला जास्ती जोराने सुरु करतो. पुरेसे पैसे जमल्यावर, नजीकच्या काळात मृत झालेल्या सर्व व्यक्तींची, सामुदायिक अंत्ययात्रा म्हणजे "नगाबेन" ठरवली जाते. पुजारी एक मुहूर्त काढून देतो. सर्व गावात दवंडी दिली जाते. त्या दिवशी, सगळा गाव वाजत गाजत पुरा प्रजापती पाशी जमतो. पुरलेले देह बाहेर काढतात. मंत्रोच्चार, प्रार्थना होते. मग पारंपरिक वेषात सजवून देह त्या रथात ठेवतात. आता सगळे देह एकाच रथात असल्यामुळे, अनेक रथ कोरून घडवायचे नाहीत, म्हणजे तो पैसा वाचला. मग ती मिरवणूक वाजत गाजत निघते. पारंपरिक संगीत जोडीला असते. गावचे सगळे लोक त्यात येतात. रस्त्यात जर चौक आले तर, त्या आत्म्यांना गोंधळात टाकण्यासाठी तो रथ गोलगोल फिरवतात. म्हणजे तो आत्मा रस्ता विसरेल आणि गावात परत न जाता स्वर्गात जाईल . अंत्य यात्रेत कोणीही रडायचे नाही. त्या पवित्र आत्म्याची सुटका झाली आहे. मग सामुदायिक दहन विधी होतो . तिथे पुन्हा प्रार्थना होतात. त्यानंतर सगळा गाव बारा दिवस सुतक पाळतो. मग पुन्हा त्या दहनाच्या जागी जाऊन , राख एका नारळात भरून समुद्रात सोडून येतात. एक सामुदायिक जेवणावळ होते. त्या मृत व्यक्तींचे पवित्र आत्मे हे जग सोडून गेले असे त्यानंतर मानतात.

बाप रे, हे सगळं ऐकून डोकं जडच झाले. हॉटेलवर परत आलो तर दोन बालीनीज तरुण, त्यांच्या पारंपरिक वेशात, एक बांबूचे सुंदरसे वाद्य वाजवत होते. आपल्यासारखेच रागदारी युक्त संगीत त्यांचेपण आहे. आडवे पोकळ बांबू नीट कापून, दोरीने बांधून मांडले होते. दोन बांबूच्या काड्या, त्यांच्या टोकाला एक गोल चकती होती, ती बांबूंवर हलकेच आपटून नाद निर्माण होत होता. संतूरचा बांबूतला भाऊ. सुंदर आणि मंजुळ नाद निर्माण करीत होते ते. शांत वातावरणात ते मंजुळ सूर भारावून टाकत होते.

--

ShareXWhatsAppEmail

Written by

कीर्ती वडाळकर

कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.

Comments